You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधींच्या पोरबंदरमध्ये मोदी लोकप्रिय का? काय वाटतं इथल्या लोकांना?
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
- Reporting from, पोरबंदर
जयेश 34 वर्षांचा तरुण आहे आणि त्याचं मूळ गाव पोरबंदर आहे. सध्या तो कामानिमित्त अहमदाबादमध्ये राहतो. त्याची तक्रार आहे की पोरबंदरचा विकास जितका व्हायला हवा तितका झालेला नाही.
जयेश सकाळी-सकाळी त्याच्या मित्रांसोबत समुद्रावर पोहायला आला होता. त्याला जेव्हा विचारलं की, मागच्या 27 वर्षांपासून हा भाजपचा गड आहे, पोरबंदर बद्दल तुला काय वाटतं?
यावर जयेश म्हणतो, "माझ्या कुटुंबातले अर्ध्याहून जास्त लोक ब्रिटनमध्ये राहतात. मी त्यांना भारतात येण्याविषयी विचारतो तेव्हा ते म्हणतात की, इथं येऊन आम्ही काय करणार? दहा वर्षांपूर्वी रस्त्यावर खड्डे होते, आजही ते त्याच स्थितीत आहेत. इथं ना ही काही बदलतं ना विकास होतो."
चाळीशी गाठलेले धर्मेश पटेल शेअर ब्रोकर म्हणून काम करतात. त्यांचं म्हणणं आहे की, मोदींनी अहमदाबादचा कायापालट केलाय पण पोरबंदर मध्ये तर काहीच झालेलं नाही. ते सांगतात की, "इथं जे उद्योग होते ते सुद्धा बंद पडलेत. ते परत सुरूच झाले नाहीत. पोरबंदरमध्ये काहीच झालेलं नाहीये."
पहिल्या नजरेत पोरबंदर भारतातल्या इतर शहरांप्रमाणेच वाटतं. इथं बहुतांश इमारती जुन्या आहेत. या इमारती बघून बनारसची आठवण येते.
'पोरबंदरचा विकास झाला नाही याला मोदी जबाबदार नाहीत'
पंचेचाळीस वर्षीय नट्ठा भाई स्विमिंग कोच आहेत.
त्यांना मोदींविषयी विचारलं असता ते सांगतात, "इथं बराच काळ काँग्रेस सत्तेवर होती. 1995 पासून इथं भाजप सत्तेवर आहे. मात्र त्यांनीही पोरबंदरसाठी काही केलेलं नाही. हे गांधीजींचं जन्मगाव आहे, इथं काहीतरी खास असायला हवं होतं. यांनी समुद्र किनाऱ्याची दुरुस्ती केलीय. फिरण्यासाठी ठिकाणं आहेत पण पोटापाण्याचं काय, रोजगारासाठी काहीच केलेलं नाही."
ते पुढं सांगतात की, "पूर्वी इथं बरेच उद्योगधंदे होते, पण आता ते सगळंच बंद झालंय. लोकांना त्यांचं पोटपाणी भरण्यासाठी रोजगार हवाय, पण इथं काहीच नाहीये. मच्छीमारही अडचणीत आलेत."
जिग्नेश पटेल पोरबंदरमध्ये पॅथॉलॉजी लॅब चालवतात. ते त्यांच्या पत्नीसोबत किंजल पटेलसोबत चौपाटीवर (बीच) आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यावर जिग्नेश पटेल सांगतात, "मी सरदार पटेल यांचा आदर करतो. त्यांनी संस्थानांचं विलिनीकरण केलं. हे एक मोठं काम होतं. मोदी सत्तेवर आल्यानंतरही संपूर्ण देशात हेच काम सुरू झालं. हे फक्त गुजरातविषयी नाहीये. पोरबंदरच्या विकासासाठी पैसे तर येतात, पण ते दुसरीकडे कुठे जातात का, हे बघायला हवं."
ते म्हणतात, "पोरबंदरमध्ये भलेही विकास मंदावलाय, पण यात मोदींचा काहीएक दोष नाहीये. मोदींनी पटेलांचा एवढा उंच पुतळा उभारलाय. यामुळे आमची प्रतिष्ठा वाढलीय."
60 वर्षांचे अशोक सिंग रिक्षाचालक आहेत. ते सांगतात की, सरकारने पोरबंदरकडे लक्ष द्यायला हवं. इथं लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवण्यासाठी बरंच काही करण्याची गरज आहे.
अशोक सिंह म्हणतात की, पोरबंदरमध्ये गांधींचा वारसा आहे. तो जपण्यासाठी नरेंद्र मोदींनी काम करायला हवं. जेणेकरून बापूंना समजून घेण्यासाठी मदत होईल.
