You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पायलटसह विमानातील 8 क्रू मेंबर, कुणाचं लग्न ठरलेलं तर कोणी निवृत्त होणार होता
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान अहमदाबाद इथल्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. यामध्ये प्रवास करणाऱ्या 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं एअर इंडियाकडून जाहीर करण्यात आलं आहे, तर एक ब्रिटिश नागरिक या प्रवासात वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
केवळ एक विमानाचा भारतातल्या आजवरच्या सर्वाधिक जीवितहानी झालेला हा अपघात आहे.
यापूर्वी 1996 साली दिल्लीजवळ चरखी-दादरी इथं दोन विमानांची हवेत धडक (मिड एअर कोलिजन) झालं होतं, त्यात तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
एअर इंडिआ 171 हे बोईंग कंपनीचं ड्रिमलायनर 787या मॉडेलचं विमान लंडनला जाण्यासाठी अहमदाबादहून निघालं होतं. पण त्यात असलेले प्रवासी मात्र भारताच्या अनेक राज्यांमधले आणि परदेशातलेही होते.
यातील 241 प्रवाशांच्या मृत्यू झालाच. त्यात विमानातले जे क्रू मेंबर्स होते, त्यांच्यापैकीही कोणाचा जीव वाचू शकला नाही.
या अपघातग्रस्त विमानाच्या मुख्य वैमानिक आणि सहवैमानिकासह एकूण 7 क्रू मेंबर्स हे मुंबईचे होते. तर एक पिंपरी चिंचवडचा होता.
हे सगळे अनुभवी होते आणि त्यांना या क्षेत्रातला गेल्या अनेक वर्षांचा अनुभव होता.
वैमानिक सुमीत सभरवालसह, सह वैमानिक क्लाईव्ह कुंदर, अपर्णा महाडीक, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशनी सोनघरे आणि साईनिता चक्रवर्ती हे क्रू मेंबर या विमानात होते.
सुमित सभरवाल, वैमानिक
60 वर्षांचे कॅप्टन सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवईतील 'जलवायू विहार' या सोसायटीत 88 वर्षांचे वडील पुष्पराज सभरवाल यांच्यासह रहात होते.
सभरवाल हे एक अनुभवी वैमानिक होते आणि आठ हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा त्यांचा अनुभव होता. वडील आणि बहिणीसह ते पवईत रहायचे.
त्यांच्या एका शेजाऱ्यानं 'द इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितल्याप्रमाणे सुमित हे त्यांच्या दीर्घ कारकीर्दीनंतर निवृत्ती घेण्याच्या वाटेवर होते.
पुढच्या काही महिन्यांतच निवृत्ती घेऊन आपल्या वडिलांसोबत कायम राहण्याचं त्यांनी ठरवलं होतं, पण तसं होऊ शकलं नाही.
सुमित 1994 सालापासून वैमानिक म्हणून काम करत होते. त्यांनी स्वत: वैमानिक असण्यासोबतच अनेक तरुन वैमानिकांना प्रशिक्षणही दिले होते.
अलिकडेच कोरोना काळात त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांची बहिण दिल्लीत वास्तव्यास असते. त्यांच्या बहिणीच्या दोन मुलांनीही वैमानिक होऊन याच क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
सभरवाल यांचे काही नातेवाईक अहमदाबाद येथे त्यांच्या पार्थिवासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी गेले आहे. त्यांच्या वृद्ध वडिलांना मात्र सोबत असलेल्या मुलाच्या जाण्यानं मोठा धक्का बसला आहे
क्लाईव्ह कुंदर, सहवैमानिक
सुमित सभरवाल यांच्यासह जे सहवैमानिक होते ते होते फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर. सभरवाल यांच्या तुलनेत ते तरुण असले तरीही त्यांनाही अशा ड्रिमलायनर विमानांचा व्यावसायिक अनुभव होता.
जवळपास दीड हजार तासांच्या उड्डाणाचा त्यांचा अनुभव होता. क्लाईव्ह यांचंही अपघाती निधन झालं.
अभिनेते विक्रांत मेसी हे क्लाईव्ह यांचा कौटुंबिक ओळखीचे आहेत . विक्रांत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.
"माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा या अपघातात गमावला आहे. क्लाईव्ह कुंदर या दुर्दैवी विमानाचा फर्स्ट ऑफिसर म्हणून काम पाहत होता," असं विक्रांत यांनी लिहिलं आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या बातमीनुसार क्लाईव्हचं कुटुंबं मूळचं कर्नाटकच्या मंगळुरुचं आहे. पण ते मुंबईला बऱ्याच वर्षांपूर्वी आले.
क्लाईव्ह यांची आईसुद्धा 'एअर इंडिया'मध्ये केबीन क्रू म्हणून कार्यरत होत्या.
क्लाईव्हनं मुंबईत शिक्षण घेतल्यावर अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथून कमर्शिअल पायलटचं ट्रेनिंग पूर्ण केलं होतं. त्यानंतर व्यावसायिक काम सुरू झाल्यावर आजपर्यंत त्यांचे उड्डाणाचे 1100 तास पूर्ण झाले होते.
क्लाईव्ह यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पालक सध्या ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलीकडे गेले आहेत.
मैथिली पाटील, केबिन क्रू
मैथिली पाटील पनवेलच्या न्हावा गावची रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी ती एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून नोकरीला लागली होती.
विमानाचा अपघात झाल्याचं कळताच तिचे आई-मामा आणि एक भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत.
आई-वडील, दोघी बहिणी आणि एक भाऊ अशा पंचकोनी कुटुंबातील मैथिली सर्वात मोठी मुलगी आहे.
मैथिली पाटील हिचे वडील पनवेलजवळ असणाऱ्या ओएनजीसी कंपनीमध्ये कामगार आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी तीन मुलांना शिक्षण दिल आहे. या घटनेनंतर ते देखील धक्क्यात आहेत.
न्हावा गावातील टी. एस. रहेमान शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.
मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. दोन वर्षापूर्वी तीने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात कामाला लागली होती.
या घटनेसंदर्भात आणि मैथिलीबाबत बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींना मैथिली पाटील यांचे नातेवाईक व न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी माहिती दिली.
जितेंद्र पाटील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण करून आमची मुलगी एअर होस्टेस झाली, या घटनेने आम्हाला धक्का बसला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आमच्या मुलीने शिक्षण करून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
या घटनेवर आमचा विश्वास बसत नाही. आमचे काही लोक अहमदाबादला गेले आहेत. सरकार प्रशासनाकडे आमची विनंती आहे आमची गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही मात्र कुटुंबाला आधार द्यावा."
ज्या शाळेत मैथिली शिकली त्या शाळेच्या मुख्याध्यापिक डेसी पॅाल यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच मैथिलीनं शाळेत येऊन विद्यार्थ्यांना हवाई क्षेत्रात करिअर कसं करावं, याबद्दल मार्गदर्शन केलं होतं.
"मैथिली पाटील ही मुलगी अत्यंत शांत, शिस्तप्रिय, हुशार आणि प्रोत्साहित करणारी होती. तिचे पहिले ते बारावी पर्यंतचे शिक्षण आमच्या शाळेत झाले होते.
दोन महिन्यांपूर्वी शाळेत माजी विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. तेंव्हा ती आली होती. तिने सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एअर होस्टेसमधील करियरच्या संधीबद्दल सांगितललं होतं," डेसी पॉल यांनी सांगितलं.
दीपक पाठक, केबिन क्रू
अहमदाबादच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बदलापूरचे 34 वर्षीय दीपक पाठकदेखील होते.
गेल्या अकरा वर्षापासून ते 'एअर इंडिया'मध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होते.
दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांच लहानपण मुंबईतील परेल भागात गेलं आहे. शालेय शिक्षण परेल भागात झाले तर उर्वरित कॉलेजचे शिक्षण बदलापुरातील आदर्श कॉलेजमध्ये झालं आहे.
त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक यांना कॉलेज शिक्षणानंतर त्यांना एव्हिएशनमध्येच करिअर करायचं होतं. त्यानुसार त्यांनी पावलं टाकली आणि त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रवेशही केला.
त्यांच्या विमानाचं उड्डाण होण्याआधी ते कायम न चुकता घरी फोन करायचे आणि लंडनच्या विमानानं भरारी घेण्याअगोदरही त्यांनी नेहमीप्रमाणे घरी फोन केला होता.
त्यांच्या फेसबूक स्टेटसवरही हा अपडेट त्यांनी शेवटच्या काही मिनिटांमध्ये केला होता.
