मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले 47 विषारी साप, नेमकं प्रकरण काय?

    • Author, शेरीलॅन मोल्लान
    • Role, बीबीसी न्यूज, मुंबई

भारतात डझनावारी दुर्मिळ सापांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

ही व्यक्ती भारतीय नागरिक असून तो थायलंडहून परतत होता. त्याला रविवारी (1 मे) मुंबई विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) अधिकाऱ्यांनी रोखलं.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या व्यक्तीच्या चेक इन केलेल्या सामानात 47 विषारी सापांसह इतर साप आढळले.

देशातील विविध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत (वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट) हे साप जप्त करण्यात आले आहेत.

या प्रवाशाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. तो सध्या कस्टडीमध्ये आहे. या व्यक्तीनं त्याच्या अटकेसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कस्टम अधिकाऱ्यांनी एक्स या सोशल मीडियावर एका डिशमध्ये रंगीबेरंगी सापांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

या पोस्टमध्ये अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी 3 स्पायडर-टेल्ड हॉर्न्ड साप, 5 एशियन लीफ कासवं आणि 44 इंडोनेशियन पिट साप या प्रवाशाकडून जप्त केले आहेत.

हे साप त्या व्यक्तीनं नेमके कुठून आणले हे अद्याप स्पष्ट नाही.

भारतात वन्यजीवांच्या तस्करीच्या घटना

भारतात प्राण्यांची आयात करणं बेकायदेशीर नसलं, तरी देशातील वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार विशिष्ट प्रजातींच्या आयातीवर बंदी आहे. यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा सरकारकडून संरक्षित करण्यात आलेल्या प्रजातींचा समावेश आहे.

भारतात कोणत्याही वन्यजीवाची किंवा प्राण्याची आयात करताना प्रवाशानं संबंधित परवानगी आणि परवाने घेणंदेखील आवश्यक आहे.

भारतात बंदी असलेल्या वन्यजीवांची प्रवाशांनी तस्करी करण्याचा प्रयत्न केला केल्यावर कस्टम अधिकाऱ्यांनी ते वन्यजीव जप्त केल्याच्या बातम्या नवीन नाहीत.

जानेवारी महिन्यात, भारतीय अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर एका कॅनेडियन व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या सामानामध्ये मगरीची कवटी आढळली होती.

महिनाभरानंतर, मुंबई विमानतळावर अधिकाऱ्यांनी पाच सियामांग गिबन्स घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला रोखलं होतं. सियामांग गिबन्स हे इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळणारी छोटी माकडं असतात.

गिबन्सचा समावेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या नामशेष होण्याच्या मार्गावरील वन्यजीवांच्या यादीत आहे. हे गिबन्य त्या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये एका प्लास्टिक क्रेटमध्ये लपवलेले होते.

तर नोव्हेंबर महिन्यात कस्टम अधिकाऱ्यांनी बँकॉकहून परतणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केली होती. त्यांच्याकडे परदेशी प्रजातीची 12 कासवं सापडली होती.

2019 मध्ये चेन्नई विमानतळावर अधिकाऱ्यांनी एक हॉर्न्ड पिट साप, पाच इग्वाना, चार निळ्या जिभेचे स्किन्क (सरड्याची एक प्रजाती), तीन ग्रीन ट्री बेडूक आणि 22 इजिप्तियन कासवं जप्त केली होती. थायलंडहून येणाऱ्या माणसाकडे हे वन्यजीव सापडले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)