50 रुपये पगार असलेले मोहन सिंह जगभरातील 35 लक्झरी हॉटेलांचे मालक कसे झाले?

फोटो स्रोत, OBEROI GROUP
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक
- Reporting from, लाहोर
मोहन सिंह ओबेरॉय यांना दहा फूट रुंद आणि तितकंच लांब घर ब्रिटिशकालीन भारताची उन्हाळी राजधानी असलेल्या शिमला इथं हॉटेलमध्ये काम करताना मिळालं.
'दी सेसल' नावाच्या या हॉटेलमध्ये त्यांना कोळशाचा हिशोब ठेवायचा होता. ज्या टेकडीवर हे भव्य हॉटेल वसलं होतं, त्या टेकडीच्या अगदी पायथ्याशी त्यांना हे घर दिलं होतं. ते दिवसातून दोनदा ही टेकडी चढायचे, सकाळी कामावर यायचे आणि दुपारी पत्नी ईशरान देवी यांनी शिजवलेलं साधं जेवण खाऊन परतायचे.
त्यांचा पगार 50 रुपये होता, म्हणजे 1922 मध्ये झेलम (आता पाकिस्तानी पंजाबमधील चकवाल) येथील बहवन शहरातून जात असताना त्यांच्या आई भागवंती यांनी त्यांना दिलेल्या रकमेच्या दुप्पट.
मोहन सिंह हे सहा महिन्यांचे असताना त्यांचे व्यवसायाने कंत्राटदार असलेले वडील अतर सिंह यांचं निधन झालं होतं.
पत्रकार आणि मोहन सिंह ओबेरॉय यांचे चरित्रकार बाची कर्करिया लिहितात, "त्यांची आई, ज्या फक्त सोळा वर्षांच्या होत्या, टोमण्यांना कंटाळल्या आणि एका रात्री आपल्या छोट्या मुलाला उचललं आणि बारा किलोमीटर चालत माहेरी पोहचल्या."
गावातील प्राथमिक शिक्षणानंतर मोहन सिंह यांनी रावळपिंडी येथून मॅट्रिक केलं. ते लाहोरमध्ये शिक्षण घेत होते, पण आर्थिक अडचणींमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत.
नोकरीसाठी हे शिक्षण कमी आहे हे लक्षात घेऊन, मित्राच्या सांगण्यावरून ते अमृतसरला त्यांच्यासोबत राहून शॉर्टहँड आणि टायपिंगचा कोर्स केला. तरीही काम मिळालं नाही. त्याच्या काकांनी त्याला लाहोरमधील त्याच्या शूजच्या कारखान्यात नोकरी दिली परंतु लवकरच पैशाअभावी कारखाना बंद पडला आणि मोहन सिंह यांना त्यांच्या गावी परत जावं लागलं.
त्याचा विवाह अश्नाक रॉय यांच्या मुलीशी ( ईशरान देवी) झाला. लग्नानंतरचे दिवस त्यांनी सरगोधा येथील मेव्हण्याच्या घरी घालवले.
प्लेग महामारी
ते बहवन इथं परतले तेव्हा तिथे प्लेगची साथ पसरली होती. त्याच्या आईने त्यांना सरगोधाला परत जाण्याचा सल्ला दिला पण त्याचवेळी त्यांना एका सरकारी कार्यालयात कनिष्ठ लिपिकाच्या नोकरीसाठी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिसली. आईनं दिलेले 25 रुपये खिशात ठेवले आणि नोकरीसाठी ते परीक्षा देण्याकरीता पावणे चारशे किलोमीटर दूर असलेल्या शिमला इथं गेले.
मोहन सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या परीक्षेत नापास झाल्यानंतर एके दिवशी ते निराश होऊन हॉटेल 'दी सेसल' जवळून जात होते आणि अचानक त्यांना आत जाऊन नशीब आजमावण्याची इच्छा झाली.
"असोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडियाच्या मालकीच्या या उच्च दर्जाच्या हॉटेलचे व्यवस्थापक दयाळू इंग्रज होते. नाव होतं डी डब्ल्यू ग्रूव. त्यांनी मला बिलिंग क्लार्क म्हणून 40 रुपये प्रति महिना कामावर ठेवलं."
मोहन सिंह ओबेरॉय यांनी त्यांच्या आयुष्यातील या सर्व गोष्टी 1982 मध्ये संशोधक गीता पिरामल यांच्यासोबत शेअर केल्या होत्या.