वडील एकटेच कामाला असल्यामुळे सर्व मुलांना शिकवून घर चालवणं वडिलांना मोठ्या कष्टाचा होतं. दीपक पाठक यांचे वडील बाळासाहेब पाठक हे रेल्वेमध्ये माटुंगा वर्कशॉप मध्ये कामाला होते.
चार वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचे लग्न झाले होते. पत्नी कामानिमित्ताने नाशिकला गेली होती. आपल्या आई-वडील यांच्यासोबत ते बदलापुरात येऊन जाऊन राहायचे. सध्या कामानिमित्ताने पत्नीसह ते घाटकोपर येथे भाड्याच्या घरात राहत होते.
दीपक यांना दोन मोठ्या बहिणी देखील आहेत. दोघांचीही लग्न झाली आहेत.
विमान अपघातात मृत्यू झाल्याबाबत माहिती प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेले नाही, असं त्यांची बहिण श्रुतिका शेजवळ यांनी माध्यमांना सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच दीपक यांच्या बहिणी व नातेवाईक अहमदाबादला रवाना झाले आहेत.
सध्या बदलापूरच्या घरामध्ये आई-वडील आणि इतर नातेवाईक उपस्थित आहेत. मात्र ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत.
दीपकचा लहानपणापासून चा मित्र सार्थक सुर्वे आणि दीपकचे वडील बाळासाहेब पाठक यांचे मित्र शरद मातोंडकर यांनी त्यांच्याविषयी आणि या घटने संदर्भात माहिती बीबीसी मराठीला दिली.
स्वप्नांसाठी संघर्ष केला आणि असा अंत झाला हे फार दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया मित्र सार्थक सुर्वे यांनी दिली.
"आम्हाला विश्वास बसत नाही. दीपक खूप मनमिळावू स्वभावाचा होता. आजवर त्यांनी आपल्या स्वप्नांसाठी संघर्ष केला. त्याला खूप गोष्टींची आवड होती. डान्स करायचा, गायचा, रील देखील बनवायचा," असे मित्र सार्थकने सांगितले.
रोशनी सोनघरे, केबिन क्रू
डोंबिवलीच्या 27 वर्षीय रोशन सोनघरे यांच्याही अहमदाबादच्या विमान अपघातात मृत्यू झाला.
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे त्या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. आई, वडील आणि लहन भाऊ असा त्यांचा परिवार आहे.
सोनघरे कुटूंबाला या दुर्घटनेने मोठा धक्का बसला असून रोशनी यांच्या आईला अद्याप (3 जून दु. 12 वाजेपर्यंत) रोशनीच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ती परत येईल, अशी आशा त्यांना आहे.
27 वर्षीय रोशनी सोनघरे यांचं लहान पणापासून एअर होस्टेस बनायचं स्वप्न होतं, असं तिचे काका दत्ता सोनघरे यांनी 'बीबीसी मराठी'च्या प्रतिनिधींना सांगितलं.
साधारण पाच वर्षांपूर्वी रोशनीने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आणि ती एअर होस्टेस म्हणून डोमेस्टिक एअरलाईनसाठी काम करू लागली. पण तिला आंतरराष्ट्रीय एअरलाईनसाठीही काम करायची इच्छा होती. यामुळे साधारण दोन वर्षांपूर्वीच ती एअर इंडियामध्ये रुजू झाल्याचं दत्ता सोनघरे यांनी सांगितलं.
10 बाय 10 च्या खोलीत राहण्यापासून ते इंटरनॅशनल एअरलाईन्सवर एअर होस्टेस बनण्यापर्यंतचा रोशनीचा संघर्ष राहीला आहे, अशी प्रतिक्रिया तिचे मामा प्रवीण यांनी दिली.
27 वर्षीय रोशनीचं नुकतंच लग्न ठरलं होतं, अशी माहिती तिचे काका दत्ता सोनघरे यांनी दिली.
रोशनीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, ती एक ब्लाॅगर होती. 'स्काय लव्ह्ज हर' हे तिच्या प्रोफाईलचं नाव आहे. रोशनी ही तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर सक्रिय असल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे 57 हजार फाॅलोअर्स आहेत.
