इटलीच्या या शहरानं घातली क्रिकेटवर बंदी, बांगलादेशी नागरिक म्हणतात, 'हे आम्हाला त्रास देण्यासाठीच'

- Author, सोफिया बेट्टिजा
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
इटलीच्या मोनफाल्कोन शहराबाहेर एक मैदानात कडक उन्हात काही बांगलादेशी तरुण क्रिकेटचा सराव करत आहेत. हा परिसर शहरापासून दूर ट्रिएस्ट विमानतळाजवळचा आहे.
पण हे लोक शहरापासून एवढ्या दूर प्रवास का करत आहेत? तर याचं उत्तर म्हणजे, महापौरांनी शहरात खेळण्यावर बंदी घातली आहे.
एखाद्यानं नियमभंग केल्यास त्याला 100 युरो म्हणजेच जवळपास साडे नऊ हजार रुपये दंड भरावा लागेल.
"आम्ही शहरात खेळत असतो तर आतापर्यंत आमच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस पोहोचले असते," असं या टीमचे कर्णधार मियाह बप्पी म्हणाले.
आधीही स्थानिक बागेत खेळणाऱ्या तरुणांना पकडलं होतं, असं मियाह बप्पी म्हणाले.
स्थानिक कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग झाल्याचं या तरुणांना माहिती नव्हतं. पोलिसांनी खेळ थांबवून त्यांच्यावर दंडही आकारला.
"क्रिकेट हा इटलीचा खेळ नाही, असं कारण हे लोक सांगतात. मात्र खरं कारण वेगळंच आहे. आम्ही विदेशी असल्याने आम्हाला अशी वागणूक दिली जात आहे," असंही बप्पी म्हणाले.
क्रिकेटवरील या बंदीच्या मुद्द्यामुळं मोनफाल्केन शहरात खदखदणारा तणाव समोर आला असून, तो वाढत चालला आहे.
बांगलादेशी मुस्लिमांची मोठी संख्या
मोनफाल्केन शहराची एकूण लोकसंख्या 30 हजार आहे. यापैकी एक तृतियांश विदेशी नागरिक आहेत. त्यातील बहुतांश बांगलादेशी मुस्लीम आहेत.
इथं 1990 पासून बांगलादेशी मुस्लीम यायला सुरुवात झाली.
शहराच्या महापौर अॅना मारिया कट्टर उजव्या विचारसरणीच्या आहेत. बाहेरून आलेल्या लोकांमुळं शहराची मूळ सांस्कृतिक ओळख धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. .
मारिया यांना निवडणुकीत विजय मिळाला होता. प्रचारात त्यांनी अँटि इमिग्रेशन पॉलिसीबाबत भूमिका घेतली होती. ही भूमिका म्हणजे शहर आणि ख्रिश्चन मूल्यांच्या संरक्षणाचा मिशन असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
"आमचा इतिहास पुसला जातोय. काही फरक पडत नाही, असं वाटत असलं तरी दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत आहे," असंही त्यांनी म्हटलं.
मोनफाल्कोनमध्ये बांगलादेशी नागरिकांचा प्रभाव किती आहे ?
या शहरात इटलीचे नागरिक पाश्चिमात्य कपडे परिधान करतात. तर बांगलादेशी नागरिक सलवार कमीज आणि हिजाबमध्ये वावरताना दिसतात.
शहरात बांगलादेशींचे रेस्तरॉ आणि हलाल शॉप आहेत. सायकल मार्गाचा वापरही बहुतांश दक्षिण आशियायी नागरिकच करतात.
महापौर मारिया यांनी शहरातील काही ठिकाणचे बसण्याचे बेंच काढून टाकले आहेत. याठिकाणी शक्यतो बांगलादेशी नागरिक बसायचे.
समुद्रकिनाऱ्यावर बुरखा परिधान करून जाणाऱ्या महिलांच्या विरोधातही मारिया यांनी आवाज उठवला आहे.
त्यांच्या मते, "इथं मुस्लीम कट्टरवादाची तीव्र झलक दिसते. एक अशी संकृती आहे ज्यात पुरुष महिलांसोबत अत्यंत वाईट वर्तन करतात."
मुस्लिमांबाबतच्या कठोर भूमिकेमुळं महापौरांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. त्यामुळं त्यांना नेहमी पोलीस संरक्षण असतं.

फोटो स्रोत, Getty Images
मियाह बप्पी आणि क्रिकेट खेळणारे त्यांचे सहकारी नोकरीसाठी इटलीला आले होते. फिनकेंटिएरी या जहाज बांधणी करणाऱ्या कंपनीत कामासाठी ते आले होते.
ही कंपनी जहाज बांधणी करणारी युरोपासह जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
ही कंपनीही महापौरांच्या निशाण्यावर आहे. कंपनी अत्यंत कमी पगारात लोकांना राबवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. एवढ्या कमी वेतनात इटलीतील नागरिक काम करणार नाहीत, असंही त्या म्हणाल्या.