"जेव्हा सेसलचं व्यवस्थापन बदललं, तेव्हा अर्नेस्ट क्लार्क हे मॅनेजर झाले. मला स्टेनोग्राफी माहित होती, म्हणून क्लार्क यांनी मला कॅशियर आणि स्टेनोग्राफरचं पद दिलं."
"एक दिवस पंडित मोतीलाल नेहरू सेसलमध्ये राहिले. ते स्वराज पक्षाचे नेते होते. पंडितजींना एक महत्त्वाचा अहवाल पटकन आणि काळजीपूर्वक टाईप करायचा होता. रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी मी रात्रभर जागा राहिलो आणि दुसर्या दिवशी सकाळी त्यांना दिला. त्यांनी 100 रुपयांची नोट काढली आणि मला आभार म्हणून दिली."
"माझ्या डोळ्यात अश्रू तरळले आणि मी पटकन खोलीतून बाहेर पडलो. शंभर रुपये, जे श्रीमंत लोक फेकतात, ते माझ्यासाठी खूप होते. रुपयाची क्रयशक्ती इतकी जास्त होती की मी माझ्या पत्नीसाठी घड्याळ, माझ्या मुलासाठी कपडे आणि स्वतःसाठी एक रेन कोट विकत घेतला."
शिमला येथील कार्लटन हॉटेल
जेव्हा क्लार्क यांचा असोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडियाशी करार संपला तेव्हा त्यांनी दिल्ली क्लबसाठी केटरिंगचं कंत्राट घेतलं. मोहन सिंह यांनीही त्यांच्याकडून नोकरीची ऑफर स्वीकारली. त्यांचा पगार आता महिन्याला शंभर रुपये झाला होता. दिल्ली क्लबचा करार केवळ एका वर्षासाठी होता आणि लवकरच क्लार्क यांनी नवीन व्यवसाय शोधण्यास सुरुवात केली.
शिमल्यातील कार्लटन हॉटेल बंद पडल होतं. क्लार्क यांना ते भाडेपट्टीने घ्यायचं होतं, पण जामीनदार हवा होता.
मोहन यांनी पिरामल यांना सांगितलं की, "मी माझ्या काही श्रीमंत नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधला. कार्लटन आता क्लार्क हॉटेल बनलं होतं. पाच वर्षानंतर क्लार्क याने निवृत्त होऊन हॉटेल विकण्याचा निर्णय घेतला. हॉटेलची परंपरा आणि सादरीकरण टिकवून ठेवू शकणार्या एखाद्याला हॉटेल चालवायला द्यायला आवडेल असं सांगून त्यांनी मला ऑफर दिली."
"आवश्यक रक्कम उभी करण्यासाठी मला माझी काही मालमत्ता आणि माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. मी क्लार्क हॉटेलची मालकी एका दयाळू काकांच्या मदतीनं घेतली, जे आधीपासून माझ्या पाठीशी उभे होते."

फोटो स्रोत, OBEROI GROUP
14 ऑगस्ट 1934 पर्यंत मोहन सिंह हे दिल्ली आणि शिमला येथील क्लार्क यांच्या हॉटेलांचे एकटे मालक बनले होते.
मोहन सिंह आणि त्यांच्या पत्नीनं स्वतः हॉटेलसाठी मांस आणि भाजीपाला खरेदी केला. त्यामुळे बिल पन्नास टक्क्यांनी कमी झालं.
हळूहळू दार्जिलिंग, चंदीगड आणि काश्मीरमध्ये हॉटेल्सचा विस्तार झाला.
मोहन सिंह म्हणाले, "मी माझं स्वतःचं हॉटेल बनवण्याचा विचार करू लागलो आणि पहिला प्रयत्न म्हणजे ओडीशा येथील गोपाळपूर ऑन सी येथीस एक छोटसं हॉटेल होतं."
ते म्हणाले की, हा एक विचित्र योगायोग आहे की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वळण कोणत्या ना कोणत्या महामारीशी संबंधित होतं.
कोलकात्यात कॉलरा पसरला
1933 मध्ये कोलकातामध्ये कॉलराची साथ पसरली होती. अर्मेनियन रिअल इस्टेट टायकून स्टिफन अराथोनचे ग्रँड हॉटेल शंभरहून अधिक परदेशी पाहुण्यांच्या मृत्यूनंतर बंद करण्यात आलं. लोक कोलकात्याला जायला घाबरत होते. विश्वासाने आणि दृढनिश्चयाने त्यांनी या हॉटेलला अतिशय फायदेशीर व्यवसाय योजनेत रूपांतरित करण्यात यश मिळविलं.