दत्ता सोनघरे यांनी सांगितलं की, "तिकडे काही प्रक्रिया सुरू आहे. डीएनए नमुने घेतलेले आहेत. रिपोर्ट येण्यासाठी 72 तास लागतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे,"
अपर्णा महाडिक, केबिन क्रू
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात केबिन क्रू म्हणून मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या अपर्णा महाडिकही होत्या. त्यांनाही अनेक वर्षांचा अनुभव होता आणि सध्या त्या 'वरिष्ठ क्रू मेंबर' म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल महाडिक हेसुद्धा या क्षेत्रात वैमानिक म्हणून कार्यरत आहेत.
40 वर्षांच्या अपर्णा या गेल्या 10 वर्षांपासून या क्षेत्रात होत्या. त्यांच्या पश्चात आता 9 वर्षांची मुलगी आणि त्यांचे पती आहेत.
अपर्णा महाडिक या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बहिणीच्या सून आहेत. त्यामुळे या विमानाच्या अपघाताची माहिती मिळताच राजकीय क्षेत्रातल्या अनेकांनीही गोरेगावच्या त्यांच्या घरी धाव घेतली. आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हेसुद्धा घरी पोहोचले होते.
माध्यमकर्मींची गर्दी रात्री उशीरापर्यंत त्यांच्या सोसायटीच्या बाहेर होती. त्यांचे नातेवाईक मानसिक धक्क्यात असल्यानं त्यांच्यापैकी कोणाशी थेट बोलणं होऊ शकलं नाही.
"ही घटना अत्यंत दु:खद आहे. महाडिक आणि तटकरे कुटुंब दोघेही दु:खात आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कुटुंब म्हणूनही आणि सोसायटी मेंबर म्हणूनही," असं राज्यातले मंत्री आणि महाडिक कुटुंबीयांचे परिचित योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
साईनीता चक्रवर्ती, केबिन क्रू
35 वर्षांच्या साईनिता या लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातल्या सर्वात तरुण क्रू मेंबर्सपैकी एक होत्या. त्या मुंबईच्या जुहू कोळीवाड्यात रहायच्या.
पूर्वी 'गो एअर' या एअरलाईनमध्ये काम करणाऱ्या साईनीता या अलिकडे 'एअर इंडिया'त रुजू झाल्या होत्या.
त्यांच्या एका शाळेपासून असलेल्या मित्राने 'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार, साईनिता या मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्या.
त्या मानेकजी कूपर शाळेत शिकल्या आणि पुढचं शिक्षण मिठीबाई कॉलेजमध्ये झालं. साईनीतासह इतर क्रू मेंबर्सचे कुटुंबीय आणि नातेवाईक अहमदाबादकडेही रवाना झाले आहेत.
प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी होऊन पार्थिवाचे जे उरलेले अवशेष आहेत ते कुटुंबीयांना देण्याचे प्रयत्न होणार आहेत, असं सरकारनं जाहीर केलं आहे.
इरफान शेख, केबिन क्रू
अहमदाबादच्या विमानात आणखी एक क्रू मेंबर होता 22 वर्षांचा इरफान शेख.
इरफान कामासाठी मुंबईत रहायचा, पण त्याचे कुटुंबीय हे पिंपरीच्या संत तुकाराम नगर इथे राहतात. दोन वर्षांपूर्वीच हवाई क्षेत्रात काम सुरू केलेल्या इरफान कामातून वेळ मिळेत तसा पिंपरीला येत असे.
शेवटचा तो काहीच दिवसांपूर्वी बकरी ईदला आला होता.
इरफानच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, तो 'एअर विस्तारा'मध्ये जॉईन झाला होता. पण त्या कंपनीचे 'एअर इंडिया'त मर्जर झाल्यावर तो 'एअर इंडिया'साठी काम करू लागला. तो आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये यापूर्वीही गेला होता.
त्याच्या कामाचा रोस्टर (वेळापत्रक) गरजेनुसार बदलत असे. जेव्हा त्याला या लंडनच्या विमानात जायचं आहे, असं समजलं तेव्हा तो पिंपरीलाच होता. त्याला कुटुंबीयांनीच मग पुणे विमानतळावर जाऊन सोडले होते.
त्याच्या घरी आई-वडील, भाऊ, आजोबा असे सगळे आहेत. अपघाताची बातमी ऐकल्यानंतर त्याचे आई-वडील अहमदाबादला रवाना झाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)