'वडिलांच्या सावलीतून बाहेर पड' असा सीरिजमध्ये संवाद; पण प्रत्यक्षात आर्यनच जेव्हा म्हणतो 'पापा है ना'

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुख खानची ओळख आहे. त्याचा मुलगा आर्यन खानने आता दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

त्याची पहिली सिरीज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' 19 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.

या सिरीजची सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. या शोची थिम बॉलिवूड आणि नेपोटिझमभोवती फिरते.

या सिरीजमध्ये एका फिल्मी घराण्यातून आलेली नायिका म्हणते की, 'कुणाच्या सावलीत जगणं हा सुद्धा एक मोठा संघर्ष असतो.'

त्यावर बाहेरच्या जगातून आलेला नायक म्हणतो की, 'वडिलांच्या सावलीतून बाहेर पड, तेव्हा कळेल बाहेर किती कडक ऊन आहे.'

गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत 'नेपोटिझम' हा शब्द खूप चर्चेत आला आहे.

जेव्हा आर्यन म्हणाला, 'पापा हैं ना''

जेव्हा आर्यन सिरीजच्या लाँचच्यावेळी पहिल्यांदा स्टेजवर आला, तेव्हा त्यानं शाहरुख खानचं नाव घेण्यास कोणताही संकोच बाळगला नाही.

आर्यनने मोकळेपणानं सांगितलं की, "गेल्या काही दिवसांपासून मी सतत प्रॅक्टिस करत होतो. मी इतका घाबरलेलो होतो की, माझं भाषणही टेलिप्रॉम्प्टरवर लिहून ठेवलं आहे, आणि जर इथे लाइटची समस्या झाली, तर मी कागदावरही भाषण लिहून आणलं आहे अन् तेही टॉर्चसह आणि तरीही जर चूक झाली… 'तो पापा हैं ना!'"

काही लोकांना आर्यनच्या या सांगण्यात सुपरस्टार शाहरुख दिसला, तर काही म्हणाले की, तो सुपरस्टार नव्हे, तर वडील शाहरुख यांच्याबद्दलच बोलत होता.

म्हणजे लोक आता आर्यन खानला फक्त नेपोकिड म्हणून पाहणार की त्याच्या कामावरून देखील?

फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट गिरीश वानखेडे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आर्यन खानने एक धाडसी शो बनवला आहे. त्यासाठी मी त्याला पूर्ण मार्क देतो. त्याचा पहिला शो चित्रपटसृष्टी आणि नेपोटिझमवर मजेशीर भाष्य करणारा आहे. त्याला हवं असतं तर तो एक सुरक्षित मार्ग निवडू शकला असता."

"तो अभिनेता म्हणूनही पदार्पण करू शकला असता. नेपोटिझमची चर्चा नेहमीच राहील. अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होतो, हे स्वाभाविक आहे. त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो हे बरोबर आहे, परंतु स्वतःची क्षमता मात्र त्यांना दाखवून सिद्ध करावी लागेलच."

अनन्या आणि सिद्धांत आले होते आमने-सामने

दर्शकांमध्येच नाही, तर चित्रपटसृष्टीतल्या लोकांमध्येही नेपोटिझमबाबत वेगवेगळी मतं आहेत, जी मनोरंजक आहेत.

2022 मध्ये एका मुलाखतीत अभिनेत्री अनन्या पांडेनं सांगितलं होतं की, तिचे वडील आणि अभिनेता चंकी पांडे यांना कॉफी विथ करणसारख्या शोमध्ये कधीही बोलावलं नाही.

त्यावेळी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. 'जिथे आमची स्वप्नं पूर्ण होतात, तिथून त्यांचा संघर्ष सुरू होतो,' असा टोला त्यानं लगावला होता.

जे चित्रपटसृष्टीशी निगडित घराण्यातून येतात, त्यांच्या संघर्षाची व्याख्या बाहेरून आलेल्यांपेक्षा खूपच वेगळी असते, असं सिद्धांतचं म्हणणं होतं.

स्वरा भास्कर म्हणते, 'नेपोटिझम आहे, पण माझ्याकडे प्रिव्हिलेजेस आहेत'

चित्रपटसृष्टीत नेपोटिझम आहे, हे अभिनेत्री स्वरा भास्कर देखील मानते.

