उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी सांगितलेली 17 दिवसांची परिस्थिती

फोटो स्रोत, ANI
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या कुटुंबीयांनी ते सुखरूप बाहेर आल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
ऐन दिवाळीत झालेल्या दुर्घटनेनंतर हे कामगार अडकून पडले होते. आता ते 17 दिवसांनी बाहेर पडल्याने अनेकांच्या घरी दिवाळीसारखं वातावरण आहे.
आत अडकलेल्या 41 मजुरांपैकी 15 झारखंड, 8 उत्तर प्रदेशात, बिहार आणि ओडिशाचे प्रत्येकी 5, पश्चिम बंगालमधील 3, आसाम आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 2 आणि 1 मजूर हिमाचल प्रदेशातील होता.
बोगद्यातून सुटका केल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. आता त्यांना ऋषीकेशमधल्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
आतमध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती, त्यांना कसं वाटलं आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याविषयी ते आता सांगत आहेत.
झारखंडचे सुबोध कुमार वर्मा म्हणाले की, बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर सुरुवातीचे 24 तास खूप कठीण होते.
वृत्तसंस्था एएनआयच्या व्हीडिओमध्ये ते म्हणाले की, "आम्हाला फक्त 24 तास त्रास झाला. अन्न आणि श्वास घेण्याबाबत अडचणी होत्या. त्यानंतर कंपनीने काजू, मनुका आणि अन्न पाठवलं आणि दहा दिवसांनंतर आम्हाला डाळ आणि चपाती देण्यात आली. भातही देण्यात आला.”
ते पुढे म्हणाले, "आता मी तंदुरुस्त आहे, कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मी पूर्णपणे बरा आहे. हे सर्व तुमच्या प्रार्थना आणि मेहनतीमुळे झालं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मेहनतीमुळे मी बाहेर आलो आहे, नाहीतर आत काय झालं असतं हे फक्त मला माहीत आहे.”

फोटो स्रोत, ani
सुरक्षित बाहेर पडलेल्यांमध्ये झारखंडचे विश्वजीत कुमारही आहेत. ते कंप्रेसर मशीन चालवतात. ते म्हणाले की, मला विश्वास होता की आम्हाला वाचवलं जाईल आणि बाहेरचं जग पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
एएनआयला त्यांनी सांगितलं की, “मी खूप आनंदी आणि सुरक्षित आहे. सर्व मजूर आनंदी आहेत. सध्या आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. बोगद्याच्या तोंडाजवळ ढिगारा पडला होता. मी त्याच्या दुसऱ्या बाजूला होतो. आतमध्ये अडीच किलोमीटरचा रस्ता रिकामा होता. वेळ घालवण्यासाठी आम्ही आत फिरायचो."
विश्वजीत पुढे म्हणाले की, “अडकल्यानंतर सुरुवातीचे तास खूप त्रासदायक होते. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण जेवण आणि पाणी आल्यावर आणि आमच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर आमचं मनोधैर्य वाढतच गेले. आम्हाला लवकरच बाहेरचं जग पाहता येईल, असा विश्वास निर्माण झाला."
विश्वजीत कुमार वर्मा म्हणाले, "वरून ढिगारा पडताच बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याचं आम्हाला वाटलं. पण सर्वजण आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले. त्यानंतर ऑक्सिजन आणि पाण्याच्या पाईपसह खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. बाहेरून मशिन आणण्यात आल्या."
कुटुंबाशी बोलूनही मोठा आधार मिळाल्याचं त्यांनी सांगितली. ते म्हणाले, "आम्ही कुटुंबीयांशी बोलत होतो. त्यासाठी माईक लावण्यात आला होता. आम्ही त्याद्वारे कुटुबीयांशी बोलत होतो.”
गब्बरसिंग नेगींचं 'नेतृत्व'
या संपूर्ण प्रकरणात आता एक नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे गब्बर सिंग नेगी यांचं. या प्रकल्पात ते टनेल फोरमॅन म्हणून काम करत होते.
बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर तेही 40 कामगारांसह आत अडकले होते. बाहेर आलेल्या मजुरांनी सांगितलं की, गब्बरसिंग नेगी सतत त्यांचे मनोबल वाढवत होते.
सुटका करण्यात आलेल्या मजुरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गब्बरसिंग नेगी यांचं भरभरून कौतुक केलं.

