भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांची हत्या कशी करण्यात आली? या हत्येमागचं कारण काय होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
लॉर्ड माउंटबॅटन यांना एक दिवस वृद्ध होतील, असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटत नव्हतं. कारण संपूर्ण आयुष्यात त्यांना किरकोळ सर्दी वगळता कोणताही मोठा आजार झाला नाही.
वयाची 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील ते जेव्हा ब्रॉडलँडमध्ये असायचे, तेव्हा सकाळी 2 तास घोडेस्वारी नक्की करायचे.
हेही तितकंच खरं की, त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात पोलो हा त्यांचा आवडता खेळ खेळणं थांबवलं होतं. कारण तेव्हा ते आधीसारखे चपळ राहिले नव्हते.
शेवटच्या काही वर्षांमध्ये थकवा आल्यावर किंवा कंटाळल्यावर ते अनेकदा डुलकी घेताना दिसत असत. मात्र, तरीदेखील आयुष्य जगण्यातील त्यांचा उत्साह अजिबात कमी झाला नव्हता.
माउंटबॅटन यांनी नेहमीच त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं होतं. दरवर्षी नाताळच्या सणाला त्यांच्या मुली आणि नातवंडं ब्रॉडलँडमध्ये एकत्र जमायचे.
ईस्टरच्या दिवशी ब्रेबॉर्नवर ते सर्व एकत्र यायचे. ते संपूर्ण उन्हाळा अनेकदा आयर्लंडमधील क्लासीबॉनमध्ये घालवायचे.
ब्रायन होई यांनी 'माउंटबॅटन द प्रायव्हेट स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात की, माउंटबॅटन यांना त्यांच्या नातवंडांच्या मित्रमंडळींबद्दल आणि त्यांच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घ्यायचं असायचं.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रायन होई लिहितात, "त्यांच्या नातवाच्या एका गर्लफ्रेंडनं मला सांगितलं होतं की, ते त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायचे. मात्र तरीदेखील त्यांना कुटुंबाकडून प्रेम आणि सन्मान मिळायचा. त्यांच्याबरोबर बसणं मजेशीर असायचं. ते जबरदस्त फ्लर्ट करायचे. मात्र त्याचं कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही."
मुलांशी त्यांचं जवळचं नातं असण्यामागचं एक कारण म्हणजे त्यांचा स्वत:चा स्वभावदेखील मुलांप्रमाणेच होता. त्यांचे नातू मायकल जॉन सांगायचे, "त्यांचं हसणं अद्भूत होतं. ते आमच्याबरोबर चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पाहून अगदी पोट धरून हसायचे. तो चित्रपट त्यांनी आधी अनेकवेळा पाहिलेला असायचा, तरीदेखील ते खूप हसायचे. लॉरेल आणि हार्डीचे चित्रपटदेखील त्यांना प्रचंड आवडायचे."
IRA च्या निशाण्यावर होते माउंटबॅटन
निवृत्त झाल्यानंतर माउंटबॅटन एक सामान्य आयुष्य जगत होते. मात्र प्रशासनाला या गोष्टीचा कुठेतरी अंदाज होता की, त्यांच्या आयुष्याला धोका आहे.
1971 मध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी 12 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
फिलिप जिगलर यांनी माउंटबॅटन यांचं चरित्र लिहिलं आहे.

फिलिप जिगलर यांना दिलेल्या मुलाखतीत माउंटबॅटन यांनी मान्य केलं होतं, "सरकारला भीती वाटते की, IRA माझं अपहरण करून त्याचा वापर उत्तर आयर्लंडमध्ये तुरुंगात असलेल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांची सुटका करण्यासाठी करू शकतं."
IRA म्हणजे आयरिश रिपब्लिकन आर्मी. त्या काळी या संघटनेला उत्तर आयर्लंडमधील ब्रिटिश राजवट संपवायची होती.
अँड्रयू लोनी यांनी 'द माउंटबॅटन्स देयर लाइव्ह्ज अँड लव्स' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं होतं, "आयआरएच्या एका सेफ हाऊसवर (गुप्त ठिकाण) छापा मारल्यानंतर माहिती मिळाली होती की, आयआरएला ज्या 50 जणांची हत्या करायची होती, त्यात माउंटबॅटन यांचाही समावेश होता."
माउंटबॅटन यांच्यावर होती पाळत
मार्च 1979 मध्ये नेदरलँड्समधील ब्रिटिश राजदूत सर रिचर्ड साइक्स आणि एरिक नीव या खासदाराला आयआरएनं गोळ्या घातल्या होत्या.
जून महिन्यात आयआरएनं बेल्जियममधील नाटोचे प्रमुख जनरल अँलेक्झांडर हेग यांची हत्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र त्यात ते थोडक्यात बचावले होते.
या घटनांनंतर पोलीस दलाचे चीफ सुपरिटेंडेंट डेव्हिड बिकनेल यांनी माउंटबॅटन यांना सल्ला दिला होता की, त्यांनी आयर्लंडला जाऊ नये. त्यावर माउंटबॅटन म्हणाले होते, 'आयरिश लोक माझे मित्र आहेत.'
यावर बिकनेल, माउंटबॅटन यांना म्हणाले होते, 'सर्व आयरिश लोक तुमचे मित्र नाहीत.'
बिकनेल यांनी सल्ला दिल्याप्रमाणे ते पिस्तुलदेखील बाळगू लागले होते.