बीबीसीशी बोलताना ती म्हणाली होती की, "मोठ्या स्टार्सच्या मुलांना ज्याप्रकारे लाँच मिळतो तो मला मिळाला नाही, हे सत्य आहे. जर एखाद्या स्टारच्या मुलाला पुढे यायला दोन वर्षे लागत असतील तर त्यासाठी मला दहा वर्षे लागतात.

पण माझ्याकडे इतर बऱ्याच सुविधा आहेत, ज्या कदाचित एखाद्या छोट्या गावातून आलेल्या मुलीकडे नसतील. प्रत्येक इंडस्ट्रीत किंवा क्षेत्रात लोकांना नेपोटिझमचा सामना करावा लागतो."

गिरीश वानखेडे म्हणतात की, आर्यन खानसारख्या लोकांना त्यांच्या पालकांचा आधार आहे, पण अनेक स्टारकिड्स असतात जे पुढे जाऊ शकत नाहीत.

कारण खरी कसोटी असते, ती म्हणजे टॅलेंट आणि प्रेक्षकांची मान्यता.

देव आनंद ते सुनील शेट्टी- ज्यांची मुलं हिट होऊ शकली नाहीत

आर्यन खानच्या पहिल्या वेब सिरीजचंच उदाहरण पाहा, एका बाजूला मुख्य भूमिकेत चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी नसलेले लक्ष्य आणि सहर आहेत, तर दुसऱ्या बाजूला बॉबी देओल आहे.

धर्मेंद्रने काही वर्षांपूर्वी आपल्या मुलांना सनी आणि बॉबीला मोठ्या धूमधडाक्यात लाँच केलं होतं. सनी बेताब नंतर यशस्वी झाला, पण बॉबी सुरुवातीच्या यशानंतर गायबच झाला होता.

बॉबीच्या यशाचा नवा टप्पा म्हणजे त्याच्या करिअरची दुसरी इनिंग. हे यश त्याला रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'सारख्या चित्रपटातून पुन्हा मिळालं.

रणबीरचा उल्लेख आलाच आहे, तर कपूर कुटुंबाला हिंदी सिनेमाची 'फर्स्ट फॅमिली' म्हटलं जातं.

पृथ्वीराज कपूरने सुरू केलेली परंपरा त्यांच्या मुलांमार्फत- राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर आणि नंतर ऋषी कपूर, करिश्मा आणि करिना कपूर यांनी पुढे नेली.

पण या कुटुंबात राजीव कपूर यांचंही एक उदाहरण आहे. राज कपूर यांनी आपल्या मुलाला म्हणजे राजीव कपूरला राम तेरी गंगा मैली या हिट चित्रपटातून मोठा प्लॅटफॉर्म दिला.

पण काही चित्रपटांनंतर राजीव कपूर कुठे गायब झाले, हे कोणालाही कळलं नाही.

अनेक वर्षांनंतर लोकांना थेट त्यांच्या निधनाचीच बातमी समजली.

संजय दत्त, अनिल कपूर, आलिया भट्ट यांना यश मिळालं, तर राजकुमार यांचा मुलगा पुरु राजकुमार, देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद, मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी, माला सिन्हा, हेमामालिनी, सुनील शेट्टीची मुलं ज्यांचे सिनेमेच चालले नाहीत.

'नेपोटिझमचं क्रूर सत्य'

काही दिवसांपूर्वी करण जोहरचा एक व्हीडिओ समोर आला होता, ज्यात त्यानं आपल्या मुलाला 'नेपोकिड' लिहिलेला टी-शर्ट घातला होता.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अजय ब्रह्मात्मज या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतात, "नेपोटिझमचं क्रूर सत्य एवढ्या मजेशीर पद्धतीने दाखवू नका की त्याचा अर्थच गमावून बसू. चित्रपटसृष्टीतील लोक हेच करत आहेत. कधी अवॉर्ड शोमध्ये यावर हसून मस्करी करतात तर कधी निगरगट्टपणे ते हसत स्वीकारतात.

