हे सोन्याचं कमोड कसं चोरीला गेलं होतं? त्यासाठी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? वाचा

फोटो स्रोत, Blenheim Palace
- Author, क्लोडाग स्टेनसन, जोनाथन एडन आणि विलियम मॅकलेनन
- Role, बीबीसी इंग्लंड इन्व्हेस्टिगेशन्स
इंग्लंडमधील एका भव्य पॅलेसमधून एक कमोड चोरीला गेलं. तब्बल 4.8 दशलक्ष पाऊंड (सुमारे 53 कोटी रुपये) किमतीचं हे कमोड चक्क सोन्यापासून बनवण्यात आलं होतं. या घटनेनं एकच खळबळ उडाली.
ब्रिटनमधील ब्लेनहाइम पॅलेससाठी तो दिवस खूप महत्त्वाचा ठरणार होता. तो दिवस होता, 14 सप्टेंबर 2019. त्या दिवशी पहाटेच्या सुमारास काच फुटल्याच्या आवाजानं इलिनॉर पेस यांना जाग आली.
इलिनॉर पेस ब्लेनहाइम पॅलेसच्या अतिथी सेवा विभागाच्या सुपरवायझर होत्या. ब्लेनहाइम पॅलेसच्या वर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या फ्लॅटमध्ये त्या राहायच्या. त्यांना विचित्र आवाजांची सवय होती.
त्यामुळे काच फुटल्याचा आवाजही असाच असेल असं त्यांना वाटलं. मात्र जेव्हा फायर अलार्म वाजू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली आहे.
त्यांनी लगेचच पॅलेसचं मोठं अंगण रिकामं करून इतरांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. मात्र स्वत:च्याही नकळत इलिनॉर एका अत्यंत धाडसी चोरीच्या शेवटचे क्षण पाहत होत्या.
पाच जणांनी ब्लेनहाइम पॅलेसमध्ये शिरून तब्बल 48 लाख पाऊंड किंमतीचं सोन्याचं कमोड चोरलं आणि एका फोक्सवॅगन गोल्फ कारमधून ते पसार झाले. ती कारदेखील त्यांनी चोरलेलीच होती.
हे सोन्याचं कमोड एकेकाळी वापरात होतं आणि त्याला 'अमेरिका' असं नाव होतं. ब्लेनहाइन पॅलेस हा 18 व्या शतकातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भव्य, आलिशान राजवाडा आहे.
या आलिशान प्रासादात हे सोन्याचं कमोड, इटालियन संकल्पात्मक कलाकार मॉरिझिओ कॅलेटन यांच्या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून फक्त दोन दिवसांसाठी ठेवण्यात आलं होतं.
या धाडसी चोरीच्या घटनेला, आता पाच वर्षांहून अधिक काळ झाल्यानंतर, एकूण तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

ऑक्सफर्डच्या 40 वर्षांच्या जेम्स शीन यानं 2024 मध्ये घरफोडी आणि गुन्हेगारी मालमत्ता हस्तांतरित केल्याचा गुन्हा कबूल केला होता. तर ऑक्सफर्डच्याच 39 वर्षांच्या मायकल जोन्स याला ऑक्सफर्ड क्राउन कोर्टात मंगळवारी (18 मार्च) घरफोडीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं.
विंडसरच्या 36 वर्षांच्या फ्रेड डो याला गुन्हेगारी मालमत्तेच्या हस्तांतराचा कट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. पश्चिम लंडनमधील 41 वर्षांच्या बोरा गुकुक यांची याच आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या गुन्ह्यामुळे कलाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली, प्रसारमाध्यमांना मथळे मिळाले आणि शौचकुपाची थीम असलेल्या असंख्य द्वयर्थी वाक्प्रचारांची निर्मिती झाली.
आता बीबीसीनं, ही चोरी आणि ब्लेमहाइम पॅलेसमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी किंवा अपयश पॅलेसच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी बीबीसीनं या कर्मचाऱ्यांकडून घटनेच्या त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे जाणून घेतलं.


