यवतमाळ: रॅगिंग म्हणजे काय? महाविद्यालयात अजूनही रॅगिंग का होतं?

रॅगिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या डॉक्टर विद्यार्थ्याच्या रॅगिंगचं प्रकरण समोर आलं आहे.

या प्रकरणात रॅगिंगमुळे पीडित डॉ. अनमोल भामभानी या विद्यार्थ्याला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडल्याचा आरोप त्याच्या आईने केल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपातील यांनी चौकशी समिती नेमली. चौकशीनंतर प्रथमदर्शनी दोषी आढळलेले डॉ. ओंकार कवतिके, डॉ. अनुप शाह, डॉ. साईलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियांका साळुंखे आणि डॉ. पी. बी. अनुशा यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे.

वरिष्ठ डॉक्टर विद्यार्थ्यांकडून सातत्याने रॅगिंग

या प्रकरणात वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून केवळ डॉ. अनमोल भामभानीच नव्हे तर इतर विद्यार्थ्यांवरही मोठ्या प्रमाणात रॅगिंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

डॉ. अनमोल याच्यावर रॅगिंग करून सलग सतत उभे राहण्यास लावल्यामुळे त्याला सेलुलायटिस आजार जडल्याची तक्रार त्याच्या आईने 23 ऑगस्ट रोजी नाईक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे दिली. तसंच विद्यार्थ्यांच्या सहीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलं होतं.

डॉ. अनमोल या विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून प्रचंड त्रास देण्यात येत होता, त्याला दिवसभर उभं राहण्यास लावलं जायचं. रुग्णांसमोर त्याला अपमानास्पद वागणूक देण्यात यायची. त्याला खानावळीचं बिल देण्यास लावलं जायचं. काहीवेळा वरिष्ठ डॉक्टरांनी त्याला सर्वांदेखत थोबाडितही मारल्याचा दावा तक्रारीत केला होता. असाच प्रकार इतर कनिष्ठ विद्यार्थ्यांसोबतही सुरू होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आता या प्रकरणाची तक्रार यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही देण्यात आली. दरम्यान, चौकशी समितीच्या चौकशीनंतर अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांनी संबंधित पाच विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

महाविद्यालयांमध्ये वारंवार होणारं रॅगिंग

महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या रॅगिंगचं प्रकरण चव्हाट्यावर येण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याच्या, त्यातून पुढे अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या सातत्याने वाचण्यास मिळतात.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वप्निल शिंदे या वैद्यकीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. स्वप्निल हा नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. रॅगिंगमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. पण महाविद्यालयाने हा आरोप फेटाळून लावला होता.

2020 च्या फेब्रुवारी महिन्यात बीडच्या नाळवंडी येथील विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. गणेश कैलास म्हेत्रे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील BAMS चा विद्यार्थी होता.

डॉ. पायल तडवी

फोटो स्रोत, FACEBOOK/PAYAL TADVI

फोटो कॅप्शन, डॉ. पायल तडवी हिने 2019 मध्ये रॅगिंगमुळेच आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

2019 च्या मे महिन्यात डॉ. पायल तडवी हिचं आत्महत्या प्रकरणही गाजलं होतं. पायलने रॅगिंगला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पायल ही बी एल नायर हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

2013 मध्ये नितीन पाडाळकर या 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. नितीन त्यावेळी नवी मुंबईतील रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या दुसर्‍या वर्षात शिकत होता. या प्रकरणात दोन विद्यार्थ्यांवर गुन्हाही दाखल झाला होता.

रॅगिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याचा प्रकार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पण त्याचसोबत इतर शैक्षणिक शाखांमध्येही रॅगिंग होत असल्याचं अनेक प्रसंगांमधून समोर आलं आहे.

रॅगिंग म्हणजे नेमकं काय?

रॅगिंगसंदर्भात महाराष्ट्र शासनाने 1999 साली काढलेल्या शासननिर्णयात रॅगिंगची व्याख्या देण्यात आलेली आहे. तसंच विद्यापीठ अनुदान आयोगानेही त्याची व्याख्या 2009 साली काढलेल्या एका सार्वजनिक सूचनेत केलेली आहे.

