You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी किती पाणी प्यायला हवं?
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
किडनी हा मानवी शरीरातील एक महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीवर शरीराला निरोगी ठेवण्याच्या अनेक जबाबदाऱ्या असतात.
किडनीद्वारे आपल्या शरीरात असणारे द्रव पदार्थातील अनावश्यक घटक आणि अतिरिक्त पाणी गाळले जाते म्हणजेच स्वच्छ केले जाते. त्यानंतर ते मूत्राद्वारे शरीरातून बाहेर फेकले जाते.
किडनी निरोगी ठेण्यासाठी डॉक्टर विविध सल्ला देत असतात. यात मिठाचे संतुलित प्रमाण, साखरेचा अतिवापर टाळणे यासह वैद्यकीय सल्लाशिवाय पेनकिलर्सचा वापर टाळणे असे सल्ले डॉक्टर देत असतात.
किडनीवर जास्त ताण येऊ नये यासाठी इतर अनेक उपायही सुचवले जातात. यात उत्तम किडनीसाठी दररोज पाणी पिणे आवश्यक असल्याचंही म्हटलं जातं.
पण दररोज किती पाणी प्यायला हवं? त्याचं प्रमाण किती असायला हवं? या लेखाच्या माध्यमातून आपण अशा विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात.
किडनी आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइटचा समतोल राखण्याचे काम करते. ती सोडियम आणि पोटॅशियमसारख्या घटकांचे प्रमाण नियंत्रित करते.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजीचे माजी अध्यक्ष आणि जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे कार्यकारी संचालक डॉ. विवेकानंद झा हे किडनीशी संबंधित आजारांचे तज्ज्ञ आहेत.
ते म्हणतात, "किडनी अशा अनावश्यक गोष्टी शरीराबाहेर टाकते, ज्या आपण आहार किंवा इतर मार्गांनी घेतो."
डॉ. विवेकानंद झा सांगतात, "किडनी शरीरात विविध प्रकारचे हार्मोन्स तयार करते, त्यामध्ये रक्त तयार करणारं हार्मोन, रक्तदाब नियंत्रित करणारं हार्मोन आणि इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवणारं हार्मोन आदि गोष्टींचा समावेश आहे."
आपल्या शरीरात मेटॅबॉलिझमशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेसाठी इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल असणं अत्यंत आवश्यक आहे.
उदा. हृदयातील प्रत्येक पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सचं ठराविक प्रमाण गरजेचं असतं.
इलेक्ट्रोलाइट असंतुलित झाल्यास मेंदूच्या कार्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. स्नायूंची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि नर्व्हस सिस्टिमवरही परिणाम होऊ शकतो.
बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलमधील किडनीविकार तज्ज्ञ डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात, "जर किडनी नीट काम करत नसेल, तर व्हिटॅमिन डी घेण्याचाही काही उपयोग होणार नाही. अशा स्थितीत तुम्ही कितीही व्हिटॅमिन डी घेतलं तरी शरीराला त्याचा लाभ मिळणार नाही."
किडनीला शरीरातील एक प्रकारचं 'व्होल्टेज स्टॅबिलायझर' असंही म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास, किडनी ते अतिरिक्त पाणी शरीराबाहेर टाकते.
निरोगी किडनीसाठी दररोज किती पाणी प्यावे?
डॉ. विवेकानंद झा सांगतात, "किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे, याचं काही ठराविक असं प्रमाण नाही. आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे शरीरच आपल्याला सांगत असतं. तहान लागणे हाच त्याचा संकेत असतो."
ते पुढे सांगतात की, शरीरातून पाणी अनेक मार्गांनी बाहेर पडत असते, जसे की घाम किंवा श्वासावाटे. याशिवाय काही अशा प्रक्रियाही असतात ज्या दिसत नाहीत, पण त्यामधूनही पाणी शरीराबाहेर पडतं.
अशा परिस्थितीत एखाद्या प्रौढ व्यक्तीसाठी किमान 700 ते 800 मिलिलीटर पाणी आवश्यक असतं.
तरीही शरीराला लागणारी संपूर्ण पाण्याची मात्रा केवळ साधं पाणी पिऊनच मिळत नाही. यासह दूध, फळांचा रस किंवा ताक यांसारख्या द्रव पदार्थांद्वारेही शरीरात पाणी जात असतं.
एखाद्या व्यक्तीला किती पाण्याची गरज आहे हे त्याच्या वयावर, शारीरिक हालचालींवर आणि वातावरणावर अवलंबून असतं, हे देखील लक्षात घ्यायला हवं.
जर एखादी व्यक्ती उष्ण हवामानात राहत असेल, तर त्याला अधिक पाण्याची गरज भासेल.
दिल्लीच्या पटपडगंज येथील मॅक्स हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. शैलेश चंद्र सहाय सांगतात, "सामान्य माणसाला दररोज सुमारे तीन ते साडेतीन लिटर पाण्याची गरज असते. हे प्रमाण फक्त साध्या पाण्यातूनच मिळतं, असं नाही. तर, कुठल्याही स्वरुपातील द्रव पदार्थांमधून ही गरज पूर्ण होऊ शकते. आपण शरीरात पाण्याचा समतोल राखला, तर लघवीमध्ये संसर्गाची शक्यता देखील कमी होते."
"जे लोक हृदय किंवा किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी, अवयवांवर जास्त ताण येऊ नये म्हणून पाण्याचे प्रमाण थोडं मर्यादित केलं जातं."
डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात, "किडनी शरीरातील पाण्याचं प्रमाणही संतुलित ठेवते. जर तुम्ही जास्त पाणी पित असाल, तर किडनी ते बाहेर टाकेल, आणि कमी पाणी पित असाल, तर तेच पाणी शरीरात साठवून ठेवेल. त्यामुळे कोणी किती पाणी प्यावे, याचं कोणतंही निश्चित प्रमाण नाही. तरीही सामान्यतः एका निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यायला हवं."
शरीरातील पाण्याची गरज व्यक्तीच्या शरीराच्या आकारावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, लहान मुलांना प्रौढांच्या तुलनेत कमी पाण्याची गरज असते.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी सोप्या टिप्स
किडनी निरोगी ठेवण्याचा सगळ्यात मूलभूत मार्ग म्हणजे संतुलित आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि नियमितपणे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे.
डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात, "मध्य-पूर्वेतील देशांमध्ये किडनीचे आजार कमी आढळतात, कारण तिथे लोक कमी मिठाचा वापर करतात. पण भारतात बहुतांश लोक जास्त मीठ खातात, ज्याचा परिणाम किडनीवर होतो."
जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात मीठ किंवा साखर घेते, तेव्हा संतुलन राखण्यासाठी किडनीवर अधिक ताण येतो. हा ताण दीर्घकाळ राहिला, तर किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
याशिवाय, बरेच लोक दीर्घकाळ उच्च रक्तदाबाने ग्रस्त असतात. पण ते त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. डॉक्टरांच्या मते, उच्च रक्तदाबाचा थेट परिणाम किडनीवर होतो, कारण रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते.
म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवायला हवं.
डॉ. गरिमा म्हणतात, "मी हर्बल गोष्टींच्या विरोधात नाही, पण तुम्ही जे काही खात आहात ते डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने खा. दुकानातून स्वतः कोणतंही औषध खरेदी करू नका. विशेषतः पेनकिलर्स किंवा वेदनाशामक औषधं विनासल्ला खरेदी करणं टाळा, कारण ते किडनीला हानी पोहोचवू शकतात."
किडनी निरोगी ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे धूम्रपान टाळा, कारण तंबाखू आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा परिणाम थेट किडनीवर होतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.