'आम्हाला याचा फटका बसला'
चोरीच्या आदल्या रात्री ब्लेनहाइम पॅलेसमध्ये या प्रदर्शनाची लाँच पार्टी होती. या पार्टीचं आयोजन स्वत: कलाकार कॅटेलन यांनी केलं होतं. ब्लेनहाइम पॅलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉमिनिक हेअर या पार्टीमध्ये हजर होते.
न्यूयॉर्कच्या बाहेर 'अमेरिका' नावाचं हे कमोड पहिल्यांदाच प्रदर्शनात मांडण्यात आलं होतं. प्रदर्शनातील या कलाकृतीची लोकांमध्ये चर्चा होत होती.
डॉमिनिक हेअर यांना ते सावकाश त्या पार्टीतून बाहेर पडल्याचं आठवतं. ते पूर्णपणे वापरण्यायोग्य कमोड सुरू करण्याची आशा त्यांना होती. मात्र बाहेर मोठी रांग दिसल्यावर, तेव्हा त्यांनी स्वत:ला सांगितलं की, "काही हरकत नाही, रांगेत उभं राहण्यात काही अर्थ नाही. तू उद्या पुन्हा येऊन ते पाहू शकतो."
मात्र त्यानंतर काही तासांतच त्यांची सहकारी इलिनॉर पेस, ती 98 किलो (216 पाऊंड) वजनी कलाकृती कारच्या डिकीत ठेवली जात असतानाचे शेवटचे क्षण पाहत होत्या.

पेस यांना ते गोंधळात टाकणारं आणि वेगानं घडणारं दृश्य आठवतं. त्या म्हणतात, "त्या फक्त सावल्या होत्या आणि त्यांची वेगानं हालचाल होत होती. मी त्यांना कारकडे जाताना, कारमध्ये बसताना पाहिलं...आणि मग कार वेगानं निघून गेली."
चोरट्यांनी पॅलेसच्या अंगणात प्रवेश करण्यापासून ते चोरी करून बाहेर पडण्यापर्यंतचा कालावधी लक्षात घेतल्यास, ही धाडसी चोरी अवघ्या पाच मिनिटांत झाली होती.
थोड्याच वेळात पोलीस तिथे आले. त्यानंतर पॅलेसच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा पॅलेसमध्ये तपासणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नेमकं काय चोरीला गेलं आहे.
"त्यावेळेस...माझ्या पोटात गोळा आला. मला वाटलं की ही मोठी घटना घडली आहे," असं पेस म्हणतात.
लवकरच, ब्लेनहाइम पॅलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉमिनिक यांचा फोन वाजू लागला आणि त्यांना जाग आली. फोनवरून त्यांना सांगण्यात आलं, "डॉम, आपल्याला फटका बसला आहे."

फोटो स्रोत, Thames Valley Police
डॉमिनिक म्हणाले की ते स्वप्न पाहत नाहीयेत, हे लक्षात येण्यासाठी त्यांना काही क्षण लागले. त्यानंतर त्यांनी पॅलेसकडे धाव घेतली.
पॅलेसमध्ये पोहोचल्यावर डॉमिनिक यांनी पाहिलं की त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. त्यांनी पाहिलं की त्या हादरवून टाकणाऱ्या गुन्ह्याच्या दृश्यातून निर्माण झालेली भीती कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होती.
"पॅलेसमध्ये जागेवर असलेलं सोन्याचं कमोड जर सुंदर, परिपूर्ण, भव्य आणि कोणतंही नुकसान न झालेलं दिसत असेल तर आताची परिस्थिती त्याच्या अगदी उलट होती. हे सर्व क्रूरपणे घडवण्यात आलं होतं, तोडफोड करण्यात आली होती. हे पॅलेस आहे. पॅलेस उदध्वस्त होत नाहीत," असं डॉमिनिक हेअर म्हणाले.