यानुसार,

  • कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याला शारिरीक किंवा मानसिक हानी पोहोचवणे,
  • त्याच्यात धास्ती, भयाची किंवा अडचणीची भावना निर्माण करणे,
  • कोणत्याही स्वरुपात चिडवणे, शिवीगाळ करणे, मारहाण, धमकी देणे, खोड्या काढणे किंवा मनाला टोचेल असे बोलणे याला रॅगिंग संबोधण्यात येतं.
  • त्याशिवाय, एखाद्या विद्यार्थ्याला तो एखादी गोष्ट स्वेच्छेने करण्यास तयार होणार नाही, असे कृत्य करावयास लावणे हेसुद्धा रॅगिंग मानलं जातं.

रॅगिंग केल्यास काय कारवाई?

15 मे 1999 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या शासननिर्णयानुसार, शैक्षणिक संस्थेत अथवा संस्थेबाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार,

  • दोषी विद्यार्थ्यास अपराधसिद्धीनंतर दोन वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक शिक्षा होऊ शकते.
  • दोषी सिद्ध झालेल्या विद्यार्थ्याला शैक्षणिक संस्थेतून काढून टाकण्यात येतं. अशा प्रकारे काढून टाकलेल्या विद्यार्थ्याला पाच वर्षांपर्यंत कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नाही.
  • रॅगिंगसंदर्भात संबंधित विद्यार्थी, त्याचे आई-वडील किंवा पालक, शैक्षणिक संस्थेचे शिक्षक हे शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे त्याबाबत तक्रार करू शकतात.
  • तक्रार मिळाल्यानंतर संस्थेच्या प्रमुखांनी सात दिवसांच्या आत त्या प्रकरणाची चौकशी करणे बंधनकारक आहे.
  • सदर तक्रार खरी असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आल्यास प्रमुखांनी आरोपी विद्यार्थ्याला तत्काळ निलंबित करावे, त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पाठवून द्यावी, असा नियम यामध्ये देण्यात आलेला आहे.
  • तक्रारीत तथ्य आढळून न आल्यासही चौकशीनंतर तक्रारदाराला यासंबंधित लेखी माहिती प्रमुखांनी द्यावी, असंही या शासननिर्णयात सांगण्यात आलं आहे.
  • अशा प्रकरणांमध्ये शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने विद्यार्थ्यांचा रॅगिंगमध्ये सहभाग आहे, याबाबत निर्णय अंतिम असेल.
  • रॅगिंगची तक्रार केली असताना प्रमुखांनी नियमांचे पालन केले नाही, आपल्या कर्तव्यात कसूर किंवा हयगय केली तर रॅगिंग सारख्या गुन्ह्याला अपप्रेरणा केल्याचं मानलं जाऊ शकतं. अशावेळी संस्थेच्या प्रमुखाविरुद्धची कारवाई होऊ शकते, असं शासननिर्णयात म्हटलं आहे.

रॅगिंगमागची मानसिकता

पुण्यात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अर्चना नारवाणी यांच्याशी बीबीसी मराठीने रॅगिंगसंदर्भात चर्चा केली.

त्यांच्या मते, "रॅगिंगबाबत अजूनही विद्यार्थी-शिक्षक आणि पालकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. वरिष्ठ विद्यार्थी आणि कनिष्ठ विद्यार्थी यांची ओळख होण्यासाठी, त्यांच्यात मैत्री होण्यासाठी सगळे एकत्र येऊन विनोदी स्वरुपात एकमेकांची थट्टामस्करी करतात. त्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो, बाहेरील जग समजतं वगैरे, असा विचार अजूनही अनेकजण करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे."

