पुणे ड्रग्ज रॅकेट : ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंचे दादा भुसेंवर आरोप, काय म्हटलं?

भूषण पाटील आणि ललित पाटील
फोटो कॅप्शन, भूषण पाटील आणि ललिता पाटील
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी पुणे

पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलच्या भाऊ आणि ड्रग्जच्या कारखान्यातील पार्टनर भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केलीय. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पुणे पोलिसांनी भूषणच्या मुसक्या आवळल्या.

या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 10 पथकं स्थापन केली आहेत. मात्र, अजूनही ललित पाटील पोलिसांच्या हाती लागला नाहीय.

पोलीस आता ललित पाटीलच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.

आता अटक करण्यात आलेला भूषण पाटील हा ललित पाटीलचा भाऊ असून, तो एमडी ड्रग्ज बनवण्याच्या कारखान्यातील पार्टरनही आहे.

पुणे पोलिसांसह मुंबई आणि नाशिक पोलीसही ललित पाटील आणि भूषण पाटील या दोघांच्या मागावर होते.

काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. प्रकरणात भूषण पाटील याचा शोध पोलीस घेत होते.

ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला पुण्याबाहेर सोडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अटक केली. दत्ता डोके असं अटक करण्यात आलेल्या मोटार चालकाचं नाव आहे.

ललित पाटील हा सोमवारी (2 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसात वाजता ससून रुग्णालयातील उपचार कक्षातून पसार झाला होता. जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलला तो पोहचला. त्यांनतर तो रिक्षानं बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथं आधीच तयारीत असलेल्या दत्ता डोके याच्या कारमध्ये तो बसला. दत्ता डोके यानं त्याला रावेतपर्यंत पोहोचवलं. तिथं दत्ता डोकेच्या कारमधून तो उतरला आणि दुसर्‍या कारमध्ये बसून तो मुंबईला गेला, असं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय.

3 जून 2023 पासून ललित पाटील हा ससून रुग्णालयात घेत होता.

सुषमा अंधारेंचे दादा भुसेंवर आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या फरार होण्यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत.

सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, नाना पटोले यांनी ललित पाटीलच्या फरार होण्यात शिंदे गटाच्या आमदाराचा हात असल्याचं म्हटलं. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनीही शिंदे गटाच्या एका मंत्र्यावर आरोप केला होता. मी माध्यमांशी बोलताना श्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करावेत असं म्हटलं होतं.

शिंदे गटाचा आमदार किंवा मंत्री किंवा भुसे असे म्हणत जर वारंवार संशयाची सुई शिंदे गटावर जात असेल तर निश्चितपणे यावर गृह मंत्रालयाने बोललं पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये तब्बल नऊ महिने ऍडमिट का होता ? कर्करोगाशी संबंधित अगदी केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू असेल तरीसुद्धा तब्बल नऊ महिने सलगपणे रुग्ण रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. मग ललित पाटील याला असा कोणता दुर्धर आजार होता ज्यामुळे तो तब्बल नऊ महिने हॉस्पिटलमध्ये होता, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

ललित पाटील यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण होते स्टाफ ची नावे काय आहे? ते डॉक्टर कोणत्या आजाराचे स्पेशालिस्ट आहे आणि कोणत्या आजारावर ट्रीटमेंट चालू होती काय ललित पाटीलच्या गंभीर शस्त्रक्रिया झाल्या होत्या का होणार होत्या का? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

मी ललित पाटीलला ओळखत नाही

माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांनी म्हटलं की, मी ललित पाटील या माणसाला ओळखतही नाही.

दादा भुसेंच्या या स्पष्टीकरणानंतर काही वेळात त्यांचे ललित पाटीलसोबतचे फोटो व्हायरल झाले. हे फोटो 2016 सालचे आहेत.

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आरोप कोणी काहीही करू शकतो. भुसे हे सक्रिय कार्यक्षम नेते आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी हा घाट आहे.

ससून रुग्णालयाचं प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

ससून रुग्णालयातील अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या पलायनानंतर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 360 पोलीस गार्डची चौकशी करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी करण्यात येणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी माहिती दिली.

ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याचं रुग्णालय प्रशासनानं आणि येरवडा कारागृह प्रशासनाला पुणे पोलिसांनी कळवलचं नाही. ससून रुग्णालयातून ललित पाटील पळून गेल्यानंतर तब्बल दीड तासानंतर पुणे पोलिसांनी प्रशासनाला माहिती दिली.

