You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पावसाचा हाहाकार पाहा 11 फोटोंमधून, कुठे पाणी तुंबलं तर कुठे शेतमालाचं नुकसान
यंदा मान्सून नेहमीपेक्षा तब्बल 8 दिवस आधी दाखल झाला आहे. दरवर्षी साधारण 20 मेपर्यंत अंदमान-निकोबार आणि 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे यावेळी 13 मे रोजीच निकोबारमध्ये दाखल झाले होते.
यापूर्वी 2009 साली मान्सूनने लवकर दाखल झाला होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी महाराष्ट्राच्या काही भागात, संपूर्ण गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात मान्सून दाखल झाला असून पुढचे 3 दिवस मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
26 मे रोजी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं, मालमत्तेचं नुकसान झालं, तर काही ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली.
राज्यात ठिकठिकाणी पावसामुळे नेमकी काय परिस्थिती झाली हे पाहूया फोटोंच्या माध्यमातून.
मुंबईत 12 दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने सोमवारी (26 मे) नागरिकांची चांगली त्रेधातिरपीट उडवली.
वरळी ते मरोळ या लाइनचे (अॅक्वा लाइन) काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, मुंबईच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोच्या वरळीतील आचार्य अत्रे स्थानकात पाणी शिरले.
आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच्या छतातून पाणी खाली कोसळत होते. छतातून कोसळणाऱ्या पाण्यामुळे स्टेशन जलमय झाले होते. प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता.
अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणकडे सरकला आहे. त्यामुळं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
तर सातारा, कोल्हापूरला घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच रायगडला ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.
मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील मरळगोई बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी उत्तम नामदेव जगताप यांनी पाच एकरावर अंदाजे चार लाख रुपये खर्च करत उन्हाळी कांद्याचे पीक घेतले. शेतामध्ये पोळी (गंज) करून झाकून ठेवलेला हा कांदा संततधार पावसाने सडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पावसामुळे ठप्प झाली आहे. फुरूस इथं पुलाचं काम सुरु होतं. त्या ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या (27 मे) रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. रविवारी (25 मे) सांगली जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पुलाची पातळी 15 फुटांवर गेल्यानं सांगलीवाडीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर, कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने म्हैसाळ येथील बंधारादेखील पाण्याखाली गेला आहे.
तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी (25 मे) घडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामं करण्यात आलं आहे. तसंच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आलं आहे.
या घटनेमुळे सिन्नर शहरातील काही रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे बसस्थानकातील सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अधिकृतरित्या समजू शकलेले नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या अतिवृष्टी ग्रस्त ठिकाणांची पाहणी केली.
बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.
इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)