You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पीरियड ब्लड' चेहऱ्यावर लावण्याचा वाढता ट्रेंड; डॉक्टर याबद्दल काय म्हणतात?
- Author, अमृता प्रसाद
- Role, बीबीसी तामिळ
बऱ्याचवेळा लोक ट्रेंडच्या नावाखाली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी पाहून, कोणताही विचार न करता तसंच करू लागतात.
अलीकडेच एक नवीन ट्रेंड आला आहे. यात दावा करण्यात येतो आहे की, पीरियड ब्लड (मासिक पाळीच्या वेळेस बाहेर पडणारं रक्त) चेहऱ्यावर लावल्यामुळे 'चेहऱ्यावर चमक' येते. तसंच 'त्वचा तजेलदार' होते.
परदेशात काहीजणांनी टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दाव्यांना प्रोत्साहन दिलं आणि मग आता भारतातदेखील हा ट्रेंड वाढतो आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी या प्रक्रियेला 'मेंस्ट्रुअल मास्किंग' असं नाव दिलं आहे.
असा दावा करण्यात येतो आहे की मासिक पाळीच्या वेळेस निघणाऱ्या रक्तात रेटिनॉल असतं. ते चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
या दाव्यात किती तथ्य आहे? पीरियड ब्लड काय असतं? डॉक्टर या दाव्याबद्दल काय म्हणतात? या मुद्द्यांविषयी जाणून घेऊया.
तज्ज्ञ काय म्हणतात?
या ट्रेंडसंदर्भात बीबीसीनं, डर्मेटॉलॉजिस्ट म्हणजे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिनेश कुमार यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की हा दावा 'पूर्णपणे खोटा' आहे.
डॉ. दिनेश कुमार म्हणाले, "पीरियड ब्लड त्वचेवर लावणं अजिबात योग्य नाही. त्याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात."
डॉ. दिनेश यांनी पीरियड ब्लड त्वचेवर का लावू नये, यामागची कारणं सांगितली. ती अशी आहेत,
- पीरियड ब्लड त्वचेवर लावल्यामुळे काहीही फायदा होत नाही.
- याचा काही सकारात्मक परिणाम होईल असं दाखवणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. (बीबीसीच्या माहितीनुसार, यावर अद्यापपर्यंत कोणतंही संशोधन किंवा अभ्यास करण्यात आलेला नाही.)
- ही स्वच्छ प्रक्रिया नाही.
- यात सूक्ष्मजीव म्हणजे जर्म्स असण्याची खूपच जास्त शक्यता असते.
- जर चेहऱ्यावर एखादी जखम, पुरळ किंवा उघडी छिद्रं असतील, तर हे रक्त लावल्यामुळे जळजळ होऊ शकते किंवा खाज येऊ शकते.
मेंस्ट्रुअल ब्लडमध्ये काय असतं?
अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार मेंस्ट्रुएशन म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस निघणारं रक्त हा एक द्रव पदार्थ असतो. ज्यात मृत किंवा निष्क्रिय ऊती असतात.
प्रत्येक मेंस्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी, महिलांच्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करते. यात युटरस म्हणजे गर्भाशयाती आतील आवरण जाड होऊ लागतं.
जर गर्भधारणा झाली नाही, तर ते आवरण रक्ताच्या रूपात बाहेर पडतं. यामुळे मासिक पाळी येते.
व्हजायना किंवा योनीच्या मार्गे जेव्हा हे आवरण बाहेर पडतं. तेव्हा याच्यासोबत योनीतील इतर द्रव पदार्थदेखील बाहेर पडतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या लेखानुसार, यादरम्यान योनीमध्ये असलेले लॅक्टोबॅसिलससारखे सूक्ष्मजीवदेखील या रक्तात येतात.
पीरियड ब्लडमध्ये जवळपास 300 प्रकारचे प्रोटीन, ॲसिड आणि एन्झाइम असतात. हे रक्त शरीरातील वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे टाकाऊ घटक असतं.
चेहऱ्यावर पीरियड ब्लड लावता येतं का?
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिनेश कुमार म्हणतात की पीरियड ब्लड चेहऱ्यावर लावल्यामुळे कोणताही फायदा होत नाही. ते इशारा देतात की यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेचं नुकसान किंवा हानीदेखील होऊ शकते.
ते असंही म्हणाले की प्लेटलेट रिच प्लाझ्मा (पीआरपी) थेरेपीसारखे काही वैद्यकीय उपचार आहेत, ज्यात त्वचेची जी हानी झालेली असते, ती बरी करण्यासाठी शरीरातील रक्ताचा वापर केला जातो.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका लेखानुसार, याप्रकारच्या उपचाराच्या एक ते तीन सत्रांनंतर उघडी छिद्रं, सुरकुत्या आणि काळे डाग कमी होऊ शकतात. तसंच त्वचेमधील कोलेजनची पातळी वाढू शकते.
अर्थात, डॉ. दिनेश कुमार म्हणतात की याप्रकारची थेरेपी मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये आणि प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करून घेतली पाहिजे.
ते इशारा देतात की निव्वळ सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंड सुरू आहे किंवा ती व्हायरल झाली आहे, म्हणून कोणताही विचार न करता, तसं करणं योग्य नाही.
ते म्हणतात की चेहऱ्यावर लाळ किंवा पीरियड ब्लड लावणं धोकादायक ठरू शकतं. तसं करणं असुरक्षितदेखील असतं. कारण लाळ किंवा पीरियड ब्लडमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात.
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
डॉ. दिनेश कुमार म्हणतात की आपल्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. त्वचेची काळजी घेण्यासाठीचे काही उपाय ते सांगतात,
- चेहरा धुण्यासाठी फेस वॉश किंवा क्लींझरचा वापर करावा.
- चेहरा मॉइश्चराइझ करण्यासाठी (आर्द्रता आणण्यासाठी) लोशन किंवा क्रीमचा वापर केला जाऊ शकतो.
- घराबाहेर पडताना, एसपीएफ 30+ असणारं सनस्क्रीन लावलं पाहिजे.
- त्वचेच्या प्रकारानुसार (कोरडी किंवा तेलकट) स्किन केअर प्रॉडक्ट निवडला पाहिजे.
- पुरेशी झोप घेणं आणि पोषक आहार घेणं, चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी सर्वात चांगलं असतं.
डॉ. दिनेश म्हणतात की निरोगी त्वचेसाठी इतकं करणंच पुरेसं आहे. वैज्ञानिक पातळीवर किंवा वैद्यकीयदृष्ट्या जी गोष्ट सिद्ध झालेली नाही, अशा कोणत्याही गोष्टीवर किंवा उपायावर विश्वास ठेवता कामा नये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)