झाशी : 20 नवजात बाळांना वाचवल्याचा दावा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?
- झाशीमध्ये घडलेल्या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
- शुक्रवारी रात्री या घटनेची माहिती मिळताच आदित्यनाथ यांनी रात्रीच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना घटनास्थळी पाठवलं.
- मुख्यमंत्री रात्रभर या घटनेवर लक्ष ठेवून होते आणि टीव्हीवरुनही माहिती घेत होते.
- आदित्यनाथ यांनी या घटनेत बळी पडलेल्या बालकांच्या मातापित्यांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे घोषित केले आहे.

फोटो स्रोत, Vishnukant Tiwari/BBC
उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये लागलेल्या आगीमुळे 10 बाळांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही बाळं जखमी झाली आहेत.
घटनास्थळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक पोहोचले असून ते तेथिल मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर एक्स प्लॅटफॉर्मवर दुःख व्यक्त केले आहे.
ही आग हॉस्पिटलच्या नवजात शिशू चिकित्सा कक्षात लागली होती. अजूनही येथे संरक्षण कार्य सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे.
एक्स हँडलवर लिहिलेल्या एका पोस्टमधे त्या म्हणतात, "उत्तर प्रदेशातील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज झाशी येथे अनेक नवजात बालकांच्या मृत्यूची बातमी अतिशय हृदयविदारक आहे. देव शोकाकुल पालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा क्रूर आघात सहन करण्याची शक्ती देवो. जखमी झालेले बालक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते."

फोटो स्रोत, @PMOIndia
पंतप्रधान कार्यालयानेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिलेल्या पोस्टवर या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
पीएमओने त्या पोस्टमध्ये लिहिलंय, “हृदयविदारक! उत्तर प्रदेशातील झांसी मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्याने झालेली दुर्घटना मन व्यथित करणारी आहे. ज्यांनी आपली मुलं गमावली आहेत त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो हीच देवाकडे प्रार्थना. राज्य सरकारच्या देखरेखीत स्थानिक प्रशासन बचाव कार्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.”

फोटो स्रोत, X
उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल एक्स पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात, “झाशीमधील मेडिकल कॉलेजमधील एनआयसीयूमध्ये झालल्या दुर्घटनेतील मुलांचा मृत्यू दुःखद आणि हृदयविदारक आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी युद्धस्तरावर बचावकार्याला संचलित करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व दिवंगत आत्म्यांना सद्गती आणि जखमींना लवकर आराम मिळो अशी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतो.”
आग कशामुळे लागली असावी?
झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी या घटनेत 10 बाळांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले, "घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री साडेदहा ते पावणेअकरा या काळात कदाचित शॉर्ट सर्किटमुळे एनआयसीयू विभागात आग लागली आणि दहा मुले दगावल्याची माहिती आहे. अजून मदत कार्य सुरू आहे. तेथे मदत कार्याचा चमू वेळेत पोहोचला आणि अनेक मुलांचा जीव वाचवण्यात आला. आयुक्त आणि डीआयजी यांच्या निरीक्षणाखाली एक तपास समिती नेमली असून तिचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल."
झाशीचे आयुक्त बिमल कुमार दुबे म्हणाले, "आगीतील जखमी बाळांना शक्य तितके सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. ते लवकरच बरे होतील."
भाजप आमदार राजीव सिंह परिचा म्हणाले, "ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. आगीत 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला, तर जवळपास 35 बाळांचा जीव वाचवण्यात आला. जखमी बाळांवर डॉक्टर शक्य ते सर्व उपचार करत आहेत. सरकार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांशी संपर्कात आहे. प्रथमदर्शनी आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसते."
तिहेरी तपास होणार- उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, "नवजात बाळांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही कुटुंबीयांसह नवजात बाळांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. या घटनेचा पहिला तपास प्रशासकीय स्तरावर आरोग्य विभाग करेल. यानंतर दुसरा तपास पोलीस प्रशासन करेल. अग्निशमन विभागाची टीमही त्यात सहभागी होईल. तिसरी चौकशी दंडाधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आगीमागील कारणं तपासली जातील. तपासात काही त्रुटी आढळून आल्यास जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही यातून सोडले जाणार नाही. सरकार या बाळांच्या कुटुंबीयांसोबत आहे."
राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एक्सवर पोस्ट करत म्हणाले, “जनपद झाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात बाळांच्या वार्डात (एनआयसीयू) शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. यात काही बाळांचा मृत्यू झाल्याची बातमी खूप दुःखद आहे.”
केशव प्रसाद मौर्य यांनी जखमी बाळं लवकर बरे होण्यासाठी देखील प्रार्थना केली.


