You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
4 वर्षांपासून अंघोळही न करता जंगलात लपून असलेल्या LTTE च्या माजी कमांडरची सुटका
- Author, रंजन अरुण प्रसाद
- Role, बीबीसी तामिळसाठी
गेल्या चार वर्षांपासून श्रीलंकेच्या जंगलात अज्ञातवासात राहणाऱ्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या (एलटीटीई) एका माजी सैनिकाची सुटका करण्यात आली असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
हा एलटीटीईचा सैनिक चार वर्षांपासून जगापासून दूर बट्टिकालोआ जिल्ह्यातील पट्टीपलाई भागातील थंडमलाई जंगल परिसरात अत्यंत गलिच्छ अवस्थेत राहत असल्याची माहिती त्याची सुटका करणाऱ्या लोकांनी दिली.
श्रीलंकेतील गृहयुद्धात श्रीलंकन सैन्य आणि तमीळ फुटीरतावादी अतिरेकी संघटना एलटीटीई आमनेसामने आल्या होत्या. 2009 मध्ये एलटीटीईचं बंड मोडून काढण्यात आलं. त्यानंतर या संघटनेच्या काही सैनिकांनी आत्मसमर्पण केलं, तर काही बेपत्ता झाले.
जंगलात लपून बसलेल्या या एलटीटीईच्या सैनिकाला स्थानिक लोक बाला नावाने हाक मारायचे.
डेमोक्रॅटिक फायटर्स पार्टीचे उपाध्यक्ष एन. नकुलेस यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं की, तो मानसिक रुग्ण असल्याने त्याला त्याच्या कुटुंबाने सोडून दिलंय.
तो मागच्या अनेक दिवसांपासून थंडमलाई भागातील रेडपाना गावाजवळच्या जंगलात एक शेडमध्ये राहतोय.
एन.नकुलेस सांगतात की, बाला जंगलातून गोळा केलेल्या फळांवर त्याचा गुजराण करत होता. कधीकधी जंगलाच्या आसपास राहणारे काही लोक त्याला अन्नधान्य द्यायचे. तो त्याच्या झोपडीत जाऊन हे अन्न अस्वच्छ पद्धतीने शिजवून खायचा.
“तो अत्यंत गलिच्छ अवस्थेत राहत होता. तो ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवायचा ती भांडीही त्याने कधी घासली नव्हती. तो त्याच खरकट्या भांड्यात पुन्हा पुन्हा अन्न शिजवायचा. बऱ्याचदा मासे आणि भात तो एकत्रच शिजवायचा,” असं एन. नकुलेस पुढे सांगतात
त्याने चार वर्षांपासून अंघोळ केली नव्हती, ना केस कापले होते.
लोकांना बघताच पळून जातो
ते सांगतात की, बाला सुरुवातीच्या काळात लोकांशी संपर्क ठेऊन असायचा. मात्र, नंतर तो लोकांना बघून पळून जायला लागला. तो जंगलात पळून जाऊन लपून बसतो. तो ज्या भागात राहत होता त्या भागात जंगली हत्तींचं वास्तव्य आहे. डेमोक्रॅटिक मिलिटंट पार्टीच्या सदस्यांना बालाची माहिती मिळताच त्यांनी या भागात जाऊन तीन दिवस त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
एन. नकुलेस सांगतात की, आम्ही पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो तेव्हा तो आम्हाला बघून पळून गेला.
"आम्ही त्या जंगलात तीन दिवस त्याची वाट पाहत थांबलो. पहिल्या दिवशी तर तो आम्हाला बघून पळूनच गेला. आम्ही दुपारपर्यंत वाट पाहिली. तो दिसताच आम्ही त्याला त्याच्या नावाने हाक मारली. आम्ही त्याला ओळखतो अशा अविर्भावात बोलायला सुरुवात केली. आम्ही तुझ्यासोबत मुल्लैथिवूमध्ये होतो असंही सांगितलं."
यावर माझ्याजवळ येऊ नका, असं बाला आम्हाला म्हणाला.
एन. नकुलेस सांगतात की, "त्याने आम्हाला थोडे पैसे आणि बिस्किटे मागितली आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. पण आम्ही त्याच्याशी गोड बोलत त्याच्या जवळ गेलो. तो पूर्वीचा सैनिक आहे त्यामुळे त्याने नीट राहिलं पाहिजे असं त्याला सांगितलं. त्याच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवू असं सांगितलं. सलग तीन दिवस आम्ही त्याची समजूत घालत होतो."
त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांना बालाची माहिती देण्यात आली आणि रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्याला बट्टिकालोआ येथील एरावूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं नकुलेस सांगतात.
नकुलेस सांगतात की, काही सोशल मीडिया युजर्सने बालाबद्दल खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात केली. त्याच्याविषयीचे खोट्या व्हिडिओ पोस्ट करून लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या अशा वागण्याने तमीळ संघर्ष आणि माजी लढाऊ सैनिकांचा अपमान होतोय.
बाला बरा होऊन त्याचं पुनर्वसन करण्यासाठी आणि त्याला सामान्य जीवन जगता यावं यासाठी लोकांनी पुढाकार घेऊन मदत करण्याचं आवाहनही नकुलेस यांनी यावेळी केलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)