आकर्षक लोक इतरांपेक्षा अधिक कमाई करतात का?

फोटो स्रोत, Getty Images
केप टाऊनमधील फॅशन मॉडेल मरीके यांना अनेकदा ड्रींक्स इतर उत्पादनं मोफत मिळत असतात. तसंच, लाँच आणि इतर इव्हेंटची मोफत तिकिटंही मिळत असतात. पण का?
याचं अगदी सहज आणि सोपं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणजे त्यांच्या सुंदर दिसण्यामुळं.
"पण, हे योग्य नाही असं काही लोकांना वाटतं," असं मत त्या उंच, सडपातळ, लांब तपकिरी केस असलेल्या मॉडेलनं बीबीसी बिझनेस डेलीच्या कार्यक्रमात मांडलं.
"तुम्ही पाहिजे तसे आकर्षक दिसत असाल आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटत असेल, शिवाय जर तुम्ही तोच लूक कायम राहावा किंवा तसंच आकर्षक दिसत राहण्यासाठी परिश्रम घेत असाल तर, तुम्हाला अशा प्रकारच्या ऑफर आणि विशेष वागणूक किंवा महत्त्वं मिळू लागतं. मला वाटतं त्याचा स्वीकार करून त्याचा आनंद लुटायला हवा," असंही मेरीके म्हणाल्या.
सौंदर्यामुळं मिळणारं महत्त्वं किंवा होणारा पक्षपातीपणा हा हॉलिवूड, सोशल मीडिया आणि अगदी जाहिरात क्षेत्राच्याही सीमा ओलांडून इतर सर्वच ठिकाणी पोहोचला आहे. आपण हे मान्य केलं, अथवा नाही केलं तरीही तेचं खरं आहे. सुंदर किंवा आकर्षक लोकांसाठी इतर लोकांच्या तुलनेत जीवन हे अधिक सुकर आणि फायदेशीर बनलं असल्याचं संशोधनांवरूनही स्पष्ट होतं.
पण चांगले दिसणारे हे किती चांगले असतात? चला एक नजर टाकू.
सोशल मीडियाची शक्ती

फोटो स्रोत, Getty Images
या विषयावर चर्चा करण्यासाठी जगभरातील लोकांना सोशल मीडियावर आमंत्रित करण्यात आलं. याठिकाणी आकर्षक दिसणाऱ्या लोकांनीच, त्यांना त्यांच्या दिसण्यामुळं त्यांना कशाप्रकारे मोफत गोष्टी किंवा फायदे अथवा सवलती मिळतात, याबाबत माहिती दिली. एका महिलेनं तर असं सांगितलं की, तिला एका अशा नोकरीसाठी मुलाखतीला बोलावण्यात आलं होतं, ज्यासाठी ती पात्रच नव्हती. नियोक्ता किंवा एम्प्लॉयरला मी अधिक आकर्षक वाटली असेल, हे त्यामागचं कारण असावं असं मत त्या महिलेनं व्यक्त केलं होतं.
सोशल मीडियामुळं अनेक लोकांना घराबाहेरही न पडता उदरनिर्वाहासाठी कमाई करणं शक्य झालंय. मग ते पुरुष असो वा महिला. तेही केवळ त्यांच्या दिसण्यामुळं.
"इथं खरंच अशाप्रकारचे फायदे वाढलेले आहेत. त्यात इन्स्टाग्रामचा सर्वात मोठा वाटा आहे," असं मरीके सांगतात.
याठिकाणी ब्रँड्सची एकमेकांबरोबर स्पर्धा चाललेली असते. पारंपरिक माध्यमांपासून दूर गेलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची शर्यत सुरू असते.
"तुम्हाला एखाद्या ब्रँडकडून त्यांची अनेक उत्पादनं मोफत पाठवली जातात. तुम्हाला केवळ तुमच्या इन्स्टाग्रामवर ते ठरावीक ब्रँड शेअर करून, तरुणांना त्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा असतो," असं मरीके यांनी सांगितलं.
