योनी मार्गाशी संबंधित 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात...

फोटो स्रोत, EMMA RUSSELL
- Author, पॉला मॅकग्रा
- Role, हेल्थ चेक, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
स्त्री योनीबाबतचे बरेच समज-गैरसमज आहेत आणि सोशल मीडियामुळे तर अशा समजांना आणखीच खतपाणी मिळतं.
एका डॉक्टर महिलेने हे खोटे समज खोडून काढण्याचा विडाच उचलला. डॉ. जेन गुंटर असं त्यांचं नाव. त्या गेल्या 25 वर्षांपासून अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्या महिलांच्या आरोग्यविषयी नेहमीच आपली भूमिका मांडताना दिसतात. त्यामुळे त्यांना गंमतीने ट्विटरच्या निवासी स्त्रीरोगतज्ज्ञ असं म्हटलं जातं.
अलीकडेच सोशल मीडियावर एक दावा केला जातोय की, योनीमध्ये जेड एग्ज ठेवले की, "हार्मोनचं संतुलन, मासिक पाळीचं नियमन आणि मूत्राशयावर नियंत्रण" राहतं.
डॉ. जेन गुंटर यांनी हे दावे खोटे असल्याचं सांगत याविरोधात कंबर कसली. त्यांनी दाखवून दिलं की, हा प्रकार कोणत्याही प्राचीन चिनी परंपरेचा भाग नसून याला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.
गुंटर यांनी 'द व्हजायना बायबल' नावाचं पुस्तक लिहिलं असून हे अनेक देशांमध्ये सर्वाधिक खपाचं पुस्तक बनलं आहे.
या पुस्तकात त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी अत्यंत व्यावहारिक सल्ले दिले आहेत. या पुस्तकात त्यांनी योनिविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, EMMA RUSSELL
1) योनीचा प्रत्येक भाग जाणून घेणं आवश्यक आहे
योनी शरीराच्या आत असते. स्नायूंनी बनलेला हा मांसल भाग गर्भाशयाला बाहेरील जगाशी जोडतो. योनीचा जो भाग आपल्याला बाहेरून दिसतो किंवा जो आपल्या कपड्यांना स्पर्श करतो त्या भागाला व्हूल्वा किंवा स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय म्हणतात.
गुंटर म्हणतात की, चुकीचे शब्दप्रयोग होऊ नयेत यासाठी तुम्हाला योनीची परिभाषा, योनीसाठी वापरले जाणारे शब्द माहीत असणं आवश्यक आहे.
त्या पुढे म्हणतात की, "जेव्हा तुम्हाला योनी किंवा व्हूल्वा हा शब्द बोलताना अवघडल्यासारखं होतं तेव्हा त्यात काहीतरी गलिच्छ किंवा लज्जास्पद आहे असा त्याचा अर्थ होतो."
व्हूल्वाच्या बाहेरील भागास "पुडेंडा" असं म्हटलं जातं. पुडेंडा ही मेडिकल टर्म असून हा शब्द लॅटिन भाषेतील "पुडेट" या शब्दावरून घेण्यात आलाय. याचा अर्थ आहे लाज वाटणे.
पण असे शब्द वापरून स्त्रियांचं भावनिक खच्चीकरण होत असल्याचं गुंटर यांना वाटतं. शिवाय वैद्यकीयदृष्ट्याही याचा परिणाम होऊ शकतो. कारण नेमकी काय समस्या आहे याचं वर्णन करताना रुग्णाची अडचण होते आणि त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत.
2) योनी मार्गाची स्वच्छता
गेल्या 10 वर्षांमध्ये महिलांच्या मनोवृत्तीत बदल झाल्याचं गुंटर सांगतात. बऱ्याच जणी आपल्या योनी मार्गाला सुगंधित करण्यासाठी विविध उत्पादनं वापरतात. मागच्या काही वर्षात योनीमार्ग साफ करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नॉर्थ अमेरिकेत महिलांचं हे प्रमाण 57% पर्यंत आहे. यातल्या अनेक जणींना त्यांच्या सेक्शुल पार्टनरकडून अशी उत्पादनं वापरण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.
पण गुंटर सांगतात त्याप्रमाणे योनी मार्गाची स्वच्छता करण्यासाठी काहीही वापरण्याची गरज नाही.
त्या सांगतात की, "योनीची स्वच्छतेची स्वतःची एक यंत्रणा आहे."
अशी सुगंधित उत्पादने वापरू नये असा सल्लाही त्या देतात.
त्या म्हणतात, "ही उत्पादने योनीमार्गासाठी अत्यंत धोकादायक आहेत."

