रहस्यमय मशरुम ! जे खाल्ल्यानंतर बुटकी माणसं दिसल्याचा होतो भास, नेमका प्रकार काय?

मोठ्या आकाराच्या तपकिरी, पिवळ्या आणि लाल रंगाच्या मशरूम्सने भरलेल्या टोपल्या.

फोटो स्रोत, Colin Domnauer

फोटो कॅप्शन, मोठ्या आकाराच्या तपकिरी, पिवळ्या आणि लाल रंगाच्या मशरूम्सने भरलेल्या टोपल्या.
    • Author, रॅचेल न्यूवेर
    • Role, बीबीसी फ्यूचर

हिमगौरी आणि सात बुटके, गलिव्हर्स ट्रॅव्हलमधलं बुटक्या लोकांचं राज्य, लॉर्ड ऑफ द रिंग्जसारख्या कादंबऱ्यातले एल्फ... अशी सगळी कल्पनेतली पात्रं आपल्याला माहीत असतात.

पण समजा, हे असे लोक आपल्या अवतीभवती आहेत, असं वाटायला लागलं तर? कल्पना आणि वास्तवाची गल्लत व्हायला लागली तर?

चीनमधल्या युनान प्रांतातल्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांकडे दरवर्षी अशी विचित्र समस्या असलेले रुग्ण येतात.

या सगळ्या रुग्णांना दरवाज्याखालून चालत जाणाऱ्या, भिंतींवर चढणाऱ्या आणि फर्निचरला चिकटून बसणाऱ्या बुटक्या, परीकथांमधील एल्फसारख्या चिमुकल्या आकृत्यांचे भास होतात.

दरवर्षी रुग्णालयात अशा शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात.

या रुग्णांना कोणताही मानसिक आजार नाही, तर या सगळ्या भासांमागचं कारण आहे एक मशरुम.

लॅनमाओआ एशियाटिका असं या मशरुमचं नाव आहे. हे मशरुम आसपासच्या जंगलातल्या पाइन झाडांच्या खोडावर वाढतं आणि स्थानिक पातळीवर अतिशय लोकप्रिय आहेत. त्याची चव चटकदार असते.

युनानमध्ये हे मशरुम बाजारात विकलं जातं, रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये दिसतं आणि जून ते ऑगस्ट या हंगामात घरोघरीही बनवलं जातं.

मात्र, तो नीट शिजवणं अतिशय आवश्यक असतं, नाहीतर भ्रम म्हणजेच हॅल्युसिनेशन्स सुरू होतात.

"तिथल्या एका मशरूम हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये वेटरने 15 मिनिटांचा टाइमर लावला आणि आम्हाला ताकीद दिली की, टाइमर बंद होईपर्यंत खाण्याची गडबड करू नका, नाहीतर तुम्हाला लहान माणसं दिसायला लागतील," असं कॉलिन डॉम्नॉअर सांगतात.

कॉलिन युटा युनिव्हर्सिटी आणि युटा नॅचरल हिस्ट्री म्युझिममध्ये जीवशास्त्रात पीएचडी करत आहेत. ते एल.एशियाटिका या मशरुमवर संशोधन करत आहेत.

इथल्या लोकांना या मशरुमच्या गुणधर्माबद्दल ज्ञान असल्याचं त्यांना वाटतं. पण युनान आणि आसपासची काही मोजकी ठिकाणं सोडता बाहेरच्या जागासाठी हे विचित्र मशरुम अजूनही गूढच आहे.

"या मशरूमच्या अस्तित्वाबद्दल अनेक कथा होत्या. अनेक लोकांनी त्याचा शोध घेतला. पण ही प्रजाती त्यांना सापडलीच नाही," असे मायकोलॉजिस्ट आणि फंगी फाउंडेशनच्या संस्थापक व कार्यकारी संचालक जुलियाना फुर्शी सांगतात.

फंगी फाउंडेशन ही संस्था बुरशीच्या वेगवेगळ्या प्रजातींचा शोध घेणे, त्यांची नोंद ठेवणे, संवर्धन करणे यासाठी काम करतात.

