न्यूमोनिया कोणासाठी जीवघेणा ठरतो? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणं आणि उपचार

लहान मुलं आणि वृद्धांसाठी न्यूमोनिया हा एक गंभीर आजार ठरू शकतो, त्यामुळे त्यावर वेळीच उपचार घेतले पाहिजेत

फोटो स्रोत, Getty Images

न्यूमोनिया हा श्वसनाशी संबंधित गंभीर आजार आहे. विषाणू, जिवाणू किंवा बुरशीच्या संसर्गामुळे तो होतो.

या आजारात फुफ्फुसातील एअर सॅक्स म्हणजे हवा भरणाऱ्या पिशव्यांमध्ये द्रव पदार्थ साचतो.

यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. सर्वसाधारण भाषेत याला 'फुफ्फुसात पाणी साचणं' असं देखील म्हणतात.

हा आजार छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. अर्थात पाच वर्षांखालील मुलं आणि वृद्धांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ), 2019 मध्ये न्यूमोनियामुळे जगभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळपास 7.4 लाख मुलांचा मृत्यू झाला होता.

कोरोनाच्या संकटकाळातही मोठ्या संख्येनं रुग्णांना 'कोरोना-न्यूमोनिया' झाला होता. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

न्यूमोनिया काय असतो?

न्यूमोनिया हा आजार काय असतो, तो कशामुळे होतो आणि त्यावर कोणते उपचार आहेत? हे जाणून घेऊया.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार, न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसातील ऊतींच्या भागांना म्हणजे हवेच्या छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये (एल्वियोली) सूज येणं आणि संसर्ग होणं. फुफ्फुसातील या छोट्या पिशव्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.

श्वास घेत असताना एल्वियोली आणि रक्तामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाण-घेवाण होते. एल्वियोलीद्वारे मिळालेला ऑक्सिजन संपूर्ण शरीरातील पेशींपर्यंत पोहोचतो.

जिवाणू, विषाणू किंवा बुरशीच्या संसर्गामुळे न्यूमोनियाचा फैलाव होतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जिवाणू, विषाणू किंवा बुरशीच्या संसर्गामुळे न्यूमोनियाचा फैलाव होतो

तज्ज्ञांच्या मते, विषाणू, हवेच्या या छोट्या पिशव्यांना जेव्हा जिवाणू किंवा बुरशीचा संसर्ग होतो, तेव्हा त्यात द्रवपदार्थ गोळा होतो.

यामुळे ऑक्सिजनची पातळी खाली येते आणि परिणामी श्वास घेणं कठीण होतं. यामुळेच न्यूमोनियाचं गांभीर्य वाढतं.

न्यूमोनियाची लक्षणं

न्यूमोनियाची लक्षणं पुढीलप्रमाणे असतात -

  • श्वास घेण्यास त्रास होणं किंवा त्यात अडथळा येणं
  • खोल किंवा उथळ श्वास घेणं
  • ह्रदयाचे ठोके वाढणं
  • खूप ताप येणं, थंडी वाजणं आणि खूप जास्त घाम येणं
  • सतत खोकला येणं आणि छातीत दुखणं
  • काही वेळा उल्टी होणं किंवा अतिसार होणं
ग्राफिक्स

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या लक्षणांची सुरुवातीलाच ओळख पटणं खूप महत्त्वाचं असतं.

पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर सलिल बेंद्रे म्हणतात, "सर्व प्रकारचा न्यूमोनिया जीवघेणा नसतो. तरीदेखील त्यावर वेळीच आणि लगेच उपचार करणं खूप महत्त्वाचं असतं."

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जिवाणू आणि विषाणूमुळे होणारा न्यूमोनियाचा एकसारखे दिसतात. मात्र त्यांची लक्षणं वेगवेगळी असू शकतात.

डॉ. बेंद्रे म्हणतात, "पांढरा, हिरवा किंवा लाल रंगाचा कफ, ताप येणं, थंडी वाजणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं, ही न्यूमोनियाची सामान्य लक्षणं आहेत."

