अफगाणिस्तानचा क्रिकेटर रहमानुल्लाह गुरबाझचा अहमदाबादेतील व्हीडिओ व्हायरल; लोक म्हणाले, देवदूतच आला

फोटो स्रोत, Getty Images
भारतात सुरू असलेली वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धा रंजक शेवटाच्या दिशेनं पुढं सरकली आहे. स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये चार संघांची नावं निश्चित झाली आहेत.
या विश्वचषक स्पर्धेत काही संघांकडून मोठे बदल घडवून आणल्याचं पाहायला मिळालं. तसंच अशाही काही घटना घडल्या ज्यामुळं ही स्पर्धा चर्चेत राहिली.
अफगाणिस्तानच्या संघानं या स्पर्धेत केलेल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
या संघानं इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या माजी विश्वविजेत्यांना पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली.
पण सध्या सोशल मीडियावर अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रहमानुल्लाह गुरबाझ याच्या मनाच्या मोठेपणाची आणि त्याच्या एका चांगल्या कृतीची प्रचंड चर्चा सुरू आहे.
गुरबाझचा व्हायरल व्हीडिओ
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार दिवाळीच्या आधीच्या रात्री अहमदाबादेत थलतेज टेकराजवळ दूरदर्शन केंद्राच्या जवळ असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या गरीबांना एक व्यक्ती पैसे वाटताना दिसला.
त्याचवेळी अहमदाबादचे आरजे लव्ह शहा त्याठिकाणाहून जात होते. त्यांनी एक व्यक्ती फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या उशाशी काही पैसे ठेवत असल्याचं पाहिलं.
चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की, ती व्यक्ती म्हणजे अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रहमानुल्ला गुरबाझ होता. लव्ह शाह यांनी त्या घटनेचा एक व्हीडिओ तयार करून अपलोड केला आहे. यामध्ये गुरबाझ काही लोकांशी बोलत आहे आणि झोपलेल्या लोकांच्याजवळ पैसे ठेवताना दिसत आहे.
गुरबाझ गेल्यानंतर लव्ह शहा त्याठिकाणी गेले आणि पाहिलं तर तिथं झोपलेल्या अनेक लोकांच्या जवळ पाचशे रुपयांच्या नोटा ठेवलेल्या होत्या.
लव्ह शहा यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावरही शेअर केला.
त्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून, लोक त्यावर मतं व्यक्त करत आहेत.
अफगाणिस्तानचा संघ त्यांचा अखेरचा सामना खेळण्यासाठी अहमदाबादेत आलेला होता.
सोशल मीडियावर कौतुक
कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमच्या एक्स हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली.
त्यात "अफगाणिस्तानातून एक देवदूत आला होता. अफगाणिस्तानच्या हेरात राज्यात आलेल्या भूकंपानंतर पैसे जमा करण्यापासून, तर आता तो विदेशातही त्याचं मन किती मोठं आहे, हे दाखवून देत आहे. गुरबाझ आम्हाला सर्वांना प्रोत्साहन देत आहे," असं लिहिलं होतं.

फोटो स्रोत, VIRAL VIDEO/SOCIAL MEDIA
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही हा व्हीडिओ पोस्ट केला आणि लिहिलं,"अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाझचं हे काम उल्लेखनीय आहे. एखादं शतक करण्यापेक्षाही हे कितीतरी मोठं काम आहे. मला विश्वास आहे की, तो अनेक शतकं करेल."
दुसरे एक यूझर रोशन राय यांनी लिहिलं की, "यामुळंच अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारतात एवढं प्रेम मिळतं. दिवाळीच्या उत्सव काळात दिसणारा हा क्षण खास आहे."

फोटो स्रोत, TWITTER/@SHASHITHAROOR
राजेंद्र खंबाट नावाच्या यूझरनं लिहिलं, एक पवित्र आत्मा आणि चांगली व्यक्ती असण्यासाठी तो कोणत्या धर्माचा आहे हे महत्त्वाचं नसतं. "आम्हाला आशा आहे की, आमचे काही नेते यातून धडा घेतील. अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाझनं भारतीयांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं आहे."
तर मोहम्मद अफझाल झरगोनी यांनीही ट्वीट केलं आणि अफगाणिस्तानातून देवदूत आला, असं लिहिलं.
"आरजे लव्ह शहा यांनी रहमानुल्लाह गुरबाझला अहमदाबादेत नकळत लोकांवर प्रेमाचा वर्षाव करताना पाहिलं..." अशी पोस्ट त्यांनी केली.
कोण आहे रहमानुल्लाह गुरबाझ?
21 वर्षं वय असलेला रहमानुल्लाह गुरबाझ अफगाणिस्तानच्या संघाचा सलामीचा फलंदाज आणि विकेटकिपर आहे.
त्यानं 2019 मध्ये टी 20 आणि 2021 मध्ये अफगाणिस्तानच्या वन डे संघात पदार्पण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाकडूनही तो खेळला आहे.
गुरबाझनं 43 टी 20 इंटरनॅशनल आणि 35 वन डे सामने खेळले आहेत. वन डे सामन्यांत त्यानं पाच शतकं केली आहेत.
या विश्वचषक स्पर्धेत त्यानं 9 सामन्यांत 280 धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








