करार नाही, शस्त्रसंधी नाही, मग ट्रम्प-पुतिन भेटीचं फलित काय? जाणून घ्या 5 मुद्द्यांमध्ये

पुतिन यांनी ट्रम्प यांना रशियाला येण्याचं आमंत्रण दिलं आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुतिन यांनी ट्रम्प यांना रशियाला येण्याचं आमंत्रण दिलं आहे
    • Author, लौरा गोत्सी
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये महत्त्वाची बैठक झाली.

युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून ही भेट एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जात होतं. मात्र, या भेटीत शस्त्रसंधीचा निर्णय झाला नाही. या भेटीची फलनिष्पत्ती म्हणून फक्त पुढील भेटीसाठी मॉस्कोत येण्याचं आमंत्रण मिळालं.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील ही बैठक जवळपास तीन तास चालली. या भेटीतून उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक निर्माण झाले.

या लेखात या दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या अलास्कातील भेटीशी निगडीत पाच महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.

1. पुतिन यांचं रेड कार्पेटद्वारे जागतिक व्यासपीठावर पुनरागमन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शुक्रवारी (15 ऑगस्ट) जेव्हा अलास्कामध्ये पोहोचले, तेव्हा तिथे ढगाळ हवामान होतं. त्यावेळेस जॉईंट बेस असलेल्या एलमेंडॉर्फ-रिचर्डसन या अमेरिकेच्या लष्करी तळावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रेड कार्पेटवर पुतिन यांचं स्वागत करण्यासाठी वाट पाहत होते.

पुतिन पुढे येताच ट्रम्प यांनी टाळ्या वाजवल्या. मग दोन्ही नेत्यांनी उत्साहानं हस्तांदोलन केलं आणि स्मित केलं.

पुतिन यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण होता. 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून पाश्चात्य देशांनी पुतिन यांना एकटं पाडलं होतं. त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पुतिन फक्त उत्तर कोरिया आणि बेलारूस सारख्या रशियाला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्येच दौरा करू शकत होते.

ग्राफिक्स

अशा परिस्थितीत अलास्कामध्ये शिखर परिषद होणं, तिथे ट्रम्प यांच्याशी भेट होणं, हे पुतिन यांच्यासाठी विजयासारखंच होतं. मात्र, तिथे पुतिन यांचं ज्याप्रकारे स्वागत झालं, ते बहुधा रशियाच्या कल्पनेपलीकडचं होतं.

फक्त सहा महिन्यांपूर्वीच पाश्चात्य देशांनी पुतिन यांना नाकारलं होतं. मात्र, आता अमेरिकेच्या भूमीवर पुतिन यांचं पाहुणा आणि सहकारी म्हणून स्वागत झालं.

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एक अनपेक्षित क्षणदेखील आला. पुतिन यांनी त्यांच्या मॉस्को-प्लेटेड राष्ट्राध्यक्षांच्या कारऐवजी ट्रम्प यांच्या चिलखडी लिमोझिन कारमधून हवाईतळावर जाण्याचा निर्णय घेतला.

ही कार निघताच, कॅमेऱ्यांमध्ये कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या आणि स्मित करणाऱ्या पुतिन यांचा क्लोज-अप फोटो घेतला.

2. पुतिन यांच्यावर कठीण प्रश्नांची सरबत्ती

रशियात 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या पुतिन यांचा तिथल्या प्रसारमाध्यमांवर पूर्ण नियंत्रण आहे. तिथे पत्रकारितेचं स्वातंत्र्य संपवून त्यांनी माहितीच्या जागी प्रोपगंडा लादला आहे. रशियात त्यांना कधीही अडचणीचे प्रश्न विचारले जात नाहीत.

ग्राफिक्स

मात्र, पुतिन अलास्कात पोहोचताच एका पत्रकारानं त्यांना विचारलं, "तुम्ही सर्वसामान्य लोकांचे मृत्यू थांबवाल का?"

यावर पुतिन यांनी कोणतंही उत्तर न देता दुर्लक्ष केलं.

थोड्या वेळानं फोटो-सेशनमध्ये पुन्हा त्यांना प्रश्न विचारले गेले. एका रशियन पत्रकारानं विचारलं की, पुतिन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलन्स्की यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठक करणार का?

त्यावर पुतिन थोडंसं स्मित करत गप्प राहिले.

3. चर्चा लवकर आटोपण्याबाबत काय सांगण्यात आलं?

जगभरातील प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषदेची अपेक्षा होती. मात्र दोन्ही नेत्यांनी फक्त त्यांची वक्तव्यं केली. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

एरवीपेक्षा वेगळं म्हणजे, सर्वात आधी पुतिन बोलले. त्यांनी 'समाधानकारक' चर्चा झाल्याचं सांगत, अलास्काच्या रशियन इतिहासाचा उल्लेख केला.

अनेक मिनिटांनंतर पुतिन यांनी 'युक्रेनच्या मुद्द्या'बाबत त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की एक 'करार' झाला आहे. मात्र खरं कारण संपल्याशिवाय शांतता निर्माण होऊ शकत नाही.

या वक्तव्यानं युक्रेन आणि इतर देशांसाठी धोक्याची घंटा वाजली असेल. 2022 मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पुतिन वारंवार हीच मागणी करत आले आहेत.

