अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानं हरियाणा विधानसभा निवडणुकीची गणितं बदलतील?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हिमांशु दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. त्यातील येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागून आहे.
हरियाणातील या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असली तरी जननायक पार्टी (जेजेपी) , इंडियन नॅशनल लोकदल पार्टी (इनॅलो) आणि आम आदमी पार्टी या पक्षांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.
सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक असेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.
त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज असतील. एकूणच आप आणि केजरीवाल आणि हे संपूर्ण प्रकरण याचा हरियाणाच्या निवडणुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो.
केजरीवालांच्या उपस्थितीत होणाऱ्या हरियाणा निवडणुकीत आम आदमी पार्टीची कामगीरी कशी राहील, याविषयी बीबीसीने काही पत्रकारांसोबत चर्चा केली.
आम आदमी पार्टीचा हरियाणात प्रभाव आहे का ?
2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीने 46 जागा लढवल्या होत्या. पण, त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नव्हतं. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही 'आप'ला केवळ 3.94 टक्के एवढीच मतं मिळाली होती.
अरविंद केजरीवालांच्या पत्नी हरियाणात प्रचार करत आहेत. केजरीवालांची सुटका झाल्याचा उल्लेख त्या भाषणांत वारंवार करत आहेत.
आगामी विधानसभेच्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरू असून निवडणूक स्वबाळवर लढण्याची पक्षाची रणनिती दिसून येते.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात पक्षाचा प्रभाव कसा राहील? याबाबत वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र सिंह भदौरिया म्हणाले की, "आम आदमी पार्टीची हरियाणामध्ये विशेष शक्ती नाही, याची पक्षालाही पूर्ण कल्पना आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना एक टक्काही मतं मिळाली नव्हती."
"या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आम आदमी पार्टीने 10 जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने त्यांना केवळ 5 जागा देऊ केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत.
आम आदमी पार्टीनं 90 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला असला, तरी ते त्यांच्यासाठी तेवढं सोपं नाही."
जामीनाचा फायदा होणार का ?
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांना जामीन मिळाल्याचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होईल का? या प्रश्नावर भदौरिया म्हणाले की, "आम आदमी पार्टीनं केजरीवालांच्या नेतृत्वात 360 ते 380 सभा घेण्याचं ठरवलं होतं.
आज 13 तारिख आलीय. त्यामुळं वेळेअभावी आता त्यांच्या सभा फारच कमी होतील. मात्र, केजरीवाल हरियाणात सभा घेतील हे मात्र नक्की. कारण ते बनिया समाजाचे आहेत आणि राज्यात बनिया समाजाची मतं वळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल."
"तरुण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते आतापर्यंत राजकारण करत आले आहेत. यावेळीही त्यांचा तोच प्रयत्न असेल. त्यात भाजपच्या बंडखोरांनाही आम आदमी पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळं त्यांचा प्रभाव नक्कीच जाणवेल."


आम आदमी पार्टी राज्यात इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टीपेक्षाही लहान पक्ष असल्याचं भदौरिया सांगतात.
तर वरिष्ठ पत्रकार दयाशंकर मिश्र यांच्या मते, आम आदमी पार्टीसाठी अरविंद केजरीवालांची सुटका एक नवसंजीवनी ठरेल.
त्यांच्या मते, अरविंद केजरीवालांचा प्रभाव दिल्लीसोबतच हरियाणामध्येही जाणवतो. अशात जर ते हरियाणा निवडणुकीच्या प्रचारात उतरले तर भाजपविरोधात चांगलंच वातावरण तापवू शकतात.
दयाशंकर मिश्र यांच्या मते, "मी अनेक ठिकाणी फिरलो. हिंदी भाषीक पट्ट्यात राहुल गांधींनंतर अरविंद केजरीवालांचीच चर्चा होताना दिसते. कारण केजरीवाल वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहतात.

फोटो स्रोत, Getty Images
आपण जनतेच्या विकासाचेच राजकारण करतो, हे पटवून देण्यात ते यशस्वी राहीले आहे. मात्र, त्यांना कायम अडचणीत आणलं जातं.
अडचणीत आणल्यानं अरविंद केजरीवालांच्या लोकप्रियतेत घट होईल असं, प्रत्येक वेळी वाटतं. मात्र, तसं घडताना दिसत नही. यावेळीही तुरूंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवालांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच जाणार आहे."
राज्यातील जेष्ठ पत्रकार मुकेश तिवारी मात्र या मतांशी सहमत नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी केजरीवाल यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली होती. असं अतानाही दिल्ली आणि पंजाबमध्ये निकालावर फारसा परिणाम झालेला दिसला नाही, असं ते म्हणाले.
हरियाणा निवडणुकीतही यापेक्षा वेगळं चित्र नसेल. पक्षाच्या दृष्टीनं विचार केल्यास केजरीवालांमुळं पक्षाला नक्कीच नवी उभारी मिळेल. कारण ते पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत.
पण मुळातच हरियाणामध्ये आम आदमी पार्टीला फारसा जनाधार नसल्यामुळं केजरीवालांची उपस्थिती राज्याच्या निवडणुकीवर तितकासा परिणाम करणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
काँग्रेससोबत युतीची शक्यता नाही
2024 लोकसभा निवडणुकीवेळी हरियाणात काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सोबत लढले होते. अर्थात आम आदमी पार्टीने एकच जागा लढवली होती. प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता हे कुरुक्षेत्र मतदारसंघात उभे होते.
यावेळी मात्र आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
यामुळं होणाऱ्या परिणामांबाबात बोलताना पत्रकार धर्मेंद्र सिंह भदौरिया म्हणाले की, "यामुळं नक्कीच भाजपपेक्षा काँग्रेसचंच अधिक नुकसान होईल. मात्र, आम आदमी पार्टीचा जनाधार तितकासा नसल्यानं ते काँग्रेसच्या जिंकणाऱ्या जागांवर परिणाम करणार नाही.
त्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपेंदर हुड्डा, रणदीप सुरजेवाला यांनी युती करण्यास विरोध केला आहे. जर पक्षाला फायदा होणार असता तर त्यांनी विरोध केलाच नसता."

फोटो स्रोत, ANI
दयाशंकर मिश्र यांच्या मते, काँग्रेसची आम आदमी पार्टीसोबत युती होत नसली तरीही केजरीवालांच्या सुटकेचा फायदा काँग्रेसलाच अधिक होईल.
"हरियाणात इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणजेच प्रामुख्याने काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगवेगळे लढत असले तरीही अरविंद केजरीवालांच्या सुटकेचा फायदा काँग्रेसलाच अधिक होईल.
आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रत्येक जागेवर आव्हान देण्याइतपत सक्षम नाहीत. केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मतांचा टक्का कायम ठेवण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीने नाईलाजाने सर्व जागेंवर उमेदवार उभे केले आहेत," असं ते म्हणाले.
हरियाणा विधानसभेचा रणसंग्राम
हरियाणा विधानसभेत एकूण 90 जागा आहे.
2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुका भाजपनं जिंकल्या असून गत 10 वर्षांपासून ते सत्तेत आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 40 तर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पक्षाच्या पाठींब्याने सरकार स्थापन केलं होते.

फोटो स्रोत, ANI
यावेळी मात्र भाजप आणि जेजेपी वेगळे झाले आहेत. चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीसोबत जेजेपीने युती केली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हरियाणात येत्या 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 8 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











