एकनाथ शिंदेंचा टोला, 'वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही त्यांना जमत नाही'

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. ‘वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही त्यांना जमत नाही’ - एकनाथ शिंदेंचा टोला

“जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय?” अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.

“जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात,” असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

या आरोप-प्रत्यारोपांची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर झाली.

नुकतेच ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटलं, “मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारच. जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय?”

त्यांच्या या टीकेला सडेतोड उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून दिलं.

ते म्हणाले, “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.”

शिंदे पुढे म्हणाले, “जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात.”

“चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही, त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलंच बरं," असंही ते म्हणाले.

ही बातमी एबीपी माझाने दिली.

2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या संपर्कात – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 20 आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील उर्वरित 13 आमदार संपर्कात असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना वेग आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सामंत यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच माझ्या संपर्कात आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

सामंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी म्हटलं, “एकमेकांच्या संपर्कात सगळेच असतात. तसेच एकनाथ शिंदेही माझ्या संपर्कात आहे. त्यामुळे उदय सामंत म्हणतात ते खोटं नाही.”

विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अजित पवार व्यवस्थित सांभाळत आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात मुख्यमंत्रिपदावरून कोणतीही स्पर्धा नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी ई-सकाळने दिली.

3. विषारी साप : मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान खर्गे यांनी कलबुर्गी येथे झालेल्या एका प्रचारसभेत हे वक्तव्य केलं होतं.

नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत, तुम्हाला प्रश्न पडेल की ते विष आहे की नाही. पण तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल, असं खर्गे यांनी म्हटलं होतं.

या वक्तव्यानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरणही दिलं. ते म्हणाले, मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएस यांच्या विचारसरणीबाबत बोलत होतो.

मात्र, खर्गे यांच्या वक्तव्यानंतर ते भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. काँग्रेस आज कशा प्रकारे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. हे शब्द खर्गेंचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचं आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली.

ही बातमी लोकमतने दिली.

4. बेस्ट बसमध्ये मोबाईलवर बोलण्यास बंदी

बेस्टनं बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवा नियम जारी केला आहे. बेस्टच्या बसेसमधून प्रवास करताना नागरिकांनी मोठ्या आवाजात फोन वर बोलता येणार नाही.

याशिवाय मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे यावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

प्रवाशांना बेस्टच्या बसेसमधून प्रवास करताना हेडफोन्स वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

बेस्टच्या बसेस ही सार्वजनिक सेवा आहे. यामुळं प्रवाशांना कसल्याही प्रकारची अडचण किंवा त्रास न होऊ देणं ही जबाबदारी आहे. एखाद्या प्रवाशाला दुसऱ्या प्रवाशाच्या गैरवर्तनामुळं त्रास होत असेल तर त्याच्यावर बॉम्बे पोलीस अॅक्ट 38/112 नुसार कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे..

बेस्टकडे प्रवाशांच्या यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर बेस्ट प्रशासनाकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

5. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात 5 राखीव खेळाडूंचा समावेश

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. हा सामना इंग्लंडमध्ये 7 ते 11 जूनदरम्यान होणार असून नुकतेच भारताने आपला संघ यासाठी जाहीर केला होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या संघात आणखी 5 जणांचा समावेश केला आहे. हे पाचही खेळाडू नवोदित असून त्यांना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.

यामध्ये ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सर्फराज खान, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे.

म्हणजे हे खेळाडू राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत इंग्लंडला जातील. अचानक एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याच्याऐवजी वरील खेळाडूंमधून एकाला संधी दिली जाते.

ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)