दरम्यान, ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आरोपी करण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील खेड न्यायालयातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलीय.या सगळ्या प्रकरणी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा देखिल अर्जात उल्लेख आहे. तसंच पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला नसल्याचं देखील वकील हिरे यांचं म्हणणं आहे.

रुग्णालयात मागवले अंमली पदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छाय़ाचित्र

त्याचसोबतच ललित पाटील यांचा मेडिकल अहवाल देखील कोर्टानं मागवावा अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी त्यांच्या अर्जात केली.

येरवडा कारागृहातील अनेक हायप्रोफाईल आरोपी ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. ललित पाटील पलायन प्रकरणानंतर त्यांची रवानगी पुन्हा कारगृहात करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात अनेक दिवसापासून उपचारासाठी असलेले आरोपी माजी आमदार अनिल भोसले, गुंड रुपेश मारणे, हेमंत पाटील यांना कारगृहात पाठवण्यात आलं. यातील आमदार अनिल भोसले हे बँक घोटाळ्याप्रकरणातील आरोपी आहेत.

आजारपणासाठी जेलबाहेर, ससूनमधून ड्रग्जचं रॅकेट

एखाद्या प्रकरणात अटक असलेला आरोपी येरवडा जेलमधून आजारपणाच्या नावाखाली बाहेर पडतो आणि त्यानंतर ज्या आरोपासाठी अटक झाली आहे ते अंमली पदार्थांचे रॅकेट उघडपणे चालवतो.

इतकंच नाही तर रुग्णालयातच पुरवण्यासाठी अंमली पदार्थ मागवतो आणि हे उघडकीला येतं तेव्हा चक्क रुग्णालयातून पळूनही जातो! सिनेमातली वाटावी अशी घटना घडली आहे पुण्यामध्ये.

हा सगळा प्रकार उघडकीला आला तो बंदोबस्त करणाऱ्या एका पोलिसामुळे. पुण्यातल्या ससून रुग्णालया पासून काही अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.

या परिसरात 30 सप्टेंबरला एका हवालदाराला एक माणूस पाठीवर बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरत असलेला दिसला. संशय आल्याने हवालदाराने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आणि या चौकशी दरम्यानच त्याच्याकडे तब्बल 2.14 कोटी रुपयांचे 1.71 किलो मेफ्रेडोन किंवा एमडी ड्रग सापडले.

या आरोपी सुभाष मंडलकडे हे ड्रग कुठे घेऊन चालला होता याची चौकशी केल्यावर त्याच्याकडून रुग्णालयात दाखल असलेल्या ललित पाटीलचं नाव पोलिसांना कळालं.

चक्क ससून रुग्णालयातून कैदेत असलेल्या आरोपीकडून अंमली पदार्थांचं रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झालं.

 ललित पाटील
फोटो कॅप्शन, पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैदेत असलेल्या ललित पाटीलकडून अंमली पदार्थांचं रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झालं आहे.

कोण आहे ललित पाटील

या प्रकरणातला मूळ आरोपी 34 वर्षांचा ललित पाटील मूळचा नाशिकचा. 2020 मध्ये त्याला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक झाली. ते प्रकरण देखील गाजलेलंच.

कोरोना काळात देखील त्याच्याकडून अंमली पदार्थांची तस्करी होत होती. या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 किलो एमडी ड्रग पकडले होते. त्यातून एमडी ड्रगचे मोठे रॅकेट उघडकीला आले होते. यातला मुख्य आरोपी होता छोटा राजन गँगशी संबंधित असणारा 42 वर्षांचा तुषार काळे.

काळेने अंमली पदार्थांच्या व्यवसायाला सुरुवात केली ती एका खूनाच्या प्रकरणातून बाहेर आल्यावर.त्याने जेल मधल्याच ओळखीने अंमली पदार्थांचा व्यवयास सुरु केला. त्यातून थेट एका नायजेरीयन नागरिकाच्या तो संपर्कात आला. या नायजेरीयन नागरिकाने त्याला भानूदास मोरेशी गाठ घालून दिली.

रुग्णालयात मागवले अंमली पदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छाय़ाचित्र

मोरे तेव्हा ठाण्याच्या तुरुंगात होता आणि काळे त्याला कोर्टाच्या तारखांदरम्यान कुटुंबाचा सदस्य म्हणून भेटायचा. मोरेच्या मदतीने काही लोकांशी संपर्क करत काळेने अंमली पदार्थांच्या धंद्यात जम बसवला.

