कोव्हिड काळानंतर तरुणांमध्ये हार्ट-अॅटॅक येण्याचे प्रमाण वाढलंय का, काय काळजी घ्यावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमरेंद्रा यारलागड्डा
- Role, बीबीसी तेलुगु प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांमध्ये अगदी तरुण वयातच हार्ट-अॅटॅक येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
इतक्या कमी वयात हृदयरोगाचा तीव्र झटका येऊन जीव जाणे ही चिंतेची बाब समजली जात आहे.
गेल्या काही दिवसात तुम्ही पाहिलं असेल की एका तरुण मुलाला क्रिकेट खेळता-खेळता अटॅक आला आणि त्याचा जीव गेला.
कुणाला 28 व्या वर्षी हार्ट अॅटॅक येत आहे तर कुणाला 18 व्या वर्षीच हृदयविकाराचा झटका येताना दिसत आहे.
तर 26 वर्षांच्या एका मुलाला जिममध्ये हार्ट अॅटॅक येऊन मृत्यू झाल्याचे तुम्ही पाहिले असेल.
- आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये अशा घटना घडल्या आहेत.
- तेलंगानातील निर्मल जिल्ह्यात 18 वर्षाच्या मुलाला डान्स करता करता हार्ट अॅटॅक आला आणि त्यात त्याचा मृत्यू आला.
- पालनाडू जिल्ह्यात 17 व्या वर्षीच एका मुलाला हार्ट अॅटक येऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.
- तेलंगानातील मेडचल या ठिकाणी CMR कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला.
- बायने पल्ली या ठिकाणी जिममध्ये वर्कआऊट करताना एक पोलीस कॉन्स्टेबल अचानकपणे कोसळला.
- गुजरातमध्ये क्रिकेट खेळता-खेळताच एका मुलाला हार्टअॅटॅक आला, नंतर त्याचा मृत्यू झाला.
या बातम्या वाचल्यावर काय वाटतं? गेल्या काही दिवसांत हार्ट अॅटॅकच्या प्रकरणात वाढ झाली आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
नुकताच हैदराबादच्या NIMS या रुग्णालयात 18 वर्षांच्या तरुणाला हार्ट अॅटॅक आल्यानंतर भरती करण्यात आले होते. पल्मोनरी अॅंजिओग्राममध्ये लक्षात आलं की त्याच्या रक्तवाहिन्यातील रक्त साकळले आहे. अगदी कोवळ्या वयात त्या मुलावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्याला स्टेंट बसवण्यात आले.
या वयात स्टेंट बसवणे हे अतिशय त्रासदायक आहे असं डॉक्टर सांगतात.
कमी वयातच वाढणाऱ्या हार्ट अॅटॅक आणि हृदयाशी संबंधित विकारांबाबतच्या वाढत्या प्रमाणाबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत हृदयरोग तज्ज्ञांमध्ये काही मतभेद आढळून आले आहेत. पण त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे देखील यावेळी सांगितले.
यशोदा हॉस्पिटल येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ए. रवीकांत सांगतात की "हार्ट अॅटॅकमुळे तरुणांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण आधी देखील भरपूर होतं. पण आता माध्यमांमध्ये मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे याकडे लक्ष वेधले जात आहे. ऑटोप्सी केल्यानंतरच कळू शकतं की जर एखादी व्यक्ती कोसळत आहे ती हार्ट अॅटकमुळे कोसळत आहे की इतर काही कारणांनी."
डॉक्टर्स सांगतात की तरुण वयात हार्ट अॅटॅकने होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी निश्चितपणे सांगणे कठीण आहे.
कार्डिअॅक सोसायटी ऑफ इंडिया, हैदराबादच्या प्रतिनिधींशी बोलून या विषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न बीबीसी तेलुगुने केला. या सोसायटीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे की "या घटनांवरुन नेमकी संख्या सांगता येणे कठीण आहे. कारण तरुण वयात नेमक्या किती जणांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला याविषयीचे संशोधनाचे प्रमाण अत्यल्प आहे. जर याविषयी अधिक सविस्तर संशोधन झाले तर अनेक गोष्टी समोर येऊ शकतील."
नोव्हेंबर 2021 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अॅंड रिसर्च या नियतकालिकामध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले होते त्यात असे सांगण्यात आले की हृदयाच्या व्हॉल्वमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हे संशोधन काहिया कृष्णा आणि पी. रमेश बाबू यांनी एकत्रितरित्या प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगानातील 108 लोकांवर अभ्यास केला आणि त्यात त्यांना असं आढळून आलं की 40 वर्षांखालील रुग्णांची संख्या ही 31 टक्के आहे.
कोव्हिडमुळे तरुणांतील हृदयविकाराचा धोका वाढत आहे का?
याबाबत डॉक्टर सांगतात की कोव्हिडनंतर हृदयविकाराची शक्यता अधिक झाली आहे.
NIMS येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रामाकुमारी सांगतात की "हृदयाशी संबंधित तक्रारी घेऊन OPDमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ही अंदाजे दिवसाला 160 ने वाढली आहे. त्यापैकी काही केसेस या गंभीर स्वरूपाच्या असतात. कोव्हिड अगोदर ही संख्या कमी होती. असंही म्हटलं जात आहे की ज्यांना कोव्हिड झाला होता त्या रुग्णात हे प्रमाण अधिक आहे."

