कबुतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय? कबुतरांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईतील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी दिले होते. तसंच मुंबई उच्च न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. परंतु यांसंदर्भात आता पक्षीप्रेमींनी रस्त्यावर उतरून आक्षेप घेतला आहे.

मध्य मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळील प्रसिद्ध कबुतरखान्यावर 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. संपूर्ण कबुतरखाना पालिका प्रशासनाकडून ताडपत्रीने झाकण्यात आला. मात्र, याला काही स्थानिकांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे.

कबुतरांमुळे किंवा त्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असून मुंबईसह राज्यातील अशी कबुतरखान्यांची सर्व ठिकाणं तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती.

कबुतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय?

मुंबईत एकूण 51 कबुतरखाने आहेत. कबुतरखाने तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जातील असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिलं होतं. यानंतर कारवाई सुद्धा सुरू झाली.

तसंच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना बंद केला. यासाठी संपूर्ण कबुतरखान्याला ताडपत्रीने झाकण्यात आलं. यावेळी स्थानिकांनी आक्षेप घेतल्याची दृश्य देखील समोर आली. तसंच दक्षिण मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून 3 ऑगस्ट रोजी विरोध प्रदर्शन करण्यात आलं. यात जैनमुनी सुद्धा सहभागी झाले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, "आतापर्यंत पूर्ण समाज झोपलेला आहे. मुंबई महानगरपालिकेचा निर्णय चुकीचा आहे. हा आमच्या धर्माच्या विरोधात आहे. सात तारखेला मुंबई उच्च न्यायालयातून काय येतो ते पाहणार. आज आम्ही कबुतरांसाठी परमात्माकडे प्रार्थना करत आहोत.

"सात तारखेपर्यंत कोणताही निर्णय आला नाही तर 10 तारखेच्या आत आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार. जैन धर्माच्या सिद्धांतानुसार लाखो कबुतर प्राण सोडत आहेत. त्यांना दाना, पाणी नाही. बीएमसीचा आम्ही विरोध करत आहोत," असं जैन मुनींनी म्हटले.

तर दादर कबुतरखान्याजवळील स्थानिकाने म्हटलं की, महानगर पालिका अधिकाऱ्यांचा कबुतरांना खाऊ घालण्याला विरोध आहे. पण त्यांना जगण्याचा अधिकार नाहीये का?

"उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. पण कबुतरांना जेवण मिळत नाहीये म्हणून ते रस्त्यावर येत आहेत आणि गाडी खाली येत आहेत. याचाही विचार करायला नको का? कबुतरखाने का बंद व्हावेत? वैद्यकीय रिपोर्ट 7 तारखेला येणार आहेत. मग तोपर्यंत थांबायला हवं होतं. आम्ही न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जात नाही. पण सत्यस्थिती न्यायालयात मांडायला हवी. तुमच्या मुलांना घरात आठ दिवस जेवायला मिळणार नाही तर काय होणार? कबुतर मरत आहेत आमच्यासोर," असं स्थानिकाने म्हटले.

"दारू, सिगारेट, गुटखा खाऊन मरतात हे बंद करा. फेरीवाल्यांना बसू द्यायचं नाही हा सुद्धा कोर्टाचा निर्णय आहे मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही. रस्त्यावर नियमानुसार सिगारेट पिता येत नाही, दारू पिता येत नाही पण अनेक जण हा नियम मोडताना दिसतात मग यावर कारवाई का होत नाही?" असं त्या व्यक्तीने म्हटले.

उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?

मुंबई उच्च न्यायालयात कबुतरखान्यांवरील कारवाई आणि त्यांचं खाद्य बंद करू नये याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. 30 जुलै रोजी यावर सुनावणी पार पडली. तर 7 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

कबुतरांचा आरोग्यावर परिणाम होतो असा कुठलाही पुरावा किंवा ठोस डेटा सरकारने उपलब्ध केला नसल्याचा दावा याचिकाकर्त्या स्नेहा विसारिया यांनी केला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "कबुतरांमुळे आरोग्यवर परिणाम होतो असं सांगतायत पण त्याचा कुठलाही पुरावा सरकारकडे नाहीये. आम्ही आतापर्यंत 20 आरटीआय दाखल केल्या पण याबबात माहिती मिळू शकलेली नाही."

"कबुतरखान्यांच्या ठिकाणी बोर्ड लिहिले आहेत की 60-65 टक्के हायपरसेंसीटीव्हिटी न्यूमोनायटीस यामुळे होतो पण असा कुठलाही पुरावा नाही किंवा स्टडी प्रेझेंट केलेला नाही. अशा केसेसेमध्ये कबुतर एक कारण असलं तरी प्रदूषण, स्मोकींग ही मुख्य कारणे आहेत. कारण असं असतं तर आतापर्यंत अनेकांना एचपी हा आजाराने त्रस्त असते," असं विसारिया यांनी सांगितले.

