'मशरुम मर्डर' प्रकरणी महिलेला 'इतक्या' वर्षांच्या जन्मठेपेची झाली शिक्षा, तीन खून प्रकरणी दोषी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लाना लॅम, कॅटी वॉटसन आणि सायमन ऍटकिन्सन
- Role, बीबीसी न्यूज
विषारी मशरुमचा वापर करुन तीन खून आणि एक खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन महिलेला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.
एरिन पॅटरसन असं या महिलेचं नाव असून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला पॅरोलशिवाय 33 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.
याचा अर्थ असा की ती 82 वर्षांची झाल्यावर, म्हणजेच 2056 मध्ये सुटकेसाठी पात्र ठरेल.
एरिननं आपण निर्दोष असून हा केवळ एक दुर्देवी अपघात असल्याचा दावा केला होता.
या खटल्यात विविध पुराव्यांचा अभ्यास आणि साक्षींदारांची तपासणी यासह बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरु होता. अखेर न्यायालयाने या महिलेला दोषी ठरवलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
सुनावणीदरम्यान या खटल्याला नाट्यमय वळण मिळत असल्याचंही दिसून आलं होतं.
वकिलांच्या मते, नातेवाईकांना मारण्यासाठी एरिनने जे विषारी मशरूम वापरले, त्यातील विषाचा परिणाम व्हावा म्हणून नेमक्या प्रमाणासाठी तिनं स्वयंपाकघरातील लहान वजन यंत्रावर ते मोजून घेतले होते.
त्याचे फोटो काढून तपशीलवार माहितीही या महिलेनं ठेवली होती, असा दावा वकिलांकडून करण्यात आला होता.
'चौथा थोडक्यात बचावला'
50 वर्षीय एरिन पॅटरसनने जुलै 2023 मध्ये व्हिक्टोरियामधील तिच्या घरी तिघांची हत्या आणि आणखी एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप नाकारला आहे. ही एक दुर्दैवी अपघाती घटना होती, असं तिचं म्हणणं होतं.
एरिन पॅटरसनच्या फोनमध्ये काही फोटो सापडले. त्या फोटोंमध्ये जंगली मशरूमचे वजन घेतलं जात असल्याचं दिसतं.
पाहुण्यांची हत्या करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात तिनं ते मशरूम मोजले होते, असा दावा सरकारी वकिलांनी या फोटोंच्या मदतीनं केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"संबंधित फोटो कदाचित मीच काढले असतील, पण त्यामधील मशरूम्स विषारी असतील, असं मला वाटलं नव्हतं किंवा माहीत नव्हतं", असं एरिननं न्यायालयात सांगितलं.
एरिन पॅटरसनचे सासू-सासरे डॉन आणि गेल पॅटरसन (दोघंही 70 वर्षांचे) आणि गेल यांची बहीण हेदर विल्किन्सन (66 वर्ष) हे तिघे जेवणानंतर काही दिवसांनी आजारी पडले. नंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
हेदर यांचे पती आणि स्थानिक पाद्री इयान विल्किन्सन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारानंतर आठवडाभरात त्यांना कोमामधून बाहेर काढण्यात यश आलं होतं.
'मोबाईलमध्ये मिळाले फोटो'
सहा आठवड्यांपूर्वी सुनावणी सुरू झालेल्या हाय-प्रोफाइल खटल्यात फिर्यादी आणि साक्षीदारांपैकी 50 हून अधिक जणांची सुनावणी झाली. त्यात पॅटरसन बचाव पक्षातर्फे साक्ष देणारी पहिली साक्षीदार होती.
पॅटरसनने चौकशीत विषारी मशरूम गोळा केल्याचं मान्य केलं. याआधी तिनं पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांसमोर ते नाकारलं होतं.
एरिन पॅटरसनच्या फोनमधून मशरूम मोजतानाचे एप्रिल 2023 च्या अखेरीस काढलेले फोटोही मिळाले होते. ते न्यायालयाला दाखवण्यात आले.

फोटो स्रोत, Supplied
एरिनने आधीच मान्य केलं आहे की, 'त्या' लंचनंतरच्या काही दिवसांनंतर तिने फोन वारंवार क्लीन केला होता. त्यातला इलेक्ट्रॉनिक डेटा डिलीट केला होता.
पोलिसांना असे फोटो सापडले तर पाहुण्यांच्या मृत्यूसाठी ते तिलाच दोषी ठरवतील, अशी भीती तिला वाटत होती, असं तिचं म्हणणं आहे.
फोटोतील मशरूम "डेथ कॅप्सशी अत्यंत जुळणारे" आहेत, असं मशरूम तज्ज्ञानं आधी दिलेल्या जबाबात म्हटलं होतं.
'एरिन पॅटरसन नकारावर ठाम'
पॅटरसनने ते मशरूम काही दिवसांपूर्वी मुद्दाम गोळा केले होते, असा आरोप वकील डॉ. नॅनेट रॉजर्स यांनी केला आहे.
एरिन पॅटरसनने आयनॅचरलीस्ट या वनस्पती आणि प्राण्यांच्या नोंदीसाठी असलेल्या वेबसाइटवर एक पोस्ट पाहिली. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 28 एप्रिल रोजी लॉच परिसरात जाऊन तिने विषारी मशरूम गोळा केले, असा आरोप डॉ. रॉजर्स यांनी केला.