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत अधिक खुलासा करताना रामाकुमारी सांगतात की कोरोना व्हायरसने हृदयातील एंडोथेलियम टिश्यूवर प्रभाव पडतो. त्यामुळे तरुण वयातील लोकांनाही हृदयविकाराचा धोका आढळून आला आहे.
हृदयात तीन प्रकारचे स्नायू असतात. एपिकार्डिअम, मायोकार्डिअम आणि एंडोकार्डिअम. मायोकार्डियाशी संबंधित केसेसचे प्रमाण वाढत आहे.
हृदयातील स्नायूंचा आकार वाढल्यामुळे हृदयाचा आकारही वाढतो आणि असंतुलन निर्माण होऊन हृदयविकार बळावतो. अशा प्रकारच्या केसेस कोव्हिडनंतर वाढल्या आहेत असं डॉ. रामाकुमारी सांगतात.
काही दुसरी कारणं आहेत का?
कोरोना व्हायरसमुळे तरुण वयात वाढणारे कोरोनरी आर्टरीतील (हृदयातील धमणी) लक्षणविरहित रोग, हे देखील हार्ट अॅटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट वाढण्याची कारणं आहेत.
अशा केसेस मध्ये रुग्णांचा मृत्यू कुठलीही लक्षणं न दिसताच होतो, असं विजयवाडा रमेश हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पी. रमेश बाबू सांगतात.
बीबीसीशी बोलताना डॉ. रमेश यांनी सांगितलं की पन्नाशीच्या आत हार्ट अॅटॅक होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. हार्ट अॅटॅकमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी चाळिशी आत असलेल्या लोकांची संख्या 25 टक्के आहे.
गेल्या दोन तीन वर्षांत सबक्लिनिकल अॅथेरोस्केलोरोसिसचे प्रमाण वाढले आहे. ही एक हृदयातील स्थिती असते. ज्यामध्ये कुठलीही लक्षणं स्पष्टपणे दिसत नाहीत पण जिवावर बेतणाऱ्या हृदयविकारांचा धोका वाढलेला असतो.
यापैकी 80-90 टक्के प्रमाणात ब्लॉकेज असतं पण कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. डॉ. रमेश यांचं म्हणणं आहे की 50 टक्के केसेस मध्ये किमान लक्षणं देखील आढळली नाहीत.
काय काळजी घ्याल?
कार्डिअॅक टेस्ट घेण्याबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की काही लक्षणं आढळली तरच चाचण्या कराव्यात.
सध्या अशी परिस्थिती आहे की 50-60 टक्के जणांना कॅल्शियम स्कोअर आणि कोलेस्टरॉल ब्लॉकबद्दल माहितच नसतं. त्यामुळे लक्षणं दिसण्याआधीच चाचणी करावी असा सल्ला डॉक्टर देतात.

फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल लिपिड असोसिएशन ऑफ अमरिकाने असं सुचवलं आहे की बाळाच्या जन्माच्या सहा महिन्यानंतर कोलेस्टरॉल-लिपिड प्रोफाइल टेस्ट करुन घेतली पाहिजे. मग त्यानंतर 7 ते 11 या वयोगटात असताना आणि नंतर 17 ते 21 या वयोगटात असताना चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
चाचण्यांबाबत निर्णय कसे घ्यावेत याविषयी डॉ. रमेश बाबू सांगतात की जर तुमच्या कुटुंबात हार्ट-अॅटॅक आलेला असेल किंवा हाय-कोलेस्टरॉल, मधूमेह आणि उच्च-रक्तदाब, कोरोनरी अॅंजिओग्राम इत्यादी गोष्टी असतील तर तुम्ही पाच वर्षात एकदा चाचणी केली पाहिजे.
झोपेची कमतरता आणि तणाव ही कार्डिअॅक अरेस्टची प्रमुख कारणं मानली जातात. पण कोरोनरी आर्टरीतील रोगांमध्ये हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतं. संतुलित आहार, योगा आणि व्यायाम हे तुमच्या कॅल्शियम स्कोअरनुसार असावं असं रमेश बाबू सांगतात.
याच विषयाबाबत डॉ. रमाकुमारी सांगतात की मधूमेह, उच्चरक्तदाब यामुळे धोका आणखी वाढतो. ECG, कार्डिअॅक MRI, पल्मोनरी अॅंजिओग्राम या चाचण्या करून घ्यायला हव्या. या चाचण्यानंतरच जिमला जाणे योग्य आहे, असं रामाकुमारी सांगतात.
पुरुषांमध्ये धोका जास्त आहे का?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की हार्ट अॅटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे.
याबाबत रवीकांत सांगतात, 20-25 या वयोगटातील पुरुषांमध्ये हार्ट-अॅटॅकचे प्रमाण आढळले आहे. त्याहून अधिक 25-30या वयोगटात आहे आणि त्यानंतर 30-40या वयोगटात हे प्रमाण अधिक आहे. या वयात महिलांमध्ये देखील हार्ट अॅटॅक होण्याचे प्रमाण अधिक आहे पण ते पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे.

40-50 या वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक दिसतं. यात ही पुरुषांची संख्या अधिक असते.
50-60 या वयोगटातील स्त्री आणि पुरुषामध्ये हे प्रमाण सारखेच असल्याचे दिसते. साठी ओलांडल्यानंतरही ही संख्या अंदाजे सारखीच आहे.
मासिक पाळी वेळी होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे तरुण महिलांमध्ये हार्ट-अॅटॅकचा धोका कमी होतो पण रजोनिवृत्तीनंतर हा धोका वाढतो.
महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे अॅथेरोक्लेरोसिसचा ( हृदयातील धमण्यांवर आवरण निर्माण होणे) धोका कमी असतो त्यामुळे हार्ट-अॅटॅकचे प्रमाण कमी होते, असं अनेक संशोधनात आढळले आहे. असं डॉ. रवीकांत सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








