'मरेपर्यंत त्यांनी दारू पिली, 50 एकर शेती गमावली', महाराष्ट्राला कशी पोखरतेय दारू? – ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"50 एकर शेती होती. सगळी त्यायनं दारुतच गमावली..."

"रोज संध्याकाळी ते दारू पिऊन येतात, की जेवणसुद्धा करावं वाटत नाही, असं वाटतं कुठंतरी चाललं जावं..."

"एका दारुड्याच्या घरामधी जन्म झाला ना की असं वाटतं आपण आधीच का नाही मेलो..."

महाराष्ट्रात गावागावात फिरताना तुम्हाला दारू आणि दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेल्यांच्या या अशा कहाण्या ऐकायला मिळतात. या कहाण्या काय सांगत आहेत? महाराष्ट्राला दारू कशी पोखरतेय? बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट.

गेल्या 7 वर्षांपासून रिपोर्टिंगसाठी राज्यभरात फिरत असताना दारूविषयी सामान्य लोक नियमितपणे बोलताना दिसले. गावात दारूचं व्यसन वाढलंय, मुलंही दारू प्यायला लागलेत, असं हमखास कानावर पडत होतं.

पण, आता दारूच्या आहारी गेलेल्यांकडून खूनही घडायला लागलेत. अशीच एक घटना अंबाजोगाईच्या येल्डा गावात घडली. इथं दारूच्या नशेतील मुलानं आपल्या 80 वर्षांच्या आईचा खून केला.

कुठे आईचा, तर कुठे मुलाचा खून

आम्ही येल्डा गावात पोहचलो, तेव्हा ज्या घरात ही घटना झाली त्या घराला कुलूप लावलेलं दिसलं. आरोपीची पत्नी माहेरी निघून गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

इथंच आमची भेट मयत महिलेचा दुसरा मुलगा हरिदास सोन्नर यांच्याशी झाली.

घटनेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "दारूमध्येच केलं त्यानं समधं. 24 तास दारू प्यायचा. एक मिनिट बी थांबत नव्हता. उतरली की चालू, उतरली की चालू."

याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे या प्रकरणाविषयी सांगताना म्हणाले, "सर्व झोपल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास या व्यक्तीनं त्याच्या आईला डोक्यात दगडं मारून, छातीत दगडं मारुन तिचा निर्घृण खून केला आणि नंतर तिला घरासमोरील रोडवर ठेवलं."

पण ही काही एकमेव घटना नाहीये. बीडच्या माजलगावात एका वडिलांनी दारुच्या नशेत आपल्या 23 वर्षांच्या मुलाचा खून केला.

खानापूर परिसरात ही घटना घडली. या घटनेतील वडील आणि मुलगा दोघेही व्यसनाधीन होते.

माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ सांगतात, "मयत रोहित हा वडिलांना वारंवार दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता. यातून त्यांचे भांडण झाले आणि वडिलांनी त्याला बाजेच्या गातेच्या लाकडानं मारहाण करुन जखमी केलेले होते."

कांता गोपाल कांबळे या मयत तरुणाची आई आहेत. मुलाच्या आठवणीनं त्यांच्या डोळ्यात पाणी येतं.

त्या म्हणतात, "सारखं होत नव्हते भांडण. पेल्यावरच थोडसं व्हायचे. हाणामारी थोडीशी व्हायची."

"मी काय करणार आहे एकटी? कुणाच्या जीवावर आता आम्ही जगायचं?", असा कांता यांचा सवाल आहे.

कांता या गावातच असलेल्या समाजमंदिरात राहतात.

माजलगावातच दारुचं बिल भरण्यावरुन वाद झाल्यानंतर काही तरुणांनी आशुतोष गायकवाड आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ते दोघेही धाबा चालवायचे.

