वाय-फाय रात्रभर चालू ठेवल्यास मेंदूवर काय परिणाम होतो? मोबाईल उशाशी घेऊन झोपणं घातक?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"झोपायला जा बाळा, रात्री 12 वाजले आहेत, किती वेळ मोबाईल बघत बसणार आहेस?"
"झालं आई, एक सिनेमा पाहून संपवत आहे, दिवसा वाय-फाय मिळत नाही ना!"
"या वाय-फायचं काहीतरी केलं पाहिजे!"
नोएडामध्ये राहणाऱ्या सरिता आणि आठवीत शिकणारा त्यांचा मुलगा अक्षर यांच्यातील हे संभाषण नेहमीचं झालं आहे. आठवड्यातील तीन ते चार रात्री हे होत असतं.
काही लोकांच्या मते वाय-फायचा अर्थ 'वायरलेस फिडेलिटी' असा होतो, जसे की हाय-फाय म्हणजे 'हाय फिडेलिटी' असा होतो. परंतु उद्योग संस्था वाय-फाय अलायन्सच्या मते, वाय-फायला पूर्ण नावच नाही.
सोप्या भाषेत सांगायचं तर, वाय-फाय हे असं तंत्रज्ञान आहे जे वायर आणि कनेक्टरच्या जाळ्यात न अडकता आपल्याला इंटरनेटशी जोडतं. याद्वारे आपण इंटरनेटवरून माहिती मिळवू शकतो आणि एकमेकांशी संवाद साधू शकतो.
वाय-फाय चालू ठेवल्यानं आरोग्यावर काही परिणाम होतो का?
वाय-फाय संगणक आणि स्मार्टफोन सारख्या उपकरणांना केबलशिवाय नेटवर्कशी जोडतं. हे वायरलेस राउटरचा वापर करून वायरलेस लोकल एरिया नेटवर्क (डब्ल्यूएलएएन) तयार करतं.
मोबाईल फोनच्या व्यसनाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आता वायफाय हे एक नवीन व्यसन म्हणून उदयास येत आहे. पण त्याचा एक पैलू असाही आहे, ज्याची चर्चा आधी कमी होत असे, मात्र आता त्याला गती मिळाली आहे.
जर कोणी मनोरंजन किंवा कामासाठी मोबाइल फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा रात्री उशिरापर्यंत वापर करत असेल तर रात्रीही वाय-फाय राउटर चालू असण्याची शक्यता वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
तर वाय-फाय चालू ठेवल्यानं आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो की ते बंद केल्यानं आरोग्यासाठी काही फायदे होऊ शकतात?
हा प्रश्नाची आणखी चर्चा वाढवण्यासाठी, रात्री वाय-फाय चालू केल्यानं मानवी शरीराच्या किंवा मेंदूच्या न्यूरोलॉजिकल पैलूंना कोणत्या प्रकारची हानी पोहोचू शकते का?
दिल्ली-एनसीआरमधील यशोदा मेडिसिटी हॉस्पिटल मधील कन्सल्टंट (मिनिमली इन्व्हेसिव्ह न्यूरोसर्जरी) डॉ. दिव्य ज्योती यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की, ते याबद्दल थेट काही सांगू शकत नाहीत, कारण अद्याप असं काहीही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही.

