एकत्र बसून जेवणाची शेकडो वर्षांची परंपरा का खास आहे? संशोधनात काय दिसून आलं?

एकत्र बसून जेवण करणारं कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेकडो-हजारो वर्षांपासून माणसं आणि त्यांचे पूर्वज एकत्र जेवण करत आले आहेत, आणि अभ्यास सांगतो की, या सवयीमुळे केवळ आनंदच नाही, तर विश्वास, जवळीक आणि सामाजिक सहकार्यही वाढतं.
    • Author, व्हेरोनिक ग्रीनवुड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, असं म्हटलं जातं. समाजात मिसळणं, एकत्र राहणं आणि इतरांशी संवाद साधणं त्याला आवडतं.

सामाजिक संबंधातून तो आपलं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतो. एकत्र जेवण्याची पद्धतही यातूनच जन्माला आली असावी.

माणसांना एकत्र बसून जेवायला का आवडतं? मित्र, कुटुंब किंवा सहकारी, एकत्र जेवणं फक्त खाण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते नाती घट्ट करण्याचं, आनंद वाढवण्याचं आणि सामाजिक संबंध मजबूत करण्याचं महत्त्वाचं साधनही आहे.

शेकडो-हजारो वर्षांपासून माणसं आणि त्यांचे पूर्वज एकत्र जेवण करत आले आहेत. आता अभ्यास सांगतो की, या सवयीमुळे केवळ आनंदच नाही, तर विश्वास, जवळीक आणि सामाजिक सहकार्यही वाढतं.

हजारो वर्षांपासून माणूस एकत्र बसून जेवणाचा आनंद घेत आला आहे. पण एकत्र बसून जेवणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि आजही ही परंपरा आपण का चालू ठेवली आहे? जाणून घेऊयात.

माणसांची ही एक खास सवय आहे. आपल्याला एकत्र बसून जेवायला खूप आवडतं.

मित्रांसोबत बाहेर जेवायला जाणं, घरी डिनर पार्टी किंवा सणासुदीच्या दिवसांतील मेजवानी करणं असं सगळं आपण खूप आनंदाने करतो.

एकत्र जेवण करणं खरंच खास आहे?

एकत्र जेवणं इतकं सामान्य झालं आहे की, आपण त्याबद्दल वेगळं बोलतही नाही. फक्त कधी ते कमी होतंय अशी चर्चा सुरू झाली की, तेव्हाच लोक याकडे लक्ष देतात.

कुटुंबांमध्ये एकत्र जेवणाचं प्रमाण कमी होत चाललं आहे, अशा बातम्या वारंवार चर्चेत येत असतात. परंतु, चिंतेचे हे विषय नवीन नाहीत. किमान 100 वर्षांपासून लोक याबद्दल काळजी व्यक्त करत आले आहेत, असे काही पुरावे सांगतात.

म्हणजेच, एकत्र जेवणं ही फक्त सामान्य नाही, तर खूप खास आणि प्रभावी गोष्ट आहे. पण ही गोष्ट खास का आहे?

अन्न एकमेकांशी वाटून खाण्याची सवय मनुष्य प्रजातीच्या उत्पत्तीपूर्वी पासूनच असावी.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अन्न एकमेकांशी वाटून खाण्याची सवय मनुष्य प्रजातीच्या उत्पत्तीपूर्वी पासूनच असावी.

शास्त्रज्ञ सांगतात की, मनुष्याच्या जवळचे म्हणजेच वानर कुळातील सदस्य चिंपांझी आणि बोनोबोस माकडंदेखील आपल्या समूहात अन्न वाटतात.

पण समाजशास्त्रज्ञ निक्लस न्यूमन यांच्या मते, फक्त जवळच्या लोकांना अन्न देणं म्हणजे 'एकत्र बसून जेवणं' नसतं.

ते म्हणतात, "तुम्ही अन्न वाटू शकता, पण त्यासाठी एकत्र बसून जेवणं आवश्यक नाही."

मनुष्याच्या या अन्न वाटण्याच्या कृतीमध्ये अनेक सामाजिक अर्थ आहेत.

सर्वांनी मिळून केलेलं पहिलं जेवण बहुतेक शेकोटीजवळ झालं असावं. मनुष्य किंवा त्याचे पूर्वज स्वयंपाक करणं नेमकं कधी शिकले, हे निश्चित सांगता येणार नाही. काहींचा अंदाज हा 18 लाख वर्षांपूर्वी आहे.

परंतु, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. कोणी तरी शिकार करून किंवा अन्न गोळा करून, शेकोटी पेटवून, त्यावर स्वयंपाक करतो म्हणजे या सगळ्या प्रक्रियेसाठी त्याच्यासोबत मदत करणारा एक सामाजिक गट असावा.

तब्येत आणि मनस्थिती चांगली राहते

शेकोटीभोवती बसलात की, तिच्यापासून मिळणारी ऊब आणि प्रकाशामुळे तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागं राहू शकता, असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ रॉबिन डनबर सांगतात.

