ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर 'या' औषधावरून गरोदर महिलांबाबत का सुरू झाली चर्चा?

    • Author, आंद्रे बिअरबाथ, साराह बेल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकन डॉक्टरांनी गरोदर महिलांना टायलेनॉल देऊ नये, असा सल्ला लवकरच त्यांना दिला जाईल. असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर गरोदर महिलांनी पॅरासिटामॉल घ्यावी की नाही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेबाहेर हे औषध पॅरासिटामॉल म्हणूनच ओळखलं जातं.

ट्रम्प पुढे म्हणाले की टायलेनॉल आणि ऑटिझम यांच्यातही एक संबंध आहे.

ट्रम्प यांनी सोमवारी (22 सप्टेंबर) व्हाईट हाऊसमध्ये आरोग्य सचिव रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्यासमवेत ही घोषणा केली.

ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं, "ऑटिजम पूर्णपणे नियंत्रणाबाहेर आहे. पण मला वाटतं त्याचं कारण आता पूर्ण कळलं आहे."

काही अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की गरोदर महिलांनी ॲसिटामिनोफेन घेण्याचा आणि ऑटिझमचा छोटासा संबंध आहे. ॲसिटामिनोफेन हा टायलेनॉल या औषधातील मुख्य घटक आहे. परंतु अजून ठोस निष्कर्ष निघालेला नाही. अद्याप हे देखील सिद्ध झालेलं नाही की असिटामिनोफेनमुळे ऑटिजम होतो.

खूप ताप आला तरच गरोदर महिलांनी पॅरासिटामॉल घ्यावी असे देखील ट्रम्प यांनी म्हटले.

टायलेनॉल काय असतं?

टायलेनॉल हे एक ओव्हर-द-काउंटर विकता येणारे वेदनाशामक औषध आहे. ओव्हर द काउंटर ड्रग्स म्हणजे अशी औषधं जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील जी औषधे आपल्याला मेडिकलमधून विकत घेता येतात. त्यातील ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएन्ट हा ॲसिटामिनोफेन हा आहे. इतरत्र त्याला पॅरासिटेमॉल म्हणतात.

हे औषध विविध ब्रँडच्या नावानं विकलं जातं. तसेच जे लहान मुलांसाठी किंवा नवजात बालकांसाठी हेच घटक असलेली परंतु वेगळे प्रमाण असलेली औषधं उपलब्ध असतात.

ताप आल्यावर किंवा वेदनाशामक म्हणून पॅरासिटामॉलचा वापर आता घराघरातून होताना दिसतो.

गरोदरपणातील सुरक्षितता

जगभरातील प्रमुख वैद्यकीय संघटना आणि सरकारांचं म्हणणं आहे की हे औषध गरोदर महिलांसाठी सुरक्षित आहे.

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजीच्या वतीने म्हटले आहे की देशभरातील डॉक्टरांच्या लक्षात आलं आहे की पॅरासिटामॉल हे गरोदर महिलांसाठी असणाऱ्या सर्वात सुरक्षित वेदनाशामक औषधांपैकी एक आहे.

"पूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातून अशा कोणताही स्पष्ट पुरावा समोर आलेला नाही, ज्यावरुन असा निष्कर्ष काढता येईल की गर्भाची वाढ आणि औषधांचा गंभीर परिणाम याचा संबंध आहे," असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

युके नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गरोदर महिलांसाठी पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध म्हणून पॅरासिटेमॉल ही 'पहिली पसंती' आहे.

"सामान्यपणे हे औषध गरोदरपणात घेतलं जातं आणि त्याचा तुमच्या बाळाला कोणताही अपाय होत नाही," असं त्यात म्हटलं आहे.

टायलेनॉल या औषधाचं उत्पादन करणाऱ्या केनव्ह्यू या औषधनिर्मिती कंपनीनं गरोदर महिलांनी हे औषध घेण्याचं समर्थन केलं आहे.

कंपनीनं म्हटलं आहे की हे औषध म्हणजे लोकांसाठी उपलब्ध असलेला सर्वात सुरक्षित वेदनाशामक पर्याय आहे.

या मुद्द्याबाबत या कंपनीची प्रतिक्रिया घेण्यासाठी बीबीसीनं संपर्क केला होता.

कंपनी आणि अमेरिकेतील डॉक्टर, दोघेही गरोदर महिलांना कोणतंही ओव्हर-द-काउंटर औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्याचा सल्ला देतात.

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, ट्रम्प सरकार गरोदर महिलांना फक्त खूप जास्त ताप आल्यावरच वेदनाशामक औषध घेण्याचा सल्ला देईल.

खूप जास्त ताप आलेला असताना योग्य उपचार न केल्यास त्यामुळे माता आणि बाळ दोघांनाही अपाय होऊ शकतो.

टायलेनॉलमुळे ऑटिझम होऊ शकतो का?