मरीके यांनी त्यांना रेस्तरॉच्या उद्घाटनासारख्या अनेक कार्यक्रमांसाठीदेखील आमंत्रित केलं जातं, असंही सांगितलं.
"तुम्हाला फक्त तिथं दिखावा आणि मज्जा करायची असते. यामुळं त्यांचा (आयोजकांचा) कार्यक्रम चांगला होतो. कारण, त्याठिकाणी आजूबाजूला सुंदर आकर्षक मुली त्या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचं दिसतं. त्यामुळं कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये हे सौंदर्य झळकत असतं."
वैयक्तिकरित्या अशाप्रकारे लोकांनी महत्त्वं देणं आणि मोफत मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे फ्रीबीज आवडत असल्याचं मेरीके यांनीही कबूल केलं.
"सुंदर आणि मॉडेल असण्यामुळं अशा प्रकारचे अनुभव आणि संधी मोफत मिळणं हे उत्तमच आहे. कारण मोठ्या शहरांमध्ये राहण्यासाठी तुम्हाला इतर खूप खर्च करावे लागत असतात."

फोटो स्रोत, Getty Images
मग, चांगले दिसणारे खरंच किती चांगले असतात?
डॅनियल हमरमेश युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधील कामगार अर्थशास्त्रज्ञ आहेत. अनेक वर्षांपासून सौंदर्यामुळं होणारा पक्षपातीपणा (सौंदर्याबाबतचे पूर्वग्रह) या संकल्पनेवर ते अभ्यास करत आहेत.
त्यांच्या मते, सुंदर लोकांना अधिक पैसे मिळतात, इतरांच्या तुलनेत बँकेचं कर्ज मिळवण्यात त्यांना कमी अडचणी येतात आणि त्यांना नोकरीच्या अधिक चांगल्या संधी आणि त्याचा अधिक चांगला मोबदला देऊ केला जातो.
"ज्यांच्याकडं आपण सुंदर किंवा चांगले दिसणारे म्हणून पाहत असतो, ते यश मिळवतातच. शिवाय ते जे काही काम करतात त्यातून त्यांना अधिक मोबदला मिळतो," असंही हमरमेश म्हणतात.
"आता विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा संबंध हा तसा सुंदर दिसण्याशी किंवा आकर्षक असण्याशी नाही. पण तरीही याठिकाणी तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचं ठरतच असतं. अगदी अर्थशास्त्रातही, चांगले दिसणारे अर्थशास्त्रज्ञ इतरांच्या तुलनेत अधिक कमाई करतात, हे काही अभ्यासांवरून समोर आलंय."
हमरमेश यांनी मांडलेल्या एका अंदाजानुसार, सुंदर दिसणारा एक कामगार हा त्याच्या संपूर्ण जीवनाचा विचार करता इतरांच्या तुलनेत 2 लाख 30 हजार डॉलर अधिक कमाई करत असतो. (तासाला 20 डॉलर वेतन गृहित धरून ही आकडेवारी मिळवली आहे)
त्यामुळं त्यांच्या मते, जर हेड फंड मॅनेजर किंवा इनव्हेस्टमेंट बँकरवर यांच्यावर हे उदाहरण लागू केलं तर, या क्षेत्रातील सुंदर दिसणाऱ्या आणि तुलनेत कमी सुंदर दिसणाऱ्यांच्या वेतनातील तफावत ही मोठी असण्याची शक्यता निर्माण होते.
चांगल्या दिसणाऱ्या लोकांमध्येदेखील लैंगिक आधारावर वेतनातली आणखी एक तफावत दिसून येते, हेही त्यांनी स्पष्ट केलं. सुंदर दिसणारे पुरुष हे सुंदर दिसणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक कमाई करतात हे, हमरमेश यांना अभ्यासातून आढळलं. कमी आकर्षक पुरुष हे आकर्षक महिलेच्या तुलनेत 10 टक्केच कमी कमाई करतात तर महिलांच्या बाबतीत हा आकडा 5 टक्के एवढा आहे.
