'8 महिन्यांची गरोदर असतानाही मी 12 तास काम केलं', गझल अलघ यांच्या पोस्टवर का होतीये चर्चा ?

ब्युटी प्रोडक्ट्स तयार करणारी कंपनी मामाअर्थच्या प्रमुख गझल अलघ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या गर्भावस्थेसंदर्भात एक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गझल अलघ यांनी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी 8 महिन्यांच्या गर्भवती असूनही 12 तास काम करत असल्याचं म्हटलं होतं.

पण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या इंजिनीअर प्रकृती शर्मा यांनी या पोस्टवर टीका करत त्यांना सुनावलं.

गर्भावस्थेत स्वतःला आणि बाळाला प्राधान्य देण्याऐवजी जगाला दाखवण्यासाठी शुटिंगमध्ये व्यस्त राहणं म्हणजे हुशारी नसल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

या घटनेनंतर अनेक लोक सोशल मीडियावर याबाबत मतं व्यक्त करत आहेत. तसंच गर्भावस्थेदरम्यान महिलांनी काम करावं की आराम यावरही चर्चा सुरू झाली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

ही चर्चा एका सोशल मीडिया पोस्टनंतर सुरू झाली.

काही दिवसांपूर्वी मामाअर्थ कंपनीच्या सह-संस्थापक आणि प्रमुख गझल अलघ यांनी लिंक्ड इन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा एक पोटो पोस्ट केला होता.

आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही काम करत असल्याचं त्यांनी त्यावर लिहिलं होतं.

"तुम्ही जर गर्भवती असाल तर हळू-हळू पुढं पावलं टाकायला हवी," अशी पोस्ट त्यांनी केली होती.

"मी मित्र आणि नातेवाईकांकडून अनेकदा बरंच काही ऐकलं आहे. त्यामुळं मला शार्क टँकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तेव्हा मी त्याबाबत विचार केला. 8 महिन्यांची गर्भवती असताना मी ही संधी हाती घेतली आणि इतरांबरोबर 12 तास काम केलं. इतरांना प्रेरणा देण्याचा माझा उद्देश होता. विशेषतः महिला गर्भावस्थेत काम करू शकत नाही, ही पुरुषांची मानसिकता मला बदलायची होती," अशी पोस्ट त्यांनी केली.

"यावर्षी माझ्या इनोव्हेशन टीममध्ये चार मॅनेजर्स गर्भवती आहेत. आम्ही इनोव्हेशनसाठीचं बजेटही सगळ्यात जास्त ठेवलं आहे. त्यामुळं आम्ही केवळ मुलांची डिलिव्हरीच नव्हे तर लक्ष्यही चांगल्या प्रकारे पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे," असंही त्यांनी लिहिलं.

या पोस्टबरोबर गझल यांनी त्यांचा एक फोटोही पोस्ट केला. त्यात त्या गर्भवती दिसत आहेत.

गझल यांच्या पोस्टवर प्रकृती शर्मा यांची प्रतिक्रिया

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या इंजिनीअर प्रकृती शर्मा यांनी त्यांची ही पोस्ट शेअर केली आहे.

"एक गर्भवती महिला केवळ जगाला दाखवण्यासाठी स्वतःच्या बाळाऐवजी शुटिंगला प्राधान्य देत आहे, हा मला पूर्णपणे वेडेपणा वाटतो. गर्भावस्थेतील या बालिश आणि क्रूर कृत्याबाबत इंटरनेटवर पोस्ट करून त्यांना याबाबत कौतुकही हवं आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटतं," असं त्यांनी लिहिलं.

त्यानंतर प्रकृती यांनी महिलांना इशाराही दिला. "तुम्ही कोणाला आदर्श मानत आहात, याबाबत कृपया सतर्क राहा. इंटरनेटवरील कोणत्याही मूर्खपणावर विश्वास ठेवू नका," असं त्यांनी लिहिलं.

सोशल मीडियात चर्चेला उधाण

यानंतर सोशल मीडियावर गझल अलघ आणि प्रकृती शर्मा दोघींच्याही पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

जेरमिना मेनन नावाच्या एका महिलेनं गझल अलघ यांचं कौतुक केलं. तुमचा हेतू आणि चुकीच्या कल्पनांना आव्हान देण्याच्या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं, असं त्यांनी म्हटलं.