कपड्यांवर, ताटात दिसणारे लहान जीव

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉम्नॉअर गेल्या अनेक दशकांपासून या मशरूमभोवती असलेल्या रहस्याचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेषतः या मशरूममुळे जे भ्रम होतात, त्यासाठी जबाबदार असलेले रासायनिक घटक कोणते आहेत आणि त्यातून मानवी मेंदूबद्दल आपल्याला काय शिकता येईल, याचा शोध घेणे हा त्यांचा उद्देश आहे.

डॉम्नॉअर यांनी एल. एशियाटिकाबद्दल पहिल्यांदा त्यांच्या मायकोलॉजीच्या प्राध्यापकांकडून ऐकलं, तेव्हा ते पदवीचं शिक्षण घेत होते.

"वेगवेगळ्या काळात आणि संस्कृतींमध्ये सांगितलेल्या परीकथांसारखी दृश्यं दाखवणारं मशरुम हे ऐकूनच मी गोंधळलो. ही अशी विचित्र गोष्ट काय आहे, हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली," असं ते सांगतात.

संशोधनात्मक साहित्यात काही संदर्भ मिळतात. 1991 मधल्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या एका रिसर्च पेपरमध्ये दोन संशोधकांनी युनान प्रांतातील अशा लोकांचे वर्णन केले होते, ज्यांनी एक विशिष्ट मशरूम खाल्ल्यानंतर 'लिलिपुटियन हॅल्युसिनेशन्स' अनुभवले.

मानसोपचारशास्त्रात हा शब्द लहान माणसे, प्राणी किंवा काल्पनिक आकृत्या दिसण्याच्या भासासाठी वापरला जातो. हा शब्द 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स' या कादंबरीतील लिलिपुट बेटावर राहणाऱ्या चिमुकल्या लोकांवरून आला आहे.

युनान प्रांतात बाजारात विकले जाणारे मशरुम्स

फोटो स्रोत, Colin Domnauer

फोटो कॅप्शन, युनान प्रांतात बाजारात विकले जाणारे मशरुम्स

संशोधकांच्या मते, रुग्णांना या आकृत्या 'सगळीकडे फिरताना' दिसायच्या. बहुतेक वेळा त्यांची संख्या दहापेक्षा जास्त असायची.

"कपडे घालताना त्यांना हे लहान जीव कपड्यांवर दिसायचे आणि जेवताना ताटातही दिसायचे," असं त्यांनी नोंदवून ठेवलं होतं. डोळे बंद केल्यावर ही दृश्ये 'आणखी जास्त स्पष्ट' होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

1960 च्या दशकातच अमेरिकन लेखक गॉर्डन वॅसन आणि फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ रॉजर हाइम यांना पापुआ न्यू गिनीमध्ये अशाच प्रकारच्या मशरुमबद्दल ऐकायला मिळालं होतं.

तीस वर्षांपूर्वी पापुआ न्यू गिनीला भेट देणाऱ्या मिशनरींनी स्थानिक लोकांना 'वेडं' करणाऱ्या मशरुमचा उल्लेख केला होता.

एका मानववंशशास्त्रज्ञाने याचा उल्लेख 'मशरूम मॅडनेस' असा केला होता. या दोघांनी त्या मशरुमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांना माहीत नव्हतं की, त्यांनी जे अनुभवले ते चीनमधल्या सध्याच्या अहवालांशी आश्चर्यकारकरित्या मिळतंजुळतं होतं. त्यांनी त्या संशयित मशरूमचे नमुने गोळा करून एलएसडीचा शोध लावणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ आल्बर्ट हॉफमन यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले.

मात्र, हॉफमन यांना त्यात कोणतेही महत्त्वाचे रासायनिक घटक आढळले नाहीत.

संयुग आढळले नाही. त्यामुळे या केवळ लोकांच्या सांगोवांगीच्या गोष्टी असाव्यात, त्यामागे कोणतंही वैद्यकीय कारण नसावे असा निष्कर्ष काढण्यात आला आणि पुढील संशोधन थांबले.

