ख्रिसमससाठी जेव्हा पहिलं महायुद्ध काही काळ थांबलं, उत्स्फूर्त शस्त्रसंधीची विलक्षण गोष्ट

फोटो स्रोत, Alamy
- Author, मायलेस बर्क
पहिलं महायुद्ध सुरू होतं. 1914 मधील हिवाळ्यातली कडाक्याची थंडी. चिखल, रक्त आणि युद्धाच्या रणधुमाळीत पश्चिम आघाडीवर मात्र उत्स्फूर्त शस्त्रसंधींची एक विलक्षण घटना घडली.
नाताळच्या त्या अद्भूत क्षणांमध्ये शस्त्रं खाली ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या काही सैनिकांशी बीबीसीनं 1960 च्या दशकात संवाद साधला होता.
रायफलमन ग्रॅहम विलियम्स 5 व्या लंडन रायफल ब्रिगेडमध्ये होते. 1914 त्या नाताळच्या पूर्वसंध्येला त्यांच्यावर पहारा देण्याची जबाबदारी होती.
पहारा देत उभे असताना ते नो मॅन्स लँड (सीमेवरचा कोणताही सैनिक किंवा व्यक्ती नसणारा भूभाग, जिथे कोणाचंच नियंत्रण नसतं) वरून जर्मन सैन्याच्या खंदकाकडे चिंताग्रस्त होऊन पाहत होते.
पहिल्या महायुद्धाचं वैशिष्ट्यं ठरलेल्या क्रूर हिंसाचार, रक्तपात आणि विनाशाचं भयंकर स्वरुप त्यांनी काही महिन्यांपासून अनुभवलं होतं.
मात्र त्याचवेळी काहीतरी अद्भूत, विलक्षण अशी गोष्ट घडली.
'सैनिक अचानक गाऊ लागले'
बीबीसी रेडिओच्या विटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात, त्यावेळी घडलेला प्रसंग आठवून सांगताना, ग्रॅहम विलियम्स म्हणाले, "अचानक, जर्मन सैन्याच्या खंदकामधून दिवे दिसू लागले. मला वाटलं, ही काहीतरी मजेशीर गोष्ट आहे. मग जर्मन सैनिकांनी 'स्टिल नाख्त, हीलिगे नाख्त' हे गाणं गाण्यास सुरुवात केली."
"माझ्यासह इतर पहारेकरीही सतर्क झाले. इतरांनाही सावध करून ते पाहण्यासाठी बोलावलं. तिथे नेमकं काय चाललं आहे? हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते."
नो मॅन्स लँडमध्ये एकटेपणातून आलेल्या अत्यंत दु:खद, निराशाजनक वातावरणात आवाजांचे प्रतिध्वनी घुमत होते.
परिचयातील गाणी दोन्ही बाजूतील भाषेचा अडथळा दूर करत होती. दोन्ही बाजूला असलेल्या माणुसकीची संगीताद्वारे आठवण करून दिली जात होती.

फोटो स्रोत, Getty Images
ग्रॅहम म्हणाले, "त्यांनी त्यांचं नाताळाचं गाणं पूर्ण केलं आणि आम्ही त्यांना दाद दिली, टाळ्या वाजवल्या. मग आम्हाला वाटलं की, आम्हीदेखील अशाप्रकारे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणून मग आम्ही 'द फर्स्ट नोएल' हे गीत गायलो."
1914 च्या नाताळमधील त्या शस्त्रसंधीचं मूळ नेमकं कशात होतं, हे शोधणं कठीण आहे. पश्चिम आघाडीवर अनेक ठिकाणी ते उत्स्फूर्तपणे झालं होतं. त्या नाताळमध्ये संपूर्ण युद्ध आघाडीवर एकसमान शस्त्रसंधी झाली नव्हती. तर ती वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक स्वरुपात घडली होती.
खंदकांमध्ये असणाऱ्या काही सैनिकांसाठी ही शस्त्रसंधी काही तास चालली होती. तर काही ठिकाणी ती बॉक्सिंग डे (नाताळनंतरचा दिवस) पर्यंत सुरू होती. तर काही दुर्गम ठिकाणी तर ती अगदी नववर्षापर्यंत राहिली होती.
धुकं कमी झालं आणि माणुसकी पुढे आली
पश्चिम आघाडीवरील काही भागांमध्ये ही शस्त्रसंधी अजिबात झाली नव्हती. 1914 मधील नाताळच्या दिवशी झालेल्या लढाईत जवळपास 77 ब्रिटिश सैनिक मारले गेले होते.