तर अर्णब गुहा यांनीही गझल यांना पाठिंबा दिला. गर्भावस्था महिलांसाठी अडथळा ठरता कामा नये, असं त्यांनी म्हटलं. पण त्यांनी एक सूचनाही केली, "गर्भवती महिलांनी फार ताण घ्यायचा नसतो. फार कठिण आव्हानं स्वीकारायला नको. त्यामुळं बाळ ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये जाण्याची शक्यता असते," असं ते म्हणाले.

शीतल वर्मा नावाच्या एका यूझरनंही गझल अलघ यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. "महिलांना पुरुषांसमोर काहीतरी सिद्ध करण्यासाठी मुद्दामहून त्यांच्याशी स्पर्धा करण्याची गरज नाही. बरोबरीचा मुद्दा वेगळा आहे. पण एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी गर्भवती महिलेनं स्वतःच्या शरिराला खूप थकवणं फार कौतुकास्पद नाही," असं त्यांनी लिहिलं.

डॉक्टरांचा सल्ला

वत्सला कोठारी यांनीही गझल अलघ यांना उत्तर दिलं. "यात प्रेरणा देण्यासारखं काही नाही. काही महिला जास्त काम करू शकत नाही. कारण त्यांचं शरीर आधीच बाळाला पोटात सांभाळण्याचं मोठं काम करत असतं. त्यांनी जर कंपनीतील महिलांना त्यांच्या वेळेनुसार कामाचे तास निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं असतं, तर त्यांचं पाऊल प्रेरणादायी ठरलं असतं," असं त्यांनी लिहिलं.

पेशानं प्रोस्थोडॉन्टिस्ट डॉक्टर पद्मप्रिया पुप्पाला यांनी गझल अलघ यांच्या पोस्टबाबत मत मांडलं. "हा वाईट सल्ला आहे. तुमच्यासाठी हे शक्य असेल तर तुमचं नशीब आहे. पण सगळ्यांकडं तशी संधी नसते. मी ही गर्भावस्थेत नऊ महिने काम केलं असं सांगू शकते. पण मी ते नाइलाजानं केलं आवडीने नव्हे."

तर, "प्रत्येक महिलेची गर्भावस्थेतील स्थिती वेगळी असते. महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे. जगाला काय हवं याचा विचार करायची त्यांना गरज नाही. विनाकारण जास्त काम करण्याचा ताणही त्यांनी घेता कामा नये," असं सोनिया साहनी यांनी लिहिलं.

तसंच, प्रकृती शर्मा यांच्या पोस्टवरही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शुभदा मूल नावाच्या एका यूझरं लिहिलं की, "गर्भावस्थेत तुम्ही हवं ते काम करू शकता, मग ते एव्हरेस्ट चढाईचं असो, जड सामान उचलण्याचं काम असो किंवा रोज ऑफिसला जायचं काम असो. तुमच्याकडे लक्झरी असेल तर तुम्ही घरून काम करण्याची संधी किंवा सहा महिन्याची सुटीही घेऊ शकता. पण काहीही झालं तरी लोकं त्यांची मतं मांडणारच."

रुचिरा चक्रवर्ती यांनी लिहिलं की, "जसे जीवनात सगळे लोक सारखे नसतात, तसंच गर्भावस्थेत कोणीही सारखं नसतं. गर्भावस्थेदरम्यान कोणत्या महिला काय करू शकतात किंवा काय करू शकत नाही, हे महिलांवरच सोडायला हवं. त्यावर इतरांनी प्रतिक्रिया देणं योग्य नाही."

स्वाती मिश्रा यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलं की, "गझल यांना काय म्हणायचं ते मला समजलं. पण त्यांच्याकडं तुलनेनं चांगली सपोर्ट सिस्टीम (कुटुंब, घरच्यांची मदत, वैद्यकीय कर्मचारी) आहे. त्यामुळं त्यांना हा निर्णय घेणं सोपं गेलं. पण प्रत्येकाला ही अपेक्षा ठेवता येणार नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)