'मी पाहिलं की, विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून चपलेने मारहाण केली गेली'

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

‘NSS कॅम्प सुरू असताना रात्रीच्या वेळी प्राध्यापकाने अर्धनग्न करून मारहाण केली. थंडीमध्ये आम्हाला दोन तास उभं केलं.’

मुंबईतील नामांकित केजे सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही गंभीर तक्रार महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे केली आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केजे सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं एनएसएसचं (नॅशनल सर्व्हिस स्किम) शिबीर पार पडलं.

मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एका गावात महाविद्यालयाने एनएसएसच्या 70 विद्यार्थ्यांना कॅम्पसाठी नेलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांसोबत दोन महिला प्राध्यापक आणि दोन पुरूष प्राध्यापक होते.

‘विद्यार्थ्यांना चपलेने मारताना मी पाहिलं’

मुंबईतील विद्याविहार येथील केजे सोमय्या महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी 29 डिसेंबर 2022 रोजी डहाणुतील एका गावात कॅम्पसाठी गेले होते.

संबंधित गावात विद्यार्थ्यांच्यादृष्टीने सोयी-सुविधा नव्हत्या किंवा त्यासाठी तयारी सुद्धा करण्यात आली नव्हती अशी तक्रार आता केली जात आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी आणखी काही गंभीर तक्रारी महाविद्यालयाकडे केल्या आहेत.

ही घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “मी काही कामानिमित्त त्याच गावात होतो. मी पाहिलं की, ज्या खोलीत विद्यार्थी झोपले होते त्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोकला जात होता. दरवाजा खोलल्यानंतर प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना चपलेने मारण्यास सुरूवात केली.

ते विद्यार्थ्यांना शिव्या देत होते. मग विद्यार्थ्यांना एका रांगत बाहेर काढलं. बाहेर आणल्यावर सेमी सर्कलमध्ये त्यांना उभं केलं. तेव्हाही त्यांना मारहाण केली जात होती. मग विद्यार्थ्यांना शर्ट,पँट काढायला सांगितली. अंतर्वस्त्रही काढण्यास सांगितले पण मुलांनी नकार दिला. बाहेर खूप थंडी होती.”

विद्यार्थ्यांना मारहाणीबाबत कायदा काय सांगतो?

फोटो स्रोत, DANNIKONOV

फोटो कॅप्शन, विद्यार्थ्यांना मारहाणीबाबत कायदा काय सांगतो?

“14 डिग्री सेल्सीयस तापमान होतं. एवढ्या थंडीत मुलांना उघडं करून मारहाण करण्यात आली. त्यानंतरही बराच वेळ त्यांना बाहेर तसंच उभं करण्यात आलं,”

ते पुढे सांगतात, “काय करावं मला काही सुचत नव्हतं. कारण हे सगळं काय चाललंय हे समजून घेण्यातच मला वेळ लागला. मला अशी माहिती मिळाली की आता मुलांनी तक्रार केली आहे.”

चौकशी सुरू

विद्यार्थ्यांकडून अशा तक्रारी प्राप्त झाल्याचं केजे सोमय्या महाविद्यालयाने मान्य केले आहे.

महाविद्यालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. नियमांनुसार आम्ही कडक कारवाई करू.”

‘कारवाई करण्यास विलंब का होतोय?’

या घटनेनंतर आता विद्यार्थी संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. या गैरप्रकाराची दखल मुंबई विद्यापीठाने घ्यावी आणि चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबाबत पत्र लिहिलं आहे.

ते म्हणाले, “डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डहाणू येथे शिबिरासाठी गेले असता कॉलेजच्या प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना मध्यरात्री अर्धनग्न करून मारहाण केली,इतकेच नाही तर अर्धनग्न अवस्थेत त्यांना कडाक्याच्या प्रचंड थंडी दोन-तीन तास उभे करून ठेवण्यात आले. विद्यार्थी शिबिरावरून परतल्यानंतर प्राचार्यांकडे तक्रार करून अद्याप प्राध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांवर इतका अन्याय होऊन. देखील प्राचार्य गंभीर का नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

“हे प्रकरण गंभीर असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे,आशी मागणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व प्रकुलगुरू यांना केली आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)