आशुतोष सांगतो,"ते बाहेरून दारू पिऊन आले होते, काही वेळ इथं दारू पिले. बिल भरण्यावरुन भांडण सुरू झालं. सुरुवातीला लाथाबुक्क्यानं, नंतर लाकडांनी मला आणि वडिलांना मारू लागले. मग वडील खाली पडले. मग माझ्या डोक्यात मागून मारू लागले. मला इथं 15 टाके पडलेत. कानाला मारलं, हाताला मारलं. हात वरी उचलत नव्हता."

आशुतोषच्या डोक्याला मागच्या बाजूस टाके पडलेत. या मारहाणीनंतर आशुतोषच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही प्रकरणांमधील आरोपी सध्या खूनाच्या गुन्ह्यात अटकेत आहेत.

'मरेपर्यंत दारू पिली'

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अनाड गावच्या मीनाबाई पवार यांच्या पतीचं, तुकाराम पवार यांचं नुकतंच निधन झालं. तुकाराम यांना दारुचं व्यसन होतं.

मीनाबाई सांगतात, "लय 50 एकर शेती होती. सगळी त्यायनं दारुतच गमावली. शेवटपर्यंत दारू पिली. शेवटी दारू पिऊनच मेले."

अनाड गावातील इतर महिला दारुविषयी विचारल्यावर बोलायला लागल्या.

यापैकी एक आहेत कल्पना महाले. त्या म्हणाल्या, "लय टेंशन आहे दररोज. म्हणजे एवढा त्रास आहे ना, रोज संध्याकाळी ते दारू पिऊन येतात, की जेवणसुद्धा करावं वाटत नाही, असं वाटतं कुकडं (कुठंतरी) चाललं जावं.

"मुलांना अभ्यास कराव नाही वाटत. संध्याकाळच्या टायमाला ते पिऊन येतात. दांगडू करतात."

याच गावातील 80 वर्षांच्या मैनाबाई म्हणाल्या, ही आजची पिढी लय बेक्कार आहे. झोपेतून उठले तोंड धुतले की अड्ड्यात जातेत. दारू पितेत. कसे बिन घरी येतेत, डोलत-डालत."

दारूच्या व्यसनाधीनतेवरचा हा रिपोर्ट करण्यासाठी फिरत असताना दारू विकत घेण्यासाठी सकाळीच दुकानाबाहेर दारू खरेदी करण्यासाठी गर्दी केलेले लोक आम्हाला काही ठिकाणी दिसले. दुपारच्या सुमारास दारू पिऊन रस्त्याच्या कडेला तर कुठे झाडाखाली पडलेले तरुणही दिसते.

एकदा तर रात्रीच्या वेळेस आम्ही प्रवास करत असताना भरस्त्यावर डुलणारा तरुणही दिसला. याशिवाय, एखाद्या महापुरुषाची जयंती असो की लग्नाचा कार्यक्रम दारू पिल्याशिवाय तरुणांना DJ समोर नाचताच येत नाही, असंही ऐकायला मिळालं.

गावागावांत दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं स्थानिक नागरिक सांगतात.

मयत तुकाराम पवार यांचा मुलगा सागर पवार सांगतात, "आमच्या गावात व्यसनाधीनतेचं प्रमाण म्हटलं तर साधारण 70 टक्के प्लसच व्यसनाधीनतेचं प्रमाण आहे."

तर, येल्डा गावचे हरिदास सोन्नर सांगतात, "बक्कळ वाढलंय प्रमाण. चिचखंडीमधील लोक दारू प्यायला येतात इथं. मोरपळी, राकसवाडी, इथून पिऊन जात्येत. इतके दुकानं आहेत या गावात."

शहरानजीकच्या गावांमध्ये बियर बारची दुकानं मोठ्या प्रमाणावर उघडण्यात आल्याचं दिसून येतंय. पण दारुच्या व्यसनाधीनतेमागची कारणं काय आणि त्याचा समाजस्वास्थ्यावर काय परिणाम होतोय?

बेरोजगार तरुण दारूच्या विळख्यात?