त्यादिवशी शहरात गेल्याचं आपल्याला आठवत नसल्याचं एरिननं सांगितलं. त्याचबरोबर तिने डेथ कॅप मशरूम शोधण्यासाठी तेथे गेल्याचे किंवा आयनॅचरलीस्टची पोस्ट पाहिल्याचंही नाकारलं.
"तू प्राणघातक ठरतील असं प्रमाण तयार करण्यासाठी या मशरूमचं वजन करत होतीस," असं डॉ. रॉजर्स यांनी तिला विचारलं.
यावर आपण सहमत नसल्याचं, उत्तर एरिननं दिलं होतं.
'मुलांच्या पोटात भाज्या जाव्यात म्हणून मशरूमची पूड'
दोन मुलांची आई असलेल्या एरिन पॅटरसनने न्यायालयात सांगितलं की, वाळवलेल्या मशरूम्सची पूड बनवून ती स्पगेटी, ब्राऊनीज आणि स्ट्यूसारख्या विविध पदार्थांमध्ये ती वापरत होती.
त्यावर हत्या झाली त्या दिवशीच्या जेवणासाठीचा तो एकप्रकारचा सरावच होता, असा आरोप फिर्यादी पक्षानं (प्रॉसिक्यूटर) केला आहे.

फोटो स्रोत, Supplied
पण पॅटरसननं ते नाकारलं.
"हे खरं नाही. त्या मशरूम्सची पूड वापरण्याचा उद्देश फक्त, मुलांच्या शरीरात जास्तीत जास्त भाज्या जाव्यात हा होता," असं पॅटरसन म्हणाली.
जाणूनबुजून फूड डिहायड्रेटर वापरून डेथ कॅप मशरूम्स जेवणासाठी तयार केले होते का, असा प्रश्न वकिलांनी तिला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला.
सुनावणीदरम्यान दाखवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पॅटरसन एका कचरापेटीत ते उपकरण (फूड डिहायड्रेटर) फेकून देत असल्याचंही दिसतं.
"म्हणूनच तुम्ही (रुग्णालयातून) सुटल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुरावा नष्ट करण्यासाठी घाईघाईने बाहेर पडलात," असं डॉ. रॉजर्स म्हणाल्या.
त्यावेळी "नाही," असं उत्तर पॅटरसनने दिलं.
'...म्हणून खोटं बोलत गेले'
मशरूम गोळा केले नाही आणि आपल्याकडं फूड डिहायड्रेटरही नाही, असं खोटं पोलिसांना वारंवार का सांगितलं? असंur वकिलांनी तिला विचारलं.
त्यावर "ही मूर्खपणाची पण तत्काळ दिलेली प्रतिक्रिया होती. त्यामुळं मी एकासाठी दुसरं खोटं बोलत राहिले," असं तिने न्यायालयात सांगितलं.
"मला भीती वाटत होती, पण मी ते करायला नको होतं," असंही तिनं म्हटलं.
कधीही जाणूनबुजून किंवा मुद्दाम जेवणात विषारी मशरूम्स घातले नव्हते, असा दावा एरिन पॅटरसनने पुन्हा एकदा केला.
ती म्हणाली की, 'बीफ वेलिंग्टन'मध्ये वापरलेल्या मशरूममध्ये कदाचित चुकीने गोळा केलेल्या, वाळवलेल्या मशरूम्सही मिसळल्या असतील. ते एका कंटेनरमध्ये दुकानातून घेतलेल्या मशरूम्सबरोबर ठेवलेले होते, असं तिनं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
इतर साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरही एरिन पॅटरसनची चौकशी करण्यात आली. तिने पाहुण्यांना आरोग्यविषयक विशेषतः कर्करोगाच्या निदानाबाबत चर्चा करण्यासाठी म्हणून बोलावलं होतं, असं सांगितलं.
थेट कर्करोग असल्याचं सांगितलं नसलं तरी नातेवाईकांना असं गोंधळात टाकायला नको होतं, अशी जाणीव झाल्याचंही एरिननं सांगितलं.
पण, तसं केल्यामुळं काळजीपोटी नातेवाईकांकडून व्यक्त केलेल्या काळजीतून प्रेम मिळाल्याची भावना निर्माण व्हायची, असंही ती म्हणाली.
यावर रॉजर्स यांनी म्हटलं की, "हा खोटा दावा समोर येईल आणि त्यासाठी तुला जबाबदार धरलं जाईल असं तुला कधीच वाटलं नसेल. कारण पाहुण्यांचा मृत्यू होईल असं तुला वाटलं असणार. "
पण "हे खरं नाही," असं पॅटरसननं म्हटलं.
शुक्रवारी तिची पुन्हा उलटतपासणी सुरू होईल. या खटल्याला सुरुवातीला सहा आठवड्यांपर्यंतचा वेळ लागेल, असं वाटलं होतं. पण आता हा खटला किमान आणखी दोन आठवडे चालेल, असं न्यायाधीशांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