कंपनीचे संचालक क्रिस्टियानो बाज्जारा यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. इटलीच्या नियमानुसारच वेतन देत असल्याचं ते म्हणाले.
"आम्हाला प्रशिक्षित कामगारांची आवश्यकता आहे. मात्र, युरोपात तसे तरुण शोधणं कठिण आहे. शिपयार्डमध्ये काम करण्याची कुणाचीही तयारी नाही," असंही ते म्हणाले.
इटलीतील सध्याची परिस्थिती
इटली हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेल्या देशांपैकी एक आहे. या देशात 2023 मध्ये 3 लाख 79 हजार बालकांचा जन्म झाला होता.
या देशात कामगारांची संख्याही कमी आहे.
इटलीमध्ये 2025 सालापर्यंत दरवर्षी दोन लाख 80 हजार कामगारांची गरज भासेल.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष ब्रदर्स ऑफ इटलीच्या नेत्या आहेत.
इमिग्रेशन कमी करायचं आहे, असं मेलोनी यांनी आधी म्हटलं होतं. तरीही युरोपाबाहेरील कामगारांना परवाना देण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.
याबाबत मेयर मारिया म्हणाल्या की, “बांगलादेशातील मुस्लीम आणि इटलीमध्ये जन्माला आलेल्या लोकांची जीवन जगण्याची पद्धत एकदम वेगळी आहे.”

महापौरांनी शहरातील दोन इस्लामिक केंद्रांमध्ये नमाज पठणावर निर्बंध आणल्यानंतर शहरात अतिशय तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मारिया याबाबत बोलताना म्हणतात की, “शहरवासीय मला अनेक फोटो, व्हीडिओ पाठवतात, ते पाहून आश्चर्य वाटतं. लोक दोन इस्लामिक केंद्रांमध्ये मोठ्या संख्येने एकत्रित होत नमाज पठण करत आहेत. एका इमारतीत 1900 लोक, असं चित्र दिसून येतं.”
मारिया म्हणतात, “फुटपाथवर अनेक लोक बाईक उभी करून निघून जातात. दिवसांतून पाच-पाचवेळा मोठ्या आवाजात नमाज पठण करतात, रात्रीही नमाज पठण करतात.”
इटली आणि इस्लाम
मारियांच्या मते, हा स्थानिक नागरिकांबरोबरचा अन्याय आहे.
सामूहिक नमाज पठणावर बंदी आणल्याचं निर्णयाचं समर्थन करताना त्या म्हणाल्या की, "सर्व कायदेशीर पद्धतीनं केलं आहे. ही इस्लामिक केंद्रं धार्मिक प्रार्थनेसाठी बनवलेली नाहीत. त्यांना प्रार्थनेसाठी जागा उपलब्ध करून देणं ही माझी जबाबदारी नाही."
इटलीच्या कायद्यानुसार इस्लामला आधिकृत दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. त्यामुळं उपासनेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात त्यांना अडचणी येतात.

इटलीत एकून 8 मशिदी आहेत. तर देशातील मुस्लिमांची संख्या जवळपास 20 लाख आहे.
इटलीच्या तुलनेत फ्रान्समध्ये 2 हजारपेक्षा अधिक मशिदी आहेत.
मोनफाल्कोनमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींच्या मते, महापौरांच्या निर्णयामुळं मुस्लीम समुदायावर मोठा परिणाम झाला आहे.
19 वर्षीय मेहेली म्हणतात की, "महापौरांना वाटतं बांगलादेशी लोक इटलीचं इस्लामीकरण करत आहेत. मात्र, तसं नाही. आम्ही फक्त आमच्या कामाशी काम ठेवतो"
मेहेली ढाक्याहून आल्या असून त्या, पाश्चिमात्य कपडे परिधान करतात. मेहेली यांना कामापुरती इटालीयन भाषाही बोलता येते.
"बऱ्याचदा केवळ बंगाली असल्यानं भररस्त्यात त्यांचा अपमान करण्यात आला," असं त्या सांगतात. त्यांनी लवकरच हे शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशी नागरिक निघून गेल्यास काय होईल ?
मियाह बप्पींना यावर्षी इटलीचा पासपोर्ट मिळेल, अशी आशा आहे. पण आता या शहरात राहण्याबाबत ते ठाम नाहीत.
आम्ही यांच्यासाठी अडथळा निर्माण करत नाही. आम्ही वेळेवर कर भरतो. मात्र, या लोकांना आम्ही इथे नकोसे झालो आहोत, असंही ते म्हणाले.

इटली आणि बांगलादेशी नागरिकांच्या जीवनशैलीत फरक असल्याचं महापौर म्हणतात. मात्र, बप्पी यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडं लक्ष वेधलं.
ते म्हणाले, "आम्ही आमच्या देशात निघून गेलो तर जहाज बांधणी कंपनीला एक जहाज निर्मितीसाठी पाच वर्षे लागतील."
दोन महिन्यांपूर्वी एका स्थानिक न्यायालयानं दोन इस्लामिक केंद्रांच्या बाजूनं निर्णय दिला आहे. तसंच तिथं सामुहिक नमाज पठनास परवानगी दिली आहे.
महापौर मारिया यांची मोहीम मात्र, सुरूच आहे. ही मोहीम 'युरोपचे इस्लामीकरण' रोखण्यासाठी असल्याचा त्यांचा दावा आहे.
मारिया आता युरोपच्या संसदेत निवडून गेल्या आहेत. लवकरच तिथंही या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
- सह वार्तांकन बॉब हॉवर्ड
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











