पृथ्वीवर फक्त माणूसच का बोलू शकतो? जगात बोलला गेलेला पहिला शब्द काय होता?

पृथ्वीवरील सजीवसृष्टीत माणूस हा एक अनोखा जीव आहे. तो अनेक बाबतीत इतर सजीव, प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. मात्र एक गोष्ट जी फक्त माणसाकडेच आहे आणि इतर जीवांकडे नाही ती म्हणजे भाषा.

बोलण्याच्या कलेतून, भाषा विकसित झाल्या आणि या भाषेनं माणसाच्या प्रगतीत, मानवी समाज विकसित होण्यात मोलाची भूमिका बजावली.

किंबहुना, माणूस जर बोलू शकला नसता म्हणजे व्यवस्थित भाषेची निर्मिती करू शकला नसता, तर आजचा आधुनिक माणूस, आधुनिक मानवी समाज निर्माणच झाला नसता.

मात्र, असं काय कारण आहे की पृथ्वीवर फक्त माणसालाच बोलता येतं, माणूसच भाषा विकसित करू शकला? भाषेचा विकास नेमका कसा होत गेला? याबद्दल जाणून घेऊया.

सजीवांमध्ये फक्त मानवालाच का बोलता येतं?

तुमच्या गळ्यात वरच्या बाजूला एक छोटंसं हाड असंत, त्याला हायोईड बोन म्हणतात. आपण का बोलतो याचं उत्तर या हाडात दडलं आहे. हे हाडंच आपल्या जीभेला आधार देतं. हे हाड सगळ्या प्राण्यांमध्ये आढळतं. त्यामुळेच सर्व प्राण्यांना त्यांच्या तोंडातून वेगवेगळे आवाज काढता येतात.

मात्र, मानवामध्ये या हाडाची रचना अतिशय खास आणि वेगळ्या प्रकारे असते. त्यामुळेच मानवाला अधिक गुंतागुंतीचे आवाज काढता येतात. थोडक्यात काय तर बोलता येतं आणि भाषेचा वापर करता येतो.

डॉ. मर्सिडिज ओकुमुरा ब्राझीलमधील साओ पाओलो विद्यापीठातील इस्टिट्यूट ऑफ बायोसायन्समधील जेनेटिक्स आणि इव्होलुशनरी बायोलॉजी विभागात प्राध्यापक आहेत.

मानवी शरीरातील या हाडाच्या रचनेबद्दल डॉ. मर्सिडिज ओकुमुरा म्हणतात, "मानवाचे जे अवशेष सापडले आहेत, त्याच्या विश्लेषणातून असं दिसतं की किमान 1 लाख 35,000 हजार वर्षांपूर्वी मानवी शरीरात भाषा बोलण्याची क्षमता होती."

जुन्या डीएनएच्या अभ्यासातून वैज्ञानिकांना आपल्या भाषेबद्दल किंवा बोलण्याच्या क्षमतेबद्दल काही गोष्टी आढळल्या आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं आहे की मानवी शरीरात असणाऱ्या FOXP2 या जीन किंवा जनुकाचा मानवातील भाषेच्या उत्क्रांतीशी संबंध आहे. हा जनुक आजच्या मानवात आहे आणि उक्रांतीतील त्यांच्या आधीच्या टप्प्यात होता.

डॉ. मर्सिडिज ओकुमुरा म्हणतात, "हा जनुक पाठीचा कणा असलेल्या आणि हाडांचा सापडा असलेल्या अनेक सजीवांमध्ये आढळला आहे. यात अनेक प्राणी, पक्षी आणि अगदी माशांचा समावेश आहे."

मानवी शरीरात FOXP2चं विशिष्ट प्रकारचं म्युटेशन झालं आहे. म्हणजे या जनुकात विशिष्ट प्रकारचे बदल झाले आहेत. हा जुनकच मेंदूतील संभाषणासाठीच्या केंद्राचं नियंत्रण करतो.