बॅक्टेरियल न्यूमोनिया

बॅक्टेरियल न्यूमोनिया जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो. सर्वसामान्यपणे याचा संसर्ग खोकला आणि शिंकेद्वारे पसरतो.

न्यूमोनिया जर जिवाणुमुळे झाला असेल, त्यावर अँटिबायोटिक्सद्वारे उपचार करता येतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूमोनिया जर जिवाणुमुळे झाला असेल, त्यावर अँटिबायोटिक्सद्वारे उपचार करता येतात

न्यूमोनियाच्या जवळपास 50 टक्के प्रकरणांमध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया जिवाणू आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, लहान मुलांना होणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या न्यूमोनियामागे हेच सर्वात सामान्य कारण असतं.

याव्यतिरिक्त, काही इतर प्रकारदेखील दिसतात. यात हीमोफिलस इन्फ्लुएन्झा, क्लॅमायडोफिला न्यूमोनिया आणि मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यांचा समावेश आहे.

व्हायरल न्यूमोनिया

पॅराइन्फ्लुएन्झा, इन्फ्लुएन्झा व्हायरस, कोरोना व्हायरस आणि रायनो व्हायरस यासारख्या विषाणूंमुळेदेखील न्यूमोनियाचा संसर्ग होऊ शकतो.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनाचा विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना न्यूमोनियादेखील झाला.

विविध प्रकारच्या बुरशीमुळे देखील न्यूमोनियाचा संसर्ग होऊ शकतो.

वोकहार्ट हॉस्पिटलच्या डॉ. हनी सवला यांच्या मते, "लहान मुलं आणि 65 वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात होऊ शकतो."

लहान मुलं आणि वृद्धांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. तज्ज्ञांच्या मते या वयोगटात न्यूमोनिया झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण अधिक असतं.

न्यूमोनियाचा फैलाव कसा होतो?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, न्यूमोनियाचा संसर्ग अनेक कारणामुळे पसरतो.

संसर्ग पसरवणारे जिवाणू आणि विषाणू लहान मुलांच्या नाकात आणि गळ्यात असतात. ते जेव्हा फुफ्फुसापर्यंत पोहोचतात, तेव्हा हा संसर्ग पसरतो.

खोकल्यावर किंवा शिंक आल्यावर बाहेर पडणाऱ्या छोट्या थेंबाद्वारे हा संसर्ग हवेतदेखील पसरू शकतो.

खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे देखील न्यूमोनियाचा संसर्ग पसरू शकतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे देखील न्यूमोनियाचा संसर्ग पसरू शकतो

नवजात बाळाच्या जन्माच्या वेळेस किंवा जन्मानंतर रक्ताद्वारे देखील न्यूमोनिया पसरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, भारतात क्षयरोग किंवा टीबी (ट्युबरक्युलोसिस) हे न्यूमोनिया संसर्गामागचं एक प्रमुख कारण आहे.

न्यूमोनियाचं निदान आणि उपचार

न्यूमोनिया किरकोळ किंवा सामान्य स्वरुपातील असू शकतो किंवा काही रुग्णांना गंभीर स्वरुपाचा संसर्ग झाल्यामुळे तो जीवघेणादेखील ठरू शकतो. त्यामुळे वेळीच त्याचं निदान होणं महत्त्वाचं असतं.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना जर छातीत श्लेष्मा किंवा घट्ट कफ झाल्यास किंवा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांच्या श्वासाच्या प्रक्रियेच्या आधारे न्यूमोनियाचं निदान केलं जाऊ शकतं.

न्यूमोनियाच्या विषाणू किंवा जिवाणुचा संसर्ग झाल्यानंतर हा आजार संपूर्ण शरीरात पसरण्यास काही दिवसांपासून काही आठवड्यांचा कालावधी लागतो.

ग्राफिक्स

जर न्यूमोनिया जिवाणुमुळे झाला असेल, तर अँटिबायोटिक्सद्वारे त्यावर उपचार केले जातात.