लेखक आणि पत्रकार आसाराम लोमटे सांगतात, "ग्रामीण भागातल्या तरुणांच्या हाताला काम नाही. प्रचंड बेरोजगारी आज खेड्यापाड्यात पाहायला मिळतेय. ही बेरोजगारी वेगवेगळ्या अवैध अशा कामासाठी वापरणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीचं कारणही दारुच आहे. वेगवेगळ्या कलहांमध्ये, भांडणांमध्ये ही तरुणाई गुंतवली जाते."

"यातूनच मग गावोगावी कलह होतात, भांडणं होतात, संघर्ष होतात. या संघर्षातून मग गावाची घडी विस्कटते, सामाजिक वीण विस्कटते. म्हणजे दारू केवळ एखाद्या कुटुंबांचं स्वाथ्य हरवते असं नाही, तर संपूर्ण गावाला, समाजाला वेठीस धरते," लोमटे पुढे सांगतात.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास सांगतात, "ज्या पद्धतीनं सध्या व्यसनांना प्रतिष्ठा मिळत आहे. ज्याला आपण स्टेटस सिम्बॉल म्हणतो. तेही दारूकडे वळण्यामागचं एक कारण आहे."

दारू विक्रीतून हजारो कोटींचा महसूल

आम्ही अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये असतानाच तिथले पोलीस एका व्यक्तीला समज देत होते. ही व्यक्ती दारू पीत असल्यामुळे त्यांची पत्नी माहेरी गेली, त्यामुळे त्यांनी दारूच्या नशेत ग्रामपंचायतीच्या काचा फोडल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. लोकांच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे हे विचारण्याची वेळ आली आहे. दारुविक्रीचे परवाने सरकार वितरित करतं.

दारू विक्रीतून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो आणि या महसूलात वर्षागणिक वाढ झाल्याचं दिसून येतं.

गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये दारू विक्रीतून सरकारला 15,078 कोटी रुपये महसूल मिळाला, 2021-22 मध्ये 17,228 कोटी रुपये, 2022-23 मध्ये – 21,550 कोटी रुपये, 2023-24 मध्ये – 23,289 कोटी रुपये महसूल मिळाला. 2024-25 मध्ये अंदाजे 30,500 कोटी रुपये महसूल मिळेल असं सांगण्यात आलं. 2025-26 मधील हा अंदाज 32025 कोटी रुपयांचा आहे.

म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये महसूलात दुप्पट वाढ झाली आहे. याशिवाय गावागावांमध्ये अवैध दारुचा त्रास आहे तो वेगळाच.

वर्षा विद्या विलास सांगतात, "पूर्वी देशी आणि गावठी दारू जास्त होती. आता विदेशी दारू खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. वाईन शॉपी, बिअर शॉपीच्या माध्यमातून ठिकठिकाणी त्याचं पेव वाढलेलं आहे. ही जी उपलब्धता कमी करणं गरजेचं आहे, ते होताना दिसत नाही."

"संविधानाचं 47 वं कलम बघितलं, तर त्यात लोकांचं, नागरिकांचं आयुष्यमान उंचावणं, त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणं आणि मादक द्रव्यांची उपलब्धता कमी करणं हे पूर्णपणे सरकारचं काम आहे. हे सरकारचं नीतीमान कर्तव्य आहे."

दारूविषयी सरकारच्या भूमिकेवर विधीमंडळाच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "दारू पिणाऱ्यांची संख्या वाढावी अशी सरकारची भूमिका नाहीये. जवळपास 1972 नंतर एक देखील नवीन दुकान आपण महाराष्ट्रामध्ये मंजूर केलेलं नाही. काही भागात दुकान आहे, पण ती स्थलांतरित करण्याचे प्रस्ताव विभागाकडे येतात. त्याबद्दल तपासणी होते, शहानिशा केली जाते आणि मग प्रस्ताव मंजूर केले जातात."

