कापणीदरम्यान पीक वाया जाऊ नये म्हणून भारतीय शेतकरी करताहेत 'हे' उपाय

फोटो स्रोत, KAPIL JAIN
- Author, प्रिती गुप्ता
- Role, बिझनेस रिपोर्टर, मुंबई
कपिल जैनच्या वडिलांना आपल्या मुलांनी शेतकरी व्हावं असं वाटत नव्हतं.
ते सांगतात, "माझ्या वडिलांनी शेतकर्यांना होणारा त्रास पाहिला होता, म्हणून आम्ही शिकलो आणि व्यवसाय करण्यासाठी शहरात आलो,"
पण कपिल जैन शहरातील जीवनाला कंटाळले आणि त्यांनी 2018 मध्ये गावी परतण्याचा निर्णय घेतला. राजस्थानमधील कोटा जवळ त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. तिथं शेती करण्यासाठी ते आले.
ते सांगतात की "मला समजलं होत, मला मातीचा स्पर्श आवडतो आणि मला गावात परत जाऊन शेती करायची आहे."
गहू, तांदूळ, मोहरी आणि सोयाबीन या पिकांची लागवड त्यांचे वडील करायचे. पण त्यांना ही परंपरागत शेती करायची नव्हती.
एकतर त्यांच्या राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता आहे , हे त्यांनी लक्षात घेतलं. त्यामुळं त्यांनी कमी पाण्यात तग धरेल असं पीक शोधलं.
पारंपारिक पिकांच्या तुलनेत सुर्यप्रकाशात चांगलं वाढणारं आणि तुलनेनं कमी पाण्याची गरज असलेल्या गुलाबांवर प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं.
पण गुलाब चांगलं वाढलं असताना, त्यांची काढणी करणं आणि बाजारात आणणं हे एक आव्हान ठरलं. गुलाब फूल तयार झालं की काही तासांतच विकावं लागतं, नाहीतर त्याच्या पाकळ्या गळायला लागतात.

फोटो स्रोत, KAPIL JAIN
मागणी पूर्ण करण्यासाठी फुलांना विक्रीसाठी पहाटे 5 वाजता बाजारात नेणं आवश्यक होतं. मार्केट फक्त 20 मैल दूर असताना, प्रवासाला एक तास लागू शकतो. त्यामुळं गुलाब फूल ही रात्री 2 ते 3 दरम्यान शेतातून उचलावी लागायची. त्यासाठी कामगार शोधणं कठीण झालं.
कपिल जैन यांनी गुलाबाची शेती केली पण अनुभव नसल्यानं पहिल्या गुलाबाच्या काढणीच्या वेळी त्यांनी 70% पीक गमावलं.
यावर तोडगा म्हणून कपिल जैन यांनी त्यांच्या गुलाबांना गुलाबपाणी आणि गुलाबाच्या तेलात बदलण्याचा निर्णय घेतला.
तसंच, टोमॅटो पिकासाठी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी वाळवण्याची यंत्रणा विकत घेतली.
जैन सांगतात की "आता मी माझी उत्पादनं सुकवतो आणि गुलाबपाणी, गुलाबाचं तेल आणि जाम बाजारात विकतो. त्यांना मोठी बाजारपेठ आणि तो टिकाऊ माल आहे आणि त्यामुळं माझा व्यवसाय वाढण्यास मदत होईल."
कापणी केलेलं उत्पादन चांगल्या स्थितीत बाजारात आणणं हे एक आव्हान आहे. ज्याचा सामना भारतीय शेतकऱ्यांना करावा लागतो.
सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात 6% ते 15% फळं, 5% ते 12% भाजीपाला आणि 4% ते 6% तृणधान्यं गमावली.
रहेजा सोलर फूड प्रोसेसिंगचे संस्थापक वरुण रहेजा म्हणतात, "पायाभूत सुविधांचा अभाव, मर्यादित प्रक्रिया क्षमता... चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि वाहतूक मार्ग विस्कळीत करणारे पूर या कारणामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाला फेकून देतात."
रहेजा निदर्शनास आणून देतात की, बहुतेक भारतीय शेतं लहान आहेत, साठवण किंवा शीतगृहामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधनं नसतात.

फोटो स्रोत, RAHEJA SOLAR
म्हणून रहेजा यांनी एक हवा कोरडी करण्याची प्रणाली विकसित केली, जी उत्पादन वाळविण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे पंखे वापरते. हे तंत्रज्ञान स्वस्त आणि सहज असेंबल होऊ शकेलं असं आहे.
"आमच्या सोलर ड्रायरचे DIY मॉडेल हे पोर्टेबल आणि परवडणारे आहे, ते अगदी दुर्गम गावातही पोहोचू शकतं आणि प्रत्येक लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्याला ते परवडणारे आहे," असं रहेजा सांगतात.
रहेजा सांगतात,त्यांच्या फर्मनं 3,000 सिस्टीम विकल्या आहेत, त्यात महिन्याला सरासरी 150 किलो उत्पादन वाळवता येतं.
रहेजा एक मध्यस्थ म्हणून काम करतात, वाळवलेला शेतमाल विकत घेतात आणि मोठ्या कंपन्यांना विकतात.