एका दिवसानंतर जेव्हा पॅलेस पुन्हा खुला करण्यात आलं, तेव्हा नाट्यमयरित्या हा वाद सोडवण्यात आला.
ब्लेनहाइम पॅलेस सर विन्स्टन चर्चिल यांच्या जन्मस्थळापासून काही मीटर अंतरावरच आहे.
पॅलेसच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या क्युबिकलवर पुन्हा पोलीस टेप लावली. आता कॅटेलन या प्रदर्शनात सोन्याच्या कमोडऐवजी, एका चोरीचं दृश्य म्हणून ते ठिकाण सादर करण्यात आलं.
डॉमिनिक हेअर म्हणाले, त्यांच्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी असूनही, त्यांना आलेल्या रागानं त्यांना हे दृश्यमान ठेवण्यास प्रवृत्त केलं. मात्र त्यांच्या हे देखील लक्षात आलं की लोकांसाठी ही बाब आकर्षणाची ठरू शकते.
तसंच झालं. पुढील काही दिवसांमध्ये त्या चोरीची झलक पाहण्यासाठी पॅलेसमध्ये लोकांची गर्दी उसळली, असं पेस म्हणाल्या.
"पॅलेसमधील सोन्याचं कमोड पाहण्यापेक्षा, लोकांना सोन्याचं कमोड कुठून चोरीला गेलं हे पाहण्यात अधिक रस होता," असं त्या पुढे म्हणाल्या.
पॅलेसच्या सुरक्षा व्यवस्थेतील अपयश
ब्लेनहाइम पॅलेसच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की या चोरीकडे जनता आणि प्रसारमाध्यमांनी कशा विनोदी दृष्टीकोनातून पाहिलं हे त्यांनी पाहिलं, मात्र तरीदेखील या चोरीमुळे त्यांना प्रचंड धक्का बसला.
पेस म्हणाल्या की ब्लेनहाइम पॅलेस, हे त्यांच्यासाठी एक सुरक्षित घर होतं. मात्र बराच काळ त्यांना "त्याच पद्धतीनं राहत असल्यासारखं" वाटलं नाही.
"नेहमीच एकप्रकारची चिंता वाटत होती. जर ती चोरी झाली, तर काहीही होऊ शकतं," असं त्या म्हणाल्या.
डॉमिनिक हेअर म्हणाले की पॅलेसच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा झाली नाही, याबद्दल त्यांना भावनिक आणि कृतज्ञ वाटलं. ते म्हणाले की "ते चोर म्हणजे ब्लेनहाइम पॅलेसला आतापर्यंत भेट देणारे सर्वात धोकादायक लोक होते."
"ते कमोड न्यूयॉर्क शहरात सुरक्षित राहिलं. ते जर न्यूयॉर्क शहरात सुरक्षित राहिलं तर ते ब्लेनहाइम पॅलेसमध्ये देखील सुरक्षित राहायला हवं होतं," असं ख्रिस्तोफर मारिनेलो म्हणतात.
ते कलाकृतीच्या रिकव्हरीच्या कामासंदर्भातील वकील आहेत. या प्रकरणात काम करण्यासाठी विमा कंपन्यांनी त्यांना नियुक्त केलं आहे.
त्यांच्या दृष्टीनं ब्लेनहाइम पॅलेसची सुरक्षा व्यवस्था "अत्यंत अपयशी ठरली."

पॅलेसमधील कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींमधून ही बाब स्पष्ट होते की हे 18 कॅरेट सोन्याचं कमोड सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक मानलं गेलं नव्हतं.
एडवर्ड स्पेन्सर-चर्चिल ब्लेनहाइम आर्ट फाउंडेशनचे संस्थापक आहेत. ही चोरी होण्याच्या एक महिनाआधी, एडवर्ड स्पेन्सर-चर्चिल यांनी संडे टाइम्सला सांगितलं होतं की, "याची चोरी करणं हे सर्वात सोपं ठरणार नाही."
"पहिलं म्हणजे, ते ड्रेनेजला जोडण्यात आलं आहे आणि दुसरं म्हणजे, संभाव्य चोराला या कमोडचा शेवटचा वापर कोणी केला किंवा त्यांनी काय खाल्लं असेल याची कल्पना नसेल. त्यामुळे त्यावर पहारा ठेवण्याची माझी योजना नाही."