फोटो स्रोत, pmo
मोदी म्हणाले, "तुमचं विशेष अभिनंदन. ज्या पद्धतीनं तुम्ही नेतृत्व दाखवलं आहे, त्यावर भविष्यात एखाद्या विद्यापीठानं संशोधन केलं पाहिजे की, एका खेड्यातील व्यक्तीनं कठीण परिस्थितीत नेतृत्व कसं केलं आणि संकटाच्या वेळी त्याच्या संपूर्ण टीमला कशी मदत केली.”
गब्बर सिंग नेगी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि सर्वांनी त्यांना पाठिंबा दिल्याचा आनंद झाल्याचं सांगितलं.
नेगी म्हणाले, “केंद्र सरकार, राज्य सरकार, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आमच्या कंपनीने आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आमचं आरोग्य तपासत राहिले. आम्ही सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. मित्रांचे (आत अडकलेले) देखील आभार ज्यांनी कठीण काळात शांत राहून आमचं ऐकलं आणि हिंमत दाखवली.”
'आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही'
या बचाव मोहिमेच्या यशानंतर देशाच्या अनेक भागांतून आनंदोत्सव साजरा करतानाचे फोटो आणि व्हीडिओ समोर येत आहेत.
राज्यातील विविध भागातील मजुरांच्या कुटुंबीयांकडूनही दिलासा आणि आनंदाच्या प्रतिक्रिया येत आहेत.
श्रावस्ती येथील राम मिलनही बोगद्यात अडकले होते. त्यांचा मुलगा संदीप कुमार एएनआयला म्हणाला, “आम्ही खूप आनंदी आहोत. माझे नातेवाईक वडिलांना आणण्यासाठी उत्तराखंडला गेले आहेत. मी बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांचे आभार मानतो.”
दुसरा मजूर संतोष कुमार हा देखील श्रावस्तीचा आहे. त्यांची मावशी शमितादेवी यांनी म्हटलं की, श्रावस्ती येथील आठ लोक बोगद्यात अडकले होते.

फोटो स्रोत, ani
संतोषच्या आईनं सांगितलं की, त्यांचं मुलाशी बोलणे झाले असून तो लवकरच घरी येणार आहे.
त्या म्हणाल्या की, "आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हीही दिवाळी साजरी करत आहोत आणि संपूर्ण गाव आमच्यासोबत दिवाळी साजरी करत आहे."
ओडिशातील मयूरभंज येथील मजूर धीरेन नायकच्या आईने बचाव कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. तसेच बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या आसाममधील राम प्रसाद नर्जरी यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला आहे.
त्यांचे वृद्ध वडील म्हणाले, "माझ्या मुलाशी बोलल्याने मला इतका आनंद झाला, की मी व्यक्त करू शकत नाही. मी बचाव कार्यात सहभागी असलेल्या सर्व सरकारांचे आणि लोकांचे आभार मानतो."
हा एक चमत्कार आहे : डिक्स
ढिगाऱ्यातून बचावाचा मार्ग तयार करण्यात आला, तेव्हा एनडीआरएफचे कर्मचारी मनमोहन सिंग रावत हे बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या लोकांपैकी एक होते.
ते म्हणाले, “मी आत पोहोचलो तेव्हा पाहिलं की, मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तुमची लवकरच सुटका केली जाईल, असे आश्वासन आम्ही आधीपासूनच त्यांना देत होतो. यामुळे त्यांची मानसिक स्थिती स्थिर राहण्यास मदत झाली."
या बचाव कार्यात मदत करण्यासाठी सल्लागार म्हणून तैनात असलेले आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स म्हणाले की, या मोहिमेसाठी मदत करणे त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
ते म्हणाले, "मी स्वत: एक वडिल आहे. अशा परिस्थितीत बोगद्यात अडकलेल्या लोकांना घरी पाठवू शकलो, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.
तुम्हाला आठवत असेल की, सुरुवातीला मी म्हणालो होतो की, नाताळपूर्वी 41 लोक त्यांच्या घरी असतील. यावेळी ख्रिसमस लवकर आला आहे.”

फोटो स्रोत, PHOTO BY ARUN SANKAR/AFP VIA GETTY IMAGES
बचाव कार्य चालू असताना, अरनॉल्ड डिक्स बोगद्याच्या बाहेरील मंदिरात दररोज प्रार्थना करताना दिसले.
याबाबत त्यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “मी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. मी फक्त आत अडकलेल्या 41 लोकांसाठी आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केली. आम्हाला कोणाचंही नुकसान होऊ द्यायचं नव्हतं."
डिक्स म्हणाले, “आम्ही शांत होतो आणि आम्हाला काय करायचे आहे हे माहीत होतं. आम्ही एक अद्भुत संघ म्हणून काम केलं. भारताकडे सर्वोत्कृष्ट अभियंते आहेत आणि या यशस्वी मोहिमेचा एक भाग बनणं मला आनंद देणारं आहे.
"आता मला मंदिरात जावे लागेल, कारण मी देवाचे आभार मानण्याचं वचन दिलं होतं. तुम्ही पाहिले की नाही हे मला माहीत नाही, पण आम्ही एक चमत्कार पाहिला आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