डॉक्टर पुढे म्हणाले की, तार्किकदृष्ट्या याचा विचार केला जाऊ शकतो कारण मेंदूचे आवेग विद्युत आवेग असतात आणि वाय-फाय किंवा इतर उपकरणं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (ईएमएफ) वर अवलंबून असतात.
"त्यामुळे हे शक्य आहे की ते मेंदूच्या आवेगांमध्ये हस्तक्षेप करू शकतात, परंतु आतापर्यंत आपल्याकडं असं मानण्यासाठी कोणतंही वैज्ञानिक कारण, स्पष्टीकरण किंवा निष्कर्ष नाही. परंतु तर्कशास्त्र असं सांगतं की आपण हे शक्य तितकं टाळलं पाहिजे."
मेंदूचे हे आवेग काय आहेत?
मेंदूचे आवेग हे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल आहेत, ज्यांच्या मदतीनं न्यूरॉन्समध्ये संवाद साधतात आणि माहितीवर प्रक्रिया करतात. या चेतापेशींच्या आवेगांना अॅक्शन पोटँशिअल असंही म्हणतात.
या आवेगांना मेंदूपर्यंत नेणारे मज्जातंतू म्हणजे संवेदी मज्जातंतू. हे मेंदूपर्यंत संदेश पोहोचवतात, त्यामुळेच आपण स्पर्श, चव, गंध यांचा अनुभव घेऊ शकतो तसेच पाहू सुद्धा शकतो.
वाय-फाय राउटरचा रात्र आणि दिवसा होणारा प्रभाव
वाय-फाय राउटर रात्री टाळलं पाहिजेत, पण दिवसा नाही?
यावर डॉ. दिव्य ज्योती यांनी बीबीसीला सांगितलं की, "दिवसा आणि रात्रीच्या वेळी शरीर आणि त्याच्या क्रियाकलापांमध्ये फरक असतो. रात्रीच्या वेळी शरीराच्या लहरी वेगळ्या असतात, त्या झोपेच्या लहरी असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री चांगली झोप घेणं आणि हे सर्वस्वी झोपेच्या चक्रावर अवलंबून असतं."
ते म्हणाले, "म्हणूनच असं म्हणतात की रात्री हे बंद केलं पाहिजे जेणेकरून मेंदूला आराम मिळेल, गाढ झोप मिळेल, जेणेकरून पूर्णपणे विश्रांती मिळेल. पण जर आपल्याला दिवसा काम करायचं असेल तर झोप यात अडथळा येत नाही, परंतु तर्क असा आहे की हे जितकं टाळता येईल, तितकं ते चांगलं होईल."
पण रात्रीच्या वेळी फक्त वाय-फाय टाळणं योग्य आहे का? जो मोबाईल फोन आपण नेहमी आपल्या उशाशी घेऊन झोपतो मग त्याचं काय?
यावर डॉक्टर म्हणतात की मोबाइल फोन देखील मायक्रोवेव्हवर आधारित असतात. ते देखील त्याच प्रकारचे रेडिएशन तयार करतात, फक्त त्यांची वारंवारता भिन्न असते. विचार केला तर ते देखील हस्तक्षेप करू शकतात. शिवाय, तुम्ही मोबाईल फोन वापरत नसला तरीही विद्युत चुंबकीय लहरी उपस्थित असतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. दिव्य ज्योती म्हणतात, "बॅकग्राउंड रेडिएशनबद्दल बोलायचं झालं तर, मोबाइल फोन आणि वाय-फायमधून निघणारे रेडिएशन त्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. जर या दोन्हीमुळे एक्सपोजर खूप वाढलं तर यावर उत्तरच नाही आहे. त्या तुलनेत, बॅकग्राउंड रेडिएशनबाबतीत आपलं एक्सपोजर अधिक आहे."
तज्ज्ञ सांगतात की आपल्या घरात आणि कार्यालयात सर्व प्रकारच्या उपकरणांमधून रेडिएशन उत्सर्जित होत असतं. टीव्ही, फ्रीजपासून एसी पर्यंत. कोणतंही विद्युत उपकरण असो, विद्युत चुंबकीय तरंग लहरी त्याच्याशी जोडलेल्या असतात.
काही तज्ज्ञांनी अशी शिफारस केली आहे की जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या अधिक एक्सपोजरची भीती असेल तर आपण ज्या खोलीत झोपतो त्या खोलीत राउटर लावणं टाळलं पाहिजे. किंवा जर हे शक्य नसेल तर आपण राऊटरला झोपेच्या पलंगापासून शक्य तेवढ्या अंतरावर ठेवू शकता.
तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञांशी देखील आम्ही चर्चा केली.
ते म्हणतात की, याबाबत नेमकी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे याबबात संभ्रम जास्त आहे. अशा परिस्थितीत, अभ्यास झाला पाहिजे जेणेकरून हे समजू शकेल की या लहरी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे प्रत्यक्षात किती नुकसान होऊ शकतं आणि ते कसं टाळता येऊ शकतं.
तंत्रज्ञान विषयावरील तज्ज्ञ मोहम्मद फैजल अली म्हणतात की, असा कोणताही अभ्यास नाही जो हे सिद्ध करू शकेल की आपण रात्री वाय-फाय बंद केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगली झोप येईल.

फोटो स्रोत, Getty Images
"किंवा वाय-फाय चालू ठेवल्यानं त्याचा परिणाम आपल्या न्यूरोलॉजिकल किंवा इतर कोणत्याही प्रणालीवर परिणाम होतो. परंतु असं म्हटलं जाऊ शकतं की कोणत्याही प्रकारच्या रेडिओ लहरींच्या अति एक्सपोजरचा एका ठराविक काळानंतर परिणाम होऊ शकतो. ही एक सामान्य बाब आहे."
अली यांनी बीबीसीला सांगितलं की, "मोबाईलचा प्रवास 30 वर्षांचा आहे आणि गेल्या दहा वर्षांत भारतात मोबाइल आणि वाय-फाय अधिक वाढले आहेत. तर हे शक्य आहे की भविष्यात एक अभ्यास होईल, ज्यामध्ये असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की या गोष्टींमुळे हे नुकसान होऊ शकते, म्हणून त्यांचा वापर मर्यादेत केला पाहिजे. पण आतापर्यंत असं काहीही झालेलं नाही."
मोबाइलचंही स्वतःचं इंटरनेट आहे, हा तर्क त्यांनाही लागू होतो का?
या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "विद्युत चुंबकीय क्षेत्र असो किंवा रेडिओ लहरी, यांबाबत अशी एक भावना आहे की त्यांचं ओव्हरएक्सपोजर योग्य नाही. आता आपल्याकडे उत्तम आकडेवारी आहे, तर त्याचा अभ्यास व्हायला हवा. जेवढं मला माहित आहे आणि समजतं, त्यावरून यानं इतकंही नुकसान होत नाही जितकं वारंवार सांगितलं जातं."

जेव्हा तज्ज्ञांना विचारलं गेलं की रेडिएशन, लहरी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे शरीरावर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात?
डॉ. दिव्य ज्योती यांनी सांगितलं की, "सैद्धांतिकदृष्ट्या जर ते गाढ झोपेत अडथळा आणू शकतात आणि जर असं झालं तर दिवसा आपल्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होईल. एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची पातळी कमी होईल. या व्यतिरिक्त, रेडिएशनचा संबंध शरीरातील ट्यूमरच्या निर्मिती आणि वाढीशी देखील जोडला जातो."
वाय-फाय सोबतच मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबाबतही चर्चा होत असतात. भारतातील अनेक मोबाइल फोन आता 5G नेटवर्कवर चालतात. सुमारे सहा वर्षांपूर्वी जेव्हा हे युरोपमध्ये आलं होतं तेव्हा नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित आरोग्याच्या जोखमींबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