एप्रिल महिन्यात, अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवसेवा विभागाचे प्रमुख रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी वचन दिलं होतं की ऑटिझम होण्यामागचं कारण निश्चित करण्यासाठी पुढील पाच महिन्यात 'मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि संशोधन' केलं जाईल.

ऑटिझमसारख्या गुंतागुंतीच्या आजारावर अनेक दशकांपासून संशोधन केलं जातं आहे.

अशा परिस्थितीत ऑटिझम होण्यामागची कारणं शोधणं सोपं ठरणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.

संशोधकांना मोठ्या प्रमाणात असं वाटतं की ऑटिझम होण्यामागे कोणतंही एक कारण नाही.

हा आजार अनेक अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या गुंतागुंतीच्या मिश्रणातून होत असल्याचं मानलं जातं.

ऑगस्ट महिन्यात, हार्वर्ड विद्यापीठातील चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखालील संशोधनाच्या पुनरावलोकनात असं आढळलं होतं की माता गरोदर असताना बाळांचा जेव्हा टायलेनॉलशी संपर्क येतो, तेव्हा त्यांना ऑटिझम आणि इतर न्यूरोडेव्हलपमेंटल आजार होण्याची अधिक शक्यता असू शकते.

संशोधकांचा युक्तिवाद होता की या औषधाचा वापर मर्यादित करण्यासाठी काही पावलं उचलली पाहिजेत. ताप आणि वेदना कमी करायच्या असतील तर गरोदर महिलांसाठी पॅरासिटामॉल हा पर्याय जगभरात सुरक्षित मानला जातो.

मात्र 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आलं की टायलेनॉलच्या संपर्कात येण्याचा आणि ऑटिझम होण्याचा कोणताही संबंध नाही.

"टायलेनॉलमुळे ऑटिझम होत असल्याचं दाखवणारा कोणताही ठोस पुरावा किंवा खात्रीशीर अभ्यास नाही," असं मोनिक बोथा म्हणाल्या. त्या डरहम विद्यापीठात सामाजिक आणि विकासात्मक मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

टायनेनॉल काम कसं करतं?

वेदनाशामक औषधी ओपिऑईड्स किंवा नॉन-ऑपिऑईड्स प्रकारातील असू शकतात.

ओपिऑईड्स हा शब्द अफूच्या रोपांपासून किंवा प्रयोगशाळेत तयार केलेल्या अफूपासून आला आहे. हे ऑपिऑईड्स आपल्या मेंदूतील ऑपिऑईड्स रिसेप्टर्सना जोडले जातात.

त्यातून शरीरात डोपामाईन स्रवतं. डोपामाईन हा हार्मोन आनंदाच्या, सुखकारक भावनांशी संबंधित आहे.

मात्र या औषधांचं प्रचंड व्यसन लागू शकतं. त्यामुळे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की वेदनांवर पॅरासिटामॉलसारख्या नॉन-ऑपिऑईड्स प्रकारातील औषधांनी उपचार करणं चांगलं असतं.

रंजक बाब म्हणजे, पॅरासिटामॉल नेमकं कशाप्रकारे काम करतं यावर अजूनही एकमत नाही.

फिलिप कोनाघन युकेतील लीड्स विद्यापीठात मस्क्यूलोस्केलेटेल मेडिसिनचे प्राध्यापक आहेत.

ते म्हणतात, "पॅरासिटामॉल कशाप्रकारे काम करतं, त्याच्या प्रक्रियेबद्दल अजूनही पूर्ण स्पष्टता नाही. ते बहुधा आपल्या शरीरातील मध्यवर्ती मज्जासंस्था आणि मेंदूमधील वेदनांच्या जाणिवेवर परिणाम करतं. तसंच ते इन्फ्लेमेशन असलेल्या परिघावरच्या भागातदेखील परिणाम करू शकतं."

युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, आपल्याला वेदना होत आहे असा संदेश मेंदूपर्यंत पोहचवणारे जे रिसेप्टर्स असतात त्यांच्यापर्यंत पॅरासिटामॉल वेदनेचा संदेशच पोहचू देत नाही. त्यामुळे आपल्याला वेदनाच जाणवत नाही.

प्रदीर्घ काळापासून असा एक सिद्धांत आहे की पॅरासिटामॉल सायक्लोऑक्सिजेनेज किंवा कॉक्स नावाच्या एन्झाईमला प्रतिबंध करतं.

हा एन्झाईम प्रोस्टॅग्लॅंडिन्स या घटकाची निर्मिती करण्यास मदत करतं. हा वेदनेशी संबंधित एक हार्मोनसारखा घटक असतो.

मात्र आता असं मानलं जातं की पॅरासिटामॉल इतर मार्गांनी देखील काम करतं. उदाहरणार्थ, त्यावर प्रक्रिया होऊन ते AM404 संयुग होतं. हे संयुग वेदनेच्या संदेश वहनाच्या अनेक मार्गांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं, असं म्हटलं जातं.

