You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात गेलेली अंजू म्हणते, 'मी नसरुल्लाहशी लग्न केलं नाही, या बातम्यांनी माझी मुलं दुःखी'
फेसबुकवर ओळख झालेल्या पाकिस्तानी मित्राला भेटायला खैबर पख्तुनख्वा प्रांतात पोहोचलेल्या भारतीय नागरिक अंजूच्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. आपण नसरुल्लाहशी लग्न केल्याच्या बातम्या तिनं फेटाळल्या आहेत.
बीबीसी प्रतिनिधी शुमायला जाफरी यांनी तिच्याशी संवाद साधला तेव्हा या लग्नाच्या बातम्यांत काहीही तथ्य नसल्याचं तिनं सांगितलं.
अंजूने आपण भारतात परतण्याच्या तयारीत असून बुधवार 26 जुलै रोजी आपण लाहोरला पोहोचू आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतात असू असं सांगितलं.
अंजू म्हणाली, माझ्या लग्नासंबंधीच्या बातम्या खोट्या आहेत. या बातम्यांमुळे माझ्या मुलांना दुःख होत आहे. या बातम्यांत काहीच तथ्य नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे.
बीबीसीशी बोलताना मलकंद परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी नासिर महमूद सती यांनी अंजू आणि नसरुल्लाह यांचा विवाह झाल्याचे स्पष्ट केलं होतं.
हा विवाह लावून देणारे शमरोज खान सांगतात, त्यांनी हुंडास्वरुपात 10,000 रुपये आणि 10 तोळे सोनं देऊन फातिमा (अंजू) चा विवाह नसरुल्लाहशी करुन दिलं होतं.
शमरोज यांच्याशी बीबीसी उर्दूचे सहयोगी पत्रकार मुहम्मद जुबैर खान यांनी संपर्क केला होता. तेव्हा शमरोज म्हणाले होते, नसरुल्लाह माझ्या ओळखीचे आहे. निकाह पढण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. आम्ही एकाच भागातले आहोत. आता कायद्यानुसार ते दोघे पती-पत्नी आहेत.
त्यांच्या निकाहाच्यावेळेस कोर्ट परिसरात संरक्षणाची मोठी व्यवस्था करण्यात आली होती, असंही अधिकारी सांगतात.
अंजूने भारतातच इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि त्या आधारावरच तिला नसरुल्लाहशी लग्न करण्याचा व्हिसा मिळाला होता असं हे अधिकारी सांगतात.
सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्लाह यांच्या विवाहाची कागदपत्रंही व्हायरल होत आहेत. मात्र, स्वतंत्रपणे त्यांची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. या कागदांवर अंजूचं नाव फातिमा असं लिहिण्यात आलं आहे.
2 दिवसांपूर्वी अंजू काय म्हणाली होती?
सोमवार 24 जुलै रोजी अंजूसी बीबीसीने संवाद साधला होता. बीबीसीने अंजूला नसरुल्लाहसोबत मैत्री आणि पाकिस्तानात साखरपुड्यासाठी पोहोचण्यावरूनही प्रश्न विचारले.
त्यावर तिने पुढील मतं मांडली होती.
- "2020 पासून मी नसरुल्लाहसोबत फेसबुकवरून बोलत होती. फेसबुकवरूनच आमचा संपर्क झाला. नसरुल्लाहला भेटण्यासाठी मी पाकिस्तानला आले आहे. इथं येऊन मला चांगलं वाटतंय. इथे लोक खूप चांगले आहेत."
- "इथे येण्याबाबतचं मी माझ्या पतीला सांगितलं नाहीय. सांगितलं असतं तर त्यांनी नकार दिला असता. मला माहित नव्हतं की, पाकिस्तानमध्ये प्रवेश करता येईल की नाही. मात्र, पाकिस्तानात पोहोचल्यानंतर पतीला सांगितलं की इकडे आलीय. मुलांशी मी सातत्यानं बोलतेय."
- "साखरपुडा आणि लग्नाबाबत सांगायचं झाल्यास मी याबाबत माझ्या पतीला सांगितलं नाहीय. मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही. मी त्यांना सांगितलंय की, परत येईन ते फक्त मुलांसाठी. माझा एक महिन्याचा व्हिसा आहे आणि दोन-चार दिवसात भारतात परतेन."
- "सर्वकाही पाहूनच साखरपुडा करण्याचा निर्णय घेईन. जर सर्व नीट वाटलं तर परतण्याच्या एक दिवस आधी साखरपुडा करेन. साखरपुड्यानंतर भारतात परतेन आणि मग पुढील प्रक्रिया पूर्ण करेन. नसरुल्लाहसोबत माझं चांगलं नातं आहे. त्याचे घरचे लोक सुद्धा चांगले आहेत. इथले लोक प्रेमाने बोलतात. माझ्यावर कुठलाच दबाव नाहीय. या लोकांना माहितही नाहीय की, माझं लग्न झालंय आणि दोन मुलं आहेत."
अंजूचे पती बीबीसीशी बोलताना काय म्हणाले होते?
अंजूचे पती अरविंद यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार मोहर सिंह मीणा यांच्याशी बोलताना सांगितलं होतं की,
- “अंजूनं 21 जलै रोजी जयपूरला जात असल्याचं सांगून घर सोडलं. त्यानंतर आमचं व्हॉट्सअपवर बोलणं होत होतं. 23 जुलैला संध्याकाळी मुलाची तब्येत खराब झाली. तेव्हा अंजूला विचारलं परत कधी येणार आहेस. तेव्हा अंजू म्हणाली की, मी आता पाकिस्तानात आहे आणि लवकरच परत येईन."
- “अंजूनं पाकिस्तानात जात असल्याबाबत कुणालाही सांगितलं नाही. तिनं आधीच पासपोर्ट बनवला होता हे आम्हाला आधीपासून माहित होतं."
- “माझं वय 40 असून अंजूचं वय 35 आहे. आम्ही दोघेही उत्तर प्रदेशातील असून, गेल्या काही वर्षांपासून भिवाडीमध्ये राहतोय. 2007 साली आमचं लग्न झालं आणि आम्हाला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी 15 वर्षांची, तर मुलगा छोटा आहे. दोघेही शाळेत जातात.”
अंजू आणि अरविंद दोघेही भिवाडीत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात.
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)