सर्वसामान्यपणे न्यूमोनिया संसर्गावरील औषधांमुळे बरा होतो. मात्र, गंभीर स्वरुपात न्यूमोनिया झाल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असते.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की न्यूमोनिया झालेल्या रुग्णांनी भरपूर विश्रांती घेतली पाहिजे आणि शरीरातील पाण्याचं योग्य प्रमाण राखलं पाहिजे.

तज्ज्ञ म्हणतात की न्यूमोनियाच्या बहुतांश रुग्णांना लक्षणांच्या आधारे औषधं दिली जातात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता नसते. मात्र, रुग्णांनी स्वत:च्याच मर्जीनं औषधं घेता कामा नये.

लहान मुलांमध्ये आढळणारी न्यूमोनियाची 5 लक्षणं

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2019 मध्ये न्यूमोनियामुळे जगभरात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 7 लाख 40 हजार मुलांचा मृत्यू झाला होता.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. जेसल सेठ यांनी नवजात बाळांना होणाऱ्या न्यूमोनियाची पाच मुख्य लक्षणं आणि त्यांची कशी ओळख पटवावी याची माहिती दिली.

ताप येणं - लहान मुलांना अनेक कारणांमुळे ताप येतो. अनेकदा संसर्ग गेल्यानंतर तापदेखील जातो. यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

जर खूप जास्त ताप आला असेल, औषधांनी ताप कमी होत नसेल, किंवा मूल सक्रिय नसेल, तर लगेचच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

मुलांच्या श्वास घेण्यावर आणि पोटाच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यामुळे न्यूमोनियाच्या संभाव्य लक्षणांची ओळख पटवता येते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलांच्या श्वास घेण्यावर आणि पोटाच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यामुळे न्यूमोनियाच्या संभाव्य लक्षणांची ओळख पटवता येते

खोल श्वास घेणं - लहान मुलांच्या श्वास घेण्याच्या गतीमध्ये दिवसभरात अनेकवेळा बदल होत असतात. न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा आजार आहे. त्यामुळे जर न्यूमोनियाचा संसर्ग झाला असेल तर मुलं जोरात श्वास घेऊ लागतात. काही मुलांमध्ये श्वास घेताना शिटीसारखा आवाजदेखील येतो.

उथळ किंवा वरचेवर श्वास घेणं - न्यूमोनियामुळे फुफ्फुसात पाणी जमा होतं. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. उथळ श्वास घेणं लहान मुलांसाठी चांगलं नसतं. जर मूल खूपच शांत झालं, तर लगेचच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.

पोटाच्या हालचालींवर लक्ष देणं - आई-वडिलांनी मुलांच्या पोटाच्या हालचालींवर लक्ष दिलं पाहिजे. त्यातून मुलाला श्वास घेण्यास त्रास होतो आहे का, अडचण येते आहे की नाही हे लक्षात येऊ शकतं.

न्यूमोनियाची काही विशिष्ट लक्षणं असतात, ती दिसल्यानंतर लगेचच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूमोनियाची काही विशिष्ट लक्षणं असतात, ती दिसल्यानंतर लगेचच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे

फक्त सर्दी झाल्यास त्याचा अर्थ असा होता नाही की त्यानंतर न्यूमोनिया होईलच. मात्र, या पाच मुख्य लक्षणांवर लक्ष दिल्यामुळे आपल्याला न्यूमोनियाचं निदान करता येतं.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लसीकरणाद्वारे न्यूमोनियाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. 'नारायणा हेल्थ' हॉस्पिटलनं युट्यूबवर एक व्हीडियो टाकून त्याद्वारे न्यूमोनियासंदर्भात जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ असलेले डॉ. विजय शर्मा म्हणतात, "जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोकोकल न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी लस उपलब्ध आहे. ताप किंवा फ्लूवर देखील लस उपलब्ध आहे. लहान मुलांना होणाऱ्या 'हिमोफिलस इन्फ्लुएन्झा'पासून बचाव करणारी लसदेखील उपलब्ध आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.