कर्नल स्कॉट शेफर्ड, हे तेव्हा कनिष्ठ अधिकारी होते. ते फ्रान्सच्या उत्तर भागातील अर्मेंटियर्स शहराजवळ लढत होते. त्यांच्यासाठी तर ही शस्त्रसंधी जवळपास अपघातानंच सुरू झाली होती. नाताळच्या दिवशी पहाटे, नो मॅन्स लँडवर धुकं पसरलं होतं.
1968 मध्ये बीबीसीबरोबर कर्नल शेफर्ड युद्धभूमीवर परतले. त्यावेळी धुक्याचं वर्णन करताना ते म्हणाले, "धुकं इतकं दाट होतं की, अगदी समोर आणलेला स्वतःचा हातही दिसत नव्हता."

फोटो स्रोत, Getty Images
प्रचंड धुक्यामुळे जो आडोसा मिळाला होता, त्याचा फायदा घेऊन त्यांनी खंदकांची दुरुस्ती करण्याचं ठरवलं. मात्र सैनिक वाळूच्या गोण्या भरत असताना आणि त्यांच्या खंदकाची तटबंदी दुरुस्त करत असताना अचानक धुकं कमी होऊ लागलं.
जनरल वॉल्टर काँग्रिव्ह यांच्याकडं त्यावेळेस रायफल ब्रिगेडचं नेतृत्व होतं. नाताळच्या दिवशी जे घडलं, त्याबद्दल त्यांनी त्यांच्या पत्नीला लिहिलं होतं.
त्यांनी लिहिलं होतं, "आश्चर्यकारकरित्या ते फार वेगानं नाहीसं झालं. त्यावेळेस आम्हाला अचानक दिसलं की, जर्मन सैनिक उघडपणे आमच्याप्रमाणेच खंदकांची दुरुस्ती करत होते. काही वेळ आम्ही फक्त एकमेकांकडे पाहिलं."
"मग आमचे एक-दोन सैनिक त्यांच्याकडं गेले. त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं, सिगारेटची देवाणघेवाण देखील केली. ते गप्पा मारू लागले. त्या क्षणांसाठी महायुद्ध जणूकाही थांबलं होतं."
'सैनिक म्हणाले, एका दिवसाची शस्त्रसंधी हवी'
जनरल वॉल्टर यांनी त्या शस्त्रसंधीचं वर्णन 'एक असामान्य परिस्थिती' असं केलं होतं. कारण दोन्ही सैन्याचे खंदक इतके जवळ होते की सैनिक एकमेकांना ओरडून शुभेच्छा देऊ शकत होते. ते एकमेकांशी बोलू शकत होते.
जनरल वॉल्टर यांनी लिहिलं आहे, "एक जर्मन सैनिक ओरडून म्हणाला की त्यांना एक दिवसाची शस्त्रसंधी हवी आहे आणि तो जर खंदकाबाहेर आला, तर आमच्याकडून कोणी बाहेर येईल का?"
ते पुढे वर्णन करतात, "आमच्यापैकी एका सैनिक अतिशय सावधपणे खंदकाच्या तटबंदीच्या वर आला आणि त्यानं पाहिलं की एक जर्मन सैनिकदेखील तसंच करतो आहे. मग ते दोघेही बाहेर आले."
"त्यानंतर आणखी सैनिक खंदकाबाहेर पडले. त्या संपूर्ण दिवसभर ते एकमेकांबरोबर चालत होते, एकमेकांना सिगार देत होते आणि गाणी गात होते."
या शस्त्रसंधीमुळे सैनिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. त्यामुळे त्यांना 'नो मॅन्स लँड'मधून त्यांच्या तुकडीतील मृत सैनिकांचे मृतदेह परत आणून त्यांच्या शहीद झालेल्या सहकाऱ्यांना योग्यप्रकारे दफन करता आलं होतं.
फुटबॉलचा सामना
जी माणसं फक्त काही तास आधीच एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होती, एकमेकांशी जीव तोडून लढत होती, ते आता सिगारेटची देवाणघेवाण करत होते.
एकमेकांना खायला आणि घरून आणलेल्या वस्तू देत होते. त्या दिवशी दोन्ही बाजूच्या खंदकांमधील मोकळ्या जागेत सैनिक उत्स्फूर्तपणे फुटबॉल खेळल्याचीही माहिती आहे.
कर्नल जोहान्स नीमन त्यावेळेस 33 व्या सॅक्सन रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट होते. खेळात सहभागी झालेल्या सैनिकांमध्ये तेदेखील होते.
