डुकराचं मांस म्हणून विकण्यासाठी पळवल्या 1000 मांजरी, पोलिसांनी केली सुटका

डुकराचं मांस म्हणून विकण्यासाठी पळवल्या 1000 मांजरी.. चीनने केली सुटका

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, निकोलस योंग
    • Role, बीबीसी न्यूज, सिंगापूर

चीनमध्ये डुकराचं मांस किंवा इतर प्राण्यांचे मटण म्हणून विकण्यासाठी 1,000 हून अधिक मांजरी पळविण्यात आल्या होत्या. चिनी पोलिसांनी या मांजरींची सुटका केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तपत्रामध्ये म्हटलंय.

प्राणिमित्र कार्यकर्त्यांनी दिलेल्या सुचनेवर कारवाई करत पोलिसांनी पूर्वेकडील झांगजियागांग शहरातील मांजरी घेऊन जाणारा ट्रक अडवला.

'द पेपर' वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या मांजरींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे मांजरीच्या मांसाचा अवैध व्यापार उघड झाला असून अन्न सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

हे मांस प्रती कॅटी 4.5 युआन या दराने विकलं जात होतं. चीनमधील कॅटी हे मांस मोजण्याचं एकक अंदाजे 600 ग्रॅमच्या समतुल्य असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी दिली.

सुटका केलेल्या मांजरी भटक्या होत्या की पाळीव होत्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र या मांजरींना चीनच्या दक्षिणेकडील प्रांतात नेऊन त्यांची कत्तल केली जाणार होती. त्यानंतर त्यांचं मांस डुकराचं मांस किंवा सॉसेज म्हणून विकलं जाणार होतं.

'द पेपर' मधील वृत्तानुसार, झांगजियागांग शहरातील कार्यकर्त्यांना लाकडी पेट्यांमध्ये मोठ्या संख्येने मांजरी भरल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सलग सहा दिवस या पेट्यांचं निरीक्षण केलं

12 ऑक्टोबर रोजी मांजरी भरलेल्या या पेट्या ट्रकमध्ये भरल्या जात असताना कार्यकर्त्यांनी तो ट्रक अडवला आणि आणि पोलिसांना बोलावलं.

गेल्या शुक्रवारी द पेपर मध्ये ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर फिरू लागली तेव्हा अनेक युजर्सनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सने अन्न उद्योगाची कडक तपासणी करण्याची मागणी केली आहे.

"या लोकांचा भयानक मृत्यू होऊ दे" अशी प्रतिक्रिया एका वेबो युजरने दिली आहे.

दुसरा युजर म्हणतो, "प्राण्यांच्या संरक्षणासाठी कायदे कधी होतील? मांजरी आणि कुत्र्यांच्या जीवाला महत्त्व नाही का?"

एक युजर म्हणतो, "मी यापुढे बाहेर बार्बेक्यू मांस खाणार नाही."

हे कमी की काय, जूनमध्ये जिआंग्झी प्रांतातील एका महाविद्यालयात एका विद्यार्थ्याच्या जेवणात उंदराचं डोकं सापडले होते. शाळेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ते बदकाचे मांस असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर विद्यार्थी बरोबर असल्याचं समजलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)