अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर कोण होईल दिल्लीचे मुख्यमंत्री? सुनीता केजरीवाल की आतिशी?

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी हिंदी

13 सप्टेंबर 2024 चा दिवस, दिल्लीच्या तिहार जेलबाहेर संध्याकाळी लोकांची गर्दी जमली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आणि तीन महिन्यानंतर ते तुरुंगाबाहेर आले.

यावेळी तुरुंगाबाहेर जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या नेत्याला तीन महिन्यानंतर पाहण्याचा उत्साह दिसून येत होता.

तुरुंगाबाहेर येताच केजरीवाल यांनी बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी, लोकांशी संवाद साधला. ‘जेल की सलाखें केजरीवाल के हौसले को कम नहीं कर सकीं’, म्हणत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

तुरुंगाबाहेर आल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाच्या दिल्ली कार्यालयाबाहेर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गर्दी जमली.

यावेळी अरविंद केजरीवालसह पक्षाचे इतर वरिष्ट नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित करताना एक घोषणा केली.

केजरीवाल म्हणाले, “मित्रांनो! येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे,” या घोषणेने आपच्या कार्यकर्त्यांपासून तर विरोधकांपर्यंत सर्वांना धक्का बसला. गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील वातावरण तापलं असून मुख्यमंत्रिपदाचा पुढचा चेहरा कोण? अशा चर्चांना पेव फुटलंय.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांनी राजीनाम्याबाबतची घोषणा करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘नाही’ चा सूर लावला. यावर ‘जनता त्यांचा निर्णय देत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही,' असं केजरीवाल म्हणाले.

फेब्रुवारी 2025मध्ये दिल्लीची निवडणूक आहे. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीबरोबर करण्यात यावी अशी मागणी, त्यांनी आपल्या संभाषणातून केली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

“येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. दिल्लीत निवडणुका होईपर्यंत दुसरा नेता मुख्यमंत्री बनेल,” असंही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली.

मद्यधोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यापासूनच भाजपकडून केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा अनेकदा उपस्थित करण्यात आला. या मागणीसह केजरीवाल यांची जागा कोण घेणार, अशा चर्चा सुरू झाल्या?

मात्र, आता खुद्द केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या संभावित दावेदारांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्यातील काहींबाबत जाणून घेऊयात.

सुनीता केजरीवाल

सुनीता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत. 2016 साली त्यांनी शासकीय नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी सुनीता केजरीवाल यांची राजकीय वर्तुळात फारशी चर्चा नव्हती. मात्र केजरीवाल यांच्या अटकेनंतर अचानक राजकारणात सक्रियता वाढल्याने सुनीता केजरीवाल प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

31 मार्च 2024 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधी पक्षाच्या संयुक्त रॅलीला संबोधित करताना असो किंवा वेळोवेळी केजरीवालांशी संबंधित माहिती देताना असो, सुनीता केजरीवाल यांचं नाव वेळोवेळी माध्यमांत येत राहिलं.

दरम्यान, त्यांनी अनेक प्रसंगी पंतप्रधान मोदींना थेट प्रश्नही विचारले. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत सुनीता केजरीवाल या एक प्रमुख चेहरा म्हणून पुढे आल्या.

निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल
फोटो कॅप्शन, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल

लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या प्रचारासह रोड शोदेखील केले. या व्यतिरिक्त काही प्रसंगी त्यांनी आमदारांच्या बैठकाही घेतल्या.

हरियाणा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने त्यांच्या स्टार प्रचारकांसाठी 40 नेत्यांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत सुनीता केजरीवाल यांचे नाव अरविंद केजरीवाल यांच्यानंतर म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर होते. यावरूनच पक्षातील त्यांच्या उंचीचा अंदाज लावता येईल.

तर, दुसरीकडे सुनीता केजरीवाल यांचे नाव घेऊन भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातोय.

भाजप नेत्यांनी त्यांना ‘दिल्लीच्या राबडी देवी’ देखील म्हटले आहे. मात्र, केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत सुनीता केजरीवाल यांना जनतेत यावे लागले, असं आम आदमी पार्टीकडून सांगण्यात आलं आहे.

आतिशी

आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचा एक ओळखीचा चेहरा बनण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या आतिशी या मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानल्या जात आहेत.

दिल्लीतील कालकाजी येथील आमदार आतिशी यांच्याकडे सध्या शिक्षण आणि सामाजिक बांधकाम या सारखी महत्त्वाची खाती आहेत. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्रिपद सोडले आणि त्यानंतर आतिशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.