कारवाई सुरू केल्यानंतर सुमारे 50 हजार कबुतरांचा मृत्यू झाल्याची माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच मुंबईतील दादर, माटुंगा, असे अनेक कबुतरखाने हे 100 वर्षांपूर्वीचे असून ते हेरिटेज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

30 जुलै रोजी पार पडलेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की, महानगरपालिकेने शहरातील विविध कबुतरखान्यांमध्ये कबुतरांची गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावी आणि त्यांना योग्य वाटेल अशी कडक उपाययोजना अंमलात आणावी.

जेथे गरज भासेल तेथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच ज्या ठिकाणी अजूनही कबुतरांना अन्न टाकले जात आहे अशा सर्व ठिकाणी बीट मार्शल/महानगरपालिकेचे अधिकारी नियुक्त करावेत.

बीट मार्शल/अधिकाऱ्यांनी परिसरात राहणारे लोक त्यांच्या घरातून किंवा मालमत्तेतून धान्य किंवा पक्ष्यांचे खाद्य फेकत नाहीत, याचीही खात्री करावी.

कबुतरांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सर्व कबुतरखान्यांना योग्य त्या साहित्याने झाकले जावे.

तसेच, महानगरपालिका यंत्रणेला निर्देश दिला जातो की, कबुतरखान्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जावी, जेणेकरून सामान्य जनतेस कोणताही त्रास होणार नाही.

कबुतरांचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

मुंबई महानगरपालिकेकडून दादर येथील कबुतरखाना याठिकाणी एक नोटीस बोर्ड लावण्यात आला आहे. यात म्हटलंय की, 'सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सदर ठिकाणी पशु पक्ष्यांना खाद्य टाकण्यास सक्त मनाई आहे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पक्ष्यांना उघड्यावर दाणे टाकल्याने बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 7.5 अंतर्गत पशु-पक्ष्यांना खाद्य टाकणे हा गुन्हा आहे. वरील प्रत्येक गुन्ह्याकरता 500 रुपये दंड आकारण्यात येईल.'

प्राणीशास्त्राच्या प्राध्यापक असलेल्या आमदार मनिषा कायंदे यांनीही माहिती दिली की, "कबुतरांचे मायक्रो फेदर्स हे डोळ्यांना दिसत नाहीत. ते नाकातून शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे हायपरसेंसीटीव्ह नीमोनीयाटीस होऊ शकतो. कोणालाही आजार होऊ शकतो. आपल्याला कशामुळे श्वसनाचा त्रास होतो हे लोकांना कळतच नाही."

दरम्यान, याबाबत नानावटी रुग्णालयातील छातीतज्ज्ञ (चेस्ट स्पेशलिस्ट) डॉ. सलील बेंद्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "कबुतरांची विष्ठा किंवा पीसं (फेदर डस्ट) ते श्वासाद्वारे फुफ्फुसात गेल्यानंतर बरेच दिवस हे सुरू राहिलं तर फुफ्फुसात फायब्रॉसिसची प्रक्रिया सुरू होते. फुफ्फुसाचे काही भाग असतात त्यात त्याची लवचिकता कमी होते. यामुळे रुग्णाला सुका खोकला येणं, चालल्यावर धाप लागणं, जीने चढल्यावर दम लागणं ही लक्षणं दिसतात.

"लंग फॉयब्रॉसिस हा कबुतरांमुळे होणारं कारण कॉमन आहे. यामुळे यापासून दूर राहणं किंवा टाळणं हाच उपाय आहे. कारण एकदा फायब्रॉसिस प्रक्रिया सुरू झाली की आपण मागे नाही जाऊ शकत. हळूहळू तो वाढत जातो," असं डॉ. बेंद्रे म्हणतात.

याला वयाचंही बंधन नाही असंही डॉ. बेंद्रे सांगतात. ते म्हणाले, "केवळ वृद्धांनाच होतो असं नाही. तर कबुतरांच्या फिदर ड्रॉपिंग किंवा विष्ठा याचं एक्सपोजर असेल तर तरुणांनाही हा आजार होऊ शकतो. फायब्रॉसिसची इंडियन रजिस्ट्री आहे यात असं दिसतं की हायपरसेंसीटीव्हिटी न्यूमोनायटीस हा फायब्रॉसिसचा प्रकार कबुतरांमुळे झालेला सगळ्यात कॉमन आहे. म्हणून याबाबत जनजागृती महत्त्वाची आहे."

कबुतरांना खाद्य देणं टाळायला हवं. निवासी परिसरात याचं एक्सपोजर नसेल तरच हा आजार नियंत्रणात राहील, असंही त्यांनी सांगितलं.

या आजाराची लक्षणे सांगताना ते म्हणाले, सुरुवाताली सुका खोकला यायला सुरुवात होते. मग चालताना दम लागणे किंवा धाप लागणे ही लक्षणं दिसतात.

यातही दोन प्रकार असतात असं डॉ. बेंद्रे सांगतात. "एक अक्यूट हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटीस असं म्हटलं जातं. काही प्रकार क्रॉनिक असतात. म्हणजे जर दीर्घ काळापासून एक्सपोजर असेल तर आजार सुरू होतो. पण असं नाही की बरेच महिने, बरेच वर्ष कबुतरांशी संपर्क आला तरच आजार होऊ शकतो."