फोटो स्रोत, EMMA RUSSELL
पाण्याच्या वापराने देखील या नाजूक परिसंस्थेचा समतोल बिघडू शकतो. यातून लैंगिक संसर्ग होण्याची शक्यता बळावते. तसेच योनीमार्गाला वाफ देण्याच्या नव्या प्रवृत्तीमुळे बर्न्स होऊ शकतात.
त्यामुळे योनीचा बाह्य भाग स्वच्छ करण्यासाठी पाणी किंवा पीएच बॅलेन्स क्लिंजर वापरणं योग्य राहील.
साबण हा बेसिक असतो तर योनी भाग ऍसिडिक असतो. या भागात जर साबण वापरला तर या दोन्हींची रिऍक्शन होऊन योनी मार्गातील संरक्षणात्मक कवच निघून जाईल. रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे योनी कोरडी होते त्यावेळी कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइल वापरणं योग्य ठरतं.
योनीच्या पेशी प्रत्येक 96 तासांनी बदलत असतात. त्यामुळे तिथली त्वचा लवकर बरी होते.
3) योनीतील चांगल्या जीवाणूंची फौज
योनीमध्ये "चांगल्या" जीवाणूंची फौज असते, ज्यामुळे योनी मार्ग निरोगी राहण्यास मदत होते.
गुंटर सांगतात, "योनीतील जीवाणू योनीच्या परिसंस्थेला निरोगी ठेवण्याचं काम करतात."
वाईट जीवाणूंची वाढ थांबविण्यासाठी हे चांगले जीवाणू अम्लीय वातावरण तयार करतात. योनी कोरडी होऊ नये यासाठी म्युकस (श्लेष्मा) तयार करतात.
जीवाणूंचं संतुलन राहणं आवश्यक असतं, त्यामुळे अँटीबॅक्टीरियल वाइप वापरणं टाळा. योनी ओलसर असणे आवश्यक आहे, त्यामुळे हेअर ड्रायर वापरू नये असा सल्ला गुंटर देतात.
4) योनी मार्गावरील केस
सध्या योनी मार्गाच्या आसपासचे केस काढून टाकण्याचा नवा ट्रेण्ड आलाय. यासाठी बऱ्याच तरुणी, महिला बिकिनी वॅक्स, रेझरचा वापर करताना दिसतात.
मात्र हे सगळे केस जेव्हा शेविंग किंवा वॅक्सिंग करून काढले जातात तेव्हा या केसांची मुळे उघडी पडतात, दुखावली जातात असं गुंटर सांगतात.
शिवाय, शेविंग किंवा वॅक्सिंग करताना त्याभागावर कट जाऊ शकतो किंवा संसर्ग होऊ शकतो.
पण जर तुम्हाला योनिमार्गाच्या भागातले केस काढायचे असतील तर काही दक्षता घ्यावी लागेल. जसं की, या भागाचं वॅक्सिंग करताना वॅक्सची स्टिक बदलली जाते का, ते पहा. कारण इतरांना वापरलेल्या स्टिकने तुम्हाला वॅक्स लावलं जात असेल तर कोणताही संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

फोटो स्रोत, EMMA RUSSELL
तुम्ही रेझर वापरत असाल तर नवीन रेझर वापरा. ज्या दिशेने केसांची वाढ होते त्याच दिशेने रेझर फिरवा. नाहीतर केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात.
गुंटर सांगतात, "स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात."
"हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतो. तसेच इथले केस मज्जातंतूच्या टोकाशी जोडलेले असतात. साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे वेदनादायक असते."
5) वय वाढल्याने योनीमार्गावर होणारा परिणाम
खूप वर्षांच्या मासिक पाळीनंतर आणि मुलं झाल्यानंतर, अंडाशयात अंडी तयार होण्याची क्रिया मंदावते. त्याचा परिणाम मासिक पाळी ही थांबते. एस्ट्रोजेन या हार्मोनमुळे स्त्रिया प्रजननक्षम असतात त्याची पातळी कमी होऊ लागते. एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यावर त्याचा योनीवर परिणाम होतो.
रजोनिवृत्ती दरम्यान या भागात कोरडेपणा येऊ लागतो, परिणामी कोरडेपणामुळे सेक्स दरम्यान वेदना होऊ शकतो. हे थोडं त्रासदायक असतं पण यासाठी उपचार उपलब्ध आहेत.
गुंटर म्हणतात, "स्त्रियांनी त्रास सहन करण्याची काहीच गरज नाही. त्यांना या गोष्टी माहीत असायला हव्यात आणि ते खूप गरजेचं आहे."
संभोग केल्यावर योनी मार्ग व्यवस्थित राहण्यास मदत होते असं म्हणतात. पण यामुळे योनीच्या आतील ऊतींना सूक्ष्म आघात होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