फोटो स्रोत, WAYCOOL
एका बाजूला रहेजा यांच्या तंत्रज्ञान आहे तर दुसरीकडे कृषी तंत्रज्ञान कंपनी वेकूल (Waycool) आहे.
ही भारतीय कृषी तंत्रज्ञान कंपनी 200,000 शेतकऱ्यांसोबत काम करते, 412 वितरण केंद्रांची मालकी आहे आणि कृषी उत्पादनांच्या मागणीचा अंदाज घेणाऱ्या अत्याधुनिक प्रणालींमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे.
दररोज अंदाजे 2,000 टन ताजी फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स , मसाले, दुग्धजन्य पदार्थ या कृषी मालाची दररोज, त्यांच्या नेटवर्कमधून वाहतूक होते.
वेकूल (WayCool ) नं एकत्रित केलेल्या डेटा विश्लेषणामुळं आणि त्यांच्या आधुनिक वितरण प्रणालीमुळं भारतातील
कृषी उत्पादनाची नासाडी टाळण्यास मदत झाली आहे.
वेकूल फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्तिक जयरामन म्हणतात की, "आम्ही किरकोळ विक्रेत्याच्या मागणीचा अंदाज लावण्यासाठी, संकलन केंद्रांचा योग्य वापर करण्यासोबत, मालाच्या किमती निश्चित करणं, पुरवठा साखळी कार्यक्षम बनवण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील तोटा 2% च्या खाली आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतो,"
वेकूल (WayCool) नं त्याचं नेटवर्क तयार करण्यासाठी लाखो डॉलर्स उभे केले आहेत आणि या गुंतवणूकीतून 2025 पर्यंत कंपनीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
कमी आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचं इनोवेशन असूनही ते भारतातील अति दुर्गम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून बरंच काम करणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, SAGAR LOKHANDE
सागर लोखंडे यांची महाराष्ट्रतील भेंडवड गावात 15 एकर शेती आहे. ते ऊस पिकवतात कारण त्याची शेल्फ लाइफ अधिक असते. दरम्यान टोमॅटो, फरसबी आणि भाज्या ही नगदी पिकं म्हणून घेतली जातात.
मे महिन्यात त्यांच्याकडे टोमॅटो आणि सोयाबीनचं चांगलं पीक आलं होतं, परंतु त्यांची पिकं बाजारात येईपर्यंत राज्यभरातून शेतमालाचे ट्रक आले आणि भावही उतरले.
पण साठवणुकीची कोणतीही सोय नव्हती म्हणून त्याला शेतमाल कमी भावात विकावा लागला. त्यामुळं त्यांना तोटा झाला होता.
"मी हिरव्या भाज्या पिकवतो, पण आमच्याकडे तापमान नियंत्रतीत ठेवणारी व्हॅन नसल्यामुळं तो शेतमाल मी शहरात पाठवू शकत नाही, कारण नाहीतर सर्व उत्पादन खराब होईल," असं लोखंडे सांगतात.
आता त्यांचं उत्पादन फ्रोजन कसं करता येईल, याचा ते तपास करत आहे.
"मला फ्रोजन भाज्यांची विक्री सुरू करायची आहे ज्याच शेल लाइफ जास्त आहे, विशेषत: फ्रोजन फरसबी, ज्यांना चांगली किंमत मिळते, त्यामुळं मी माझे सर्व कर्ज फेडू शकेन आणि त्याच वेळी अधिक पैसे कमवू शकेल."
मार्केला डिसोझा या सेंटर फॉर रेसिलिअन्स स्टडीजच्या संचालक आहेत आणि त्यांनी भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत अनेक दशकं काम केलं आहे.
त्या सांगतात की, "हे (तंत्रज्ञान) नियोजन, संसाधनांचा वापर, निर्णय घेणं, शेतीशी संबंधित अनेक प्रक्रियांसाठी समन्वय हा यामध्ये कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणू शकतं,"
पण भारतीय शेतकर्यांसाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसं नाही, असं त्या सांगतात.
" पर्यावरणातील नैसर्गिक घटकांचं पुनरुज्जीवन करण्याबरोबरच, यशस्वी शेतीसाठी पारंपारिक ज्ञानाची मदत, कर्ज आणि इतर घटकही तितकेच महत्त्वाचे ठरतात.”
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








