कबुतरांचे पंख आणि त्यांची विष्ठा यांचा आपल्या फुप्फुसांवर काय परिणाम होतो?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईतील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार, मध्य मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळील प्रसिद्ध कबुतरखान्यावर 2 ऑगस्टला मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली.

मात्र, मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबुतरखाने बंद करण्याच्या या कारवाईला जैन समाजातील काही नागरिकांकडून आणि पक्षीप्रेमींकडून विरोध दर्शवण्यात येत आहे.

तसंच दक्षिण मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून 3 ऑगस्ट रोजी विरोध प्रदर्शन करण्यात आलं. यात जैनमुनी सुद्धा सहभागी झाले होते.

दरम्यान, कबुतरांना दाणे टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना देखील समोर आली आहे.

कबुतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून वाद पेटल्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक देखील घेतली.

"कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबुतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवला पाहिजे", अशा सूचना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

कबुतरांमुळे किंवा त्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्यानं मुंबईसह राज्यातील अशी कबुतरखान्यांची सर्व ठिकाणं तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती.

तेव्हापासून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच, या प्रश्नासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी अद्याप सुरू आहे.

या निमित्तानं जाणून घेऊयात, कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याला कशी हानी पोहोचते.

कबुतरांच्या विष्ठेतून बुरशी पसरते?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी सापडते.

याबाबत बीबीसीशी बोलताना पुण्याच्या साई अलर्जी-अस्थमा रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. विजय वारद सांगतात, 'कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते.'

यामुळे आजार कसा होतो?

श्वसनविकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील ही बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.

ग्लास्को हॉस्पिटलमध्ये झालेल्या मुलाचा मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करताना तज्ज्ञांना, कबुतरांच्या विष्ठेचे काही कण रूममध्ये आढळून आले. स्कॉटलॅंडचे आरोग्य सचिव जेन फ्रीमन सांगतात, 'हे कण डोळ्यांना दिसू शकत नव्हते.'

डॉक्टर सांगतात, 'अनेकांना याचा त्रास होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो.'

कबुतरांच्या विष्ठेमुळे कोणते आजार होतात?

डॉ. विजय वारद पुढे सांगतात, कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची अ‍ॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, कबुरतांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार वाढल्याचं दिसून आलं आहे. या आजारांचं वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत तर श्वसनमार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात.

कबुरतांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती देताना डॉ. वारद सांगतात, कबुतरांच्या विष्ठेमुळे

  • हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया
  • श्वसननिलिकेला सूज येणं
  • फुफ्फुसांना सूज येणं
  • क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (श्वसनमार्गाचे गंभीर आजार) यांसारखे गंभीर आजार

'श्वसन नलिकेला सूज आल्याने अस्थमाग्रस्त रुग्णांना गंभीर स्वरूपाचा शॉक येण्याची शक्यता असते,' असं ते पुढे म्हणतात.

कबुतरांची विष्ठा किती धोकादायक?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील कण हवेत मिसळतात. ही प्रदूषित हवा श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास किंवा प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

सॅलमोनेला जीवाणूंमुळे डायरिया होण्याची शक्यता असते. हे पक्षांच्या विष्ठेमध्ये असतं.

मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या

मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या काही वर्षांपूर्वी राजकीय मुद्दा बनला होता. राज ठाकरेंच्या मनसेने लोकांच्या आरोग्याला त्रास होत असल्याने दादर कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती.

कबुतरांच्या वाढत्या त्रासामुळे खार परिसरातील रहिवाशांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने खारचा कबुतरखाना बंद केला होता.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने कबुतरांच्या विष्ठमुळे मुंबईत दोन महिलांची फुफ्फुसं निकामी झाल्याची बातमी जानेवारी 2020 मध्ये दिली होती.

ज्यात मुंबईतील छातीविकारतज्ज्ञ डॉ. उन्मिल शहा यांनी, या दोन्ही महिलांना हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया किंवा पर्यावरणामुळे फुफ्फुसं निकामी झाल्याची माहिती दिली होती.

मुंबईतील कबुतरांच्या समस्येमुळे होणाऱ्या आजारांबाबत बोलताना फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. कपिल राठी सांगतात, 'मुंबई हवेत आद्रता जास्त असल्याने आणि कबुतरांची संख्या खूप असल्याने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे लोकांना अस्थमाचा जास्त त्रास होतो.'

कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणं काय? डॉ राठी सांगतात, कफ, सर्दी, श्वास घेण्यास अडथळा ही श्वसनाच्या विकारांची लक्षणं आहे. रुग्ण आल्यानंतर आम्ही त्यांना कबुतरांना अन्न देता का? त्यांच्या विष्ठेशी संपर्क येतो का असे प्रश्न विचारतो. जेणेकरून याबाबतची माहिती मिळू शकते.

कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारा हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया जीवघेणा आहे. याचं कारण, यात फुफ्फुसं निकामी होतात, असं डॉ राठी सांगतात.

कबुतरांचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

मुंबई महानगरपालिकेकडून दादर येथील कबुतरखाना याठिकाणी एक नोटीस बोर्ड लावण्यात आला आहे.

यात म्हटलंय की, 'सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सदर ठिकाणी पशु पक्ष्यांना खाद्य टाकण्यास सक्त मनाई आहे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पक्ष्यांना उघड्यावर दाणे टाकल्याने बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 7.5 अंतर्गत पशु-पक्ष्यांना खाद्य टाकणे हा गुन्हा आहे. वरील प्रत्येक गुन्ह्याकरता 500 रुपये दंड आकारण्यात येईल.'

प्राणीशास्त्राच्या प्राध्यापक असलेल्या आमदार मनिषा कायंदे यांनीही माहिती दिली की, "कबुतरांचे मायक्रो फेदर्स हे डोळ्यांना दिसत नाहीत. ते नाकातून शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे हायपरसेंसीटीव्ह नीमोनीयाटीस होऊ शकतो. कोणालाही आजार होऊ शकतो. आपल्याला कशामुळे श्वसनाचा त्रास होतो हे लोकांना कळतच नाही."

दरम्यान, याबाबत नानावटी रुग्णालयातील छातीरोग तज्ज्ञ (चेस्ट स्पेशलिस्ट) डॉ. सलील बेंद्रे यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली.

यावेळी त्यांनी सांगितलं की, "कबुतरांची विष्ठा किंवा पीसं (फेदर डस्ट) ते श्वासाद्वारे फुफ्फुसात गेल्यानंतर बरेच दिवस हे सुरू राहिलं तर फुफ्फुसात फायब्रॉसिसची प्रक्रिया सुरू होते. फुफ्फुसाचे काही भाग असतात त्यात त्याची लवचिकता कमी होते. यामुळे रुग्णाला सुका खोकला येणं, चालल्यावर धाप लागणं, जीने चढल्यावर दम लागणं ही लक्षणं दिसतात.

"लंग फॉयब्रॉसिस हा कबुतरांमुळे होणारं कारण कॉमन आहे. यामुळे यापासून दूर राहणं किंवा टाळणं हाच उपाय आहे. कारण एकदा फायब्रॉसिस प्रक्रिया सुरू झाली की आपण मागे नाही जाऊ शकत. हळूहळू तो वाढत जातो," असं डॉ. बेंद्रे म्हणतात.

तसंच उच्च न्यायालयाच्या 30 जुलै रोजीच्या ऑर्डरमध्येही वैद्यकीयदृष्ट्या उल्लेख करण्यात आला आहे. यात पूर्वीच्या एका वैद्यकीय अहवालाचा संदर्भ देण्यात आलेला आहे.

यात म्हटलंय की, 'कोर्टाने 21 जून 2018 रोजी दिलेल्या निकालामध्ये वैद्यकीय अहवाल स्वीकारला होता, ज्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की मुंबईतील खुले कबुतर खाद्य टाकण्याचे ठिकाणे काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.'

तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कबुतरांशी आणि त्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्याने लहान मुलांच्या तसेच प्रौढांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

'हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस' ही अवस्था तीव्र श्वासोच्छ्वासाच्या त्रासास कारणीभूत ठरते आणि कबुतरांपासून दूर राहिल्यास लक्षणांमध्ये सुधारणा होऊन फुफ्फुसे पूर्ववत होऊ शकतात.'

'तसंच, ही वैद्यकीय स्थिती लोकांना उशिरा लक्षात येते – जेव्हा आजार गंभीर झालेला असतो आणि फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिस सुरू झालेला असतो. जगात सध्या फायब्रॉसिससाठी कोणतीही औषधोपचारपद्धती उपलब्ध नाही जी हा आजार बरा करू शकेल किंवा मागे जाऊ शकेल.

हा आजार जसजसा वाढतो, तसतसे बऱ्याच रुग्णांना घरी ऑक्सिजनची गरज भासते, आणि शेवटी हे रुग्ण व्हेंटिलेटरवर तडफडत मृत्यूमुखी पडतात किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी वाट पाहत राहतात, जे मुंबईत अद्याप उपलब्ध नाही, अत्यंत महाग असून अनेक गुंतागुंतींचे व कमी यशाचे प्रमाण असलेले आहे.'

यासंदर्भात 7 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)