"कबुतरांच्या पखांमुळे किंवा त्यातल्या धुळीमुळे अलर्जी सुद्धा होऊ शकते. हवा प्रदूषण, कुत्रा, मांजर तसंच कबुतरांच्या पखांमधील धुळीनेही होऊ शकते. यामुळे अस्थमाची लक्षणे सुरू होऊ शकतात. सर्दी, शिंका आणि खोकला ही लक्षणे दिसू शकतात.

"एखादी व्यक्ती कबुतरांना खाद्य देत नसेल पण त्याभागत राहत असेल अशाही लोकांना आजार होऊ शकतो. हवेमध्ये त्याचे घटक, कण या भागात अधिक असणार. धुळीचे कण या परिसरात अधिक पसरलेले असणार यामुळे अशा भागातील लोकांनाही आजार होऊ शकतो," असंही ते म्हणाले.

तसंच उच्च न्यायालयाच्या 30 जुलै रोजीच्या ऑर्डरमध्येही वैद्यकीयदृष्ट्या उल्लेख करण्यात आला आहे. यात पूर्वीच्या एका वैद्यकीय अहवालाचा संदर्भ देण्यात आलेला आहे.

यात म्हटलंय की, 'कोर्टाने 21 जून 2018 रोजी दिलेल्या निकालामध्ये वैद्यकीय अहवाल स्वीकारला होता, ज्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की मुंबईतील खुले कबुतर खाद्य टाकण्याचे ठिकाणे काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.'

तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की कबुतरांशी आणि त्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्याने लहान मुलांच्या तसेच प्रौढांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 'हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस' ही अवस्था तीव्र श्वासोच्छ्वासाच्या त्रासास कारणीभूत ठरते आणि कबुतरांपासून दूर राहिल्यास लक्षणांमध्ये सुधारणा होऊन फुफ्फुसे पूर्ववत होऊ शकतात.'

'तसंच, ही वैद्यकीय स्थिती लोकांना उशिरा लक्षात येते – जेव्हा आजार गंभीर झालेला असतो आणि फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिस सुरू झालेला असतो. जगात सध्या फायब्रॉसिससाठी कोणतीही औषधोपचारपद्धती उपलब्ध नाही जी हा आजार बरा करू शकेल किंवा मागे जाऊ शकेल.

हा आजार जसजसा वाढतो, तसतसे बऱ्याच रुग्णांना घरी ऑक्सिजनची गरज भासते, आणि शेवटी हे रुग्ण व्हेंटिलेटरवर तडफडत मृत्यूमुखी पडतात किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी वाट पाहत राहतात – जे मुंबईत अद्याप उपलब्ध नाही, अत्यंत महाग असून अनेक गुंतागुंतींचे व कमी यशाचे प्रमाण असलेले आहे.'

यासंदर्भात अद्याप सुनावणी सुरू असून 7 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

कबुतरखाने बंद करण्याची मागणी का केली जात आहे?

पावसाळी अधिवेशनादरम्यान जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानपरिषदेत शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबईतील कबुतर खाने आणि कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडला.

त्या म्हणाल्या, "लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर प्रश्न अनेक शहरांमध्ये तयार होत आहे. अनधिकृत कबुतरखाने ठिकठिकाणी वाढत चालले आहेत. काही ठिकाणी काढले आहेत. पण काही लोकांना असं वाटतं की कबुतरांना दाने घातले पाहिजे. तर कुठेही एखाद्या फुटपाथवर देखील काही लोक येतात कबुतारखाना चालू करतात.

"दादर येथील कबूतरखाना वाहतूक बेट हे पुरातन यादी जतन श्रेणी 2 मध्ये येत असला तरी तिकडे कबूतर खाना तयार झाला आहे अनेक वर्षांपासून तिकडच्या स्थानिक लोकांना श्वसनाचा त्रास होतोय," असं कायंदे म्हणाल्या.

यावेळी मनिषा कायंदे यांनी 'इंडियन जर्नल ऑफ अलर्जी अस्थमा आणि इम्यूनॉलॉजी' याचा दाखला देत अनेक रिसर्च पेपर्स असल्याचा संदर्भ देत सांगितलं की, "कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांची जी पीसं आहेत त्यामुळे त्रास होऊ शकतो. कबुतरांना मायक्रो फेदर्स म्हणजेत अतिसूक्ष्म पीसं असतात. जी केवळ मायक्रोस्कोप खाली दिसतात. ती तुमच्या श्वसननलिकेत जातात आणि त्यातील प्रथिनांपासून अ‍ॅलर्जी होते."

तसंच यावेळी मनिषा कायंदे आणि आमदार चित्रा वाघ यांनी कबुतर खाने बंद करण्याची देखील मागणी केली.

यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी, "कबुतरखाने तत्काळ बंद करण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेने कारवाई करावी असे निर्देश दिले जातील," असं म्हटलं.

तसंच ते म्हणाले, "दादरचा कबुतरखाना देखील दोन वर्ष बंद केला होता. त्याच्या समोरची इमारत होती त्यांच्या ट्रस्टींची कमिटी नेमली होती. दाणे टाकायला येणाऱ्यांमध्ये जनजागृती करायचं ठरलं होतं. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे त्रास होतात."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.