फोटो स्रोत, BLINK
अँड्रयू लोनी लिहितात, "जुलै 1979 मध्ये ग्राहम योएल यांनी माउंटबॅटन यांना असलेल्या धोक्याचं आकलन करत सांगितलं होतं की, माउंटबॅटन यांची 'शॅडो फाईव्ह' ही बोट त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण रात्रीच्या वेळेस त्यावर कोणीही गुपचूप चढू शकतं."
"बेलफास्टमध्ये नोंद असलेली एक कार अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर येताना दिसली होती. या गोष्टीची त्यांना चिंता होती. एकदा योएल यांनी दुर्बिणीनं कारमध्ये बसलेल्या लोकांना पाहण्याचा प्रयत्न केला होता."
योएल यांनी पाहिलं होतं, "एक व्यक्ती दुर्बिणीनं माउंटबॅटन यांची बोट पाहत होता. त्यावेळेस तो त्या बोटीपासून जवळपास 600 फूट (200 गज) अंतरावर असेल."
सुरक्षारक्षक माउंटबॅटन यांच्या बोटीवर गेला नाही
योएल यांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यांच्याकडून माउंटबॅटन यांच्या सुरक्षेची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि ती आयरिश पोलिसांना देण्यात आली. 27 ऑगस्ट 1979 च्या दिवशी संपूर्ण ब्रिटनमध्ये सुट्टी होती.
अनेक दिवस पाऊस पडल्यानंतर चांगलं ऊन पडलं होतं. त्यामुळे न्याहारीच्या वेळेस माउंटबॅटन यांनी त्यांच्या कुटुंबाला विचारलं की, त्यांच्यापैकी कोण त्यांच्याबरोबर शॅडो फाईव्ह बोटीवर फिरायला येईल?
जेटीवर जाण्याआधी माउंटबॅटन यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लोकांना त्यांची योजना सांगितली.

फोटो स्रोत, Getty Images
दुर्बिण आणि रिव्हॉल्व्हर असलेल्या सुरक्षारक्षकांनी जेटीवर त्यांची फोर्ड एस्कॉर्ट कार पार्क केली.
त्यातील एका सुरक्षारक्षकाला समुद्राच्या लाटांमुळे उलट्या होत असत. माउंटबॅटन यांनी त्याला सल्ला दिला की, त्यानं बोटीवर त्यांच्यासोबत येण्याची आवश्यकता नाही.
ब्रायन होए यांनी 'माउंटबॅटन द प्रायव्हेट स्टोरी' या त्यांच्या पुस्तकात लिहिलं की, माउंटबॅटन यांनी त्यांच्या 'एचएमएस केली' या युद्धनौकेची एक जर्सी घातलेली होती. त्यावर 'द फायटिंग फिफ्थ' असं लिहिलेलं होतं.
याआधी त्यांच्या कुटुंबानं त्यांना ही जर्सी घातलेलं कधीही पाहिलेलं नव्हतं. बोटीत बसताच माउंटबॅटन यांनी बोटीचं नियंत्रण स्वत:कडे घेतलं.
बोटीत डेकखाली एक बॉम्ब ठेवलेला होता. नंतर आयआरएनं दावा केला होता की, त्यात जवळपास 20 किलो प्लास्टिक स्फोटकं होती.
माउंटबॅटन यांच्या बोटीची दुर्बिणीनं टेहळणी
साडेअकरा वाजता 'शॅडो फाईव्ह' बोट निघाली. सुरक्षा रक्षक किनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्यावरील त्यांची कार चालवत दुर्बिणीनं बोटीवर लक्ष ठेवून होते.
त्यांच्या थोडं पुढे प्रोव्हिजनल आयआरएच्या काही सदस्यांचंही त्या बोटीवर लक्ष होतं.

