53 कोटी रुपयांचं सोन्याचं कमोड, जे अवघ्या पाच मिनिटांत चोरट्यांनी पळवून नेलं

- Author, मार्टिन ईस्टॉ
- Role, बीबीसी न्यूज, ऑक्सफर्ड
इंग्लंडमधील एका भव्य पॅलेसमधून एक कमोड चोरीला गेलं आहे, होय कमोड! हे काही साधंसुधं कमोड नव्हतं, तब्बल 4.5 दशलक्ष पाऊंड (सुमारे 53 कोटी रुपये ) किमतीचं हे कमोड चक्क सोन्यापासून बनवण्यात आलं होतं.
या सोन्याच्या कमोडला सप्टेंबर 2019 मध्ये ऑक्सफर्डशायरमधील भव्य अशा ब्लेनहेम पॅलेसमध्ये आयोजित कला प्रदर्शनात ठेवण्यात आलं होतं. हे कमोड पूर्णपणे कार्यरत होतं.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड क्राऊन कोर्टात झालेल्या सुनावणीत, चोरीला गेलेलं सोन्याचं कमोड वितळवून टाकण्यात आलं असावं, अशी शंका उपस्थित करण्यात आली.
ही चोरी 14 सप्टेंबर 2019 च्या पहाटे घडली असल्याचं सरकारी वकील ज्युलियन क्रिस्टोफर यांनी कोर्टाला सांगितलं.
सोन्याचं कमोड कसं चोरीला गेलं होतं?
ही चोरी पाच जणांच्या टोळीनं केल्याची माहिती कोर्टाला सादर करण्यात आली. चोरट्यांची ही टोळी ब्लेनहेम पॅलेसचा दरवाजा तोडून आत शिरली होती. चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेले हातोडे घटनास्थळीच टाकून दिल्याचंही कोर्टाला सांगण्यात आलं.
चोरी व्हायच्या सुमारे 17 तास आधी सोन्याच्या कमोडचा एका फोटो काढण्यात आला होता. हा फोटो माइकल जोन्स नामक प्रकरणातील एका आरोपीनं काढल्याचं वकील ज्युलियन क्रिस्टोफर यांनी कोर्टाला सांगितलं.
आरोपी चोरीच्या उद्देशानं माहिती गोळा करण्यासाठी तेथे आला होता, त्यावेळी त्याने सदर फोटो काढला, अशी माहिती वकील क्रोस्टोफर यांनी कोर्टाला दिली.

फोटो स्रोत, Getty Images
ही चोरी अवघ्या पाच मिनिटांत करण्यात आली, असंही वकील क्रोस्टोफर यांनी कोर्टाला सांगितलं.
ते म्हणाले, "चोरीला गेलेलं सोन्याचं कमोड परत कधीच सापडलं नाही. बहुतेक चोरट्यांनी सोनं वितळवून ते आपसात वाटून घेतलं असावं," अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
या प्रकरणात एका व्यक्तीनं आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती ज्युरींना देण्यात आली. त्या व्यक्तीचं नाव जेम्स शीन (वय 40) असून तो नॉर्थम्पटनशायरच्या वेलिंगबोरो इथला रहिवासी आहे.
जेम्स शीन याने एप्रिल 2024 मध्ये चोरी, गुन्हेगारी मालमत्ता हस्तांतरित करणे तसेच अशाप्रकारच्या कारवाया करण्यासाठी कटकारस्थान रचण्याचे कबूल केले. तर इतर तीन आरोपींनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑक्सफर्डमधील डिव्हिनिटी रोड येथील 39 वर्षीय मायकेल जोन्सने चोरीचा आरोप नाकारला. विंडसर येथील 36 वर्षीय फ्रेड डो, ज्याला पूर्वी फ्रेडरिक सिग्नेस म्हणून ओळखले जात असे, त्याच्यासह पश्चिम लंडन येथील 41 वर्षीय बोरा गुचुक यांनी गुन्हेगारी मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या कट रचल्याचा आरोप नाकारला आहे.


चौकशीत आणखी काय उघड झाले?
चोरीला गेलेलं कमोड 18 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलं होतं. सदर कमोड इटालियन संकल्पनात्मक कलाकार मौरिजियो कॅटेलन यांच्या प्रदर्शनाचा भाग होता.
हे कमोड सुमारे 98 किलो वजनाचे होते आणि त्याचा 6 दशलक्ष (60 लाख) डॉलर्सचा विमा काढण्यात आला होता.
कोर्टात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यावेळेसच्या सोन्याच्या बाजार भावानुसार म्हणजेच सप्टेंबर 2019 मध्ये कमोड तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची किंमत 2.8 दशलक्ष पाऊंड (सुमारे 31 कोटी रुपये) होती.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेम्स शीन, फ्रेड डो आणि बोरा गुचुक यांच्या फोनवर सापडलेले मेसेजेस, व्हॉईस नोट्स आणि स्क्रीनशॉटमध्ये तिघेही चोरीचे सोने विकण्याबद्दल बोलत असल्याचं आढळून आलं.
या लोकांनी चोरीच्या सोन्यापैकी सुमारे 20 किलोग्रॅम सोनं 25, 632 पाऊंड (सुमारे 28 लाख) प्रति किलोच्या दरानं विकण्याची योजना आखली होती.
तर, बोरा गुच्चुक नामक व्यक्ती जो हॅटन गार्डनमध्ये 'ज्वेलर्स पाचा ऑफ लंडन' चालवायचा, त्यानं प्रतिकिलो सोन्यावर जवळपास 3000 पाऊंड (सुमारे 3 लाख रुपये) नफा कमावल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या ब्लेनहेम पॅलेसमधून हे सोन्याचं कमोड चोरीला गेलं, ते स्थान यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समाविष्ट असून सर विन्स्टन चर्चिल यांचं जन्मस्थान देखील आहे.
ब्लेनहेम पॅलेसमधून चोरीला गेलेल्या सोन्याच्या कमोडबाबतचा हा खटला कोर्टात सुरू आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











