म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी आणि त्यातून रक्कम काढून घेण्याची योग्य वेळ कोणती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पैसे गुंतवायचेत पण कुठे आणि कसे हे समजत नाही. शेअर बाजारात गुंतवावेसे वाटतात, पण त्याची भीती वाटते. शेअर बाजारात गुंतवलेला पैसा सुरक्षित असेल का असा प्रश्न पडतो. मग तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड.
आजकाल अनेक तज्ज्ञ म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
टीव्ही, सोशल मीडियावरही याबाबत अनेक जाहिराती येत असतात. अनेक सेलिब्रिटीही या जाहिरातीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याबद्दल सांगतात. पण म्युच्युअल फंडची नीट माहिती नसताना आपण त्यात पडावं का? म्युच्युअल फंड्स नेमके काय असतात, त्यात गुंतवणूक कशी करायची, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं नसतं ना, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे काढायचे कसे? असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरं या लेखातून शोधायचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर, म्युच्युअल फंड्स हे एक आर्थिक गुंतवणुकीचं उत्तम साधन आहे. म्युच्युअल फंडमध्ये अनेक गुंतवणूकदार असतात. यामध्ये तुम्ही, मी किंवा इतर कोणीही असू शकतं.
म्युच्युअल फंडमध्ये पैसे कसे गुंतवले जातात?
म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही म्हणजेच गुंतवणूकदार त्यांचे पैसे एखाद्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीला (AMC) देत असता.
मग त्या कंपनीचा एक आर्थिक व्यवस्थापक म्हणजे फंड मॅनेजर असतो, जो तुमचे हे पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे हे पाहायचं काम करत असतो, कारण तो त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असतो.
देशाची अर्थव्यवस्था, शेअर मार्केट, आंतरराष्ट्रीय मार्केट या सगळ्यांवर लक्ष ठेवून तो हे पैसे गुंतवत असतो.
गुंतवणूकदारांना कमीत कमीत धोका पत्कारून जास्तीत जास्त नफा देणं हेच या फंड मॅनेजरचं उद्दिष्ट असतं.
पण, म्युच्युअल फंडमध्ये रिस्क कमी का असते असा प्रश्नाही आपल्याला पडतोच. त्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण आपले पैसे म्युच्युअल फंड कंपनीला, म्हणजेच अॅसेट मॅनेजमेंट कंपनीला गुंतवायला देतो.

फोटो स्रोत, Getty Images
मग ती कंपनी हा पैसा कोणत्या तरी एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गुंतवत असते.
कारण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यामुळे जरी एखाद्या कंपनीत तोटा झाला, तरी इतर कंपन्यांमधून नफा मिळू शकतो. सगळे पैसे बुडण्याचा धोका आपोआप कमी होतो.
गुंतवणूकदारांचे जास्त नुकसान होऊ नये आणि नफाही चांगला मिळावा हाच या मागचा विचार असतो.
शिवाय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे म्युच्युअल फंड्सची नोंदणी केलेली असते. त्यांना सेबीच्या नियमांचं पालन करावं लागतं आणि हे गुंतवणूकदारांच्या हिताचंच असतं.
मग या म्युच्युअल फंडमार्फत गुंतवणूकदारांची मोठी रक्कम एकत्रितपणे स्टॉक्स, बाँड, सोनं किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवली जाते.
मग त्यातून येणारा नफा सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागून दिला जातो.
म्युच्युअल फंडचे किती प्रकार असतात?
म्युच्युअल फंडचे अनेक प्रकारचे असतात. गुंतवणूक करण्याआधी ते समजून घेणं ही महत्त्वाचं असतं.
मालमत्तेच्या म्हणजे अॅसेटच्या आधारावर आणि संरचनेच्या म्हणजे स्ट्रक्चरच्या आधारावरती म्युच्युअल फंडचे प्रकार ठरतात. त्यातले काही महत्त्वाचे प्रकार आपण पाहू.
संरचनेच्या आधारावर फंड ओपन एंड आणि क्लोज एंड असे प्रकार असतात.
ओपन एंड म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कधीही पैसे काढता येतात आणि कधीही गुंतवता येतात, तर क्लोज एंड म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आणि काढण्यासाठी ठराविक कालावधी असतो.
म्हणजे ठराविक कालावधीनंतरच तुम्ही आपले पैसे काढू शकता किंवा अजून गुंतवणूक करू शकता.
मालमत्तेच्या आधारावर इक्विटी म्युच्युअल फंड, डेब्ट म्युच्युअल फंड, हायब्रीड म्युच्युअल फंड असे प्रकार असतात. यात तसे अनेक प्रकार आहेत, पण हे जास्त परिचित असलेले प्रकार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
1. इक्विटी म्युच्युअल फंड –
यामध्ये तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये म्हणजे विविध स्टॉक्समध्ये गुंतवले जातात. यात नफाही चांगला मिळतो पण तशी रिस्कही राहते.