डॉमिनिक हेअर म्हणाले की प्रदर्शनातील इतर वादग्रस्त कलाकृतींबद्दल त्यांना "खूप जास्त काळजी वाटत" होती. त्यात उल्का अंगावर कोसळलेले पोपचा पुतळा, युनियन फ्लॅग (इंग्लंडचा झेंडा)बरोबर लोकांचा पुतळा आणि प्रार्थना करणाऱ्या अॅडॉल्फ हिटलरचा पुतळा या त्यात वादग्रस्त कलाकृती होत्या.
त्यांनी कबूल केलं की सोन्याचं कमोड ही एक विचित्र कलाकृती दिसत असल्यामुळे त्याची किंमत 28 लाख पौंड असल्याच्या वस्तुस्थितीकडे त्यामुळे दुर्लक्ष झालं होतं.
प्रदर्शन संपल्यानंतर या सोन्याच्या कमोडवर पहारा ठेवण्यात आला नव्हता. तसंच त्याच्या क्युबिकलच्या दरवाजावर सीसीटीव्ही देखील नव्हता.
मात्र चोरट्यांच्या टोळीनं इतर सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेतला. त्यात कोणतीही गस्त नसण्याचा समावेश होता. त्यामुळे त्यांनी सहजपणे दरवाजे तोडले.
अगदी चोरी झाल्यानंतरदेखील, सोन्याचं कमोड हेच चोरांचं लक्ष्य आहे, ही बाब पॅलेसच्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आली नाही.
पेस म्हणतात की त्यांना क्षणभर वाटलं की चोर चर्चिलच्या बालपणातील केसांच्या पुंजक्यासाठी आले आहेत. हे केस पॅलेसनं प्रदर्शनात मांडले होते.
'आता असुरक्षित नाही'
चोरीनंतरच्या आठवड्यांमध्ये डॉमिनिक हेअर यांना पॅलेसच्या सुरक्षेत वेगानं सुधारणा आणि वाढ करावी लागली.
त्या रात्री झालेल्या प्रकाराची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली.
"पॅलेसमध्ये विशिष्ट स्तराची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला नव्हता. तो निर्णय खरोखरच मी घेतला होता. त्या अर्थानं मी ब्लेनहाइम पॅलेसला असुरक्षित बनवलं. मात्र आता आम्ही असुरक्षित नाही," असं ते म्हणाले.

आता ब्लेनहाइम पॅलेसच्या सुरक्षेत "अत्यंत महत्त्वाची सुधारणा" करत त्यात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पॅलेस किंवा आलिशान प्रासादांसाठीदेखील ही धोक्याची घंटा आहे.
चोरीला गेलेलं सोनं कधीच सापडलं नाही. मात्र ब्रिटनच्या सर्वात लोकप्रिय पॅलेसपैकी एका पॅलेसच्या इतिहासातील एक विचित्र बाब म्हणून ही कहाणी जिवंत राहील.
"या पॅलेसचा एक मोठा आणि गंभीर इतिहास आहे. अशा युद्धांचा इतिहास ज्यांनी एका खंडाच्या इतिहासाची दिशा बदलली. आता त्या इतिहासाच्या तुलनेत बोलायचं तर ही खूपच किरकोळ बाब आहे," असं हेअर म्हणाले.
"मात्र ब्लेनहाइम पॅलेसमध्ये राहिलेल्या, इथे चैतन्य निर्माण केलेल्या सर्वसामान्य लोकांच्या इतिहासात, हा अतिशय घाबरवणारा क्षण होता."
"मी पुढील 150 वर्षांच्या काळातील गाईड्सची कल्पना करू शकतो. ते या चोरीची कथा सांगतील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