फोटो स्रोत, SIDJWICK & JACKSON
ब्रायन होए लिहितात, "आयआरएच्या लोकांना स्पष्ट दिसत होतं की, बोटीवर एक वृद्ध महिला बसली होती. तीन तरुण बोटीच्या मधोमध बसले होते, तर माउंटबॅटन बोट चालवत होते."
"एका मारेकऱ्याकडे एक रिमोट कंट्रोल उपकरण होतं. त्याचा वापर करून ते बोटीवरील बॉम्बचा स्फोट करणार होते."
बोटीवर बॉम्बस्फोट
बरोबर 11 वाजून 45 मिनिटांनी 'शॅडो फाईव्ह' बोट जेटीवरून निघून 15 मिनिटं झाली होती. तितक्यात एका मारेकऱ्यानं रिमोट कंट्रोलचं बटण दाबलं.
बोटीवर ठेवलेल्या जवळपास 20 किलो स्फोटकांचा एक जबरदस्त स्फोट झाला आणि बोटीचे तुकडे तुकडे झाले.
माउंटबॅटन यांची मुलगी पॅट्रीशिया यांनी त्यावेळची आठवण करत सांगितलं, "मी माझ्या सासू लेडी ब्रेबॉर्न यांच्याकडे बघत बोलत होते. सोबतच मी न्यू स्टेट्समनचा ताजा अंकही वाचत होते."
"माझे डोळे ते वाचण्यासाठी खालच्या दिशेला होते. बहुधा त्यामुळेच ज्यावेळेस स्फोट झाला तेव्हा माझ्या डोळ्यांचं कमी नुकसान झालं."
त्या सांगतात, "मला आठवतं की, माझ्या वडिलांच्या पायाजवळ टेनिसच्या आकाराची काहीतरी वस्तू होती. त्यातून तीव्र प्रकाश येत होता. मला फक्त इतकंच आठवतं की, पुढच्याच क्षणी मी पाण्यात पडले आणि त्यात गटांगळ्या खात होते."

फोटो स्रोत, Getty Images
लॉर्ड माउंटबॅटन यांचे जावई लॉर्ड ब्रेबॉर्न बोटीच्या मधोमध उभे होते. त्यांच्या शरीराचा एक भाग स्फोटाच्या तडाख्यात सापडला. मात्र त्यांचा चेहरा पूर्णपणे बचावला.
स्फोटाच्या काही सेकंद आधीच ते त्यांच्या सासऱ्यांना म्हणाले होते, 'तुम्हाला मजा येते आहे? हो ना?'
माउंटबॅटन यांच्या कानी पडलेले बहुधा ते शेवटचे शब्द होते.
लॉर्ड ब्रेबॉर्न तो प्रसंग आठवून सांगतात, "पुढच्याच क्षणी मी पाण्यात पडलो होतो आणि मला कडाक्याची थंडी वाजत होती. मला हेदेखील आठवत नाही की, मला कशाप्रकारे वाचवण्यात आलं होतं."
माउंटबॅटन यांचा मृतदेह सापडला
बोटीच्या ढिगाऱ्यापासून काही फुटांवर माउंटबॅटन यांचा मृतदेह सापडला होता.
अँड्रयू लोनी लिहितात, "त्यांचे पाय त्यांच्या शरीरापासून जवळपास वेगळे झाले होते. त्यांच्या शरीरावरील सर्व कपडे फाटले होते. फक्त एक बाही राहिली होती. त्यावर 'एचएमएस केली' या त्यांच्या जुन्या युद्धनौकेचं नाव लिहिलेलं होतं."
ते लिहितात, "त्यांचा त्याच क्षणी मृत्यू झाला होता. लोकांना दिसू नये म्हणून रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांचा मृतदेह एका बोटीत ठेवण्यात आला होता."

फोटो स्रोत, Getty Images
स्फोट झाला तेव्हा योगायोगानं डॉक्टर रिचर्ड वॉलेस त्याच्या आसपासच होते. त्यांनी सांगितलं, "जेव्हा आम्ही स्फोटाचा आवाज ऐकला, तेव्हा हा बॉम्बस्फोट असू शकतो असं आम्हाला वाटलं नाही."
"आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा पाहिलं की बरेचसे लोक पाण्यात पडले होते. जिवंत लोकांना मृतदेहांपासून वेगळं करणं हे आमचं पहिलं काम होतं."
ते सांगतात, "डॉक्टर म्हणून आमचं कर्तव्य होतं की, आम्ही मृतांऐवजी जिवंत लोकांवर आमचं लक्ष केंद्रित करावं. आम्ही जेव्हा माउंटबॅटन यांचा मृतदेह घेऊन जेटीवर पोहोचलो, तेव्हा अनेकजण आमची मदत करण्यासाठी पुढे सरसावले."

