You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रात्री आई-बाबांचं भांडण मिटवणाऱ्या मुलासमोर दुसऱ्या दिवशी आई-वडिलांचा मृत्यू
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजराती
गेल्या शनिवारी (15 नोव्हेंबर) राजकोटच्या नागेश्वर रोडवरील समेत शिखर अपार्टमेंटमधील लोक सकाळी कामावर जाण्याची तयारी करीत होते. त्याचवेळी अचानक गोळीबार आणि किंचाळण्याचा आवाज ऐकू आला.
लोकांनी आवाजाच्या दिशेनं धाव घेतली तेव्हा त्यांना तपकिरी रंगाच्या जॅकेटमध्ये एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी काळ्या ट्रॅकसूटमध्ये एक महिला देखील रक्ताने माखलेली दिसली.
थोड्याच वेळात त्यांचा 20 वर्षांचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा धावत आला आणि आई-वडिलांना या स्थितीत बघून स्तब्ध झाला.
गेल्या दीड महिन्यापासून त्याच्या आई-वडिलांमध्ये वाद सुरू होते. मुलाने त्याच्या मामाच्या मदतीने आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, परिस्थिती काही बदलली नाही. उलट दुसऱ्या दिवशी त्याच्यापुढे एक भयंकर स्थिती उभी होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पती-पत्नीमधील भांडण आणि पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे ही घटना घडली असून पती-पत्नी दोघांचाही यात मृत्यू झाला आहे.
प्रकरण काय?
राजकोटमधील तीर्थ अपार्टमेंटमध्ये राहणारे आणि ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय करणारे 42 वर्षीय लालजी पढियार यांचं 21 वर्षांपूर्वी त्रिशा (वय 39) यांच्याशी लग्न झालं होतं. त्यांना 20 वर्षांचा मुलगा आहे, तो सध्या कॉलेजमध्ये शिकतो.
लालजींचे मित्र के.सी. राठोड यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, त्रिशाचे कुटुंबातीलच एका व्यक्तीसोबत कथित प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत होती.
घरातील कलहाला कंटाळून त्रिशा घरासमोरील समेत शिखर अपार्टमेंटमध्ये राहणारी मैत्रीण पूजा हिच्याकडे राहायला गेली होती आणि दीड महिन्यापासून तिथेच राहत होती.
लालजींचा मेहुणा व त्रिशाचा चुलत भाऊ जय राठोड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांनी दोघांची वारंवार समजूत घालत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
जय राठोड यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, "गेल्या शुक्रवारी लालजीभाईचा फोन आला. त्यानंतर मी आणि माझ्या भाच्याने मिळून त्या दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही पती-पत्नी दोघांचीही समजूत घालत बसलो, पण काही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर आम्ही तीर्थ अपार्टमेंटमधील लालजींच्या राहत्या घरी परतलो.
मी, माझा भाचा आणि भाऊजी एकाच खोलीत झोपलो. पहाटे मी उठून पाणी प्यायला गेलो असता भाऊजी लालजीभाई जागे दिसले.
"सकाळी नऊच्या सुमारास कोणीतरी दार ठोठावून आम्हाला उठवलं. शेजाऱ्यांनी सांगितलं की समोरच्या अपार्टमेंटमध्ये तुमची बहीण आणि लालजीभाई भांडत आहेत.
मी आणि भाचा तिथे पोहोचलो तेव्हा तिथे लोकांची गर्दी जमली होती. आम्हाला सांगण्यात आलं की, लालजींनी आधी बहीण त्रिशाच्या डोक्यात गोळी झाडली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडली.
घटनेत लालजी पढियार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्रिशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई-वडिलांच्या अशा मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मानसिक धक्क्यात आहे.
वाद शिगेला गेला पोहोचला, अन्...
लालजी पढियार यांचे कुटुंबीय याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र नात्यातील एक भाऊ बी. एम. गोहिल यांनी सांगितलं की, पती-पत्नीमध्ये सगळं सुरळीत सुरू होतं. पण त्रिशाचे कुटुंबातीलच एका व्यक्तीशी कथित संबंध उघड झाल्यानंतर वाद सुरु झाला. दोघांत भांडणं होऊ लागली.
घर त्रिशाच्या नावावर असल्यानं तिने घराची मागणी केली. ती घरातील सर्व दागिनेही घेऊन गेली ज्यामुळे त्यांच्यातील तणाव आणखी वाढला.
समेत शिखर अपार्टमेंटजवळ राहणारे जयमिन मेहता यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "त्रिशाबेन आणि लालजीभाई यांच्यातील भांडणाबद्दल आसपासच्या सर्वांनाच माहिती होती. त्रिशाबेन दररोज सकाळी जिमला जात असत. शनिवारी जिममधून त्या जिममधून परत आल्या असता पार्किंगमध्ये दोघांत वाद सुरू झाला.
त्रिशाबेनने प्रतिकार करण्यासाठी हातातली पाण्याची बाटली उचलली आणि काही समजण्यापूर्वीच गोळीबार झाला. त्रिशाबेन खाली कोसळल्या. त्यानंतर आणखी एक गोळीबार झाला आणि लालजीभाई खाली पडले."
ताबडतोब रुग्णवाहिका बोलावण्यात आली त्यानंतर पोलीस आले. त्यांच्या मुलाची अवस्था अतिशय वाईट होती. नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन गेले."
राजकोट पोलिसांनी काय सांगितलं?
राजकोट शहराच्या एसीपी राधिका भारई यांनी सांगितलं की, "लालजीभाई पढियार यांनी परवानाधारक बंदुकीने पत्नी त्रिशावर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्रिशाचाही मृत्यू झाला."
त्या पुढे म्हणाल्या, "त्रिशाचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही घटना घडली, अशी तक्रार त्रिशाच्या भावाने दिली आहे. पती-पत्नी दोघे गेल्या दीड महिन्यापासून वेगळे राहत होते. लालजी कुटुंबाकडून कोणतीही प्रति प्रतितक्रार दाखल करण्यात आलेली नाही."
बीबीसी गुजरातीशी बोलताना एसीपी भारई म्हणाल्या, "फॉरेन्सिकचा अहवाल येणे बाकी आहे. त्रिशाचे ज्याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं जातंय, तो विशाल राठोड सध्या राजकोटमध्ये नाही. आम्ही त्याच्याविरुद्ध समन्स बजावला आहे.
आम्ही दोन्ही कुटुंबीयांची चौकशी करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स तपासत आहोत. त्यांचा मुलगा मानसिक आघाताखाली आहे, त्याचे समुपदेशन केले जात आहे. लवकरच विशाल राठोडचीही चौकशी केली जाईल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.