200 वर्षांपूर्वीच्या कंडोमवर छापण्यात आलेले चित्र नेमके काय दर्शवते?

200 वर्षांपूर्वींचा कंडोम

फोटो स्रोत, Rijksmuseum

    • Author, बार्बरा टॅश आणि दानाई नेस्ता कुपेम्बा बीबीसी न्यूज
    • Role, बीबीसी न्यूज

अ‍ॅमस्टरडम मधील रिक्सम्युझियम नावाच्या संग्रहालयात सुरू असलेल्या एका प्रदर्शनात नुकताच 200 वर्ष जुना कंडोम ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जवळपास दोन शतकं जुना असलेला हा कंडोम आजही चांगल्या सुस्थितीत आहे. या कंडोमचा वापरही झाला नसल्याचे क्युरेटर्सनी म्हटले आहे. तसेच ते पाहण्यासाठी अनेकजण येत असल्याचे क्युरेटर्सनी सांगितले.

हा कंडोम मेंढीच्या आतड्यापासून तयार केला असल्याची माहिती आहे. तसंच या कंडोमवर एक नन आणि तीन धर्मगुरू यांचं एक अश्लील चित्रही प्रिंट करण्यात आलेलं आहे.

ही दुर्मिळ वस्तू अंदाजे 1830 सालची असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी एका लिलावातून या संग्रहालयानं ही वस्तू खरेदी केली होती.

19 व्या शतकातील शरीर आणि लैंगिकता या विषयावरच्या प्रदर्शनात हा कंडोम ठेवण्यात आला आहे. तसंच या प्रदर्शनामध्ये छायाचित्रं, रेखाचित्रं आणि छपाई केलेल्या काही प्रिंटचाही समावेश आहे.

रिक्सम्युझियमचे क्युरेटर जॉयस झेलेन यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिलावात हा कंडोम पहिल्यांदा पाहिला होता त्यावेळी त्या सर्वांना हसू आलं होतं.

इतर कोणीही त्याची दखलही घेतली होती. फक्त त्यांनीच लिलावात त्यावर बोली लावली होती, असंही झेलेन म्हणाल्या.

वस्तू संग्रहालय

फोटो स्रोत, Rijksmuseum

ही वस्तू मिळवल्यानंतर त्यांनी यूव्ही प्रकाशात तपासणी केली आणि तिचा वापर झालेला नाही, याची खात्री करून घेतली.

ते चांगल्या स्थितीत असल्याचंही लक्षात आल्याचं झेलेन यांनी सांगितलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही वस्तू प्रदर्शनात ठेवल्यापासून याठिकाणी लोकांची चांगलीच गर्दी होत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ते पाहण्यासाठी गर्दी करत असून, अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचंही झेलेन म्हणाल्या.

हा कंडोम म्हणजे फ्रान्समधल्या एका आलिशान वेश्यालयातून भेट मिळालेला असू शकतो असा एक अंदाज आहे. आजच्या घडीला अशा फक्त दोनच वस्तू असल्याचंही त्यांनी म्हटलं.

संग्रहालयानं याबाबत बोलताना म्हटलं की, ही एक अशी वेगळ्या प्रकारची वस्तू आहे, ज्यामध्ये लैंगिक आरोग्याचे दोन्ही पैलू पाहायला मिळतात. लैंगिक सुख मिळवण्याची इच्छा, नको असलेली गर्भधारणा याबरोबरच लैंगिक अशा संसर्गजन्य रोगांचीही भीती होती.

या कंडोमवर एक नन आणि तीन धर्मगुरूंचे एक अश्लील असे छायाचित्र छापलेले आहे. तसेच त्यावर "Voilà mon choix" म्हणजेच "माझी निवड" असंही लिहिलेलं आहे.

संग्रहालयाच्या मते, प्रिंट केलेलं हे चित्र म्हणजे, "ब्रह्मचर्य किंवा कौमार्य आणि त्याबरोबरच ग्रीक पुराण कथांतील 'जजमेंट ऑफ पॅरिस' याची एक प्रकारची खिल्ली आहे."

'जजमेंट ऑफ पॅरिस' ही ग्रीक दंतकथेतील राजकुमाराची कथा आहे. त्याला अफ्रोडाईट, हेरा आणि अथेना या तीन देवतांपैकी सर्वात सुंदर कोण हे ठरवायचं होतं.

डच संग्रहालयाच्या मते, त्यांच्या छपाई विभागात जवळपास 7,50,000 छायाचित्रं, रेखाचित्रं आणि प्रिंट्स आहेत. पण कंडोमवर छापलेलं हे त्यांच्या संग्रहातलं एकमेव चित्र आहे.

अशा प्रकारचं प्रिंट केलेलं कंडोम असल्याचं आमचं एकमेव संग्रहालय असल्याचं झेलेन म्हणाल्या.

तसंच ही वस्तू इतर संग्रहालयांनाही प्रदर्शनासाठी दिली जाऊ शकते. पण हा कंडोम अतिशय नाजूक असल्याने काळजीपूर्वक हाताळावा लागेल, असंही त्या म्हणाल्या.

नोव्हेंबरअखेरपर्यंत हा कंडोम प्रदर्शनात पाहता येणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)