हॉटेलच्या खोलीत स्वतःच्या मुलाचा खून करून ती पळत होती, पण एका चुकीनं बिंग फुटलं

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रमोद आचार्य
- Role, बीबीसी मराठीसाठी
गोव्यातल्या एका हॉटेलमध्ये स्वतःच्याच मुलाचा खून करून पळ काढणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. सूचना सेठ असं या महिलेचं नाव आहे. तिने नेमकी ही हत्या का केली? कशी केली आणि सूचना सेठ नेमकी कोण आहे हे पेलीस तपासात समोर आलं आहे.
आपल्या चार वर्षांच्या मूलाच्या खूनाचा आरोप असलेल्या सूचना सेठने हॉटेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिस तपासात पुढे आलेली आहे.
कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथून तिला ताब्यात घेतल्यानंतर गोवा पोलिसांना तिच्या डाव्या हातावर धारदार वस्तूने आपली नस कापण्याचा केलेला प्रयत्न दिसून आला आहे.
सध्या गोव्यातील म्हापसा न्यायालयाने सूचनाला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे. तिच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 (खून), 201 (पुरावा नष्ट करणे) आणि गोवा बाल कायदा कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
सूचना सेठ कोण?
सूनचा सेठ मूळची पश्चिम बंगालमधील असून तिचा पती केरळचा आहे. दोघांचं 2010 साली लग्न झालं होतं. 2019 साली त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता. 2020 मध्ये दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केला.
ती मायंडफूल एआय लॅब या आर्टिफिशन इंटलिजन्ससंदर्भातल्या स्टार्टअपची सीईओ म्हूणून काम बघायची. खासगी जीवनात संघर्ष चालू असतानाही तिने व्यावसायिक जीवनात यश संपादन केलंय.

फोटो स्रोत, ANI
या दरम्यान घटस्फोटाची प्रक्रिया चालूच होती. गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नी एकमेकांशी बोलतही नव्हते.
मुलाची कस्टडी कोणाकडे असावी हा महत्त्वाचा प्रश्न होता. तात्पुरता तोडगा म्हणून न्यायालयाने दर रविवारी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात यावा, असा आदेश दिला होता. या विषयावर बेंगलुरूतल्या कौटुंबिक न्यायालयात बुधवारी (10 जानेवारी) रोजी निर्णय होणार होता.
मुलाचा ताबा त्याच्या पित्याकडे जाईल या विवंचनेतून तिने मुलाचा खून केला असा पोलिसांचा कयास आहे.
सूचनाला कसं पकडलं?
पोलीस खात्यातील सूत्रांनुसार मुलाचा खून केल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो फसल्यानंतर तिने मृतदेह बॅगमध्ये कोंबून हॉटेलमधून चेकआऊट केलं.
आपल्याला तातडीनं रस्तेमार्गे बेंगलुरुला जायचं आहे. आपल्याला एक गाडी उपलब्ध करून द्या असं तिने हॉटेल व्यवस्थापनाला कळविलं.
रस्तेमार्ग न जाता विमानाने बंगळुरुला गेल्यास प्रवास खर्चाच्या दृष्टीन स्वस्त पडेल असा सल्ला हॉटेल व्यवस्थापनाने सूचनाला दिला. तो तिने धुडकावला.
कार चालकाने प्रथम तिला 35 हजार रुपये भाडं सांगितलं. वाटाघाटीनंतर 30 हजार रुपये भाडं निश्चित झालं.
खोली सोडताना तिच्यासोबत मुलगा नसल्याचं हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आलं. त्यानंतर एका हाउस किपिंग स्टाफला खोलीत रक्ताचे थेंब आढळले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाचा संशय बळावला.