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर वॅलेस म्हणाले, "एक दरवाजा तोडून कामचलाऊ स्ट्रेचर बनवण्यात आलं आणि महिलांनी चादर फाडून त्याच्या पट्ट्या बनवून दिल्या. त्यांचा वापर करून जखमी झालेल्यांच्या जखमा लगेचच झाकण्यात आल्या."
"आम्ही जेव्हा माउंटबॅटन यांचा मृतदेह किनाऱ्यावर आणला, तेव्हा मी पाहिलं की त्यांचा चेहरा विछिन्न झाला नव्हता. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी कापल्याच्या आणि जखमांच्या खुणा होत्या. मात्र त्यांचा चेहरा व्यवस्थित होता."
माउंटबॅटन यांना शेवटचा निरोप
माउंटबॅटन यांच्या मृत्यूची बातमी येताच दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालय आणि दुकानं बंद करण्यात आली. त्यांच्या सन्मानार्थ भारतात 7 दिवसांच्या राजकीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली.
त्यांचे चरित्रकार रिचर्ड हाओ यांनी 'माउंटबॅटन हिरो ऑफ अवर टाइम' या पुस्तकात लिहिलं, "हा एक विचित्र योगायोग होता की, त्यांचे मित्र महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच त्यांची हत्याही एका संघर्षमय देशात झाली. मृत्यूच्या वेळेस या दोघांचं वय 79 वर्षे होतं."

फोटो स्रोत, Getty Images
5 सप्टेंबर, 1979 ला वेस्टमिंस्टर एबीमध्ये 1,400 जणांच्या उपस्थित माउंटबॅटन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या लोकांमध्ये ब्रिटनची महाराणी, राजकुमार चार्ल्स, युरोपमधील अनेक राजे, पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि 4 माजी पंतप्रधान उपस्थित होते.
आयआरएनं घेतली हल्ल्याची जबाबदारी
थोड्या वेळानं प्रोव्हिजनल आयआरएनं निवेदन जारी केलं की, ते माउंटबॅटन यांना ठार केल्याची जबाबदारी घेत आहेत.
आयआरएनं हे कधीही स्पष्ट केलं नाही की, एका 79 वर्षांच्या वृद्धाला त्याच्या कुटुंबासोबत मारणं कसं योग्य ठरू शकतं?
माउंटबॅटन यांचे चरित्रकार फिलिप जीगलर लिहितात, "माउंटबॅटन यांची हत्या करण्याबरोबरच त्याच दिवशी आयर्लंडमध्ये 18 ब्रिटिश सैनिकांना देखील मारण्यात आलं होतं. त्यातून दिसून येतं की, हा निर्णय आयआरएच्या उच्च स्तरावर घेण्यात आला होता."

फोटो स्रोत, Getty Images
आयआरएनं त्यांच्या बुलेटिनमध्ये म्हटलं, "याचा उद्देश आमच्या देशावरील ताब्याकडे ब्रिटिश लोकांचं लक्ष वेधण्याचा होता."
"माउंटबॅटन यांना मारून आम्ही ब्रिटिश राज्यकर्त्या वर्गाला सांगू इच्छितो की, आमच्याबरोबरच्या लढाईची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागेल."
माउंटबॅटन यांची हत्या झाल्यानंतर आयआरएच्या मोहिमेला मिळणारं जनसमर्थन कमी झालं होतं.
त्यावेळच्या ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी आयआरएला राजकीय संघटनेऐवजी एक गुन्हेगारी संघटना म्हणून जाहीर केलं.
ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी आयआरएच्या बंडखोरांना देण्यात आलेला युद्धकैद्यांचा दर्जादेखील मागे घेतला होता.
मॅकमॅहन याला जन्मठेप
बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही तासांतच आयर्लंडच्या पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास सुरू केला.
शेवटी, 24 वर्षांचा फ्रान्सिस मॅकगर्ल आणि प्रोव्हिजनल आयआरएचा 31 वर्षांचा थॉमस मॅकमॅहन या दोन जणांना अटक करण्यात आली.
त्या दोघांच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावे सापडले. दोघांकडे जेलिगनाईट आणि माउंटबॅटन यांच्या 'शॅडो फाईव्ह' या बोटीच्या हिरव्या रंगाचे काही अंश सापडले.

फोटो स्रोत, Getty Images
23 नोव्हेंबर 1979 ला 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं मॅकगर्लला संशयाचा फायदा देत त्याची सुटका केली. मॅकमॅहनला 2 पुराव्यांच्या आधारे माउंटबॅटन यांच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं.
हिरवा रंग आणि नायट्रोग्लिसरीनचा काही अंश सापडल्याच्या आधारे न्यायालयानं मान्य केलं की, त्यानंच माउंटबॅटन यांच्या बोटीत बॉम्ब ठेवला होता. अर्थात ज्यावेळेस हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा तो घटनास्थळापासून 70 मैल अंतरावर पोलिसांच्या ताब्यात होता.
थॉमस मॅकमॅहन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र 1998 मध्ये 'गुड फ्रायडे' कराराअंतर्गत त्याची सुटका करण्यात आली. तो एकूण 19 वर्षे ब्रिटिश तुरुंगात होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











