अरविंद केजरीवाल 2 दिवसांनंतर देणार दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; म्हणाले, 'जनतेच्या न्यायालयात जाणार'

फोटो स्रोत, ANI
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांनंतर राजीनामा देणार असल्याचं केजरीवालांनी सांगितलं.
आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली.
आता आपण जनतेच्या न्यायालयात आलो असून, तुम्हीच ठरवा मी गुन्हेगार आहे का, अशी भावनिक साद अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्ते आणि जनतेला घातली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. जनता त्यांचा निर्णय देत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. प्रत्येक गल्लीबोळात जाईन, प्रत्येक घरात जाईन आणि जोपर्यंत जनता सांगत नाही की, केजरीवाल प्रामाणिक आहे, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही."
पुढचा मुख्यमंत्री कोण? आतिशी म्हणाल्या...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याविषयी दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या आतिशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आतिशी म्हणाल्या आहेत, “पुढचा मुख्यमंत्री कोण होईल हे आमदार ठरवतील."
आतिशी पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री कोण होतं हे महत्त्वाचं नाही. तर महत्त्वाचं हे आहे की जोवर आम आदमी पक्ष सरकारमध्ये असेल तोवर दिल्लीच्या जनतेसाठी काम करत राहील.”

फोटो स्रोत, ANI
याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, “मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे आणि जोवर जनता आपला निर्णय देत नाही तोवर मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही.”
राज्यपालांना पत्र लिहिले तर धमकी मिळाली...
दिल्लीत आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, “मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता त्यांचा निर्णय सुनावत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही.”
भाषणाच्या सुरुवातीला केजरीवाल म्हणाले की, "मी तुरुंगात असताना लाखो लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुरुंगात मला वाचायला भरपूर वेळ मिळाला. मी रामायण, महाभारत आणि गीता वाचली. मी तुरुंगात भगतसिंह यांची डायरीही वाचली."