याचे देखील अनेक प्रकार आहेत. जसं की लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड इत्यादी. इथे कॅपचा अर्थ कॅपिटल असा होतो.
लार्ज कॅपमध्ये, कंपनीचा मार्केटमधील आकार आणि मूल्य हे जास्त असतं. यामध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा कमी नफा होतो. पण जोखीमही कमी असते.
मिड कॅप मध्ये कंपनीचा मार्केटमधील आकार आणि मूल्य हे मध्यम स्वरूपाचं असतं, त्यातून मिळणारा नफा आणि असणारा रिस्कही मध्यम स्वरूपाचा असतो.
स्मॉल कॅप फंडमध्ये जास्त नफा मिळू शकतो, पण रिस्कही मोठी असते.
2. डेब्ट म्युच्युअल फंड –
हे एकप्रकारे फिक्स डिपॉझिट सारखे असतात. हे तुम्हाला एक निश्चित नफा देत असतं. यामध्ये रिस्क कमीत कमी असते.
परंतु यातून जास्त नफा होण्याची शक्यताही नसते. यामध्ये तुमचे पैसे सरकारी बॉण्ड, कंपनी बॉण्ड, कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवले जातात.
3. हायब्रीड म्युच्युअल फंड –
यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड अशी दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते.
यामध्ये पैसे दोन प्रकारच्या फंडमध्ये विभागले जातात, त्यामुळे रिस्क आपोआप कमी होते.
यामध्ये एक प्रकारचा समतोल राखला जातो असं तुम्ही म्हणू शकता. यामध्येही अनेक प्रकार असतात.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायच्या पद्धती कोणत्या?
यात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि एकरकमी गुंतवणूक प्लॅन या दोन पद्धतींद्वारे तुम्हाला गुंतवणूक करता येते.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) -
यामध्ये ठराविक रक्कम एका ठराविक कालावधीनंतर गुंतवली जाते. यामध्ये दर दिवसाला, दर आठवड्याला, दर पंधरा दिवसाला, दर महिना किंवा दर तीन महिन्यांना अशा कोणत्याही प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला ठराविक रक्कम गुंतवता येते.
दीर्घकाळापर्यंत तु्म्ही एसआयपी ठेवली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो, पण काही फंड मध्ये हेच पैसे एक वर्ष आधी काढले तर चार्जेस किंवा कर लागण्याची शक्यताही असते.
नोकरदार वर्गासाठी हा गुंतवणूकीचा एक फायदेशीर मार्ग ठरू शकतो. यात तुम्ही कमीत कमी 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता.
याचा फायदा असा की, तुम्ही यात रक्कम कमी जास्त करू शकता. म्हणजे जर तुमचा पगार वाढला तर तुम्ही गुंतवणूकीची रक्कम वाढवू शकता.
शिवाय, जर कधी आर्थिक गणित बिघडलं तर तुम्ही काही काळासाठी रक्कम नाही भरली तरी चालू शकतं. तुमचे पैसे कुठेही जात नाहीत.
2. एकरकमी गुंतवणूक -
यामध्ये एकदाच मोठी रक्कम गुंतवली जाते. गुंतवणूकदार त्यात सारखे सारखे पैसे टाकत नाहीत.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?
म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटद्वारे, बँकांच्या माध्यमातून, ब्रोकरच्या मार्फत आणि म्युच्युअल फंड कंपन्यांच्या त्यात गुंतवणूक कशी करायची ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला गुंतवणूक करता येते.
म्युच्युअल फंड कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून तुम्हाला गुंतवणूक करता येते. त्यासाठी आवश्यक असलेलं खातं तयार करावं लागतं.
जवळच्या म्युच्युअल फंडच्या ऑफिसला जाऊन, तिथे त्यांनी दिलेला फॉर्म भरून त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करून गुंतवणूक करता येते.
कागदपत्रांमध्ये ओळखपत्र म्हणून तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड देऊ शकता.
त्यासाठी तुमचं बँक खात्याची माहिती तसेच केवायसी झालेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते तुमचं म्युच्युअल फंडचं अकाऊंट काढतात.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रोकरच्या मार्फत देखील तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
ब्रोकर तुम्हाला कोणता म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी चांगला आहे याची माहिती देऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला ठराविक शुल्क द्यावं लागेल.
बँकांच्या माध्यमातून देखील तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंड कंपन्यांच्या ॲप्लिकेशनचा वापर करुन देखील तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येते.
म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्याची योग्य वेळ कोणती?
म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा, असं सगळे सांगतात. पण हे पैसे काढून घेण्याची योग्य वेळ कधी असते, हेही माहिती असायला हवं.
शेअर बाजारात घसरण झाली तर आपण खरेदी करू याची वाट इक्विटी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स पाहत असतात. बाजार पुन्हा वर गेला, उसळला की मग ही युनिट्स विकून हे गुंतवणूकदार नफा कमावतात.