तुम्ही किती प्रमाणात टायलेनॉल घेऊ शकता?

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, सुरक्षित वापरासाठी पॅरासिटामॉलचा डोस घेताना वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचं महत्त्व अधोरेखित करतात.

त्यांचं म्हणणं आहे की जर योग्य डोसमध्ये म्हणजे योग्य प्रमाणात घेतलं आणि थोड्या कालावधीसाठी घेतलं, तर पॅरासिटामॉलमुळे क्वचितच दुष्परिणाम आढळतात.

युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, पॅरासिटामॉलचा सुचवण्यात आलेला डोस म्हणजे 24 तासात जास्ती जास्त चार वेळा, 500 mg च्या एक किंवा दोन गोळ्या घ्याव्यात. 24 तासात जास्तीत जास्त आठ वेळा या गोळ्या घ्याव्यात.

यापेक्षा अधिक प्रमाणात गोळ्या घेतल्यास त्यामुळे यकृताला गंभीर अपाय होऊ शकतो किंवा त्यात बिघाड होऊ शकतो.

कारण पॅरासिटामॉलमधील जवळपास 5 टक्के भागाचं रुपांतर बेन्झोक्विनोन इमाईन नावाच्या विषारी पदार्थात होतो. याला NAPQI असं म्हटलं जातं, अशी माहिती नॅशनल हेल्थ सर्व्हिस पुढे दिली.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (यूएस एफडीए) आकडेवारीतून असं दिसतं की 1998 ते 2003 दरम्यान अमेरिकेत गंभीर स्वरुपात यकृत निकामी होण्यामागं पॅरासिटामॉल खूप अधिक प्रमाणात घेणं हे प्रमुख कारण होतं.

अशा जवळपास निम्म्या रुग्णांमध्ये पॅरासिटामॉल अपघातानं अधिक प्रमाणात घेण्यात आलं होतं. त्या पीडितानं अनावधानानं दररोज जितक्या प्रमाणात पॅरासिटामॉल घ्यायलं हवं त्यापेक्षा अधिक प्रमाणात ते घेतलं होतं.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानुसार 600 औषधांमध्ये पॅरासिटामॉल असल्यामुळे असं अनेकदा घडतं.

त्यामुळे ताप आलेला किंवा फ्लू झालेला एखादा व्यक्ती अनेक औषधं घेऊ शकतो आणि त्या प्रत्येकात पॅरासिटामॉल असल्याचं त्याला माहित नसतं.

तज्ज्ञ पालकांना असाही सल्ला देतात की त्यांनी त्यांच्या मुलांच्या डोसच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. विशेषकरून जेव्हा मुलांची काळजी दिवसभरात, नर्सरी, आजी-आजोबा आणि घर अशा अनेक ठिकाणी घेतली जात असते तेव्ही ही काळजी घेणं आवश्यक असतं.

पॅरासिटामॉलची परिणामकारकता

वेदना आणि सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या तापासाठी पहिला उपचार म्हणून पॅरासिटामॉलचा वापर करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटना करते.

जर पॅरासिटामॉलमुळे रुग्णाला बरं वाटलं नाही, तर रुग्ण चढत्या क्रमानं वेदनाशामक औषधं घेऊ शकतात.

म्हणजेच ते आधी सौम्य ओपिऑईड्स घेऊ शकतात, त्यानंतर अधिक तीव्र ओपिऑईड्स घेऊ शकतात आणि शेवटी आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकतात.

पॅरासिटामॉलची परिणामकारकता वेदनेच्या प्रकारांनुसार बदलते.

युकेस्थित कोक्रेन इन्स्टिट्यूट प्रकाशित झालेल्या संशोधनांचं पुनरावलोकन करतं आणि विश्लेषण करतं.

हे इन्स्टिट्यूट म्हणतं की पॅरासिटामॉल तीव्र स्वरूपाची डोकेदुखी (मायग्रेन) तसंच प्रसूतीनंतरच्या आणि शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांच्या बाबतीत प्रभावी आहे.

अर्थात, गुडघ्यांचा संधिवात यासारख्या आजारांबाबतीत देखील पॅरासिटामॉल 'माफक' स्वरुपात फायदेशीर ठरत असल्याचं मानलं जातं.

कोक्रेन इन्स्टिट्यूट म्हणतं की कंबरदुखी किंवा कर्करोगाशी संबंधित शारीरिक अस्वस्थता यासाठी पॅरासिमटामॉल प्लासिबोपेक्षा (म्हणजेच अशी गोळी किंवा औषध ज्यात औषधाचा कोणताही सक्रिय नसतो, ती एकप्रकारे साखरेची गोळी असते) अधिक प्रभावी नसतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.