फोटो स्रोत, ANI
केजरीवालांनी उपराज्यपालांवरही आरोप केला. "मी एलजींना पत्र लिहून माझ्या जागी आतिशी यांना ध्वज फडकावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यावर मला धमकी मिळाली की, परत पत्र लिहिलं तर तुम्हाला कुटुंबाला भेटू देणार नाही."
अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारवरही आरोप केला. आम आदमी पक्षाचं खच्चीकरण करणं हाच मला तुरुंगात पाठवण्यामागचा उद्देश होता, असं केजरीवाल म्हणाले. पण तुरुंगातील दिवसांनी मी आणखी मजबूत झालो.
ते म्हणाले की, "मी तुरुंगातून राजीनामा दिला नाही, कारण मला देशातील लोकशाही अधिक मजबूत व्हावी असं वाटत होतं. तुरुंगातूनही सरकार चालवता येतं, हे मी दाखवून दिलं असं केजरीवाल म्हणाले.
भाजपने काय म्हटले?
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची राजीनामा देण्याची घोषणा हा त्यांचा ‘पीआर स्टंट’ असल्याची खोचक टीका भाजपने केलीय.
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, हा केजरीवाल यांचा पीआर स्टंट आहे. दिल्लीच्या जनतेपुढे त्यांचा प्रामाणिकपणाचा बुरखा फाटला असून, भ्रष्टाचारी नेत्याचा चेहरा समोर आला आहे, हे त्यांना समजलं आहे, असंही भंडारी म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
आम आदमी पार्टी देशभरात भ्रष्टाचारी पार्टीच्या रुपानं ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळं केजरीवाल अशाप्रकारची स्टंटबाजी करून मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करू पाहताहेत. मात्र, दिल्लीची जनता सुज्ञ आहे, असंही त्यांनी म्हटलं.
"केजरीवाल म्हणतात की त्यांचं बँक बॅलेन्स शून्य आहे, मग त्यांनी इतका मोठा शीश महाल कसा उभा केला. ते म्हणतात की, ते दिल्लीच्या प्रत्येक गल्लीबोळात जाईन, प्रत्येक घरात जाईन आणि जनता सांगत नाही केजरीवाल प्रामाणिक आहे, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. याचाच अर्थ ते सोनिया गांधींचं मॉडल आत्मसात करू पाहताहेत."
"तिसरी गोष्ट अशी की, आम आदमी पार्टी दिल्लीची निवडणूक हरणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं असून आता जनता त्यांना मत देणार नाही याची जाणीव झाल्यानं ते विविध मार्गाने लोकांना भूरळ घालताहेत. मात्र या तिन्ही गोष्टी जनतेच्या लक्षात आल्या असून दिल्लीची जनता आता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही," असंही भंडारी म्हणाले.
भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले, 'आज उत्सवाचा दिवस'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन-तीन दिवसांत राजीनाम्या देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप नेता कपिल मिश्रा यांनी एका व्हिडियोद्वारे त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
कपिल मिश्रा आधी आम आदमी पक्षातच होते, मात्र त्यांनी पुढे भाजपची कास धरली.
कपिल मिश्रा म्हणाले आहेत की, “अखेर एका भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्याला खुर्ची सोडावी लागते आहे. दिल्लीच्या जनतेचा हा विजय आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे. आम्ही म्हटलं होतं ना, भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल.”
ते पुढे असं म्हणाले की हे दुसरे मुख्यमंत्री आहेत ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागतो आहे - ‘पहले शीला हारी है अब केजरीवाल की बारी है.’
कपिल मिश्रांनी केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे की, “ते जेलमध्ये गेल्यानंतरही राजीनामा द्यायला तयार नव्हते. मी जेलमधूनच सरकार चालवेन असं म्हणत होते. आता सुप्रीम कोर्टाचा दणका बसला आहे. त्यांना खुर्ची सोडावी लागते आहे, राजीनामा द्यावा लागतो आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
लोकसभा निवडणुकींचा उल्लेखही मिश्रा यांनी केला, “ते म्हणतायत की आम्ही जनतेमध्ये जाऊ, जनतेशी बोलू की केजरीवाल यांच्या इमानदारीसाठी मत द्या. याच मुद्द्यावर त्यांनी आता दोन महिन्यांपूर्वी प्रचार केला होता.
“पण लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेनं जनादेश देत दाखवलं आहे की त्यांच्यामते केजरीवाल बेईमान आणि चोर आहेत. त्यांना केजरीवालांना तुरुंगात पाहायचं आहे. निवडणूक नोव्हेंबर मध्ये होवो वा फेब्रुवारीत, केजरीवाल पुन्हा कधी परतणार नाहीत, असा माझा दावा आहे. भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीकरांच्या लढाईत आज ऐतिहासिक विजय मिळाला आहे.”
प्रकरण काय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन अबकारी धोरणात (मद्यधोरण) भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपावरून ईडीनं 21 मार्चला अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली होती.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 10 मे रोजी निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांचा जामीन मंजूर केला होता. याच जामिनाचा कालावधी संपल्यानंतर अरविंद केजरीवाल 2 जूनला तुरुंगात परतले होते.
मद्यधोरण किंवा नवीन अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर झालेले आरोप, ईडीनं केलेली कारवाई, अटक आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडीत नेमकं काय काय घडलं? याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

फोटो स्रोत, X/AAP
मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्लीत नवीन अबकारी धोरण लागू करण्यात आलं होतं. मद्य माफियांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणि सरकारचा महसूल वाढवणं ही दोन कारणं त्यासाठी सिसोदिया यांनी दिली होती.
पण हे धोरण लागू करताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. दिल्ली सरकारची दिल्लीतील मद्य व्यवसायातील भागीदारी संपवून खाजगी कंपन्यांना फायदा करून देणं हा या धोरणाचा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आला होता.
नव्या मद्य धोरणाअंतर्गत होम डिलिव्हरीसह इतर नव्या सुविधांचाही समावेश करण्यात आला होता. तसंच मद्य विक्रेत्यांना मद्याच्या किंमतीवर सूट देण्याची किंवा दर ठरवण्याची परवानगीही दिली होती.
या सर्वामुळं दिल्ली सरकारला मोठा तोटा झाला आणि महसुलामध्ये घट झाल्याचा आणि दिल्ली सरकारनं यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणी 21 मार्चला केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 13 सप्टेंबरला न्यायालयानं त्यांना जामीन दिला होता.
बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