जिनोम सिक्वेन्सिंगने पटवली मशरुमची ओळख

2015 नंतर एल. एशियाटिकाचे औपचारिक नामकरण आणि गुणधर्माचे वर्णन करण्यात आले. मात्र, त्यामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांची फारशी माहिती नव्हतीच.

त्यामुळेच डॉम्नॉअर यांचे पहिले उद्दिष्ट म्हणजे या प्रजातीची नेमकी ओळख निश्चित करणे, हे होतं. 2023 साली ते उन्हाळ्यातील मशरुमच्या हंगामात युनानला गेले.

तिथे त्यांनी मशरुमच्या मोठमोठ्या बाजारांमध्ये फेरफटका मारला आणि विक्रेत्यांना विचारलं की, "कोणत्या मशरूममुळे बुटकी माणसं दिसतात?" या प्रश्नावर खो खो हसणाऱ्या विक्रेत्यांनी दिलेले मशरूम विकत घेऊन त्यांनी प्रयोगशाळेत त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले.

या प्रयत्नामुळे एल. एशियाटिकाची ओळख पटवली गेली, असं ते सांगतात. प्रयोगशाळेत वेगळ्या करण्यात आलेल्या मशरुमच्या रासायनिक अर्काने उंदरांमध्येही माणसांप्रमाणेच लक्षणं दिसून आली.

हा अर्क दिल्यानंतर आधी हे उंदीर प्रचंड सक्रीय झाले, हालचाली वेगवान झाल्या आणि नंतर बराच काळ निष्क्रिय, सुस्त पडून राहिले.

कॉलिन डॉम्नॉअर हे मशरुमवर संशोधन करत आहेत.

फोटो स्रोत, Colin Domnauer

फोटो कॅप्शन, कॉलिन डॉम्नॉअर हे मशरुमवर संशोधन करत आहेत.

डॉम्नॉअर फिलिपिन्सलाही गेले. तिथे चीन आणि पापुआ न्यू गिनीप्रमाणेच लक्षणं दाखवणाऱ्या मशरुमबद्दलच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या.

तिथले नमुने चिनी मशरूमपेक्षा थोडे वेगळे दिसत होते. आकाराने लहान आणि रंगाने फिकट गुलाबी. मात्र जनुकीय चाचण्यांतून तेही त्याच प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले.

डिसेंबर 2025 मध्ये डॉम्नॉअर यांच्या मार्गदर्शकांनी पापुआ न्यू गिनीला भेट देऊन वॅसन आणि हाइम यांनी नोंदवलेल्या मशरूमचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत, त्यामुळे त्या मशरुमचं रहस्य अजूनही कायम आहे.

"ते मशरूमही याच प्रजातीचे असू शकते. जर तसं असेल तर खूप विशेष गोष्ट आहे. कारण पापुआ न्यू गिनीमध्ये चीन आणि फिलिपिन्समधील प्रजाती सहसा आढळत नाहीत," असं डॉम्नॉअर सांगतात.

किंवा तो पूर्णपणे वेगळा प्रकार असू शकतो, ही गोष्ट उत्क्रांतीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरू शकते, असंही ते म्हणतात.

याचा अर्थ असाही होतो की, जगाच्या वेगवेगळ्या भागांतील मशरूमच्या प्रजातींमध्ये 'लिलिपुटियन इफेक्ट्स' स्वतंत्रपणे विकसित झाले आहेत.

निसर्गात असं घडल्याची उदाहरणं आहेत. डॉम्नॉअर ज्या प्रयोगशाळेत काम करतात, तिथल्या काही शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोध लावला की 'मॅजिक मशरूम'मधील सायलोसायबिन नावाचं सायकेडेलिक संयुग दोन अतिशय वेगवेगळ्या मशरूम प्रजातींमध्ये स्वतंत्रपणे विकसित झाले आहे.

मात्र, एल. एशियाटिकामधले परिणाम हे सायलोसायबिनमुळे होत नसल्याचं डॉम्नॉअर सांगतात. ते आणि त्यांची टीम अजूनही हे भ्रम निर्माण करणारे रासायनिक संयुग शोधत आहेत.

हे भ्रम किती काळ टिकतात?

