मार्टिन ल्यूथर किंग ते नेल्सन मंडेलांपर्यंत अनेकांना प्रेरणा देणारे गांधीजी खरंच जगाला माहीत नव्हते?

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
    • Role, बीबीसी तामिळ

'परदेशात राहणाऱ्यांना 1982 साली प्रदर्शित झालेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या 'गांधी' चित्रपटाआधी महात्मा गांधींबाबत काहीही माहीत नव्हतं' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आता त्यांच्या याच विधानावर काँग्रेसचे नेते आणि गांधीवादी विचारवंत सडकून टीका करत आहेत. पण गांधींना कधीपासून जगभर ओळखलं जाऊ लागलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, "महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व महान होतं. मागच्या 75 वर्षांमध्ये गांधींना जगभर पोहोचवणं ही आपली जबाबदारी नव्हती का? मला माफ करा पण गांधींना कुणीही ओळखत नव्हतं.

पहिल्यांदा जेव्हा 'गांधी' चित्रपट बनला तेव्हा जगाला उत्सुकता लागली की हे कोण आहेत? आपण एक देश म्हणून त्यांना जगभरात पोहोचवू शकलो नाही, या देशाचं हे कर्तव्य होतं."

मोदींच्या या विधानावर सोशल मीडिया आणि संपूर्ण देशभर टीका होऊ लागली आहे.

मोदींच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, "ज्यांनी शाखांमध्ये जगाचं ज्ञान मिळवलेलं आहे असे लोक गांधींना समजू शकत नाहीत. गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंना मात्र ते समजू शकतात."

रिचर्ड ॲटनबरो यांनी बनवलेला 'गांधी' चित्रपट कसा होता?

1952 पासूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण त्यापैकी एकही प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

1960च्या दशकात ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो यांनी गांधींच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा पहिला प्रयत्न केला.

तब्बल वीस वर्षांच्या विलंबानंतर म्हणजेच नोव्हेंबर 1980मध्ये ॲटनबरो यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु केलं. सुमारे दीड वर्ष हे चित्रीकरण सुरु होतं आणि अखेर मे 1981मध्ये हे चित्रीकरण पूर्ण झालं.

या चित्रपटात बेन किंग्सले यांनी गांधींची भूमिका साकारली तर रोशन सेठ यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भूमिका केली. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका हर्ष नय्यर यांनी केली होती.

बेन किंग्सले

फोटो स्रोत, Getty Images

30 नोव्हेंबर 1982 रोजी दिल्लीत या चित्रपटाचा प्रीमियर झाला. नंतर तो लंडन, अमेरिकेतही प्रदर्शित करण्यात आला. जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं.

व्यावसायिक पातळीवरही गांधींवर बनवलेला हा चित्रपट यशस्वी ठरला. या चित्रपटाला ऑस्कर आणि ब्रिटिश अकादमीसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

महात्मा गांधींना पडद्यावर जिवंत करणाऱ्या बेन किंग्जले यांना त्यावर्षीचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

पण गांधींवर बनवलेल्या या चित्रपटानंतरच गांधींची ओळख जगाला झाली का? सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास केला तर लक्षात येईल की 1930 च्या दशकातच गांधींनी जगभर ख्याती मिळवली होती.

1937च्या नोबेल पुरस्कारासाठी गांधींच्या नावाचा विचार झाला होता

1930 च्या दशकात नोबेल पुरस्कारासाठी महात्मा गांधींचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर नोबेल पुरस्कार समितीने गांधींना हा पुरस्कार का नाकारण्यात आला या प्रश्नाचं उत्तर देणारा एक लेखही प्रकाशित केला होता.

1937च्या नोबेल पुरस्कारासाठी महात्मा गांधींच्या नावाचा विचार केल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आलेला आहे. एकूण पाचवेळा महात्मा गांधींचं नाव संभाव्य नोबेल विजेत्यांच्या चर्चेत आलेलं होतं. या लेखात दिलेल्या माहितीनुसार, "1937, 1938, 1939, 1947 आणि जानेवारी 1948 मध्ये त्यांच्या हत्येपूर्वी, असा एकूण पाचवेळा त्यांच्या नावाचा नोबेल पुरस्कारासाठी विचार करण्यात आला होता."

अभिनेते चार्ली चॅप्लिनसोबत गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेते चार्ली चॅप्लिनसोबत गांधी (लंडनमध्ये 1931 मध्ये घेतलेला फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या लेखात दिलेल्या माहितीनुसार ज्या संस्थांनी नोबेल पुरस्कारासाठी गांधींच्या नावाची शिफारस केली होती, त्या संस्थांची नावं वाचली तरी त्या दशकात गांधींचा जगभर किती प्रभाव होता हे अगदी सहज कळू शकेल.

