न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन नौदलाचं जहाज धडकलं; दोघांचा मृत्यू, 19 जण जखमी

न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन नौदलाचं जहाज आदळलं आहे. हे एक शिडाचं प्रशिक्षण जहाज आहे.

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत. काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातात जहाजाचं मोठं नुकसान झालं. हे जहाज एका खास कार्यक्रमासाठी तिथे गेलं होतं.

शनिवारी (17 मे) संध्याकाळी हे जहाज ब्रुकलिन पुलाखालून जात असताना जहाजातील एक उंच खांब पुलावर आदळला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा

समोर आलेल्या वृत्तांनुसार, टक्कर झाल्यानंतर जहाजाच्या खांबाचे काही भाग तुटून जहाजावर पडले. यात अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिलं आहे.

न्यूयॉर्क शहराच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेनं सांगितलं की, ते मदत कार्य करत आहेत. मात्र, त्यांनी अधिक माहिती दिली नाही.

मेक्सिकन नौदलानं जहाजाचं नुकसान झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच घटनेची चौकशी सुरू असल्याचंही म्हटलं आहे.

माध्यमांमधील वृत्तानुसार, या जहाजात 200 हून अधिक कर्मचारी होते.

मेक्सिकन नौदलानुसार, 297 फूट लांब आणि 40 फूट रुंद असलेले हे जहाज पहिल्यांदा 1982 मध्ये प्रवासाला निघालं होतं.

हे जहाज दरवर्षी नौदल लष्करी शाळेच्या प्रशिक्षणाच्या शेवटी प्रवासाला निघतं आणि हे प्रशिक्षण पूर्ण होतं.

या वर्षी हे जहाज 6 एप्रिल रोजी 277 जणांसह मेक्सिकन बंदर अकापुल्को येथून निघाले होते, अशी माहिती मेक्सिकन नौदलानं दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)