चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत अमानुष वर्तणूक

चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या गैरसमजांमुळे मोठमोठे गुन्हे झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांविरोधात घरगुती हिंसाचारांच्या अनेक घटनांची नोंद देखील राज्यात झाली आहे.

मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचं दिसत आहे. या घटनेमुळे केवळ पिंपरी- चिंचवडच नाही तर संपूर्ण समाजावरच विचार करण्याची वेळ आली आहे.

पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगाला चक्क कुलूप लावल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी संबधित पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरामध्ये आरोपी तरुण त्याच्या पत्नीसोबत राहत होता.

मूळचा नेपाळचा असलेल्या या आरोपीला त्याच्या 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. संबंधित युवकावर आरोप आहे की तो 'आपल्या पत्नीला मारहाण करत असे, तिच्यावर ब्लेडने वार करत असे. एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीचे हात पाय ओढणीने बांधून तिच्या गुप्तांगाला कुलूप लावले.'

यानंतर वेदना असह्य झाल्यावर पत्नी रुग्णालयात गेली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याहून धक्कादायक बाब म्हणजे घटनेला 24 तास गेलेत. मात्र, पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलूप किल्ली नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हते. त्यामुळे अती वेदनेने पीडित महिला अजूनही विव्हळत होती, असा आरोप तक्रारीत नोंदवण्यात आला आहे.

जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी गंभीर दखल घेत संबधित पतीविरुद्ध भादंवि 323, 326, आणि 504 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी एक चाकू, एक ओढणी, एक एका ब्लेडचा वापर या गुन्ह्यात झाल्यानं एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

वाकड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बालाजी मेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

हा गुन्हा करणाऱ्या उपेंद्रला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार कशी करावी?

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना संपूर्ण देशभरातच घडताना दिसतात. गेल्या वर्षी बीबीसीने याच विषयावर एक लिहिला होता. त्यात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात तक्रार कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे. त्यावेळी बीबीसीने समाज कल्याण आयुक्तांशी चर्चा करुन ही माहिती दिली होती. ती पुन्हा या ठिकाणी देत आहोत.

त्यानुसार, 'कौटुंबिक हिंसाचाराबद्दल बोलण्यास आणि इतरांची मदत घेण्याच्या अनिच्छेमुळे चित्रासारख्या अनेक महिलांना हिंसाचार सहन करावा लागतो', असे सुरक्षा अधिकारी सांगतात.

समाजकल्याण आयुक्त अमुदवल्ली सांगतात की, हिंसाचाराच्या तक्रारीसाठी महिला, विशेष हेल्पलाइन क्रमांक 181 वर किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांकडे मदत मागू शकतात.

अमुदवल्ली सांगतात की, "कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या तक्रारीत पीडित महिलेला 60 दिवसांच्या आत मदत पुरवली जाते. तक्रारदाराला वैद्यकीय मदतीची गरज असेल तर तीही पुरवली जाते. महिला तिच्या पतीच्या घरी सुरक्षितपणे राहू शकते का, याबाबत चौकशी केली जाते. आवश्यक असल्यास, तक्रार करणाऱ्या महिलेला तात्पुरत्या निवारा केंद्रात ठेवले जाते. अशी प्रकरणं सुरक्षा अधिकारी हाताळतात."

तक्रारदाराची स्थिती लक्षात घेऊन बचावकार्यही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कमाल शिक्षा किती आहे?

या कायद्यामुळे स्त्रीला तिच्या पतीच्या घरी किंवा तिच्या पालकांच्या घरात राहण्याची हमी मिळते.

सोबतच महिलेला तिच्या निवासस्थानी 'हिंसामुक्त घरात' राहण्याची सुरक्षा प्रदान केली जाते.

तसेच, हिंसाचार पीडित महिलेला 60 दिवसांच्या आत त्वरित आवश्यक ती मदत दिली जाते.

महिलेच्या कुटुंबातील कोणताही पुरुष सदस्य जो तिच्यावर अत्याचार करतो त्याच्यावर या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. या प्रकरणात वडील, भाऊ, पती, पतीचे नातेवाईक यांचाही समावेश आहे.

मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता शांताकुमारी सांगतात की, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात जास्तीत जास्त एक महिना तुरुंगवास होतो. पण भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांचा वापर करूनच जास्तीत जास्त शिक्षा मिळू शकते.

त्या सांगतात, "अनेक लोक फक्त घरगुती हिंसाचाराची स्वतंत्र केस म्हणून नोंद करत नाहीत. घटस्फोट प्रकरण, बालहक्क प्रकरण, हुंडा प्रकरणामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीचाही समावेश असतो. या कायद्याचा वापर अनेकांकडून केला जातो, कारण यामुळे स्त्रीला आवश्यक असलेले संरक्षण त्वरित मिळते."

कायदेशीर उपाय

भारतीय दंड संहितेच्या कलम 498 (अ) मध्ये जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आहे. अधिवक्ता शांताकुमारी सांगतात की, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या तक्रारीमुळे केस आणखीन मजबूत होईल.

अधिवक्ता शांताकुमारी यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा, 2005 अंतर्गत महिलांना उपलब्ध असलेल्या तात्काळ उपायांची माहिती दिली.

कलम 18 आणि 19: एखादी महिला राहत्या घरात संरक्षण आणि निवासासाठी डिक्री मिळवू शकते.

कलम 20: पीडितेच्या आणि मुलांच्या देखभालीसाठी मदत मिळू शकते.

कलम 21: मुलांसाठी आणि पीडितेसाठी तात्पुरता निवारा मिळू शकतो.

कलम 22: पीडित महिला तिला झालेल्या नुकसान भरपाईचा दावा करू शकते.

महिलांना जर कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच शारीरिक, मानसिक क्रौर्याचा सामना करावा लागला तर त्यांनी त्वरित तक्रार करावी असं महिला हक्कवादी कार्यकर्ते सांगतात.