कस्तुरबा गांधींच्या 'त्या' डायरीत नेमकं काय लिहिलं आहे?

फोटो स्रोत, KEYSTONE/GETTY IMAGES
- Author, पायल भुयान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आज (11 एप्रिल) कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मागे काही दिवसांपूर्वी इंदुरच्या आश्रमात एक डायरी सापडली होती. चर्चा अशी होती की ही डायरी महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची आहे.
सध्या या डायरीवरून वाद सुरूच आहे. लोकांचं म्हणणं आहे की ही डायरी कस्तुरबांची नाही. पण दुसरीकडे त्यांचे पणतू तुषार गांधी यांना मात्र ही डायरी त्यांच्या पणजी कस्तुरबा यांचीच आहे असं वाटतं.
तुषार गांधी यांनी या डायरीवर आधारित एक पुस्तकही लिहिलंय. या पुस्तकाचं नाव आहे 'द लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर माई बा'.
ही डायरी खरंच कस्तुरबांची आहे का? हे जाणून घेण्यासाठी तसंच डायरीशी संबंधित इतरही काही प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसीने तुषार गांधी यांच्याशी संपर्क साधला.
डायरी मागची गोष्ट
या डायरी मागची गोष्ट सांगताना तुषार गांधी सांगतात, काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी आणि त्यांच्याशी निगडित साहित्याचं जतन करावं म्हणून महाराष्ट्रातील जळगावमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन नावाची संस्था स्थापन करण्यात आली.
गांधीजींशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन गांधीजींशी संबंधित असलेल्या वस्तू गोळा करून आणण्याचे काम या फाउंडेशनचे कर्मचारी करायचे.

फोटो स्रोत, KANU GANDHI
अशाच एका टीमला इंदुरमधल्या कस्तुरबा ट्रस्टमध्ये ही डायरी सापडल्याचं तुषार गांधी सांगतात. ते सांगतात, "त्या ट्रस्टमध्ये फार वर्षांपासून बंद पडलेल्या तिजोऱ्या आणि पेट्या ठेवल्या होत्या. बऱ्याच वर्षांपासून त्यातली पुस्तक आणि इतर गोष्टी धूळ खात पडल्या होत्या. कोणी ते उघडूनही पाहिलं नव्हतं. अशाच एका पेटीत एक डायरी सापडली.
"हाताने लिहिलेली डायरी नेमकी कुणाची हे सुरुवातीला तर समजत नव्हतं. शेवटी गुजराती समजणाऱ्या एका व्यक्तीने डायरी वाचायला सुरू केली. त्या डायरीत ज्या दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टी लिहून ठेवल्या त्यावरून असा अंदाज बांधण्यात आला की ही डायरी कस्तुरबांची असावी."
तुषार गांधी पुढे सांगतात, "या डायरीत लिहिलेल्या गोष्टी कस्तुरबांच्याच आहेत का याची खातरजमा करण्यासाठी अनेक गोष्टींचा धांडोळा घेण्यात आला. जसं की त्यावेळी कस्तुरबा कुठे होत्या, त्याचा आणि या डायरीतल्या पानांचा सहसंबंध लागतो का हे तपासण्यात आलं. आणि ही डायरी बांची आहे हा अंदाज शेवटी खरा ठरला. पण बऱ्याच जणांचा यावर विश्वास नव्हता, कारण कस्तुरबांना लिहिता वाचता येत नव्हतं."
तुषार गांधींचा युक्तिवाद
पण प्रश्न असा उपस्थित होतो की, कस्तुरबा गांधी निरक्षर होत्या मग त्यांनी डायरी लिहिली या निर्णयाप्रत तुषार गांधी कसे आले?
यावर तुषार गांधी सांगतात, "जेव्हा डायरी मिळाली तेव्हा मलाही असंच वाटत होतं की 'बा' तर निरक्षर होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. पण जेव्हा मी ती डायरी वाचली तेव्हा माझा ठाम विश्वास झाला की ही डायरी 'बां'चीचं आहे. या डायरीसंबंधी मी माझ्या वडिलांशी बोललो, तसंच ज्या लोकांनी कस्तुरबांची बायोग्राफी लिहिलीय त्यांच्याशी बोललो. त्या लोकांच्या मते ही डायरी कस्तुरबांची असूच शकत नाही. कारण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं.
"पण त्यांना लिहिता वाचता येत नसलं तरी त्यांनी कालांतराने स्वतःच मुळाक्षरांचा ज्ञान घेतलं असावं. जसं की त्या डायरीमध्ये ज्या प्रकारची भाषा, शब्दावली, व्याकरण आणि वाक्यांची रचना केली आहे ते पाहता असं वाटत होतं की ही डायरी केवळ बोली भाषेचं ज्ञान असलेल्या व्यक्तीने लिहिली असावी. या व्यक्तीला लिखित भाषेचं ज्ञान नसावं."
ते पुढे सांगतात, "या डायरीत बऱ्याच ठिकाणी काठीयावाडी लहेजा वापरण्यात आलाय. काठीयावाडी गुजराती बोलीभाषा आहे. 'बां' च्या तोंडी कायम काठीयावाडी असायची असं त्यांच्याबरोबर राहिलेले इतर लोक सांगतात. जर 'बां'ने सांगितलं असेल आणि कोणी दुसऱ्या व्यक्तीने ते लिहिलं असेल तर लिहिणाऱ्याने आपली कमाल दाखवली असती. त्याने बांनी जे सांगितलंय त्यात दुरुस्ती करून लिहिलं असतं. पण असं झालेलं दिसत नाही. उलट ज्या प्रकारे 'बा' बोलायच्या त्याच प्रकारे ते लिहिण्यात आलंय."