महत्त्वाचं म्हणजे हे भ्रम दीर्घकाळ टिकतात. जवळपास 12 ते 14 तास. काही प्रकरणांत रुग्णांना आठवडाभरही हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.

या दीर्घकालीन परिणामांमुळे आणि भ्रम, चक्कर येणं यांसारख्या दुष्परिणामांच्या शक्यतेमुळे डॉम्नॉअर यांनी स्वतः अजून हा मशरूम कच्चा खाल्लेला नाही.

याच कारणामुळे चीन, फिलिपिन्स आणि पापुआ न्यू गिनीमधले लोक मानसिक परिणामांसाठी मुद्दाम हे मशरुम शोधत नाहीत. ते केवळ अन्न म्हणून शिजवून खाण्यासाठी एल. एशियाटिका वापरतात, असं डॉम्नोअर सांगतात.

आणखी विशेष गोष्ट म्हणजे इतर सायकेडेलिक पदार्थांमुळे (मानसिक परिणाम करणारे) येणारे अनुभव व्यक्तिनिहाय आणि वेळेनुसार बदलतात. मात्र, एल. एशियाटिकाच्या बाबतीत 'बुटके लोक दिसण्याचा' अनुभव सर्वच लोकांत सातत्याने आणि वारंवार नोंदवला जात असल्याचं डॉम्नोअर सांगतात.

"इतक्या लोकांमध्ये सारखाच भ्रम निर्माण करणारा दुसरा पदार्थ मला माहीत नाही."

कॉलिन डॉम्नॉअर हे मशरुमवर संशोधन करत आहेत.

फोटो स्रोत, Colin Domnauer

फोटो कॅप्शन, कॉलिन डॉम्नॉअर हे मशरुमवर संशोधन करत आहेत.

हे मशरूम समजून घेणे सोपे नसल्याचं डॉम्नॉअर म्हणतात. पण सायकेडेलिक पदार्थांवरी इतर संशोधनांप्रमाणेच या मशरुमवरील संशोधनातूनही जाणीव (कॉन्शसनेस) तसंच मनातील भावना आणि वास्तव यांच्यातील संबंधांसारख्या मुलभूत गोष्टींवर प्रकाश पडू शकतो.

याशिवाय, कोणताही मशरूम न खाता देखील काही लोकांना अचानक 'लिलिपुटियन भ्रम' का होतात, याचंही उत्तर मिळू शकतं. अर्थात, अशी प्रकरणं खूप दुर्मिळ आहेत.

1909 मध्ये अशा प्रकरणाची नोंद झाल्याचं उल्लेख आहे. त्यानंतर 2021 पर्यंत मशरुम न खाता भ्रम झाल्याची केवळ 226 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

ही संख्या कमी असली तरी याचे परिणाम गंभीर आहेत. कारण या रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण पूर्णपणे बरे झालेच नाहीत.

एल. एशियाटिकाचा अभ्यास केल्यानंतरच मशरुम न खाताही नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या लिलिपुटियन भ्रमांमागील मेंदूतील प्रक्रिया समजण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कदाचित नवीन उपचारपद्धतीही शोधता येऊ शकते, असे डॉम्नॉअर सांगतात.

"आता मेंदूच्या कुठल्या भागातून लिलिपुटियन भ्रम निर्माण होतात, हे आपण समजू शकतो," असे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील मॅकेना अकॅडमी ऑफ नॅचरल फिलॉसफीचे संचालक आणि एथ्नोफार्माकॉलॉजिस्ट डेनिस मॅकेना सांगतात.

'या मशरूममधील संयुगांमुळे नवीन औषधांचा शोध लागू शकतो. याचा उपचारांसाठी उपयोग होईल का, हे पाहता येईल,' असं मॅकेना सांगतात.

शास्त्रज्ञांच्या मते, जगातील 5% पेक्षाही कमी बुरशीच्या प्रजातींचे आजवर वर्गीकरण झाले आहे.

"बुरशींमध्ये एक प्रचंड जैवरासायनिक आणि औषधी लायब्ररी दडलेली आहे. आतापर्यंत आपण त्याचा थोडासाच भाग उघडू शकलो आहोत, असं फुर्ची म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)