तंत्र कळल्यानंतर काळे राजगुरू नगर मधल्या एका कंपनीच्या संपर्कात आला आणि तिथे त्याने विक्रीच्या ऐवजी दर किलोचे भाडे घेऊन त्याबदल्यात अंमली पदार्थ पुरवायचा व्यवसाय सुरु केला. याच प्रकरणात ललित पाटील त्याची साथ देत होता.

ललित पाटीलला अमली पदार्थांचा पुरवठाच नाही तर ते तयार करण्याचं तंत्र देखील चांगलंच ज्ञात होतं. काळेला अटक झाल्यानंतर पोलिसांना सापडलेल्या 1 कोटी रुपयांमधले 25 लाख रुपये पोलिसांनी ललित पाटीलच्या नाशिकच्या घरातून ताब्यात घेतले होते.

दहावी पर्यंतचं शिक्षणही पूर्ण न केलेल्या ललित पाटीलची मुळची आर्थिक पार्श्वभूमी देखील श्रीमंतीची नाही. मात्र अचानक त्याच्या कडे आर्थिक सुबत्ता इतक्या प्रमाणात आली होती की तो वेगवेगळ्या हाय एंड गाड्या वापरत होता.

या प्रकरणात 2020 मध्ये ललित पाटीलला अटक झाली. त्यानंतर तो येरवडा जेल मध्ये कैदेत होता. पण गेले चार महिने तो सातत्याने विविध आजारांची कारणे देत ससून रुग्णालयाच्या वाऱ्या करत होता. दर वेळी त्याचे आजार देखील बदलत होते आणि त्यामुळे ससून मधला मुक्काम देखील लांबला होता.

येरवड्यामधून पाटीलला ससून रुग्णालयात आणलं गेलं ते टीबीच्या उपचारांसाठी. मात्र त्यानंतर त्याच्यावर हर्नियाचेही उपचार करण्यात आले. सध्या अल्सरच्या त्रासासाठी तो ससून मध्ये दाखल होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार होती.

कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहिती नुसार त्याचं हे वारंवार रुग्णालयात दाखल होणं आणि तिथला वाढता मुक्काम यावर तुरुंग प्रशासनाने आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतर देखील ललित पाटील तब्बल चार महिने रुग्णालयात होताच.

कसं चालवत होता रॅकेट?

ललित पाटीलने ससून रुग्णालयात गेल्यावर दोन आयफोन मिळवले होते. पोलिसांच्या मते यातल्या एका फोनची किंमत 1.1 लाख रुपये आहे. याचाच वापर करुन तो हे रॅकेट चालवत होता. हे अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्याने रऊफ रहिम शेखला (वय 19) हाताशी धरले होते. शेखच्या माध्यमातून ससूनमधून तो अंमली पदार्थ पुरवायचा. या शेखकडेच हे पदार्थ पोहोचवण्यासाठी मंडल ते घेऊन जात होता.

हा प्रकार उघड झाल्यानंतर पाटील राऊफ आणि मंडल विरोधात पुण्यातल्या बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये कलम ३०६/२०२३ आणि एन पी डी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

1 तारखेला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तारखेला शस्त्रक्रिया करायची असल्याने ललित पाटील रुग्णालयातच मुक्कामी होता. शस्त्रक्रीयेच्या आदल्या दिवशी एक्स रे काढण्यासाठी त्याला एक पोलिस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर घेऊन आला आणि त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन पाटील तिथून फरार झाला.

ससून बाहेर येत त्याने रिक्षा पकडल्याचे त्याला आणलेल्या पोलिसाने जबाबात म्हणले आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, "पोलिसांच्या विविध तुकड्या त्याचा शोध घेत आहेत. तो रुग्णालयात असल्याने आणि तिथून फरार झाल्याने तो हे अंमली पदार्थांचे रॅकेट कसे चालवत होता याबाबत चौकशी करण्यात येत आहे."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससूनमध्ये पोलिस निरिक्षकांसह जवळपास 112 गार्ड ड्युटीवर असतात. त्यांच्याक़डे या कैद्यांच्याच वॉर्डची देखरेख करण्याची जबाबदारी असते.

चाकण प्रकरणातील सरकारी वकील शिशिर हिरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "या प्रकरणी यापुर्वीच कोर्टासमोर कोर्टाने दखल देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.हा प्रकार म्हणजे कायद्याची चेष्टा असल्याचं सांगत मी कार्यवाही करावी अशी विनंती केली होती. आता झालेला प्रकार लक्षात घेता यातील सर्व संबंधित दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे."

या प्रकरणी हलगर्जीपणा झाला म्हणून आता 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)