व्यक्तिमत्त्वं, बुद्धिमत्ता, शिक्षण, वय, लैंगिकता आणि वंश अशा इतर घटकांचाही यावर परिणाम होतो हे हमरमेश मान्य करतात. मात्र त्यांच्या मते, या सर्वांच्या तुलनेत सौंदर्याचा परिणाम हा जास्त आणि वेगळ्या स्वरुपाता असल्याचा तर्क ते मांडतात.
"वरील सर्व घटकांचा विचार केला तरीही, नोकरीत किंवा कामात किती यश मिळणार? हे ठरवताना अधिक परिणामकारक ठरतो तो, सौंदर्यामध्ये असलेला फरकच."
चांगले दिसण्याची व्याख्या कशी करणार?

फोटो स्रोत, Getty Images
अनेकजण सौंदर्याची व्याख्या करणं अत्यंत कठीण आहे, असा युक्तिवाद करतात. मात्र, हमरमेश त्याच्याशी सहमत नाहीत. सुंदर दिसणारे लोक आणि तुलनेनं कमी आकर्षक दिसणारे लोक कोण आहेत, यावर बहुतांश लोकांचं एकमत होऊ शकतं असं ते म्हणतात.
"जर मी आणि तुम्ही एखाद्या रस्त्यावर फिरत असलो आणि रस्त्यावरील 10 लोकांकडे आपण पाहिलं, तर त्यापैकी एक किंवा दोनच लोक हे सुंदर दिसणारे असतात. अशावेळी ते सुंदर दिसणारे नेमके कोण आहेत, याबाबत बहुतांशवेळा एकमत होतं," असं ते म्हणाले.
सौंदर्यामुळं मिळणाऱ्या फायद्यावर ती व्यक्ती कोणत्या वंशाची आहे यामुळंही फार फरक पडत नाही, असंही ते म्हणतात.
"आज सौंदर्याबद्दलचा आपला दृष्टीकोन हा सर्व वंशातील लोकांसाठी सारखाच आहे. एखाद्या सुंदर दिसणाऱ्या आफ्रिकन स्त्रीकडे संपूर्ण जग सुंदर स्त्री म्हणूनच पाहतं. तसंच मत एखाद्या आशियाई किंवा कॉकेशियन महिलेबद्दलही असतं."
सुंदर चेहरे आणि लठ्ठपणाची भीती
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी सध्या बोटॉक्स आणि लिप फिलर्स अशा कॉस्मॅटिक सर्जरी लोकप्रिय ठरण्याचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतं.
पण आश्चर्याची बाब म्हणजे, यामुळं एखादी व्यक्ती अधिक सुंदर किंवा आकर्षक दिसू लागते, याच्याशी हमरमेश सहमत नाहीत.
"लोकांना वाटतं यामुळं त्यांचा फायदा होईल. पण चांगले कपडे, चांगली हेअरस्टाईल किंवा चांगला मेकअप अशा गोष्टीही ते करू शकतात. पण तसं असलं तरी, शांघायमधील महिलांवर केलेल्या एका अभ्यासानुसार हे स्पष्ट झालंय की, सौंदर्यावर अधिक खर्च करणाऱ्या महिला या कमी खर्च करणाऱ्या महिलांच्या तुलनेत अगदीच किंचित जास्त सुंदर दिसत असतात."
त्यानंतर जेव्हा सौंदर्य आणि नोकरी याचा विषय येतो तेव्हा लठ्ठपणा किंवा वजनावरून मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जातो, असं मत लेखिका एमिली लॉरेन डिक यांनी व्यक्त केलं.
बहुतांश देशांमध्ये असलेले कामगार कायदे हे वंश, लैंगिकता, धर्म, अपंगत्व, वय अशा कोणत्याही कामाशी संबंध नसलेल्या घटकांवरून होणाऱ्या भेदभावावर निर्बंध घालणारे आहेत. पण तरीही शारीरिक आकर्षकपणाचा मुद्दा आला की, त्याबाबत संरक्षण देण्यात आलेलं आढळत नाही, असं एमिली म्हणतात. त्यामुळं कामाच्या ठिकाणच्या धोरणांमध्येच बदल करण्याची गरज असून पक्षपातीपणा टाळण्यासाठी योग्य प्रशिक्षणही गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलंय.