डॉ. डाएन नेल्सन, युकेतील लीड्स विद्यापीठात स्टडीज फॉर लिंग्विस्टिक्स आणि फोनेटिक्सच्या संचालक आहेत.

डॉ. नेल्सन म्हणतात की "मानवामध्ये शरीराची रचना आणि आकलन क्षमता यांचं अतिशय विशिष्ट प्रकारचा मिलाफ असतो. ते इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये आढळत नाही. त्यामुळेच माणूस अतिशय गुंतागुंतीची आणि व्यवस्थित भाषा बोलू शकतो."

मानवी भाषेच्या उत्पत्तीबद्दलचे विविध सिद्धांत

मात्र आता प्रश्न उद्भवतो की मुळातच माणूस बोलायला का लागला?

यासंदर्भात भाषाशास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत.

डॉ. नेल्सन म्हणतात, "भाषेच्या उगमासंदर्भात अनेक सिद्धांत आहेत. मात्र याबाबतीत आपण काही अधिक अभ्यासपूर्ण अंदाज बांधू शकतो."

यातील पहिला सिद्धांत असा आहे की माणूस सुरुवातीच्या टप्प्यात हातवाऱ्यांनी संभाषण करू लागला. तर आणखी एक सिद्धांत म्हणतो की विविध साधनं, अवजारं बनवण्यासाठी जी आकलन क्षमता लागते, त्यामुळेदेखील माणूस शब्दांना जोडून वाक्यं तयार करू लागला.

डॉ. मर्सिडिज ओकुमुरा म्हणतात, "माणूस एकत्र राहण्यासाठी, एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी आणि विविध कल्पना एकमेकांना सांगण्यासाठी बोलू लागला, भाषेचा वापर करू लागला."

काही तज्ज्ञांना वाटतं की भाषेची उत्क्रांती मोठ्या समूहांना जोडून ठेवण्यासाठी आणि नंतर गॉसिप करण्यासाठी एकमेकांची माहिती सांगण्यासाठी झाली.

यासंदर्भात आणखी एक सिद्धांत प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ निऑम चॉम्स्की यांनी मांडला आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की, मानवाच्या मेंदूमध्ये जन्मत:च भाषेशी संबंधित क्षमता असते.

डॉ. नेल्सन म्हणतात, "सत्य हे या सर्व सिद्धांतांचं मिश्रण असू शकतं. मानव गॉसिप करत होता. एकमेकांशी बोलत होता. आपण त्याचा वापर करण्यासाठी विकसित होत होतो आणि मानवाचा मेंदू कालांतरानं मोठा होत होता."

प्राचीन कलांमधून आपल्याला भाषेबद्दल काय समजतं?

प्राचीन काळातील मानवाची कामं, अवजारं यातून आपल्याला भाषेच्या संदर्भातील मानवाचं गुंतागुंतीचं वर्तनासंदर्भात काही गोष्टी कळतात. तशा त्या आपल्याला मानवी अवशेषांमधून समजत नाहीत.

डॉ. मर्सिडिज ओकुमुरा म्हणतात, "जेव्हा तुम्ही प्राचीन मानवानं काढलेली चित्र, खुणा याकडे पाहता, तेव्हा त्यातून काही सांगण्याचा प्रयत्न होताना दिसतो. तुम्ही कोण आहात, तुमचं कुटुंब कोण आहे, तुमचे मित्र कोण आहेत, तुम्ही कोणत्या गटातील आहात हे त्यातून सांगितलं जात होतं."

जगात बोलला गेलेला पहिला शब्द काय होता?

मानवी समूहाची जसजशी वाढ होत गेली तसतसं मानवाला ओळख पटवण्याची आवश्यकता निर्माण झाली. यातूनच पहिल्या शब्दाचा जन्म झाला असावा.