नोबेल पुरस्कार समितीने प्रकाशित केलेल्या या लेखात असं लिहिण्यात आलं आहे की, "गांधींना मानणाऱ्यांमध्ये करणाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती संघटना असेल तर ती म्हणजे 'फ्रेंड्स ऑफ इंडिया.' युरोप आणि अमेरिकेत 1930च्या सुरुवातीला या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती.

1937 मध्ये नॉर्वेचे खासदार ओले काल्बजॉन्सन यांनी गांधींना शांततेसाठीचा नोबेल देण्यात यावा अशी मागणी केलेली होती. त्यानंतर पुरस्कारासाठीच्या संभाव्य तेरा नावांमध्ये महात्मा गांधींच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता."

पण त्यावर्षी महात्मा गांधींना हा पुरस्कार का देण्यात आला नाही? या प्रश्नाचं उत्तरदेखील याच लेखात देण्यात आलं आहे, "1938 आणि 1939 मध्ये ओले काल्बजॉन्सन यांनी गांधींच्या नावाची शिफारस केली होती. मात्र त्यांना हा पुरस्कार देण्यात आला नाही. 1947 मध्ये त्यांचे नाव पुन्हा नामांकन करण्यात आले. त्यानंतर अंतिम 6 जणांच्या यादीतही गांधींचं नाव होतं. 1948 मध्ये गांधींच्या हत्येनंतर पुन्हा एकदा गांधींच्या नावाचा नोबेल पुरस्कारासाठी विचार करण्यात आला होता. "

"मात्र त्याहीवर्षी नोबेल पुरस्कार समितीने शांततेचा नोबेल कुणालाच दिला नाही. गांधींना तो दिला गेला नाही कारण या समितीला महात्मा गांधींना मरणोत्तर नोबेल द्यायचा नव्हता," असं या लेखात सांगण्यात आलं आहे.

मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ते नेल्सन मंडेला, गांधींनी अनेकांना प्रेरित केलं

गांधींची जगभर असणारी लोकप्रियता मोजण्यासाठी केवळ नोबेल पुरस्कारांसाठी गांधींच्या नावाची शिफारस हे एकच परिमाण होतं का? तर ते तसं नाहिये.

गांधींनी त्यांच्या आयुष्यात मानवाधिकारांसाठी जगभर लढणाऱ्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना प्रेरित केलं. त्यात सगळ्यात प्रमुख नाव होतं अमेरिकेत नागरिक हक्कांसाठीचा लढा उभारणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचं.

'माय पिल्ग्रिमेज टू नॉनव्हायलन्स' या त्यांच्या पुस्तकात मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर लिहितात की, "वंचितांच्या उद्धारासाठी उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक लढ्यात गांधींनी सांगितलेला मार्ग हा सगळ्यात जास्त नैतिक आणि रास्त आहे. ईश्वराने आम्हाला मार्ग दाखवला आणि गांधींनी त्यासाठीच्या लढ्याचं नियोजन करून दिलं."

अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते मार्टिन ल्यूथर किंग जूनियर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्ते मार्टिन ल्यूथर किंग जूनियर

केवळ मार्टिन ल्युथर किंगच नाही तर दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात एक व्यापक लढा उभारणाऱ्या नेल्सन मंडेला यांच्यासाठीही गांधींचं तत्वज्ञान अत्यंत महत्त्वाचं ठरलं. मंडेला यांनी म्हटलं आहे की, "गांधी अहिंसेसाठी कटिबद्ध होते आणि मी गांधींचे हे तत्व अनुसरण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला."

त्याचप्रमाणे, जर्मनीत ज्यांचा जन्म झाला आणि पुढे 20 व्या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून ज्यांनी ओळख मिळवली असे अल्बर्ट आइनस्टाइन असोत किंवा फ्रेंच लेखक आणि विचारवंत रोमेन रोलँड असोत.. अशा अनेकांवर गांधींचा खूप मोठा प्रभाव होता.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 1930 च्या दशकात गांधींच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 1939 मध्ये प्रकाशित झालेलं 'महात्मा गांधी' हे पुस्तक. पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती बनलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गांधींवर लिहिलेल्या लेख आणि निबंधांचं केलेलं हे संकलन होतं.