1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानं कोलकाता सैनिकांनी भरून गेलं. ब्रिटिश सैन्य मुक्कामासाठी जागा शोधत होतं.
मोहन सिंह म्हणाले, "मी ताबडतोब पंधराशे सैनिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रति व्यक्ती दहा रुपये भाडे देऊन केली. मी मिस्टर ग्रोव्ह यांना माझे मॅनेजर म्हणून दीड हजार रुपये मासिक पगारावर नियुक्त केलं, त्यांनी मला सेसल हॉटेलमध्ये माझ्या पहिल्या नोकरीसाठी महिना पन्नास रुपये पगार दिला होता."

फोटो स्रोत, OBEROI GROUP
हे हॉटेल चालवणं हा त्याच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा होता. 1941 मध्ये, भारतीय हॉटेल उद्योगातील त्यांच्या सेवेबद्दल भारत सरकारनं त्यांना राय बहादुर ही पदवी दिली.
1943 मध्ये, मोहन सिंह यांनी असोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडिया लिमिटेडचे शेअर्स विकत घेतले आणि रावळपिंडी, पेशावर, लाहोर, मरी आणि दिल्ली इथं बांधलेल्या हॉटेल्सच्या मोठ्या समूहाची मालकी घेतली.

फोटो स्रोत, PENGUIN
इतकंच काय, कंपनीच्या मालकीबरोबरच त्यांनी ज्या हॉटेलमध्ये पहिली नोकरी केली तेही त्यांचं झालं.
फाळणीनंतर 1961 पर्यंत रावळपिंडीतील फ्लॅश मेन्स, लाहोरमधील फ्लिटिझ, पेशावरमधील डेंस आणि मरी येथील सेसल हे याच कंपनीच्या मालकीचे होते.
नंतर ते असोसिएटेड हॉटेल्स ऑफ पाकिस्तान नावाच्या कंपनीत विलीन करण्यात आलं, पण त्याचे बहुतांश शेअर्स अजूनही ओबेरॉय कुटुंबाकडे होते. मात्र, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर त्या सर्व हॉटेलांना शत्रूची मालमत्ता घोषित करून जप्त करण्यात आलं.
जनरल झियाउल हक यांचा मृत्यू
पत्रकार पॉल लुईस यांच्या मते, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल झियाउल हक यांनी त्यांना परत करण्याचं आश्वासन दिलं असलं, तरी मोहन सिंह यांना भेटण्यापूर्वीच त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.
लुईस लिहितात की, "मोहन सिंह ओबेरॉय यांनी भारतीय हॉटेल उद्योगाला विसाव्या शतकातील गरजेनुसार अनुकूल केलं होतं. त्यांना भारताचे कोनराड हिल्टन म्हटलं जायचं. त्यांच्याकडे जीर्ण आणि कमीकिंमतीची मालमत्ता शोधून आणि त्याच आधुनिकीकरण करण्याची निपुणता होती."
त्यांनी जुने आणि जीर्ण राजवाडे, ऐतिहासिक वास्तू आणि इमारतींचं रूपांतर आलिशान हॉटेल्समध्ये केलं. यामध्ये कोलकातातील द ओबेरॉय ग्रँड, कैरो येथील ऐतिहासिक मीना हाऊस आणि ऑस्ट्रेलियातील द विंडसर यांचा समावेश होतो. तर शिमल्यातील ओबेरॉय सेसलची इमारत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आली. क्लिष्ट डिझाइन आणि सजावटीनंतर ते एप्रिल 1997 मध्ये पुन्हा उघडण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
भारत, श्रीलंका, नेपाळ, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि हंगेरीमध्ये अंदाजे 35 लक्झरी हॉटेलांसह, ओबेरॉय ग्रुप टाटा समूहानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी हॉटेल कंपनी बनली.
त्यांच्या नेतृत्वाखाली ओबेरॉय ग्रुपने आपला दुसरा हॉटेल ब्रँड 'ट्रायडेंट' आणला. ट्रायडेंट हे पंचतारांकित हॉटेल आहे.
या समूहाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1966 मध्ये ओबेरॉय स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची स्थापना झाली.