शक्तिशाली लोकांना नेहमीच याचा फायदा होतो आणि स्टारकिड्सलाही यामुळे ताकद मिळते. मागील पिढीने मेहनत केली, तर त्याचा फायदा त्यांच्या वंशजांना म्हणजे मुलांना मिळायला हवा, असे तर्क चुकीच्या प्रवृत्तींना बरोबर ठरवतात."

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर नेपोटिझमवरील चर्चा अधिक तीव्र झाली.

जेव्हा निर्माता जी.पी. सिप्पींनी आपला मुलगा रमेश सिप्पी यांना 70च्या दशकात लाँच केलं आणि नंतर शोले बनवला, तेव्हा नेपोटिझमवर एवढी चर्चा झाल्याचं आठवत नाही.

असंच, 2000 साली जव्हा हृतिक रोशनची क्रेझ आली, तेव्हाही हा शब्द फारसा ऐकायला मिळाला नाही.

नवाजुद्दीन चाहत्यांवरच प्रश्न उपस्थित करतो

अलीकडच्या वर्षांत या शब्दावर सर्वात जास्त वाद 2017 मध्ये झाला होता. त्यावेळी कंगना रनौतने करण जोहरच्या टीव्ही शोमध्ये त्याला 'नेपोटिझमचा ध्वजवाहक' (फ्लॅगबिअरर ऑफ नेपोटिझम) म्हटलं होतं.

चित्रपट अभिनेता मनोज बाजपेयी यांना ही निरुपयोगी चर्चा वाटते.

नुकतंच 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "चित्रपटसृष्टी हा खासगी उद्योग आहे. कोणताही व्यक्ती किंवा खासगी समूह चित्रपटात पैसा गुंतवतो. पैसा त्यांचा आहे, त्यांना जे करायचं आहे ते करतात. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा चित्रपट दाखवणारे भेदभाव करतात. जर एखाद्याला 100 स्क्रीन दिल्या जात असतील, तर मला 25 स्क्रीन तरी द्या."

"जो जितका पॉवरफुल असतो, त्यानुसार तो आपली ताकद दाखवतो. हा खेळ तर सर्वत्रच चालतो. निष्पक्षतेची मागणी फक्त एका उद्योगातून करता येणार नाही," असं मनोज वाजपेयी म्हणतो.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची जबाबदारी प्रेक्षकांवर टाकतो.

बीबीसीशी बोलताना तो नेपोटिझमबाबत म्हणाला की, "तुम्ही लोकच नेपोटिझमबाबत बोलत राहता. एखाद्या स्टारचा मुलगा किंवा मुलगी अ‍ॅक्टर होऊ इच्छित असेल, तर त्यासाठी ते मेहनतही करतात.

"असं नाही की झोपेतून उठून ते अभिनय करायला आलेत. जेव्हा एखादा स्टारकिड लाँच होतो, तेव्हा चित्रपट पाहायला तुम्हीच जाता. तो अभिनेता किंवा अभिनेत्री केवळ आपलं काम करत आहेत."

हॉलिवूडमध्येही यावर खूप चर्चा होते.

गॉडफादर चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांची मुलगी आणि निर्माती सोफिया कोपोलाबद्दल वेबसाइट व्हाइसने आपल्या लेखात म्हटलं होतं की,'क्लिअर कट केस ऑफ नेपोटिझम गॉन वाइल्ड ऑन स्टिरॉइड्स'.

विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांना ऑस्कर मिळाले आहेत.

आर्यन खानच्या सिरीजकडे आपण परत येऊयात. महत्त्वाचं म्हणजे, आपल्या पहिल्या सिरीजबरोबर आर्यन खान आणि नेपोटिझमची चर्चा सुद्धा ट्रेंड करत आहे.

सिरीजच्या ट्रेलरमध्ये एक संवाद आहे, बॉलिवूड स्वप्नांचं शहर आहे, पण हे शहर सर्वांचं नसतं. या स्वप्नांच्या जगात काही लोक हिरोच्या घरात जन्म घेतात आणि काही लोक स्वतः हिरो म्हणून जन्म घेतात.

आता आर्यन खानला त्याच्या स्वतःच्या सिरीजमधील या संवादाच्या कसोटीवरही चाचणीला उभं राहावं लागेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.