रात्री मिळालेला हा अतिरिक्त वेळ अन्न खाताना एकमेकांशी जास्त जवळीक वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडला असावा.

या सवयीचा नेमका उगम कसाही आणि काहीही असला तरी एकत्र बसून जेवलं की माणसांची तब्येत आणि मनस्थिती दोन्ही चांगली राहते, असं रॉबिन डनबर यांना 2017 मधील एका अभ्यासात आढळून आलं.

यूकेमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांनी विचारलं की, इतरांसोबत ते किती वेळा जेवतात.

जे लोक वारंवार एकत्र जेवत होते, ते त्यांच्या आयुष्यात जास्त समाधानी होते आणि त्यांना मदत करण्यासारखे मित्रही जास्त होते.

माकडं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माणसांव्यतिरिक्त बोनोबोससारखी माकडं एकत्र येऊन समूहात जेवतात.

डनबर यांच्या मते, लोक एकत्र जेवतात म्हणूनच असे सामाजिक फायदे दिसतात, हे फक्त योगायोगानं होत नाही.

डनबर म्हणतात, "जेवण किंवा खाणं मेंदूमधील एंडोर्फिन सिस्टिमला चालना देतं, जे माकडांमध्ये आणि माणसांमध्ये नाती घट्ट करण्यासाठी महत्त्वाचं आहे. समूहात एकत्र जेवल्यामुळे एंडोर्फिनचा प्रभाव वाढतो, अगदी जसं लोक एकत्र जॉगिंग करताना अनुभवतात. कारण एकत्र क्रिया केल्याने एंडोर्फिनची पातळी दुप्पट वाढते."

पत्रकार सिंथिया ग्रेबर आणि निकोला ट्विली यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये 'गॅस्ट्रोपॉड' या विषयावर चर्चा केली.

त्यांना आढळून आलं की, जर तुम्ही कुणासोबत एकाच वेळी एकसारखं अन्न खात असाल, तर ते लोक जास्त विश्वासार्ह वाटतात.

शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेसच्या आयलेट फिशबाक यांनी एका इन्व्हेस्टमेंट सिम्युलेशनमधील अनुभव सांगितला.

जर लोकांनी आधी एकत्र गोड खाल्लं असेल, तर ते त्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवून त्याला जास्त पैसे देतात, असं त्यांना आढळून आलं.

एकत्र जेवणं नेहमीच सकारात्मक नसतं

ज्यांनी एकसारखे स्नॅक्स खाल्ले होते, ते लोक वाटाघाटी लवकर आणि समाधानकारकपणे पूर्ण करत होते.

फिशबाक यांच्या मते, पूर्वीच्या काळात अन्नाच्या किंवा खाण्याच्या आवडी एकसारख्या असणं हा एक सोपा मार्ग होता.

यातून लोक एकमेकांच्या समान आवडीची ओळख करू शकत असत. आजही त्याचा थोडासा प्रभाव दिसून येतो.

परंतु, एकत्र जेवण करणं नेहमीच साधं किंवा सकारात्मक नसतं. मोठ्या मेजवानीत किंवा जेवणात, जिथे खूप अन्न वाटलं जातं, तिथे अनेकदा सत्ता किंवा ताकद दाखवण्याचा किंवा कोणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही असतो.

उदाहरणार्थ, पेरणीच्या काळात शेतकरी त्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना जेवण देतो किंवा ऑफिस पार्टीत कंपनी किती मोठं जेवण देते किंवा देत नाही, हे लोक तपासतात. कुटुंबातील नियमित जेवणातही कधी कधी भांडणं होऊ शकतात.

एकत्र बसून जेवणारं कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

"जर तुम्ही लोकांना विचाराल, तर ते मित्र आणि प्रियजनांसोबत एकत्रित जेवण करणं त्यांना आवडतं, असं सांगतील. पण कधी कधी हे एकत्र जेवण फारच त्रासदायक ठरू शकतं," असं न्यूमन सांगतात.

"हे नियंत्रण आणि वर्चस्वासाठीचंही एक ठिकाण आहे. अशा जेवणात कोणी तुमच्या निर्णयांवर किंवा वजनावर सतत टीका करत असेल, तर ते तुमच्या आनंदासाठी उपयोगाचं नाही."

स्वीडनमधील वृद्ध लोकांसोबतच्या अभ्यासात न्यूमन यांना असं लक्षात आलं की, त्यांना एकटं जेवायला जास्त त्रास होत नाही. त्यांना एकत्र जेवायला आवडतं, पण त्याची कमतरता फारशी जाणवत नाही.

फक्त जर ते आधीच एकटे किंवा त्यांना एकटेपणाची जाणीव होत असेल, तर एकट्यानं जेवण करण्यानं त्यांना जास्त त्रास होऊ शकतो.

"पण जर तुम्ही नेहमीच इतरांसोबत जेवत असाल, तर कधीकधी एकटं बसून पुस्तक वाचणं छान वाटेल," असं न्यूमन म्हणतात.

हा लेख 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रकाशित झाला होता आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा प्रकाशित करण्यात आला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.