अरविंद केजरीवाल हे दिल्ली मॉडेलबद्दल बोलताना शिक्षण मंत्रालय हा एक मजबूत स्तंभ असल्याचं म्हणतात. दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षाचे नेते अनेकदा दिल्लीच्या सरकारी शाळांचे कौतुक करतात.

आतिशीचा जन्म दिल्लीतील एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचं कॉलेजपर्यंतचे शिक्षण दिल्लीतूनच झालं आहे पुढे त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या.

आतिशी दिल्ली सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत
फोटो कॅप्शन, आतिशी दिल्ली सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत

2012 मध्ये पक्षाची स्थापन झाली, आतिशी या 2019 साली सक्रिय राजकारणात आल्या. त्यावेळी पक्षाने आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती.

यात आतिशी यांचा या निवडणुकीत 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला, त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.

मात्र, पुढच्या वर्षी कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. तीन वर्षांनंतर मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनल्या.

संजय सिंह

रस्त्यावरील आंदोलन असो वा आम आदमी पक्षातर्फे संसदेत भाषण असो, एक चेहरा नेहमी समोर येतो तो म्हणजे संजय सिंह यांचा.

विरोधी पक्षनेत्यांशी सुसंवाद निर्माण करणे असो वा संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे असो, संजय सिंह नेहमीच पक्षाच्या बाजूने पुढे राहिले आहेत.

राज्यसभेतील त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (2018-2024) अनेक प्रसंगी केजरीवाल यांचे जवळचे मानले जाणारे संजय सिंह हे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत येत राहिले.

आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांचे नावही चर्चेत आहे
फोटो कॅप्शन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांचे नावही चर्चेत आहे

उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथील संजय सिंह हे 2011 साली केजरीवाल यांच्यासोबत अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान रामलीला मैदानावरील व्यासपीठावर उपस्थित काही निवडक नेत्यांपैकी ते एक होते.

2012 मध्ये पक्षाची स्थापना झाली आणि 2020 पर्यंत त्यांना राज्यसभा खासदार असण्यासोबतच दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.

केजरीवाल यांच्या सर्वांत विश्वासू नेत्यांपैकी एक असल्याने आणि संजय सिंह हे देखील एक प्रमुख दावेदार असल्याचे दिसून येते. मात्र, कथित मद्यधोरण घोटाळ्यात तुरुंगात जावे लागल्याने त्यांच्या नावाची शक्यता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीनंतरच ते आणि मनीष कोणतेही पद सांभाळतील, असे केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अशा परिस्थितीत संजय यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता कठीण वाटते आहे.

सौरभ भारद्वाज

कधीकाळी अमेरिकेत इंजीनिअरची नोकरी करणारे सौरभ भारद्वाज हे आज केजरीवाल यांच्या सर्वांत विश्वासू व्यक्तींपैकी एक मानले जातात.

या विश्वासावर सौरभ यांना दिल्ली सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं होतं. सध्या त्यांच्याकडे गृह, जल, विद्युत, आरोग्य, उद्योग आणि नगरविकास सारख्या प्रमुख मंत्रालयाचा पदभार आहे.

मुळचे दिल्लीचे सौरभ भारद्वाज हे सलग तीनवेळा ग्रेटर कैलास विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2013-2014 साली सौरभ यांनी 49 दिवसांच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे सध्या दिल्ली सरकारचे नेते आहेत.
फोटो कॅप्शन, आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे सध्या दिल्ली सरकारमध्ये नेते आहेत.

सौरभ भारद्वाज हे टीव्हीवर आम आदमी पार्टीची बाजू भक्कमपणे मांडतानाही दिसतात.

यावर्षी, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर, आम आदमी पार्टीने मंत्रिपदासाठी ज्या नेत्यांवर विश्वास टाकला होता त्यातील एक नाव हे सौरभ भारद्वाज यांच होतं. आता हा आत्मविश्वास त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत नेऊ शकेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कैलाश गेहलोत

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत अरविंद केजरीवाल यांच्या जागी मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

कैलाश गेहलोत हे नजफगढचे विद्यमान आमदार असून त्यांच्याकडे परिवहन विभागाव्यतिरिक्त महसूल, कायदा, न्याय आणि विधिमंडळ व्यवहार, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रशासकीय सुधारणा ही खाती आहेत.

कैलाश गेहलोत यांच्याकडे परिवहन मंत्रालयासह अनेक खाती आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कैलाश गेहलोत यांच्याकडे परिवहन मंत्रालयासह अनेक खाती आहेत.

मात्र, मद्यधोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मार्चमध्ये त्यांची चौकशी केली होती. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीपर्यंतचा मार्ग त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नसेल.

वरील सर्व नावांपैकी कोणाला संधी मिळते की इतर कोणाच्या पदरात ही संधी पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.