फोटो स्रोत, ANI
सूचनाचे हाताची नस कापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावेळी हे रक्त सांडले असावं असा पोलिसांना संशय आहे.
हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर धावपळ सुरु झाली. ज्या बॅगमध्ये मुलाचा मृतदेह सापडला त्या बॅगला चेक आऊट करताना तिने कुणालाही हात लावायला दिला नाही हेही समोर आले.
पोलिसानी तातडीने सूचना ज्या गाडीने बेंगळुरूसाठी रवाना झाली होती त्या टॅक्सीच्या चालकाला फोन केला.
सूचनाला या विषयी काहीही समजू नये म्हणून कलंगूटचे पोलीस निरिक्षक परेश नाईक यांनी कार चालकाशी गोव्याच्या कोंकणी भाषेत संवाद साधला आणि त्याला गाडी नजीकच्या पोलीस स्टेशनवर न्यायला सांगितली.
परेश नाईक यांच्या सूचनेनुसार चालकाने गाडी चित्रदुर्ग येथील पोलीस स्थानकात नेली. तिथं तिला मुलाबाबत विचारलं असता तिने स्पष्ट उत्तर द्यायचं टाळलं. प्रश्नांची सरबत्ती वाढल्यानंतर मात्र ती गोंधळली.
या दरम्यान पोलिसांनी तिच्या गाडीत ठेवलेल्या साहित्याचा तपास सुरु केला. तेव्हा कारमधील बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला.
सूचनाची भूमिका काय?
मृतदेह सापडल्यानंतर तिने एकच भूमिका घेतलेली – काय झाले त्याची मला कल्पना नाही. मी सकाळी उठले तेव्हा मला मुलगा गतप्राण झालेल्या अवस्थेत सापडला.
पोलिसांनी तिला हॉटेल रुममधील रक्ताच्या डागांविषयी विचारले असता आपली मासिक पाळी चालू आहे. त्यामूळे कदाचित ते डाग सापडले असतील असं तिने सांगितलं.
मात्र पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यापासून तिने एकच तगादा लावला. मी माझे वकिल प्रत्यक्ष हजर नसताना काहीही बोलणार नाही.
न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्याने तिला विचारलं असता तिने हीच भूमिका कायम ठेवली. आपला वकील प्रत्यक्ष हजर असताना वा आपल्या वकिलाच्या माध्यमातूनच आपली बाजू मांडणार असं तिने ठामपणे सांगितलं.
पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
सूचनाच्या मुलाचा मृतदेह चित्रदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिथेच शवविच्छेदन करण्यात आलं. उशी किंवा तशाच इतर कुठल्या तरी वस्तूचा वापर करून गुदमरून त्या चार वर्षांच्या बालकाचा खून करण्यात आल्याचं समोर आलं आहे. असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या डॉक्टर कुमार नाईक यांनी सांगितलंय.
गुदमरल्यामुळे त्याचा चेहरा आणि छाती सुजलेली आणि नाकातून रक्त येत होतं, अशी माहिती डॉ. नाईक यांनी दिली.
हिरियूर हॉस्पिटलमधील डॉ. रंगेगौडा आणि डॉ. कुमार नाईक यांनी इतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा अहवाल तयार केला.
मृतदेह वडिलांकडे सुपुर्द
ही घटना घडली तेव्हा सूचनाचे पती व्यंकट रमण इंडोनेशियामध्ये होते. ते तातडीन कर्नाटकात परतले.
पती-पत्नीमधील वैमनस्यातून हा खून झाल्याच्या संशय असल्याने गोवा पोलिसांकडून रमण यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, ANI
मुलाच्या खूनाची बातमी ऐकून धक्का बसलेले व्यंकट रमण आपल्या परिवारातील काही व्यक्तिंसोबत हिरियूर हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर थांबले होते. त्यानंतर मृतदेहाचा ताबा मिळाल्यावर ते ऍम्बुलन्समधून अंतिमसंस्कारासाठी बेंगळुरुला रवाना झाले.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यानी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमधील वैमनस्याचं पर्यवसान मुलाचा जीव जाण्यात झालं असा पोलिसांचा प्रथमदर्शनी कयास आहे.
कलंगूट पोलीस पुढील तपास करत आहेत. 6 तारखेला गोव्यात दाखल झालेल्या सूचनाने 8 तारखेला घाईगडबडीत गोवा सोडलं होतं.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