स्वस्तात युनिट्स विकत घेऊन भाव वधारल्यानंतर ती विकणं ही स्ट्रॅटेजी म्हणजे गुंतवणुकीतून नफा कमावण्याचं धोरण आहे.
पण सगळेच असं करू शकत नाही. कारण शेअर बाजारात काय होईल याचा नेमका अंदाज बांधणं कुणालाच शक्य नाही.
घसरण सुरू झाली तर ती किती काळ सुरू राहील आणि पुन्हा बाजार कधी वर जाईल म्हणजे रिकव्हरी केव्हा होईल हे कोणीही सांगू शकत नाही.
मग म्युच्युअल फंडातून बाहेर पडण्याची करण्याची नेमकी वेळ कशी साधायची?
शेअरबाजारात घसरण होते तेव्हा अनेक गुंतवणूकदार आपल्या फंडाची NAV घसरताना पाहून घाबरून जातात. ते आपली म्युच्युअल फंडात सुरू असलेली SIP थांबवतात किंवा मग त्यांच्याकडे असलेली म्युच्युअल फंडाची युनिट्स या पडत्या बाजारात विकून टाकतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण आकडेवारीचा अभ्यास केला, तर शेअरबाजारातली अस्थिरता ही काही काळापुरतीच असते. त्यामुळे पडत्या बाजारात आपल्याकडची म्युच्युअल फंड गुंतवणूक विकून न टाकता, ती तशीच ठेवणं योग्य ठरेल.
बाजार पडतोय तर आता पैसे काढून घेऊ आणि नंतर मार्केट सुधारल्यावर पुन्हा पैसे गुंतवू, असा विचार करणं कधी कधी तोट्याचं ठरू शकतं. पण तरीही कधी कधी काही कारणांसाठी म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीतून बाहेर पडावं लागतं.
त्याला अनेक कारण असू शकतात. जसं की नवीन वाहन विकत घेणं असेल, शिक्षणासाठीच्या कोर्सची फी भरणं असेल, पर्यटनासाठी येणारा खर्च असेल, लग्न असं काहीही असू शकतं.
अशा वेळी तुम्ही इक्विटी फंडातून लिक्विड फंडामध्ये पैसे हलवण्यामध्ये कमी जोखीम आहे. कारण त्यावर सेव्हिंग्स अकाऊंटपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि त्यात गुंतवलेले पैसे काढून घेणं सोपं असतं.
शिक्षण किंवा निवृत्तीसाठी तुम्ही जर आर्थिक उद्दिष्टं ठरवली असतील तर ही वेळ येण्याच्या थोडं आधी म्युच्युअल फंडातून पैसे काढून फिक्स्ड डिपॉझिट किंवा डेब्ट पर्यायांमध्ये गुंतवणं चांगलं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दुसरी गोष्ट म्हणजे एकदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यावर त्याबद्दल विसरून जाऊ नका. त्याच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवा. म्हणजेच तुमच्या पोर्टफोलियोचा आढावा घेत रहा.
वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेल्या पर्यायांची कामगिरी कशी आहे, ते तपासून पहा. जे फंड्स चांगली कामगिरी करत नसतील, त्यातून बाहेर पडण्याचा विचार करा. मग अचानक पैशांची गरज निर्माण झाली तर काय करायचं?

फोटो स्रोत, Getty Images
तुमच्याकडे अचानक आलेल्या अडचणीच्या काळी इमर्जन्सी फंड असायला हवा, असं गुंतवणूक सल्लागार सांगतात.
अचानक येणारी आजारपणं , नोकरी जाणं, घराची दुरुस्ती निघणं अशा परिस्थितीत आपली गुंतवणूक न मोडताही पुढचा काही काळ पुरतील अशा दृष्टीनं साठवलेले पैसे. साधारणपणे 3 ते 6 महिन्यांच्या खर्चाइतका इमर्जन्सी फंड उभारावा, असं तज्ज्ञ सांगतात.
पैशांची गरज निर्माण झाली आणि हा इमर्जन्सी फंड वापरूनही जर पैसे लागणार असतील, तर अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडातले पैसे तुम्ही काढू शकता.
आपल्या गुंतवणुकीचं नियोजन हे आपली जोखीम घ्यायची क्षमता किती आहे, यानुसार करावं असं गुंतवणूक सल्लागार सांगतात.
म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणं चांगलं, असं सगळे सांगतात.
पण दीर्घ कालावधी म्हणजे नक्की किती? तज्ज्ञांची याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. पण सरासरी विचार करता 5 वर्षांचा कालावधी चांगला आहे.
पाच वर्षं तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीत, तर तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. पण हा कालावधी ही प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. कारण म्युच्युअल फंडाचा प्रकार त्यात गुंतवलेली रक्कम वेगवेगळी असते.
पण ही फक्त माहिती आहे. आर्थिक निर्णय घेताना तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागारांना विचारूनच घ्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