ग्राफिक्स

क्रीमिया, दोनेत्स्क, लुहान्स्क, जापोरिजिया आणि खेरसॉनवरील रशियाच्या सार्वभौमत्वाला मान्यता, युक्रेनला शस्त्रास्त्रं न पुरवणं, परदेशी सैन्याची अनुपस्थिती आणि युक्रेनमध्ये नव्यानं निवडणुका घेणं, या पुतिन यांच्या मागण्या आहेत.

सोप्या शब्दांमध्ये, या युक्रेनच्या पराभवाच्या आणि शरणागतीच्या अटी होत्या. त्या युक्रेनला मान्य नाहीत. मात्र युद्धाला साडेतीन वर्षे झाल्यानंतर देखील त्या रशियासाठी अजूनही महत्त्वाच्या आहेत.

यातून हे स्पष्ट झालं की कोणताही ठोस करार झाला नाही.

4. काय बोललं गेलं नाही?

या बैठकीमागचं खरं कारण आणि संदर्भ लक्षात घेता, ही गोष्ट आश्चर्यकारक होती की ट्रम्प यांनी युक्रेनचं नाव घेतलं नाही, तसंच शस्त्रसंधीचाही उल्लेख केला नाही.

ते फक्त इतकंच म्हणाले की 'दर आठवड्याला पाच-सहा-सात हजार लोक मारले जातात'. पुतिन यांनादेखील रक्तपात थांबवायचा आहे.

सर्वसाधारणपणे खूप बोलणारे ट्रम्प यावेळेस पुतिनपेक्षाही कमी बोलले. त्यांचं एक छोटंसं वक्तव्यं होतं. ते असामान्य होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वक्तव्यातील अस्पष्टता.

ग्राफिक्स

ट्रम्प म्हणाले की 'अनेक मुद्द्यांबाबत आमचं एकमत झालं' आणि ते पुढे म्हणाले की 'खूप प्रभावी बैठकी'तून मोठी प्रगती झाली.

मात्र त्यांनी या चर्चेचा कोणताही तपशील दिला नाही. या चर्चेतून युक्रेन युद्ध संपवण्याच्या दिशेनं कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलं असल्याचं दिसून आलं नाही.

यात कोणताही मोठा करार झाला नाही, तसंच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठकीची घोषणा झाली.

ग्राफिक्स

ट्रम्प यांनी त्यांच्या 'गंभीर परिणामां'च्या इशाऱ्याचा उल्लेखदेखील केला नाही, ही रशियासाठी दिलाशाची बाब आहे. शस्त्रसंधी न झाल्यास रशियाला 'गंभीर परिणाम' भोगावे लागण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती.

ट्रम्प यांनी मान्य केलं की, "आम्ही तिथपर्यंत (शस्त्रसंधी) पोहोचलो नाही."

मग त्यांनी आशा व्यक्त केली की, "मात्र तिथपर्यंत पोहोचण्याची आमच्याकडे चांगली संधी आहे."

5. 'नेक्स्ट टाइम इन मॉस्को'

पुतिन-ट्रम्प भेटीतून युक्रेन युद्धावर कोणताही कायमस्वरुपी तोडगा जरी निघाला नाही, तरी या बैठकीमुळे रशिया आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा एकदा चांगले झाले.

दोन्ही नेत्यांनी वारंवार हस्तांदोलन करण्याचे आणि स्मित हास्य करण्याच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा झाली.

पुतिन जेव्हा त्यांच्या विमानातून उतरत होते, तेव्हा अमेरिकेचे सैनिक रेड कार्पेट अंथरत होते, त्या फोटोंची देखील चर्चा झाली.

सर्वसाधारणपणे पुतिन इंग्रजीतून उत्तर देत नाहीत, मात्र अलास्कामध्ये पुतिन स्मितहास्य करत ट्रम्प यांना पुढील वेळेस मॉस्कोत भेटण्याबद्दल बोलले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वसाधारणपणे पुतिन इंग्रजीतून उत्तर देत नाहीत, मात्र अलास्कामध्ये पुतिन स्मितहास्य करत ट्रम्प यांना पुढील वेळेस मॉस्कोत भेटण्याबद्दल बोलले

पुतिन यांनी त्यांच्या वक्तव्यात ट्रम्प यांच्या त्या जुन्या दाव्याचा देखील सदंर्भ दिला की जर ते सत्तेत असते तर युक्रेन युद्ध कधीच झालं नसतं.

अर्थात 'मोठ्या प्रगती'बद्दल बोलण्यात आलं. मात्र अलास्का परिषदेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. मात्र तरीदेखील रशियामध्ये पुढील बैठक होण्याची शक्यता दोन्ही नेत्यांनी खुली ठेवली.

ट्रम्प म्हणाले, "मी बहुधा लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन."

कोणतंही आश्वासन, तडजोड किंवा करार न करताच पुतिन इतके निवांत झाले की, त्यांनी इंग्रजीत विनोद केला - "नेक्स्ट टाइम इन मॉस्को."

त्यावर ट्रम्प हसत म्हणाले - "ओह, हे रंजक आहे. त्यासाठी मला टीकेला सामोरं जावं लागेल. मात्र हो, मी कल्पना करू शकतो की हे शक्य आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)