महात्मा गांधींचं आयुष्य आणि त्यांच्या कार्यावर लिहिलेले लेख या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले होते. यातल्या 70पैकी बहुतांश लेख ही जगभरातल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी लिहिलेले होते.

महात्मा गांधींची युरोपातली स्वीकारार्हता

गांधी जेव्हा जेव्हा लंडनला जायचे तेव्हा इतर युरोपीय देशांमध्ये त्यांना निमंत्रित केलं जाण्याची जणू प्रथाच बनली होती. तिथे मोठ्या उत्साहाने गांधींचं स्वागत केलं जात असे.

गांधी गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले, त्यानंतर भारतात परतण्यापूर्वी पॅरिस, स्वित्झर्लंड आणि इटली सारख्या देशांना त्यांनी भेटी दिल्या.

गांधींच्या परदेश दौऱ्यांबाबत नियमितपणे लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार मीरा कामदार म्हणतात की, "1931 मध्ये महात्मा गांधी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होते.

युनायटेड प्रेसचे पत्रकार वेब मिलर यांनी दांडीयात्रेबद्दल लिहिलेला लेख हजाराहून अधिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता."

 1931च्या ब्रिटन दौऱ्यावर गेलेले महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1931च्या ब्रिटन दौऱ्यावर गेलेले महात्मा गांधी

मीरा कामदार यांनी लिहिलं आहे की, "1931 मध्ये गांधी गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर, रोमन रोलँड यांना भेटण्यासाठी जिनिव्हाला जाण्यापूर्वी ते पॅरिसला गेले. तिथे जमलेल्या मोठ्या जनसमुदायाला गांधींनी संबोधित केलं होतं."

इतिहासकार ए. इरा वेंकटचलपथी यांनी 1930 मध्ये गांधींना जगभर कसे ओळखले जाते याचे उदाहरण दिले आहे.

ए. इरा वेंकटचलपथी म्हणतात की, "गांधींनी मार्च 1930मध्ये जेंव्हा दांडी यात्रा सुरू केली, तेव्हा जगभरातील पत्रकार आणि छायाचित्रकार या यात्रेचं वार्तांकन करण्यासाठी आणि दांडी यात्रेची क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी भारतात आले होते. यावरूनच गांधींच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते."

'गांधी' चित्रपटाआधी गांधींच्या आयुष्यावर एक माहितीपटही बनवण्यात आला होता

रिचर्ड ॲटनबरो यांचा 'गांधी' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तब्बल चाळीस वर्ष आधी, गांधींच्या आयुष्यावर एका माहितीपटाचीही निर्मिती करण्यात आलेली होती. विसाव्या शतकातील प्रमुख तामिळ माहितीपटकार ए.के. चेट्टियार यांनी त्याची निर्मिती केली होती.

हा माहितीपट बनवण्यासाठी 1930 च्या दशकात ए. के. चेट्टीयार यांनी जगभरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून गांधींबद्दलच्या मूळ चित्रपटांचा संग्रह केला.

1940 मध्ये त्यांनी "महात्मा गांधी: इन्सिडेंट्स ऑफ हिज लाईफ" नावाचा दोन तासांचा माहितीपट प्रदर्शित केला. त्यानंतर तेलुगू आणि हिंदीमध्येही तो प्रदर्शित करण्यात आला. अमेरिकेतदेखील हा माहितीपट दाखवण्यात आला होता.

महात्मा गांधी, नेहरू

फोटो स्रोत, Getty Images

ए.के. चेट्टीयार यांनी लिहिलं की त्यांना गांधींच्या आयुष्यावर 'अन्नलिन अतिचुवट्टिल' नावाची एक मालिकाच बनवायची होती. त्यामध्ये जगभरातील प्रमुख विचारवंत आणि नेत्यांच्या मनात गांधींविषयी असणारा आदर आणि सन्मान दाखवला जाणार होता.

1931 मध्ये अमेरिकेतील टाईम मॅगझिनने आपल्या मुखपृष्ठावर गांधींना स्थान दिले आणि त्यांना 'मॅन ऑफ द इअर' (वर्षातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती) म्हणून सन्मानित केलं गेलं. यावरूनच गांधींची अमेरिकेतही दखल घेतली जायची हे स्पष्ट होतं.

कायद्याची पदवी मिळवल्यानंतर गांधी 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले तिथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला. तब्बल 21 वर्षं ते दक्षिण आफ्रिकेत राहिले. गांधींनी दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांच्या विरोधात होणाऱ्या भेदभावाविरुद्ध जोरदार आवाज उठवला. गांधी 1915 मध्ये भारतात परतले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला समर्पित केलं.