याच वेळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की, 1972 पासून दुकानं देणं बंद केले. पण झालं काय, तुम्ही बिअर शॉपी सुरू केली. माझ्या जिल्ह्यातल्या किती तक्रारी मी केल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या घरात बिअरबार, बिअर शॉपी. लोक विरोधात विरोध करताहेत. पण बंद होत नाही."

राज्य सरकारनं हॉटेल्स आणि बारमध्ये विदेशी दारू विक्रीसाठी दिलेल्या परवान्यांची संख्या दरवर्षी वाढल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये 12865 हॉटेल्स, बारमध्ये विदेशी दारू विक्रीसाठी परवाना होता. 2022-23 मध्ये ही संख्या 15709 वर, 2023-24 मध्ये 17852 वर, 2024-25 मध्ये 19420 वर, तर 2025-26 मध्ये 20567 वर पोहचलीय.

दारूमुळे महिला-मुलांवरही परिणाम

दारूची विक्री ही गावांमध्ये परवानाधारक दुकानांशिवाय एखाद्या शेतात झाडाखाली, कुठे पत्र्याच्या शेडमध्ये, तर कुठे एखाद्या घरात होताना दिसते. दारू कुठे मिळते हे गावात प्रत्येकाला माहिती असतं. दारूची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्यांवर काही ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई केलेली पाहायला मिळते. पण, दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावरही त्याचे मानसिक परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मेराज कादरी सांगतात, "आमच्याकडे खूप महिला येतात त्यांना डिप्रेशन निर्माण झालेलं असतं. कारण त्यांचा नवरा रोज घरी दारून पिऊन येतो आणि त्यांना मारहाण करतो. त्यामुळे तिला डिप्रेशन येतं. तिच्यात आत्महत्येची वृत्ती निर्माण होते. मुलं लहानपणी जेव्हा पाहतात की, वडील आईला मारतात, तर त्यांचा रिलेशनशिपमधला ट्रस्ट कमी होऊन जातो. त्यांचा लोकांवरील विश्वास कमी होतो."

दारू विक्रीतून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं जानेवारी महिन्यात एक समिती गठीत केलीय. इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरणं, परवाने, उत्पादन शुल्क तसंच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास ही समिती करणार आहे.

दारूनं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील व्यक्तींचं मात्र तरुणांना एक सांगणं आहे.

सागर पवार म्हणतात, "तरुणांना एकच विनंती आहे, तुम्ही शौक म्हणून करता. पहिल्यांदा कुणीतरी पाजतो, दुसऱ्यांदा कुणीतरी पाजतो. तिसऱ्यांदा तुम्ही स्वत: जाऊन थोडी घेता आणि मग ते करत करत तुम्ही पूर्णपणे व्यवसनाच्या आहारी जाता. असं न करता पूर्णपणे निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करा, जीवन फार सुंदर आहे."

दरम्यान, गावातील दारूचं दुकान बंद करावं, अशी अनाडमधील महिलांची मागणी आहे.

"दारू पहिली बंद केली पाहिजे. कारण त्यामुळे त्रास होणार नाही, मुलं चांगलं शिकतीन. नाहीतर त्यांचेच संस्कार मुलांना लागण," कल्पना महाले म्हणतात.

तर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री दारुबंदीच्या पर्यायावर टिप्पणी करतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "काही राज्यांमध्ये पूर्ण दारूबंदी आहे. तरी तिथं आजूबाजूच्या राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर दारू जाते. उलट दारूबंदी केल्यामुळे तिथं दारूचा अक्षरश: धुमाकूळ चालतो."

व्यसनमुक्तीवर दारुबंदी हा खरंच पर्याय आहे का यावर मतं-मतांतरं आहेत. पण दारुच्या व्यसनापायी घरातच नाही तर गावांमध्ये, शहरांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतायत.

समाजाला पोखरणाऱ्या या व्यसनाचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने कडक धोरणं आखावीत, अशी मागणी महिला करतायत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)