फोटो स्रोत, TOPICAL PRESS AGENCY/GETTY IMAGES
या डायरीत हॉस्पिटलसाठी बरेच शब्द वापरण्यात आलेत. जसं की काही ठिकाणी 'इसपिताल' तर काही ठिकाणी 'हॉसटीपल' तर काही ठिकाणी 'इसपताल' लिहिलंय.
एक शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्यात आलाय. जेलच्या सुप्रीटेंडंटला काही ठिकाणी 'सुप्रीटेन', 'सुपलीनटेन' तर काही ठिकाणी 'सुकटेनली' असं लिहिलं आहे.
"ज्या व्यक्तीला अक्षर ज्ञान नसेल तोच व्यक्ती असं लिहू शकतो. जर बा सांगत असत्या आणि कोणी ते लिहिलं असतं तर ते दुरुस्त करून लिहिलं असतं. मी ती डायरी वाचत गेलो तसा माझा अंदाज विश्वासात बदलायला लागला. आता माझा ठाम विश्वास आहे की ही डायरी बां'नेच लिहिली आहे," तुषार गांधी पुढे सांगतात.
डायरीत नेमकं काय लिहिलंय?
बीबीसीनं तुषार गांधींना विचारलं की, जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा महात्मा गांधींविषयी बरंच काही वाचायला मिळतं. मात्र त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्याशी संबंधित खूपच कमी साहित्य उपलब्ध आहे. 1933च्या आसपास लिहिलेली ही डायरी जर कस्तुरबांनीच लिहिली आहे तर त्यांनी स्वतःविषयी त्यात काय लिहिलंय?
या प्रश्नावर उत्तर देताना तुषार गांधी सांगतात, "या डायरीत कस्तुरबांनी स्वतःबद्दल काही लिहिलेलं नाहीये. ही डायरी तेव्हाची आहे जेव्हा त्या बापूंपासून वेगळ्या राहत होत्या. कस्तुरबा त्यावेळी एका तुरुंगात होत्या तर बापू दुसऱ्या तुरुंगात होते. ते एकमेकांपासून वेगळे राहत होते तेव्हाचा हा तपशील आहे. त्यांच्या राहणीमानावरून आणि दिनचर्येवरून या गोष्टींचा अंदाज लावता येतो."

फोटो स्रोत, FOX PHOTOS/GETTY IMAGES
या डायरीत कस्तुरबा गांधी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल आपले विचार मांडतात का?
या प्रश्नावर तुषार गांधी सांगतात, "कस्तुरबांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल बरंच काही लिहिलंय. त्यांनी काही ठिकाणी त्यावेळच्या राजकारणावरही आपली मतं मांडली आहेत."
'कस्तुरबा बापूंची ताकद होत्या'
महात्मा गांधींच्या जीवनावर कस्तुरबांचा प्रभाव कितपत होता या प्रश्नावर तुषार गांधी सांगतात, "मला वाटतं त्याहीपेक्षा बापूंनी स्वतः हे मान्य केलं होतं. बापू त्यांच्या आयुष्यात ज्या ठिकाणावर पोहोचले आणि त्यांच्यात जे परिवर्तन झालं त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना बांची साथ लाभली होती. जर त्यांच्यासोबत बा नसत्या तर त्यांना या गोष्टी साध्य झाल्या नसत्या."
ते पुढे सांगतात, "बापूंच्या प्रत्येक बदलाबरोबर कस्तुरबांनी स्वतःला बदललं. वेळ पडल्यावर त्यांनी बापूंना आधार दिला, बळ दिलं. बापूंना नेहमीच वाटायचं की, त्यांच्यासोबत त्यांची काळजी घेणारं आणि गरज पडेल तेव्हा त्यांच्यासोबत उभं राहणार कोणीतरी आहे. बापूंच्या शेवटच्या चार वर्षांत कस्तुरबा हयात नव्हत्या.
"त्यावेळेस बापूंना ते असाह्य निराधार झालेत असं वाटायचं. ते त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराला शोधत आहेत हे आम्हाला दिसायचं. त्यामुळे बापूंच्या आयुष्यात कस्तुरबांचं महत्त्व किती होतं हेच दिसून येतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