हे स्कूल आता 'द ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट' म्हणून ओळखलं जातं आणि हॉस्पिटॅलिटीचं (आदरातिथ्य) उच्चस्तरीय प्रशिक्षण देतं.
महिलांसाठी नोकऱ्या
महिलांना हॉटेलमध्ये कामावर ठेवण्याबरोबरच उच्च दर्जाची खात्री देण्यासाठी संलग्न उद्योगांची स्थापना करण्याचा निर्णय देखील उल्लेखनीय आहे.
ओबेरॉय ग्रुपने 1959 मध्ये भारतात प्रथम फ्लाइट कॅटरिंग ऑपरेशन सुरू केलं. मोहन सिंह ओबेरॉय यांनी 1962 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली आणि त्यात ते यशस्वी झाले. 1967 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत उभे राहिले आणि 46 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.

फोटो स्रोत, OBEROI HOTELS
2001 मध्ये भारत सरकारने त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मभूषण' देऊन सन्मानित केलं.
बाची कर्करिया यांनी मोहन सिंह ओबेरॉय यांचं चरित्र 'डेअर टू ड्रीम : अ लाइफ ऑफ राय बहादूर मोहन सिंह ओबेरॉय' या नावानं लिहिलं आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार, एमबीएशिवाय त्यांनी आपलं 'हँड्स ऑन स्टाईल' आणि 'मॅनेजमेंट हाय वॉकथ्रू' तयार केलं. 1934 मध्ये, शिमल्यातील त्यांच्या पहिल्या 50 खोल्यांच्या क्लार्क हॉटेलमध्ये, त्यांनी स्वयंपाकघरातून अतिथी मजल्यापर्यंत खाद्यपदार्थ नेण्यासाठी लिफ्टची रचना केली.
“स्वयंपाकघरात फिरत असताना त्यांना दिसलं की उरलेले लोणी कचऱ्यात टाकलं जात आहेत. त्याऐवजी त्यांनी स्वादिष्ट पेस्ट्री बनवण्यासाठी ते त्याचे तुकडे पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला. ते आणि ईशरान यांची खरेदीवर बारीक नजर होती."
अनेक दशकांनंतर, वयाच्या जवळपास 90 व्या वर्षी, त्यांचा मुलगा पृथ्वीराज 'बिकी' याच्या प्रदीर्घ आजारपणात ते आनंदाने कामावर परतले.
"त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये गरम पाण्याच्या थर्मोस्टेट मध्ये किंचित बदल सुचवला. पाहुण्यांनी लक्षही दिले नाही तरी वीज बिलात मोठा फरक पडला. पाण्याच्या ग्लासच्या पृष्ठभागापासून ते फुलदाण्यातील गुलाबाच्या उंचीपर्यंत ते सर्व काही सांगत."
पैसा आणि काम यातील संबंध
बाची कर्करिया लिहितात की, आपल्या शेतावर वैयक्तिक स्मशानभूमी बांधणारे ते राजेशाहीशी संबंध नसलेले एकमेव व्यक्ती होते. एक शांत, वृक्षाच्छादित, राजपूत-शैलीतील छत्र्यांसह सँडस्टोन असलेली ही जागा होती. पण 1984 मध्ये त्यांचा मुलगा तिलकराज 'टिकी' आणि चार वर्षांनंतर त्यांच्या पत्नीसाठी वापरावं लागलं.
"मोहन सिंह यांनी त्यांच्या जन्माचं वर्ष 1898 ते 1900 असं बदललं, कारण त्यांना स्वत:ला 19व्या शतकातील व्यक्ती अशी ओळख द्यायची नव्हती. त्याचा मुलगा 'बिकी'ने त्याच्या इच्छेवर ताबा ठेवला असता तर हे रहस्य गुपितच राहू शकलं असतं. 1998 मध्ये त्यांनी ते दुरुस्त केलं कारण त्यांना वडिलांची शंभरी ही कोणत्याही उत्सवाशिवाय पार पडावी, असं होऊ द्यायचं नव्हत."
राय बहादूर मोहन सिंह ओबेरॉय वयाच्या 104 वर्षांपर्यंत जगले.
मोहन सिंह यांचं तत्वज्ञान होतं की, "जर तुम्ही फक्त पैशाचा विचार केला तर तुम्ही योग्य काम करणार नाहीत, पण जर तुम्ही योग्य काम केलं तर पैसा आपोआप येईल."
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