पोरबंदरमध्ये भाजप आणि काँग्रेसला आपचं आव्हान
भाजपचे बाबूभाई भीमाभाई बोखरिया 2012 पासून पोरबंदरमधून विधानसभेत निवडून जात आहेत.
मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या अर्जुन मोढवाडिया यांचा पराभव केलाय. दोघेही मेर जातीचे आहेत. मेर स्वतःला राजपूत समजतात. आणि मेर लोक ओबीसी आहेत. जातीय समीकरण बघितलं तर लक्षात येईल की, इथं मेर जातीची मतं सर्वाधिक आहेत.
बाबूभाई बोखरिया सांगतात की, 74 हजार मतं माझ्या जातीची आहेत. यानंतर 32 हजार ब्राह्मण वोटिंग आहे. तर मच्छिमार समाजाचं 26 हजार वोटिंग आहे.
आम आदमी पक्षाने मच्छीमार समाजातील जीवन जंग यांना इथून उमेदवारी दिलीय. आम आदमी पक्षाच्या उमेदवारामुळे आपला पराभव होऊ शकतो अशी चिंता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना लागली आहेे.
लोकांना हिंदुत्वाची विचारधारा पटते आहे का ?
इथल्या लोकांच्या भाजप आणि मोदींविषयी जरी तक्रारी असल्या तरी त्यांना सत्तेत भाजपच येईल असं वाटतं.
गांधींजीच्या विचारसरणीचे पाईक असलेल्या लोकांना हिंदुत्वाची विचारधारा आवडू लागलीय का?
काहींच्या मते, गांधीजींनंतर गुजरातमधील ज्ञानपरंपरा संपत चाललंय. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ अच्युग याज्ञिक याला बौद्धिक गरीबी म्हणतात. पोरबंदरमध्ये भाजपने जो विजय मिळवलाय त्याला ते बौद्धिक गरिबीशी जोडतात.
ते सांगतात, 1960 मध्ये गुजरात राज्याची स्थापना झाली. याआधी इथला कारभार मुंबईतून चालायचा. गुजरातच्या स्थापनेपासून ते काँग्रेस पक्ष येईपर्यंत इथं संघाला काहीच करता आलं नाही. गुजरातमध्ये अनेक दंगली झाल्या. 1969 मध्ये सुद्धा दंगल घडली. तेव्हाही काँग्रेसचंच सरकार होतं आणि हितेंद्र देसाई मुख्यमंत्री होते.
दुसरी दंगल 1985 मध्ये झाली, तिसरी 1992 मध्ये आणि नंतर 2002 मध्ये. आरक्षणविरोधी आंदोलनेही झाली. यातलं पहिलं आंदोलन 1981 मध्ये तर दुसरं 1985 मध्ये झालं.
वरीष्ठ पत्रकार राजीव शहा म्हणतात त्याप्रमाणे, या दंगली आणि आरक्षणविरोधी आंदोलनाच्या बळावर भाजपने संपूर्ण गुजरात काबीज केला.
पण 2002 मध्ये जी दंगल झाली त्याचे पडसाद पोरबंदरमध्ये उमटले नव्हते. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमुळे विधानसभेत धार्मिक ध्रुवीकरण झालं असं म्हटलं जातं. पण तेव्हाही पोरबंदरमधून काँग्रेसचे अर्जुन मोढवाडिया विजयी झाले होते.
'हिंदुत्वाच्या राजकारणामुळे मोदी लोकप्रिय'
भानुभाई ओडादरा हे पोरबंदर जिल्हा न्यायालयात वकील आहेत.
ते सांगतात, "हिंदुत्वाच्या राजकारणामुळे मोदींना इथं लोकप्रियता मिळालीय. इथले ब्राह्मण आणि मच्छीमार भाजपला साथ देतात. हा मच्छिमार समाज गरीब आहे. त्यांना भीती घातली जाते की, तुम्ही मतदान केलं नाही तर पाकिस्तान तुमच्या बोटी जप्त करेल आणि पुन्हा कोणीही सोडवायला येणार नाही."
ते म्हणतात, "पाकिस्तानपासून आपलं संरक्षण करायचं असेल तर भाजपला मतदान करा असा प्रचार केला जातो. आणि मच्छिमार समजाला ही गोष्ट अपिलिंग वाटते. मात्र यंदा आम आदमी पक्षाने मच्छिमार समाजातीलच एकाला तिकीट दिल्याने भाजपला फटका बसू शकतो."
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून डाव्यांच्या राज्यात असो वा गांधीवादी राज्यात, भाजपला सत्ता मिळालीय. उदाहरण म्हणून बघायचं झालंच तर पश्चिम बंगालमध्ये मातीग्रा-नक्षलबारी परिसर असो नाहीतर गांधींचं जन्मस्थान पोरबंदर...भाजप सत्तेत दिसतं.
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)