"फेब्रुवारीमध्ये या रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. जूनमध्ये मॉक ड्रिलही करण्यात आली होती. ही घटना कशी घडली आणि का घडली, याबाबत चौकशी अहवाल आल्यावरच आम्ही काही सांगू शकू. आगीत मृत्यू झालेल्या नवजात बाळांपैकी 7 मृतदेहांची ओळख पटली आहे, तर 3 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. या नवजात बाळांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाईल," असंही ब्रजेश पाठक यांनी नमूद केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ऑक्सिजनमुळे आग पसरली- मुख्य वैद्यकीय अधीक्षक
मुख्य वैद्यकीय अधीक्षक सचिन माहोर यांनी सांगितलं, "नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू वॉर्ड) 54 बाळांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अचानक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये आग लागली. यानंतर ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु या ठिकाणी जास्त ऑक्सिजन असल्याने आग वेगाने पसरली. अनेक नवजात बाळांना वाचवण्यात यश आले आहे. या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला, तर जखमी बाळांवर उपचार सुरू आहेत."
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन आदित्य यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "अनेक नवजात बाळांचा मृत्यू झाला आणि अनेक बाळं जगण्यासाठी लढा देत आहेत. आगीत जी बाळं 40 टक्के भाजली आहेत त्यांना संसर्ग होऊ शकतो, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यांना वाचवणं हेच सर्वात मोठं लक्ष्य आहे."
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
रुग्णालयात आग लागल्यानंतर जाळी तोडून नवजात बाळांना बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्यांचं बाळ सापडत नसल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
आणखी एक प्रत्यक्षदर्शी कृपाल सिंग राजपूत म्हणाले, “मी बाळाला दूध पाजण्यासाठी वार्डात गेलो होतो. तेव्हा एक महिला कर्मचारी धावत आल्या. त्यावेळी त्यांच्या पायाला आग लागली होती आणि त्या किंचाळत होत्या. आम्ही जवळपास 20 बाळांना तेथून सुखरूप बाहेर काढलं आणि रुग्णालयाच्या नर्सकडे दिलं."

“आग लागलेल्या वॉर्डात काही बाळं ऑक्सिजनवर होते, तर काहींची प्रकृती गंभीर होती. आम्ही त्या बाळांना उचलून सुरक्षितपणे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले. जेणेकरुन ते बाळ ज्याचे असेल त्याला ते सुखरूप मिळेल. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वॉर्डातील मशिन जास्त गरम झाल्याने बाळांचा मृत्यू झाला," असंही त्यांनी नमूद केलं.
ऋषभ यादव नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, येथे खूप गोंधळ उडाला होता. आग लागली तेव्हा येथे जवळपास 50 बाळं असावीत. लोक बाळांना घेऊन आपत्कालीन दरवाजाकडे धावत होते.
काही कुटुंबांना तर त्यांचं बाळ कुठं आहे हेही माहिती नाही. प्रशासनाने त्यांना माहिती द्यायला हवी, असंही या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
अखिलेश यांची योगी आदित्यनाथांवर टीका
उत्तर प्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अखिलेश एक्सवर लिहिलेल्या पोस्टवर म्हणतात, “झाशी मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्यामुळे 10 मुलांचा मृत्यू आणि अनेक मुलांच्या जखमी होण्याची बातमी अतिशय दु:खद आणि चिंताजनक आहे. सर्वांना माझी श्रद्धांजली. ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ मध्ये आग लागल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
अखिलेश म्हणतात, “आरोग्य व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं हे प्रकरण आहे किंवा कमी दर्जाच्या ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचं. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या सर्व लोकांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी.”
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना अखिलेश म्हणाले, “मुख्यमंत्रीजी, निवडणुकीचा प्रचार सोडून सगळं ठीक असल्याचे खोटे दावे सोडून आरोग्य क्षेत्रातील स्थितीवर लक्ष द्यायला हवं, ज्यांनी आपली मुलं गमावली आहे ते कुटुंबियच हे दु:ख समजू शकतात. ही सरकारीच नाही तर नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. निवडणुकीचं राजकारण करणारे या संकटसमयी या प्रकरणाची योग्य चौकशी करतील.”
“उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने या आगीत होरपळलेल्या मुलांना जागतिक पातळीवरील उपचार उपलब्ध करून द्यायला हवेत. ज्या कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत, त्यांना एक-एक कोटी रुपयांची मदत नुकसानभरपाई म्हणून करावी.” अशी मागणीही त्यांनी केली आहे
त्याआधी समाजवादी पक्षाच्या मीडिया सेलने त्यांच्या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील भाजप सरकार या घटनेसाठी जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, X
नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर बसपाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शोक व्यक्त केला आहे.
मायावती यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “युपीच्या झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये आग लागून घडलेल्या भीषण घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दु:खद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेवर लोकांचा रोष आणि आक्रोश स्वाभाविक आहे. या घटनेला जबाबदार व्यक्तींना त्यांच्या निष्काळजीपणासाठी कठोर कायदेशीर शिक्षा होणे आवश्यक आहे.”
पुढे त्या लिहितात, “अशा घटनांची भरपाई करणे अशक्य आहे, तरीही सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करावी.”
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