"लठ्ठपणामुळं असणारी भीती आणि त्यामुळं केला जाणारा द्वेष हादेखील एकप्रकारचा वर्णद्वेषच आहे," असंही त्यांचं मत आहे.
"गुलामगिरीला सुरुवात झाली तेव्हा श्वेतवर्णीय महिलांना स्वतःला कृष्णवर्णीय महिलांपासून आपण वेगळ्या कसं हे सांगण्याचा मार्ग हवा होता. त्याचं उत्तर सडपातळ असणं हे होतं," असं त्या म्हणतात. एमिली यांच्या मते, जाहिराती आणि चित्रपटांमधून लठ्ठ लोकांची प्रतिमा "नावडते आणि मूर्ख किंवा मठ्ठ" अशी तयार करण्यात आलीय. त्यांच्याबद्दलच्या या समजामुळं किंवा गैरसमजाचा परिणाम होऊन, दैनंदिन जीवनात अनेक लोकांना छळ आणि अत्याचाराला सामोरं जावं लागू शकतं असं त्या सांगतात.
त्यांच्या मते, "लठ्ठ लोक हे इतरांच्या किंवा सडपातळ कर्मचाऱ्यांच्या इतकी कमाई करू शकण्याची शक्यता कमी असते, आणि त्याच दृष्टीकोन किंवा समजाचा थेट संबंध त्यांची नेमकी किंमत काय? याच्याशी असतो."
एमिली यांच्या या सिद्धांताला युकेच्या शेफिल्ड हल्लम युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासामुळं शास्त्रीय आधार मिळण्याची शक्यता आहे.
या अभ्यासात कंपनी किंवा नियोक्त्यांना (नोकरी देणारे) दोन सारखेच रिझ्यूम देण्यात आले. एकामध्ये लठ्ठ लोकांचे फोटो होते तर दुसऱ्या रिझ्यूममध्ये सडपातळ लोकांचे फोटो होते. त्यानंतरचा निकाल हा स्पष्टच होता. तो म्हणजे सडपातळ लोकांच्या बाजुनं झुकलेला होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजित आकडेवारीनुसार जगभरातील लठ्ठ लोकांचा आकडा हा एक कोटींच्या वर गेला आहे. त्यामुळं वजन आणि सौंदर्याबाबत नकळतपणे जो एक दृष्टीकोन किंवा समज तयार झालेला आहे, त्याला आव्हान देण्याची योग्य वेळ आलेली आहे.
बदलाचे वारे

फोटो स्रोत, Getty Images
सौंदर्याप्रती असलेला पक्षपातीपणा किंवा त्याला दिलं जाणारं अधिक महत्त्वं यात नवं काही नाही. अनेक पिढ्यांपासून आपल्यावर त्याचा परिणाम होत आलेला आहे. अगदी हॉलिवूडच्या स्टार्सपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांवरच तो दिसतो.
मात्र, दिसण्याबाबत समाजाचा हा जो दृष्टीकोन किंवा वेडेपणा आहे तो आता सर्वांच्या लक्षात येऊ लागला असून, फॅशन क्षेत्रामध्येही आता लोकांच्या अपेक्षांमध्ये बदल होऊ लागला आहे, असं मत मॉडेल मरीके यांनी व्यक्त केलं.
"आजच्या काळात लोकांना ज्यांची स्वत:ची अशी काहीतरी गोष्ट आहे, अशा कलाकार, मॉडेल किंवा अॅक्टरमध्ये अधिक रस आहे. ते कदाचित मॉडेलिंग आणि अॅक्टिंगशिवाय इतरही काही करत असतील आणि इतर गोष्टींचीही त्यांना आवड असेल. त्यामुळं आता व्यक्तिमत्त्वं अधिक महत्त्वाचं बनलं आहे."
"सध्या या इंडस्ट्रीमध्ये हाच ट्रेंड वाढत आहे आणि माझ्या मते ही अत्यंत खास बाब आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