"अचानक एक ब्रिटिश सैनिक फुटबॉल घेऊन आला आणि मग फुटबॉलचा सामना सुरू झाला. आमच्या टोप्यांचा वापर करून आम्ही आमच्या गोलची जागा निश्चित केली. ब्रिटिश सैनिकानंही तसंच केलं. मग आम्ही भरपूर फुटबॉल खेळलो. शेवटी फुटबॉलचा तो सामना जर्मन 3-2 नं जिंकले."
पुन्हा युद्ध सुरू
पहिल्या महायुद्धाच्या रणधुमाळीत पुन्हा अशाप्रकारची शस्त्रसंधी घडली नाही. या शस्त्रसंधीमुळे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना वेगळीच चिंता वाटत होती.
उत्स्फूर्तपणे झालेल्या या शस्त्रसंधींमुळे आणि त्या काळात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या सौहार्दामुळे लष्करी अधिकारी आश्चर्यचकित झाले होते. त्यांना भीती वाटत होती की यामुळे त्यांच्या सैनिकांची लढण्याची इच्छाशक्ती कमी होईल आणि त्याचा परिणाम युद्धावर होईल.
मग दोन्ही बाजूंनी आदेश जारी झाले. त्यात 'शस्त्रूशी सलोखा निर्माण करणं' थांबवण्याचे हुकुम देण्यात आले होते. सैनिकांनी हुकुमाचं पालन न झाल्यास कोर्ट मार्शल करण्याचीही धमकी देण्यात आली होती.
अधिकाऱ्यांना खंदकाजवळ येणाऱ्या शत्रू सैनिकांवर गोळीबार करण्यास सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, HENRY GUTTMANN / STRINGER
परिणामी संपूर्ण युद्ध आघाडीवर हळूहळू पुन्हा गोळीबार सुरू झाला. युद्धातील क्रौर्य पुन्हा घडू लागलं, युद्धाची भीषणता जसजशी वाढत गेली. तसतशी विरोधी देशांमधील कटुता आणखीच वाढत गेली.
पुढच्या वर्षीच्या नाताळमध्ये असं चित्र दिसलं नाही. कारण त्यावेळेस पुन्हा उत्स्फूर्तपणे शस्त्रसंधी होऊ नये म्हणून नाताळच्या गीताचा येणारा कोणताही आवाज दडपून टाकण्यासाठी त्याच वेळेस हेतूपुरस्सरपणे मशीनगनचा मारा करण्यात आला.
'मानवतेचं दर्शन घडवणारा क्षण'
1914 च्या नाताळातील त्या उत्स्फूर्त शस्त्रसंधीमुळे पहिल्या महायुद्धाची दिशा बदलली नव्हती. मात्र बीबीसीच्या व्हाईसेस ऑफ द फर्स्ट वर्ल्ड वॉर या पॉडकास्टमध्ये इतिहासकार डॅन स्नो म्हणाले, त्याप्रमाणे, हे असं प्रत्यक्षात घडलं, हेच चमत्कारिक आहे.
ते म्हणाले होते, "नोकरशाही, यंत्रं आणि विनाशकारी स्फोटकांच्या या भीषण युद्धात, ही शस्त्रसंधी म्हणजे मानवतेचं दर्शन घडवणारा एक छोटासा मात्र प्रचंड परिणामकारक क्षण होता."
कर्नल स्कॉट शेफर्डसारख्या त्या क्षणाचा अनुभव घेणाऱ्या सैनिकांवर त्याचा खोलवर परिणाम झाला. एका क्षणासाठी, दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांकडे वडील, भाऊ आणि मुलगा म्हणून पाहिलं होतं.
हे सैनिक कोणताही चेहरा नसलेले शत्रू होऊन मारण्याऐवजी किंवा मारले जाण्याऐवजी, घरी परतण्यासाठी आणि त्यांच्या प्रियजनांना भेटण्यासाठी आतूर होते.
"त्यातील अनेकजण इंग्रजी बोलत होते. किंबहुना त्यांनी या संपूर्ण युद्धाबद्दल त्यांची नापसंती व्यक्ती केली होती. ते अजिबात आक्रमक नव्हते.
त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले की ते लंडनला, इंग्लंडला गेले होते. खरंतर आम्हाला भेटून आनंद झाल्याचंच त्यांनी दर्शवलं," असं ते म्हणाले.
(बीबीसीच्या 'इन हिस्ट्री' मालिकेतून हा लेख घेतला आहे. अर्थपूर्ण वाटणाऱ्या ऐतिहासिक घटनांचा शोध बीबीसीच्या या मालिकेत घेतला जातो.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