डॉ. नेल्सन म्हणतात, "काही संशोधकांना असं आढळलं आहे की व्हेल मासे त्यांची स्वत:ची खास नावं सांगण्यासाठी गाणी गातात किंवा विशिष्ट प्रकारचे आवाज काढतात. त्यामुळे मानवी समाजाच्या बाबतीत पहिला शब्द असाच काहीतरी असावा. त्याचा वापर स्वत:ची ओळख सांगण्यासाठी करण्यात आला असावा."

जगातील पहिली भाषा कशी होती?

काही तज्ज्ञांना वाटतं की मानवी समाजात भाषेची सुरुवात पूर्व आफ्रिकेतील मानवाच्या उक्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जन्माला आली असावी.

डॉ. मर्सिडिज ओकुमुरा म्हणतात, "काही भाषांमध्ये विशिष्ट आवाज काढले जातात ते इतर भाषांमध्ये आढळत नाहीत."

या विशिष्ट प्रकारे आवाज काढण्यातूनच भाषेचा विकास होत गेला असावा

आज पृथ्वीवर बोलल्या जात असलेल्या सर्वात प्राचीन भाषा कोणत्या आहेत?

जसजसे मानव पृथ्वीवर इतरत्र पसरत किंवा विखुरत गेले, तसतसं भाषेत विविधता निर्माण होऊ लागली. आज जगभरात 7,000 हून अधिक भाषा बोलल्या जातात.

जर आपण सर्वात प्राचीन भाषांचा विचार केला, तर लिहिण्यात आलेल्या सर्वात जुन्या भाषांमध्ये सुमेरियन, इजिप्तशियन, अकेडियन या भाषांचा समावेश होतो.

तामिळ ही आज जगात वापरात असलेली सर्वात जुनी भाषा असल्याचं मानलं जातं. ती भारत, श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये बोलली जाते. तामिळ 2,500 वर्षांहून अधिक जुनी असल्याचं मानलं जातं.

चिनी भाषेची मूळंदेखील हजारो वर्षे जुनी असल्याचं मानलं जातं.

आपण ज्याप्रकारे बोलतो, संभाषण करतो, त्यात सतत बदल होतो आहे. त्यात उत्क्रांती होते आहे.

मानवी भाषेत कशाप्रकारे बदल होतायेत?

डॉ. नेल्सन म्हणतात, "समाजाची रचना जसजशी अधिक गुंतागुंतीची होऊ लागली तसतसं भाषेतही उत्क्रांती झाली, भाषाही विकसित होत गेल्या. आपले पूर्वज खूप बुद्धिमान होते."

"मात्र समाजात माणसं एकमेकांशी ज्याप्रकारे संवाद साधत होती, संभाषण होती ते सर्वात महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, अवजारांबद्दल, फॅशनबद्दल आणि अगदी चारचौघात कसं बसायचं याबद्दल हे संभाषण होत होतं."

आज आपण बोलत असलेल्या विकसित झालेल्या, गुंतागुंतीच्या भाषा हे मानवाचं अतिशय वेगळं असं वैशिष्ट्यं आहे.

डॉ. मर्सिडिज ओकुमुरा म्हणतात, "भाषेमुळे आपल्याला कथा, गोष्टी सांगता येतात. कल्पना करतात येतात आणि त्या व्यक्त करता येतात. आपल्याला संभाव्य भविष्याबद्दल बोलता येतं, चर्चा करता येते."

मानवी समाज जसजसा डिजिटल होत चालला आहे, तसतसं भाषांमध्ये यापूर्वी कधीही झाले नव्हते इतक्या वेगानं बदल होत आहेत. प्रत्येक पिढीबरोबर नवीन शब्द, इमोजी, संकल्पना विकसित होत आहेत.

असं असूनही आपण का संभाषण करतो, बोलतो, यामागचं कारण मात्र बदललेलं नाही. ते म्हणजे एकमेकांशी जोडून घेणं, माहितीचं आदानप्रदान करणं आणि एकमेकांना समजून घेणं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)