रॅगिंग

फोटो स्रोत, Getty Images

"पूर्वीच्या काळी तसं असू शकेल, पण सध्या रॅगिंगचं स्वरुप बदलून गेलं आहे. यात चुकीच्या गोष्टींचा शिरकाव झाला आहे. आजकाल जीवघेणं रॅगिंग पाहायला मिळतं, पीडित विद्यार्थ्याच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो, हे त्यामधून दिसून आलं आहे, " असं डॉ. नारवाणी सांगतात.

त्यांच्या मते, "नव्या विद्यार्थ्यावर जरब बसवण्यासाठी वरीष्ठ विद्यार्थी रॅगिंग करतात. ते करताना अनेक गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव असतो. एखाद्या समाजाबद्दल असलेला आकस, पूर्वाग्रह, आपल्यासोबत घडलेल्या घटना यांचं प्रतिबिंब यामधून दिसतं."

इंडिया टाईम्सच्या बातमीनुसार, "कनिष्ठ विद्यार्थ्यांवर रॅगिंग करण्यामागे अधिकार गाजवण्याची मानसिकता असते. यामुळे रॅगिंक करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण कसे श्रेष्ठ आहोत, इतरांना आदेश देऊ शकतो, ही भावना आनंदित करते. पीडित विद्यार्थी आपले आदेश मानू लागतो, तेव्हा रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल आणखी वाढतं."

बदला घेण्याची मनोवृत्तीही यामागे असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या वरीष्ठ विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची वागणूक दिलेली असते. त्यामुळे आपल्यावर झालेल्या छळाचा बदला घेण्यासाठी काही विद्यार्थी हा मार्ग अवलंबतात. आपण जे काही सहन केलं, ते इतरांवर लादण्याचा प्रयत्न ते करतात.

"याव्यतिरिक्त, काही विद्यार्थी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांचा रागही रॅगिंगच्या माध्यमातून कनिष्ठ विद्यार्थ्यांवर काढत असल्याचं दिसून आलं आहे. या माध्यमातून ते आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात."

डॉ. नारवाणी म्हणतात, "रॅगिंग करणाऱ्या व्यक्तीच्या मनावरही एका प्रकारचं दडपण असतं. त्याला रॅगिंग करण्यात रस असतोच असं नाही. पण त्यांना कूल अशा समूहाचा भाग बनायचं असतं. इतर जण ते करत आहेत म्हणून त्यांच्यापैकीच एक दिसण्यासाठी रॅगिंग केलं जातं. सध्याच्या तरुणांमध्ये रॅगिंग करण्याची फॅशन बनली आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे."

तुमच्यासोबत रॅगिंग होत असल्यास काय कराल?

डॉ. नारवानी म्हणतात, "सध्या रॅगिंग विरोधात अनेक कायदे करण्यात आले आहेत. पण विद्यार्थी त्यांची मदत घेत नाहीत. आपण तक्रार केली तर सर्वांपासून वेगळे पडू, अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे जे होईल ते सहन करण्याचा विचार ते करतात."

त्यांच्या मते, "आपल्यावर रॅगिंग होत असल्याचं पीडित विद्यार्थ्याने न सांगितल्याने हा प्रकार वाढत जातो. त्यातून अनुचित गोष्टींना तोंड फुटतं. त्याचा शेवट वाईट पद्धतीने होतो."

हे सगळं टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळीच या गोष्टींबाबत बोलणं गरजेचं असल्याचं डॉ. नारवाणी यांना वाटतं. त्या म्हणतात, "आपल्यासोबत चुकीचं घडत आहे, असं जाणवल्यास तत्काळ संस्था प्रशासनाशी संपर्क साधायला हवा. या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना देणंही तितकंच महत्त्वाचं असतं."

डॉ. नारवाई पुढे म्हणतात, "आपण वेगळे पडू, निलंबित केलं जाईल, याची भीती तक्रार करणाऱ्याला नाही तर छळ करणाऱ्याला असावी. त्यामुळे आपल्यावर होणाऱ्या रॅगिंगविषयीची कल्पना शिक्षक, प्राचार्य, अँटी-रॅगिंग समितीला वेळीच दिल्यास पुढील चुकीच्या गोष्टी टाळता येऊ शकतात."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)